वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१५ पृ. ४-७
  • कृतज्ञतेचा आत्मा विकसित करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कृतज्ञतेचा आत्मा विकसित करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कृतघ्नतेचे मूळ कारण
  • मनन आवश्‍यक!
  • कृतज्ञता व्यक्‍त करणे
  • देवास कृतज्ञता
  • “सर्व गोष्टींसाठी आभार माना”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • कृतज्ञ का असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • कृतज्ञता
    सावध राहा!—२०१६
  • उपकाराची जाणीव का बाळगावी?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१५ पृ. ४-७

कृतज्ञतेचा आत्मा विकसित करा

न्यूयॉर्क राज्यातील एक डॉक्टर, मेरीला मृत्यूच्या विळख्यातून सोडवून जीवनदान देतो. पण, ५० वर्षीय मेरी त्या डॉक्टरचे आभार मानीत नाही किंवा त्याचे बिलही भरत नाही. किती हा कृतघ्नतेचा प्रकार!

बायबलमध्ये एक वृत्तान्त आहे; येशू एका शहरात प्रवेश करतो तेव्हा त्याच्यासमोर कुष्ठरोग झालेले दहा पुरुष येतात. ते मोठ्याने ओरडून त्याला म्हणतात: “येशू, गुरुजी, आम्हावर दया करा.” येशू त्यांना आज्ञा करतो: “तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा.” ते येशूचे ऐकतात आणि मार्गावर असतानाच त्यांना जाणवते व ते पाहतात की त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला आहे.

बरे झालेले नऊ कुष्ठरोगी आपआपल्या मार्गाने जातात. पण, शोमरोनी असलेला एक पुन्हा येशूकडे येतो. तो देवाची स्तुती करतो आणि येशूला भेटल्यावर त्याच्या पाया पडून त्याचे आभार मानतो. येशू त्याला म्हणतो: “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत? ह्‍या परक्यावाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?”—लूक १७:११-१९.

“मग नऊ जण कोठे आहेत?” या प्रश्‍नावरून एक महत्त्वपूर्ण धडा मिळतो. मेरीप्रमाणेच त्या नऊ कुष्ठरोग्यांनी एक घोडचूक केली होती—त्यांनी आभार मानले नव्हते. अशाप्रकारची कृतघ्न वृत्ती आज आपल्याला चौफेर पाहायला मिळते. याचे कारण काय असावे?

कृतघ्नतेचे मूळ कारण

कृतघ्नतेचा उगम स्वार्थीपणातून निघतो. आपले पहिले मानवी पालक, आदाम आणि हव्वा यांचेच उदाहरण घ्या. यहोवाने त्यांना ईश्‍वरी गुणधर्मांसह निर्माण केले आणि त्यांना सुख मिळेल अशा सर्व गोष्टी पुरवल्या; जसे की, त्यांना मनोरम बागेसमान घर दिले, त्यांच्या आजूबाजूचा परिसर दोषरहित होता, अर्थपूर्ण आणि समाधान देणारे काम होते. (उत्पत्ति १:२६-२९; २:१६, १७) तरीसुद्धा, सैतानाने त्यांच्या मनात स्वार्थी इच्छा जागृत केल्या आणि या दबावाखाली ते आज्ञाभंजक झाले व यहोवाच्या दयाळूपणाचा त्यांनी अपमान केला.—उत्पत्ति ३:१-५; प्रकटीकरण १२:९.

आपली खास मालमत्ता होण्याकरता देवाने ज्यांची निवड केली त्या प्राचीन इस्राएल लोकांचाही जरा विचार करा. सा.यु.पू. १५१३ च्या निसान १४ च्या रात्री, सर्व इस्राएल पालकांनी किती आभार मानले असतील! त्या संस्मरणीय रात्री, देवाच्या देवदूताने ‘मिसर देशातील सर्व प्रथम जन्मलेल्यांना’ मारून टाकले; पण योग्यरीतीने चिन्हित असलेल्या इस्राएल लोकांचे घर ओलांडले. (निर्गम १२:१२, २१-२४, ३०) तसेच, तांबड्या समुद्राजवळ फारोच्या सैन्यापासून सोडवण्यात आल्यानंतर, कृतज्ञ अंतःकरणांनी ‘मोशे आणि इस्राएल लोक ह्‍यांनी यहोवाला गीत गाईले.’—निर्गम १४:१९-२८; १५:१-२१.

तरीपण, इजिप्त सोडून काही आठवडेच झाले होते आणि ‘इस्राएल लोकांची सर्व मंडळी कुरकूर करू लागली.’ किती लवकर ते कृतघ्न बनले! मिसर देशात दास्यावस्थेत असताना, “मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवीत” होते; पण आता तसे नव्हते याची त्यांना खंत वाटत होती. (निर्गम १६:१-३) स्वार्थीपणा कृतज्ञता विकसित करण्याविरुद्ध व प्रदर्शित करण्याविरुद्ध कार्य करतो हे स्पष्ट झाले.

पापी आदामाचे वंशज असल्यामुळे सर्व मानवांत जन्मतःच स्वार्थीपणाचा अंश असतो व कृतघ्नतेकडे कल असतो. (रोमकर ५:१२) कृतघ्नता हा गुण सुद्धा, आज जगावर ज्या स्वार्थी आत्म्याचे वर्चस्व आहे त्याचाच भाग आहे. आपण जी हवा श्‍वासोच्छ्‌वास करतो तिच्याप्रमाणे तो आत्मा सगळीकडे आहे आणि आपल्यावरही त्याचा परिणाम होतो. (इफिसकर २:१, २) यास्तव, आपण कृतज्ञता दाखवण्याची वृत्ती विकसित करणे आवश्‍यक आहे. ती कशी करता येईल?

मनन आवश्‍यक!

“आभार व्यक्‍त करण्याची स्थिती: उपकारकर्त्याप्रती प्रेमळ आणि स्नेही भावना जी उपकाराची परतफेड करण्यास एखाद्याला प्रवृत्त करते,” अशी कृतज्ञतेची व्याख्या केली जाऊ शकते. भावनेला यंत्राप्रमाणे चालू-बंद करता येत नाही; ती एखाद्याच्या आतून आपण होऊन येण्यास हवी. आपण कृतज्ञता व्यक्‍त करतो तेव्हा त्यावरून केवळ शिष्टाचार किंवा सभ्यताच प्रकट होत नाही; ती भावना आपल्या अंतःकरणातून येते.

आपण हृदयापासून कृतज्ञता व्यक्‍त करण्यास कसे शिकू शकतो? बायबलनुसार, आपल्या विचारांचा आपल्या भावनेशी संबंध आहे. (इफिसकर ४:२२-२४) आपल्याला दाखवलेल्या दयाळुपणावर गुणग्राहकतेने मनन केल्याने आपण कृतज्ञ होण्यास शिकतो. याबद्दलच, मानसिक आरोग्य क्षेत्रातील डॉ. वेन डब्ल्यू. डायर असे म्हणतात: “पहिल्यांदा तुमच्या मनात विचार आल्याशिवाय तुमच्यामध्ये भावना उत्पन्‍न होऊच शकत नाहीत.”

उदाहरणार्थ, आपल्या सभोवतालच्या सृष्टीबद्दल आभार व्यक्‍त करण्याबाबत जरा विचार करा. एका निरभ्र रात्री चांदण्यांनी डवरलेल्या आकाशाकडे तुम्ही पाहता तेव्हा, तुम्ही जे अनुभवत आहात त्याविषयी तुम्हाला कसे वाटते? राजा दाविदाने त्याला वाटणारे भय अशाप्रकारे व्यक्‍त केले: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य, व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर—मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?” रात्रीच्या एकान्तात, चांदण्या जणू काय दाविदाशी हितगूज करत होत्या आणि त्याला असे लिहावयास प्रवृत्त केले: “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृति दर्शविते.” ते तारामय आकाश दाविदाला इतके का भिडले? तो स्वतःच त्याचे उत्तर देतो: “तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करितो.”—स्तोत्र ८:३, ४; १९:१; १४३:५.

दाविदाचा पुत्र शलमोन याने देखील, सृष्टीच्या आश्‍चर्यांबद्दल विचार करण्याचे महत्त्व जाणले. जसे की, आपल्या पृथ्वीला तजेला देणाऱ्‍या मेघांच्या भूमिकेविषयी त्याने लिहिले: “सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनः पुनः वाहत राहतात.” (उपदेशक १:७) पावसाने व नद्यांनी पृथ्वीला ताजेतवाने केल्यानंतर त्यांच्यातील पाणी सागराला जाऊन मिळते आणि मग पुन्हा त्यांचे मेघांत रूपांतर होते असे चक्र चालूच राहते. पाण्याचे अशाप्रकारे शुद्धीकरण आणि चक्र चालू नसते, तर ह्‍या पृथ्वीची काय अवस्था झाली असती? या विचारांवर मनन केल्यावर शलमोनाला किती कृतज्ञ वाटले असावे!

कृतज्ञता व्यक्‍त करणाऱ्‍या मनुष्याला कौटुंबिक सदस्यांबरोबर, आप्तांबरोबर आणि ओळखीच्या लोकांबरोबरचा नातेसंबंध मोलाचा वाटतो. त्यांनी केलेली दयाळू कृत्ये त्याचे लक्ष वेधवून घेतात. त्यांनी केलेल्या कृपेचा गुणग्राहकतेने विचार केल्यावर तो मनापासून त्यांचे आभार मानतो.

कृतज्ञता व्यक्‍त करणे

“आभारी आहे,” हे शब्द किती साधे आहेत! ते म्हणावयासही सोपे आहेत. असे करण्यासाठी पदोपदी संधीही आहेत. कोणी आपल्यासाठी दार उघडतो तेव्हा किंवा आपल्या हातून पडलेली एखादी वस्तू कोणी आपल्याला उचलून देतो तेव्हा प्रेमळपणे व मनापासून त्याला आभारी आहे असे म्हणणे किती तजेला देणारे आहे! ती अभिव्यक्‍ती ऐकल्यावर, दुकानात काम करणाऱ्‍या क्लार्कला किंवा रेस्टॉरन्टमध्ये काम करणाऱ्‍या एखाद्या वेटरसला किंवा पोस्टमनला त्याचे काम हलके आणि समाधानकारक वाटू शकते.

कृपेच्या कार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा एक सोईस्कर मार्ग म्हणजे थँक्यू कार्ड पाठवणे. दुकानात उपलब्ध असलेल्या कार्डांवर अतिशय खुबीने कृतज्ञतेचा आशय छापलेला असतो. पण त्यापेक्षा, तुम्ही जर तुमच्या स्वाक्षरात आकर्षक व स्नेही शब्दांत कृतज्ञता व्यक्‍त केली तर ते प्रेमळपणाचे ठरणार नाही का? काही जण, छापील कार्ड पाठवण्याऐवजी, संक्षिप्त पत्र पाठवतात.—पडताळा नीतिसूत्रे २५:११.

कदाचित, आपल्या जवळ राहणारे आपल्या घरातील लोकच आपल्या कृतज्ञतेच्या पात्र आहेत. बायबल एका सद्‌गुणी पत्नीविषयी असे म्हणते: ‘तिचा नवरा उठून तिची प्रशंसा करतो.’ (नीतिसूत्रे ३१:२८) पतीने आपल्या पत्नीसाठी काढलेले कृतज्ञता व्यक्‍त करणारे मनापासूनचे उद्‌गार घरातील शांतीमय आणि समाधानकारक वातावरणाला हातभार लावत नाहीत का? तसेच, पतीला जेथे पत्नी त्याचे प्रेमळपणे व कृतज्ञतापूर्ण अभिवादन करते त्या आपल्या घरी यायला आनंद वाटत नसतो का? अलीकडे, विवाहावर अनेक दबाव आहेत आणि हे दबाव वाढतात तेव्हा संताप लगेचच भडकतो. कृतज्ञ वृत्तीचा मनुष्य सूट देण्यास तयार असतो आणि क्षमा करण्यास तत्पर असतो.

युवकांनीही आपल्या पालकांची हार्दिक कृतज्ञता व्यक्‍त करण्यास विसरू नये. अर्थातच, पालक परिपूर्ण नाहीत, पण त्यांनी तुमच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल तुम्ही कृतघ्न असण्याचे कोणतेही कारण नाही. तुमच्या जन्मापासून त्यांनी तुम्हाला दाखवलेले प्रेम आणि काळजी विकत घेता येत नाही. त्यांनी तुम्हाला देवाविषयीचे ज्ञान शिकवले आहे त्यामुळे तर ते आणखीनच कृतज्ञतेच्या पात्र आहेत.

स्तोत्र १२७:३ म्हणते: “संतति ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे.” म्हणून, बारीकसारीक गोष्टींत मुलांचे उणे काढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पालकांनी त्यांची प्रशंसा करण्याची संधी शोधली पाहिजे. (इफिसकर ६:४) त्यांच्या देखरेखीखाली असलेल्या लहानग्यांमध्ये कृतज्ञतेचा आत्मा विकसित करण्यास मदत करण्याचा त्यांना केवढा मोठा सुहक्क आहे!—पडताळा नीतिसूत्रे २९:२१, NW.

देवास कृतज्ञता

यहोवा देवापासून “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” येते. (याकोब १:१७) त्या सर्वांत जीवन हे महत्त्वाचे आहे, कारण आपण जर जीवन गमावले तर आपल्याकडे असलेले सर्व किंवा जे काही मिळवण्याची योजना आपण करत असू ते सर्व काही व्यर्थ जाईल. “जीवनाचा झरा [यहोवा देवाजवळ] आहे,” याची आठवण ठेवण्यास शास्त्रवचने आपल्याला आर्जवतात. (स्तोत्र ३६:५, ७, ९; प्रेषितांची कृत्ये १७:२८) देवाप्रती कृतज्ञ असणारे हृदय विकसित करण्यासाठी, आपले शारीरिक आणि आध्यात्मिक जीवन टिकवून ठेवणाऱ्‍या त्याच्या उदार तरतुदींवर आपण मनन करणे आवश्‍यक आहे. (स्तोत्र १:१-३; ७७:११, १२) अशाप्रकारचे हृदय आपल्याला, बोलण्याद्वारे व कृतीद्वारे कृतज्ञता व्यक्‍त करण्यास प्रवृत्त करील.

देवाला आभार मानण्याचा एक स्पष्ट मार्ग म्हणजे प्रार्थना. स्तोत्रकर्त्या दाविदाने घोषित केले: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करिता येणार नाही; मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.” (स्तोत्र ४०:५) आपणही असेच प्रवृत्त होऊ या.

दावीद इतरांशी जे काही बोलला त्याद्वारे देवाची कृतज्ञता व्यक्‍त करण्यास तो दृढनिश्‍चयी देखील होता. तो म्हणाला: “मी अगदी मनापासून परमेश्‍वराचे उपकारस्मरण करीन; तुझ्या सर्व अद्‌भुत कृतीचे वर्णन करीन.” (स्तोत्र ९:१) देवाबद्दलची कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, त्याच्याविषयी इतरांना सांगणे, त्याच्या वचनातील सत्य इतरांना सांगून स्वतःचे मनोगत व्यक्‍त करणे होय. यामुळे आपण जीवनातील इतर पैलूंतही कृतज्ञ होऊ शकतो.

‘जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझे गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन,’ असे यहोवा म्हणतो. त्याच्याबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्‍त करण्याद्वारे मिळणाऱ्‍या आनंदाचा तुम्हीही उपभोग घ्या.—स्तोत्र ५०:२३; १००:२.

[७ पानांवरील चित्र]

जीवन देवाकडील एक दान आहे. कृतज्ञता व्यक्‍त करण्यास विसरू नका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा