कृतज्ञ का असावे?
मज्जारज्जूचे ऑपरेशन झाल्यामुळे, हार्लीला मशिनीस्टचे काम सोडून कार्यालयीन क्लार्क व्हावे लागले. आता त्याला कसे वाटते असे विचारल्यावर, हार्ली म्हणाला: “मला मशिनरीचे काम आवडते. पण खरं सांगायचं तर, माझ्या पूर्वीच्या कामापेक्षा मी आताच्या कामात जास्त समाधानी आहे.”
त्याच्या समाधानाचे कारण तो पुढे सांगतो: “मी ज्या लोकांबरोबर काम करतो त्या लोकांची मनोवृत्ती वेगळी आहे. माझा आताचा सुपरव्हाईसर आणि माझ्याबरोबर काम करणारे लोक, मी जे काही करतो त्याची कदर करतात, खुल्या मनाने माझी प्रशंसा करतात; पूर्वी मी जिथे कामाला होतो तिथं असं नव्हतं. ह्यानंच तर मोठा फरक पडतो.” आपण उपयोगी आहोत, आपली आवश्यकता आहे या भावनेमुळे हार्ली आता एक आनंदी कामगार आहे.
उचित प्रसंगी काढलेले प्रशंसोद्गार किंवा कृतज्ञतेचे उद्गार खरोखरच मनाला सुखावतात. दुसऱ्या बाजूला पाहता कृतघ्नतेचा परिणाम, “हे हिमपवना, बागडत राहा मुक्त स्वच्छंद; नाहीस तू निष्ठुर या मानवांसम कृतघ्न,” या शेक्सपिअरच्या म्हणण्याप्रमाणे थंड असू शकतो. दुःखाची गोष्ट म्हणजे अनेकांना असा कटू अनुभव आला आहे.
कृतघ्नतेपासून सावध राहा
आजच्या जगात फार क्वचितच, मनापासून प्रशंसेचे उद्गार ऐकायला मिळतात. उदाहरणार्थ, एका लेखकाने एक प्रश्न उपस्थित केला: “एका नववधूला जर २०० पत्रिकांवर पत्ता लिहायला वेळ होता, तर १६३ बक्षिसांबद्दल थँक्यू-नोट लिहायला ती वेळ का काढत नाही?” पुष्कळदा, “आभारी आहे” असे म्हणावयास देखील अनेकांना जड जाते. कृतज्ञतेची जागा आता मी-पहिला ही मनोवृत्ती घेत आहे. हे, शेवटल्या दिवसांचे ओळखचिन्ह आहे. प्रेषित पौलाने इशारा दिला: “तुम्ही हे जाणावे की शेवटले दिवस खूप धोकादायक होतील. माणसे अगदीच स्वार्थी . . . कृतघ्न होतील.”—२ तीमथ्य ३:१, २, फिलिप्स भाषांतर.
इतर बाबतीत, कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी तोंडपूजा केली जाते. कृतज्ञता, व्यक्तिगत लाभाचा जराही विचार न बाळगता हृदयापासून व्यक्त केली जाते. परंतु, तोंडपूजा बहुतेक वेळा अप्रामाणिक व अतिशयोक्ती असते; बढती मिळण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट व्यक्तिगत लाभास्तव ती केली जाते. (यहुदा १६) अशा गोड आणि लाघवी भाषणाने तर ऐकणाऱ्याची फसवणूक होतेच होते, शिवाय त्या व्यक्तीचा गर्व आणि अहंकारही दिसून येतो. तर मग, कोणाला तोंडपूजा केलेली आवडेल का? पण, खरी कृतज्ञता खरोखरच तजेला देणारी असते.
कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा लाभ होतो. हृदयापासून कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे तिच्यात उत्पन्न होणाऱ्या चांगुलपणाच्या भावनेमुळे तिला आनंद व शांती मिळते. (पडताळा नीतिसूत्रे १५:१३, १५.) सकारात्मक गुण असल्यामुळे कृतज्ञता त्या व्यक्तीचे क्रोध, द्वेष आणि राग या नकारात्मक भावनांपासून संरक्षण करते.
“तुम्ही कृतज्ञ असा”
बायबल आपल्याला कृतज्ञतेचा किंवा आभार व्यक्त करण्याचा आत्मा विकसित करण्यास आर्जवते. पौलाने लिहिले: “सर्व स्थितीत उपकारस्तुति करा; कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.” (१ थेस्सलनीकाकर ५:१८) याशिवाय, पौलाने कलस्सैकरांना सल्ला दिला: “ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. . . . आणि तुम्ही कृतज्ञ असा.” (कलस्सैकर ३:१५) अनेक स्तोत्रांत आभाराची वक्तव्ये आहेत, मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता ईश्वरी सात्विकता आहे हे सूचित करण्यात आले आहे. (स्तोत्र २७:४; ७५:१) दैनंदिन जीवनात आपण आभारी मनोवृत्ती व्यक्त केल्यास यहोवा देवाला आनंद होतो.
परंतु या कृतघ्न जगात राहताना, कोणत्या कारणांमुळे आपल्याला कृतज्ञतेचा आत्मा विकसित करण्यास जड जाते? दैनंदिन जीवनात आभारी वृत्ती आपण कशी प्रकट करू शकतो? पुढील लेखात या प्रश्नांची उत्तरे दिली जातील.