पृथ्वीवर येशूच्या शेवटल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा
सा.यु. ३३. यहुद्यांच्या निसान महिन्यातील आज सातवा दिवस. रोमी शासनाधीन असणाऱ्या यहुदिया प्रांतात होत असलेल्या घटनांचे चित्र डोळ्यापुढे उभे करा. जेरिकोचा हिरवागार वनप्रदेश मागे टाकून येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य आता एका धूळकट नागमोडी वाटेवरून जाताहेत. वार्षिक वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आणखीही कितीतरी पथिक वर जेरुसलेमकडे जाताहेत. चढण थकविणारे तर आहे, पण ख्रिस्ताच्या शिष्यांच्या मनांत मात्र वेगळीच घालमेल चालली आहे.
रोमी लोकांच्या जुलमी शासनातून आपल्याला सोडवेल अशा एका मशीहाची, यहुदी लोक केव्हापासून अधीरतेने वाट पाहत होते. नासरेथकर येशू हाच तो मशीहा आहे अशी पुष्कळांची श्रद्धा आहे. साडेतीन वर्षांपासून त्याने केलेला देवाच्या राज्याचा प्रचार, त्याचे आजारी लोकांना बरे करणे, उपाशी लोकांना जेवू घालणे, या सर्वांमुळे खऱ्या अर्थाने लोकांना दिलासा मिळाला आहे. पण धार्मिक पुढारी, येशूने त्यांची जोरदार निंदा केल्यामुळे फारच क्रोधिष्ट झाले आहेत आणि कसा एकदाचा त्याचा काटा काढावा हा एकच ध्यास त्यांना लागला आहे. येशू मात्र त्या खडखडीत पायवाटेवरून आपल्या शिष्यांपुढे चालला आहे, एका निश्चित उद्देशानिशी.—मार्क १०:३२.
येशू आणि त्याचे सोबती बेथानी गावात पोचतात तोवर समोर जैतुनांच्या डोंगरामागे सूर्य विसावू लागला आहे. पुढच्या सहा रात्रींसाठी ते येथेच मुक्काम करणार आहेत. त्यांचे प्रिय स्नेही, अर्थात लाजार, मरिया आणि मार्था त्यांच्या स्वागताला थांबून आहेत. दिवसभर उन्हात प्रवास केल्यावर संध्याकाळचा गारवा हवाहवासा वाटतो; निसान ८ चा शब्बाथ सुरू झाला आहे.—योहान १२:१, २.
निसान ९
शब्बाथ संपला असून, जेरुसलेममध्ये आज बरीच वर्दळ आहे. वल्हांडण साजरा करण्यासाठी आलेल्या हजारो लोकांनी नगरात एकच गर्दी केली आहे. पण, यंदा एरवीपेक्षा जरा जास्तच गलबला ऐकू येतोय. काय भानगड आहे हे जाणून घेण्यास अधीर झालेल्या लोकांच्या झुंडी लगबगीने शहराच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जात आहेत. गजबजलेल्या प्रवेशद्वारांतून कशीबशी वाट काढून बाहेर पडताच त्यांना एक भलतेच विलक्षण दृश्य दिसते! जैतुनांच्या उतरणीवर, बेथफगे गावाकडून येणाऱ्या रस्त्यावरून कितीतरी लोक मोठ्या आनंदाने जेरुसलेमच्या दिशेने येत आहेत. (लूक १९:३७) या सर्वाचा अर्थ काय?
पाहा! नासरेथकर येशू गाढवीच्या शिंगरावर बसून येतोय. लोक रस्त्यावर त्याच्यापुढे आपली वस्त्रे पसरवीत आहेत. आणखी काही लोक खजुरीच्या ताज्या झावळ्या घेऊन, “प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा धन्यवादित असो,” असा आनंदाने उद्घोष करीत आहेत.—योहान १२:१२-१५.
जमाव हळूहळू जेरुसलेमजवळ येतो; येशू शहराकडे पाहतो तेव्हा त्याच्या भावना उचंबळून येतात. या शहराचा नाश होणार असे भाकीत करून तो रडू लागतो. थोड्या वेळाने मंदिरात आल्यावर येशू लोकसमुदायांना उपदेश करतो, आणि त्याच्याकडे आलेल्या आंधळ्या, पांगळ्या लोकांना बरे करतो.—मत्तय २१:१४; लूक १९:४१-४४, ४७.
या सर्व गोष्टी मुख्य याजकांच्या आणि शास्त्र्यांच्या नजरेतून निसटत नाहीत. येशूची महत्कृत्ये आणि जमावांचा हर्षोल्लास पाहून त्यांचा तर नुसता तिळपापड होतोय! संताप अनावर होऊन शेवटी परूशी येशूला निक्षून म्हणतात: “गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा.” येशू त्यांना उत्तर देतो, “मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले, तर धोंडे ओरडतील.” तेथून निघून जाण्याआधी, मंदिरात चाललेल्या व्यापारधंद्यावर येशूचे लक्ष जाते.—लूक १९:३९, ४०; मत्तय २१:१५, १६; मार्क ११:११.
निसान १०
येशू जरा लवकरच मंदिरात येतो. आपल्या पित्याच्या, यहोवा देवाच्या उपासनेला धडधडीत व्यापाराचे रूप दिलेले त्याने काल पाहिले, तेव्हा तो चांगलाच संतापला होता. म्हणूनच तो मोठ्या आवेशाने, मंदिरात खरेदी किंवा विक्री करीत असलेल्यांना बाहेर हाकून लावण्यास सुरवात करतो. लोभी सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या करून तो मोठ्याने म्हणतो: “‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहा.”—मत्तय २१:१२, १३.
येशूची ही कृत्ये आणि त्याचे जाहीर उपदेश देणे मुख्य याजक, शास्त्री आणि पुढारी यांच्या डोळ्यांत सलते. कधी एकदाचे याला मारून टाकतो असे त्यांना झाले आहे! पण जमावाच्या भीतीने ते मागेपुढे पाहात आहेत, कारण सर्व लोक येशूच्या शिकवणुकींनी विस्मित होऊन ‘त्याचे मन लावून ऐकत आहेत.’ (लूक १९:४७, ४८) दिवेलागणीच्या सुमारास, येशू आणि त्याचे सोबती रात्रीचा विश्राम करण्यासाठी फिरत फिरत बेथानीला परततात.
निसान ११
भल्या पहाटे, येशू आणि त्याचे शिष्य जैतुनांच्या डोंगरावरून जेरुसलेमच्या दिशेने निघाले आहेत. ते मंदिरात पोचले न पोचले तोच मुख्य याजक आणि वडीलधारी पुरुष येशूला गाठतात. मंदिरातील सराफ आणि व्यापाऱ्यांविरुद्ध त्याने केलेल्या कारवाईची आठवण अद्याप त्यांच्या मनात ताजी आहे. द्वेषक्रोधाने भरलेले त्याचे शत्रू त्याला सवाल करतात: “तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” येशू त्यांना उलट सवाल करतो, “मीहि तुम्हास एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करितो ते मीहि तुम्हास सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?” लगेच एकमेकांजवळ येऊन हे विरोधक विचारविनिमय करू लागतात: “स्वर्गापासून म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेविला नाही? बरे, माणसांपासून म्हणावे तर आपल्याला लोकांची भीति वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात.” इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाल्यामुळे ते निमूटपणे सांगून टाकतात: “आम्हाला ठाऊक नाही.” येशू पण शांतपणे उत्तर देतो: “तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करीत आहे ते मीहि तुम्हास सांगत नाही.”—मत्तय २१:२३-२७.
येशूचे शत्रू आता नवी शक्कल लढवतात; ते असे काहीतरी त्याच्या तोंडून काढण्याचा प्रयत्न करू लागतात, ज्यामुळे त्याला अटक करण्याचे निमित्त मिळेल. ते त्याला प्रश्न करतात, “कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” त्यांची युक्ती ओळखून येशू म्हणतो, “कराचे नाणे मला दाखवा.” तो त्यांनाच उलट प्रश्न करतो: “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” “कैसराचा,” ते उत्तर देतात. “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा,” असे सर्वांना ऐकू येईल अशा रितीने सणसणीत उत्तर देऊन येशू त्यांना बाद करतो.—मत्तय २२:१५-२२.
सडेतोड उत्तरे देऊन आपल्या शत्रूंची तोंडे बंद केल्यावर येशू आता जमावापुढे आणि आपल्या शिष्यांपुढे आपला रोष व्यक्त करतो. शास्त्री आणि परूशी यांचा तो कसा समाचार घेतो ते पाहा. “त्यांच्या कृत्यांप्रमाणे करू नका,” तो म्हणतो, “कारण ते सांगतात पण तसे करीत नाहीत.” आंधळे वाटाडे आणि ढोंगी म्हणून त्यांचे पितळ उघडे पाडून, तुम्हाला हायहाय असे तो वारंवार त्यांना म्हणतो. “अहो सापांनो, फुरश्यांच्या पिलांनो,” येशू म्हणतो, “तुम्ही गेहेन्नातला दंड कसा चुकवाल?”—मत्तय २३:१-३३, पं.र.भा.
या जळजळत्या दोषारोपाचा असा मुळीच अर्थ नाही की येशूला इतरांचे चांगले करणे दिसतच नाही. थोड्या वेळाने तो लोकांना मंदिरातल्या भांडारात दान टाकताना पाहतो. एका गरीब विधवेला तिची होती नव्हती ती सर्व उपजीविका, अगदीच कमी मोलाच्या दोन टोल्या भांडारात टाकताना तो पाहतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणाला पीळ पडतो! मोठ्या कौतुकाने तिची प्रशंसा करीत तो असे म्हणतो की, “आपल्या समृद्धीतून” सढळ हाताने दान देणाऱ्या इतरांपेक्षा, खरे तर या विधवेचे दान कितीतरी पटीने मोठे आहे. आपल्या परीने एक व्यक्ती जे काही करू शकते, कोमल करुणामयी येशू त्याची कदर बाळगतो.—लूक २१:१-४.
येशू आता मंदिरातून बाहेर पडतो; मंदिरातून बाहेर पडण्याची ही त्याची शेवटची वेळ. त्याचे काही शिष्य, ते भव्यदिव्य मंदिर “उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे,” याविषयी बोलत असतात. पण येशूचे उत्तर ऐकून ते थक्क होतात; येशू म्हणतो: “असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहा त्यांतला पाडला जाणार नाही असा चिऱ्यावर चिरा राहणार नाही.” (लूक २१:५, ६) गर्दीतून वाट काढत येशूच्या मागोमाग शहराबाहेर येताना, येशूच्या शब्दांचा काय अर्थ असावा हाच प्रश्न प्रेषितांच्या मनात घोळत राहतो.
काही वेळानंतर, येशू आणि त्याचे प्रेषित जैतुनांच्या डोंगरावरील नीरव शांततेत विसावा घेत असतात. जेरुसलेम आणि मंदिराचे भव्य दृश्य पाहून पेत्र, याकोब, योहान आणि अंद्रिया येशूच्या धक्केदायक भाकितावर खुलासा करण्याची विनंती करतात. ते म्हणतात, “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे [“उपस्थितीचे,” NW] व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांस सांगा.”—मत्तय २४:३; मार्क १३:३, ४.
या प्रश्नाच्या उत्तरात सर्वोत्तम शिक्षक येशू, एक अत्यंत उल्लेखनीय भविष्यवाणी करतो. तो मोठमोठ्या लढाया, भूमिकंप, दुष्काळ आणि मऱ्या होतील असे भाकीत करतो. राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल असेही येशू भाकीत करतो. तो ताकीद देतो, “जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल.”—मत्तय २४:७, १४, २१; लूक २१:१०, ११.
चौघे प्रेषित अगदी कान देऊन ऐकत असतात; येशू ‘आपल्या उपस्थितीच्या चिन्हाच्या’ विविध पैलूंवर विवरण देतो. ‘जागृत राहणे’ किती आवश्यक आहे, यावर तो विशेष भर देतो. का? “कारण,” तो स्वतःच सांगतो, “घरधनी केव्हा येईल, . . . हे तुम्हाला माहीत नाही.”—मत्तय २४:४२; मार्क १३:३३, ३५, ३७.
येशू आणि त्याच्या प्रेषितांच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय दिवस होता. किंबहुना, येशूची अटक, चौकशी होण्याआधी आणि त्याला मरणदंड दिला जाण्याआधी हा सार्वजनिक सेवा कार्याचा त्याचा शेवटला दिवस आहे. उशीर होत असल्यामुळे, ते बेथानीपर्यंतचे थोडेसे अंतर पार करण्यासाठी डोंगरावरून चालू लागतात.
निसान १२ आणि १३
निसान १२ हा दिवस येशू एकान्तात आपल्या शिष्यांच्या सहवासात घालवतो. धार्मिक पुढारी आपला जीव घ्यायला टपलेले आहेत याची येशूला जाणीव आहे; पण वल्हांडण सणात कोणतीच बाधा आणण्याची संधी येशू त्यांना देऊ इच्छित नाही. (मार्क १४:१, २) दुसऱ्या दिवशी, म्हणजे निसान १३ रोजी लोक वल्हांडणाची तयारी उरकण्याच्या घाईत आहेत. दुपारीच येशू, पेत्र आणि योहान यांना जेरुसलेममधील एका माडीवरच्या खोलीत वल्हांडण साजरा करण्याची तयारी करण्यासाठी पाठवतो. (मार्क १४:१२-१६; लूक २२:८) सूर्य मावळण्याच्या बेतात असताना, येशू आणि बाकीचे दहा प्रेषितही शेवटला वल्हांडण सण साजरा करण्यासाठी तेथे जातात.
निसान १४, सूर्यास्तानंतर
जेरुसलेम शहर संधिप्रकाशात न्हाऊन निघाले आहे; जैतुनांच्या डोंगरावर पौर्णिमेचा चंद्र उगवतो आहे. सजवलेल्या एका मोठ्या खोलीत येशू आणि त्याचे बारा प्रेषित त्यांच्यासाठी तयार केलेल्या मेजाभोवती बसलेले आहेत. तेव्हा येशू म्हणतो, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हांबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती.” (लूक २२:१४, १५) काही वेळानंतर, येशू मेजावरून उठून आपली बाह्यवस्त्रे काढून बाजूला ठेवतो तेव्हा प्रेषित बुचकळ्यात पडतात. रुमाल आणि पाण्याचे गंगाळ घेऊन येशू त्यांचे पाय धुऊ लागतो. विनम्र सेवाभावाचा केवढा अविस्मरणीय धडा!—योहान १३:२-१५.
पण याच लोकांपैकी एकाने—यहुदा इस्कार्योताने—धार्मिक पुढाऱ्यांसोबत मिळून आपला विश्वासघात करण्याचा कट रचला आहे याची येशूला पुरेपूर कल्पना आहे. साहजिकच तो अत्यंत व्याकूळ होतो. तो त्यांना उघडपणे सांगतो, “तुमच्यातला एक जण मला धरून देईल.” हे ऐकून प्रेषितांना अत्यंत दुःख होते. (मत्तय २६:२१, २२) वल्हांडण साजरा केल्यानंतर, येशू यहुदाला म्हणतो: “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”—योहान १३:२७.
यहुदा गेल्यानंतर, येशू लवकरच होणार असलेल्या आपल्या मृत्यूच्या स्मरणार्थ एका भोजनाची सुरवात करतो. बेखमीर भाकरी घेऊन, उपकारस्तुतीची प्रार्थना करून तो ती मोडतो आणि त्या ११ जणांना खाण्यास सांगतो. तो त्यांना म्हणतो, “हे माझे शरीर आहे; ते तुम्हांसाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” मग तो तांबड्या द्राक्षरसाचा प्याला उचलतो. त्यावर आशीर्वाद देऊन तो प्याला त्यांना देतो आणि त्यातून पिण्यास सांगतो. पुढे तो म्हणतो: “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.”—लूक २२:१९, २०; मत्तय २६:२६-२८.
त्या महत्त्वपूर्ण संध्याकाळी, येशू आपल्या विश्वासू प्रेषितांना कित्येक महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो; उदाहरणार्थ, बंधुप्रेमाच्या महत्त्वाविषयी. (योहान १३:३४, ३५) त्यांना एक “कैवारी” अर्थात पवित्र आत्मा दिला जाईल याची तो त्यांना हमी देतो. येशूने सांगितलेल्या सर्व गोष्टींची तो त्यांना आठवण करून देईल. (योहान १४:२६) संध्याकाळ आणखी थोडी सरल्यावर, येशू त्यांच्याकरता कळकळीने प्रार्थना करतो, ती ऐकून नक्कीच त्यांना बरीच हिंमत मिळाली असावी. (योहान, अध्याय १७) रात्र बरीच सरली आहे; स्तुतीची भजने गाऊन ते माडीवरच्या खोलीतून येशूच्या मागोमाग बाहेरच्या थंड हवेत येतात.
किद्रोनचे खोरे पार करून येशू आणि त्याचे प्रेषित आपल्या आवडत्या ठिकाणी अर्थात, गेथशेमाने बागेत येतात. (योहान १८:१, २) प्रेषित तेथेच थांबतात, येशू मात्र प्रार्थना करण्यासाठी तेथून थोड्या अंतरावर जातो. कळकळीने तो देवाकडे मदतीसाठी विनवणी करतो; त्याच्या मनावर असणारा भावनिक ताण शब्दांपलीकडला आहे. (लूक २२:४४) आपण उणे पडलो तर आपल्या प्रिय स्वर्गीय पित्यावर किती मोठा कलंक येईल या विचारानेच त्याला अतीव वेदना होत असतात.
येशूची प्रार्थना संपली न संपली तोच तलवारी, सोटे व मशाली घेऊन आलेल्या मोठ्या जमावासोबत यहुदा इस्कार्योत तेथे येतो. “गुरुजी, सलाम!” असे म्हणून यहूदा हलकेच येशूचे चुंबन घेतो. येशूला अटक करण्यासाठी ही एक खूण होती. एकाएकी, पेत्र आपली तलवार उपसतो आणि मुख्य याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकतो. येशू मात्र या माणसाचा कान बरा करतो आणि पेत्राला म्हणतो, “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.”—मत्तय २६:४७-५२.
एकापाठोपाठ एक कितीतरी घटना घडतात! येशूला अटक करून बांधले जाते. भीतीपोटी, गोंधळून गेलेले प्रेषित आपल्या धन्याला एकटे टाकून पळ काढतात. येशूला भूतपूर्व प्रमुख याजक हन्ना याच्याकडे नेले जाते. मग चौकशीसाठी तत्कालीन प्रमुख याजक कयफा याच्याकडे. पहाटे पहाटे, यहुदी न्यायसभा येशूला देवाविरुद्ध दुर्भाषण केल्याबद्दल अन्यायीपणे दोषी ठरवते. यानंतर, कयफाच्या सांगण्यावरून त्याला रोमी सुभेदार पंतय पिलात याच्यापुढे नेले जाते. पंतय पिलात त्याला गालीलचा राजा, हेरोद अंतिपा याच्याकडे पाठवतो. हेरोद आणि त्याचे शिपाई येशूची टर उडवतात. मग त्याला पुन्हा पिलाताकडे पाठवण्यात येते. पिलात येशूच्या निर्दोषपणाचे पुन्हा एकदा समर्थन करतो. पण यहुद्यांचे धार्मिक पुढारी येशूला मृत्यूदंड सुनावण्याचे त्याच्यावर दडपण आणतात. शाब्दिक आणि शारीरिक स्वरूपाच्या अकथनीय यातना दिल्यानंतर, येशूला गुलगुथा या ठिकाणी नेऊन निर्दयपणे वधस्तंभावर खिळण्यात येते; येथे भयंकर यातना सोसताना येशूचा मृत्यू होतो.—मार्क १४:५०–१५:३९; लूक २३:४-२५.
येशूच्या मृत्यूने त्याचे जीवन कायमचे संपुष्टात आले असते, तर इतिहासात ही सर्वात मोठी शोकांतिका ठरली असती. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, असे घडले नाही. निसान १६, सा.यु. ३३ रोजी त्याला मृतांमधून जिवंत केलेले पाहून त्याचे शिष्य थक्क होतात. नंतर, ५०० हून अधिक लोकांना येशू पुन्हा जिवंत झाला असल्याची स्वतः खात्री करण्याची संधी मिळते. आणि त्याच्या पुनरुत्थानानंतर ४० दिवसांनी, विश्वासू अनुयायांच्या एका समूहाला, त्याचे स्वर्गारोहण होताना पाहायला मिळते.—प्रेषितांची कृत्ये १:९-११; १ करिंथकर १५:३-८.
येशूचे जीवन आणि तुम्ही
या सर्वाचा तुमच्यावर—आपल्या सर्वांवर कसा परिणाम होतो? येशूचे सेवाकार्य, त्याचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान यहोवा देवाला गौरवितात आणि त्याच्या महान उद्देशाच्या पूर्तीसाठी अत्यावश्यक आहेत. (कलस्सैकर १: १८-२०) आपल्यासाठीही ते अतिमहत्त्वपूर्ण आहेत कारण येशूच्या बलिदानाच्या आधारावर आपल्या पापांची क्षमा होणे शक्य झाले आहे आणि आपण यहोवा देवासोबत एक वैयक्तिक नातेसंबंध जोडू शकतो.—योहान १४:६; १ योहान २:१, २.
मानवांतील मृतांवरही याचा परिणाम होतो. येशूच्या पुनरुत्थानामुळे त्यांना देवाच्या वचनयुक्त परादीस पृथ्वीवर पुन्हा जीवन देण्याचा मार्ग मोकळा होतो. (लूक २३:३९-४३; १ करिंथकर १५:२०-२२) याबाबतीत तुम्हाला आणखीन माहिती हवी असल्यास, आम्ही तुम्हाला एप्रिल ११, १९९८ रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या तुमच्या परिसरातल्या कोणत्याही सभागृहात ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देत आहोत.
[६ पानांवरील चौकट]
“लुटारूंची गुहा”
लोभी व्यापाऱ्यांनी देवाच्या मंदिरास “लुटारूंची गुहा” करून टाकले असे येशूने काही उगाच म्हटले नाही. (मत्तय २१:१२, १३) मंदिराचा कर भरण्यासाठी, इतर देशांतून आलेल्या यहुदी आणि यहुदी मतानुसारी यांना आपल्या परदेशी चलनाच्या ऐवजात कर म्हणून देता येईल असे चलन घ्यावे लागायचे. मशीहा येशूचे जीवन आणि काळ (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात, ॲल्फ्रेड एडरशाइम यांनी वर्णन केल्यानुसार, पैशांची अदलाबदल करून देणारे हे सराफ आदार १५ रोजी म्हणजे वल्हांडणाच्या एका महिन्याच्या आधीपासूनच रोमी प्रांतांत आपली दुकाने थाटून बसायचे. मग आदार २५ पासून, ठिकठिकाणांहून येणाऱ्या असंख्य यहुदी आणि यहुदी मतानुसारी यांच्याकडून भरमसाट फायदा उकळण्यासाठी हे सराफ जेरुसलेम येथील मंदिराच्या परिसरात येत असत. पैसे बदलून देताना प्रत्येक नगामागे एक ठराविक किंमत घेतली जात असे; अशारितीने या दुकानदारांचा बेसुमार धंदा चालायचा. येशूने त्यांना लुटारू म्हटले यावरून असे दिसून येते की हे लोक फार मोठी किंमत आकारत असावेत, दुसऱ्या शब्दांत ते गरिबांची पिळवणूक करीत होते.
काहीजण बलिदानांसाठी स्वतःची जनावरे आणू शकत नव्हते. पण जे स्वतःची जनावरे सोबत घेऊन यायचे, त्यांना मंदिरातल्या पाहणी करणाऱ्याकडून आपल्या जनावराची तपासणी करून घ्यावी लागत असे—तेही किंमत देऊन. इतक्या दुरून आपल्यासोबत जनावर आणल्यावर ते अयोग्य ठरवले जाण्याचा धोका होता; तो टाळण्यासाठी अनेकजण मंदिरातल्याच एखाद्या पैसेखाऊ दुकानदाराकडून याजकांनी आधीच “योग्य ठरवलेले” जनावर विकत घेत असत. एका अभ्यासकाच्या मते, “कितीतरी गरीब शेतकऱ्यांची येथे चांगलीच हजामत होत असे.”
एकेकाळी मुख्य याजकाचे पद भुषवलेल्या हन्ना आणि त्याच्या कुटुंबियांचे देखील मंदिराच्या व्यापाऱ्यांशी लागेबांधे होते असे पुराव्यावरून दिसून येते. रब्बींच्या लिखाणांमध्ये “हन्नाच्या पुत्रांच्या [मंदिरातील] बाजारपेठा,” असा उल्लेख आढळतो. सराफांकडून आणि मंदिराच्या परिसरात होणाऱ्या जनावरांच्या विक्रीतून वसूल केलेली रक्कम ही त्यांची एक प्रमुख मिळकत होती. एका अभ्यासकाने म्हटल्याप्रमाणे येशूने त्या व्यापारांना हाकून लावण्यासाठी जी कारवाई केली तिच्यामुळे “याजकांच्या प्रतिष्ठेलाच नव्हे, तर त्यांच्या तिजोऱ्यांनाही धक्का बसला.” त्याचे शत्रू मात्र कसेही करून त्याचा काटा काढू इच्छित होते!—लूक १९:४५-४८.
[४ पानांवरील तक्ता]
येशूच्या मानवी जीवनाचे शेवटले दिवस
निसान सा.यु.३३ घटना सर्वश्रेष्ठ मनुष्य*
७ शुक्रवार येशू आणि त्याचे शिष्य १०१, परि. १
जेरिकोहून जेरुसलेमला जातात
(निसान ७ ही तारीख रविवार,
एप्रिल ५, १९९८ या तारखेशी
जुळते, मात्र हिब्रू लोक एका
संध्याकाळपासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत
एक दिवस मोजत असत)
८ शुक्रवार संध्याकाळ येशू आणि त्याचे शिष्य १०१, परि. २-४
बेथानी येथे येतात; शब्बाथ सुरू
शनिवार शब्बाथ(सोमवार, एप्रिल ६, १९९८) १०१, परि.४
९ शनिवार संध्याकाळ शिमोन नावाच्या कुष्टरोग्याकडे १०१, परि.५-९
जेवण; मरिया जटामांसीच्या तेलाने
येशूचा अभिषेक करते; कित्येक
जण येशूला पाहण्यासाठी आणि
त्याचे उपदेश ऐकण्यासाठी
जेरुसलेमहून येतात
रविवार विजयी राजाच्या थाटात १०२
जेरुसलेमेत प्रवेश; मंदिरात उपदेश
१० सोमवार पहाटेच जेरुसलेमेस जाणे; १०३, १०४
मंदिराचे शुद्धीकरण; स्वर्गातून
यहोवाची वाणी
११ मंगळवार जेरुसलेममध्ये, मंदिरात १०५ ते ११२
दृष्टान्तांच्या साहाय्याने उपदेश; परि. १
परूशांवर दोषारोप; विधवेच्या
दानाची प्रशंसा; भविष्यातील आपल्या
उपस्थितीचे चिन्ह सांगतो
१२ बुधवार बेथानीत शिष्यांसोबत ११२, परि.२-४
एकान्तात; यहुदा
विश्वासघाताचा कट रचतो
१३ गुरुवार पेत्र आणि योहान ११२, परि.५ ते
जेरुसलेममध्ये वल्हांडणाची ११३, परि.१
तयारी करतात; येशू आणि
बाकीचे दहा प्रेषित देखील
दुपारी तेथे जातात (शनिवार,
एप्रिल ११, १९९८)
१४ गुरुवार संध्याकाळ वल्हांडण साजरा करणे; ११३, परि.२
येशू प्रेषितांचे पाय धुतो; ते ११७
यहुदा येशूला विश्वासघाताने
धरून देण्यासाठी बाहेर जातो;
ख्रिस्त आपल्या मृत्यूचा स्मारक
विधी सुरू करतो
(सूर्यास्तानंतर, शनिवार,
एप्रिल ११, १९९८)
मध्यरात्रीनंतर गेथशेमाने बागेत ११८ ते १२०
विश्वासघाताने धरून दिले
जाते, अटक; प्रेषित पळ
काढतात;मुख्य याजक
आणि न्यायसभेपुढे चौकशी;
पेत्र येशूला नाकारतो
शुक्रवार सूर्योदयापासून पुन्हा न्यायसभेपुढे; १२१ ते १२७
सूर्यास्तापर्यंत पिलाताकडे, मग हेरोदाकडे, परि. ७
पुन्हा पिलाताकडे; मृत्यूदंड
ठोठावला जातो; वधस्तंभावर
खिळतात; पुरले जाते
१५ शनिवार शब्बाथ; पिलात येशूच्या १२७, परि. ८-१०
कबरेवर पहारा ठेवण्याची
परवानगी देतो
१६ रविवार येशूचे पुनरुत्थान १२८
* या सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकातील अध्यायांच्या संख्या आहेत. येशूच्या सेवा कार्याच्या शेवटल्या टप्प्यांची सविस्तर माहिती देणाऱ्या शास्त्रवचनांच्या संदर्भांकरता ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित व लाभदायक आहे,’ (इंग्रजी) या पुस्तकातील पृष्ठ २९० वर दिलेला तक्ता पाहा. ही पुस्तके वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केली आहेत.