वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १/१ पृ. ३-५
  • सत्यामुळे जीवनांचे रूपांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्यामुळे जीवनांचे रूपांतर
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनात उद्देश
  • नवीन कुटुंब
  • तरुणपणच्या वाईट अनुभवांमुळे आलेल्या निराशेतून सुटका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • बायबलने बदलले जीवन!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • पवित्र शास्त्राचे सत्य कुटुंबाला ऐक्यात आणते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मी सत्य स्वतःलाच कसे पटवू शकते?
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १/१ पृ. ३-५

सत्यामुळे जीवनांचे रूपांतर

आज अनेक लोकांचे जीवन कठीण तसेच आणीबाणीच्या काळात हिंदकळत आहे, ही गोष्ट दुःखाची असली तरी तितकीच खरी आहे. अशा लोकांना आनंद गवसणे शक्य आहे का? काही जण गुन्हेगार आहेत तर काही जण त्यांच्या परिसरात धुमाकूळ घालतात. ते, समाजाचे प्रामाणिक सदस्य कधी होऊ शकतील का? वरील दोन्ही प्रश्‍नांचे उत्तर होय, असे आहे. लोकांमध्ये बदल होऊ शकतो. जीवनांचे रूपांतर कसे होऊ शकते हे दाखवताना प्रेषित पौलाने लिहिले: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, . . . आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:२.

“देवाची . . . परिपूर्ण इच्छा” हे पौलाचे वरील शब्द, त्याने असे लिहिण्याच्या सुमारे २० वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी येशूने त्याच्या शिष्यांना जे म्हटले त्याची आठवण करून देतात. येशूने म्हटले: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” (योहान ८:३२) “सत्य” असा येशूच्या म्हणण्याचा अर्थ होता, की ईश्‍वरी प्रेरित माहिती—विशेषतः देवाच्या इच्छेविषयीची माहिती—जी आपल्यासाठी बायबलमध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. (योहान १७:१७) बायबलमधील सत्य खरोखरच लोकांना बंधमुक्‍त करते का? देवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत चालल्याने खरोखरच जीवनांचे रूपांतर होते का? निश्‍चितच. आपण काही उदाहरणांचा विचार करू या.

जीवनात उद्देश

काही काळापूर्वी जिब्राल्टर येथील मोएसस नामक एक माणूस फार दुःखी होता. तो म्हणतो: “मी पिऊन बाहेर कोठेही झोपत असे. मला अगदी आशाहीन वाटत होतं. माझ्यावर दया करावी आणि मला उद्याचा दिवस दाखवू नये, अशी मी देवाकडे प्रत्येक रात्री प्रार्थना करत असे. मी अश्रू ढाळत देवाला विचारत असे, की मी जर कुचकामी आहे तर मी या जगात तरी का आहे, मला काही काम नाही, घर नाही, मदत करू शकेल असं कोणी नाही. माझ्या जगण्याचा उद्देश तो काय?” आणि नंतर काहीतरी घडलं.

मोएसस पुढे म्हणतो: “यहोवाचा साक्षीदार असलेल्या रोबर्टोशी माझी भेट झाली त्यामुळे मला हे समजलं, की यहोवाने माझी प्रार्थना खरोखरच ऐकली होती. रोबर्टोने मला एक बायबल आणि देव आपल्याकडून काय अपेक्षितो?a हे बायबल अभ्यासाचं साधन दिलं. मी रात्री ज्या बाकावर झोपत असे त्या बाकावर आम्ही दररोज बायबलचा अभ्यास करत असू. एक महिन्यानंतर रोबर्टो मला यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक सभागृहात घेऊन गेला. लवकरच, बायबलमधील सत्यामुळे माझं बाह्‍यस्वरूप पूर्णपणे पालटलं होतं. आता मी बाहेर झोपण्याचं सोडलंय; पिणं आणि धूम्रपान करणंही थांबवलं आहे. माझ्या जीवनात बदल झाला आहे आणि मी आता सुखी आहे. मी लवकरच बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा एक सेवक या नात्याने त्याची सेवा करीन, असं मला वाटतं.”

किती मोठे हे रूपांतर! लोकांना कोणतीही आशा नसते तेव्हा ज्ञानाची कमी हेच बहुतेकवेळा त्याचे कारण असते. देवाबद्दल आणि त्याच्या आश्‍चर्यकारक उद्देशांबद्दल त्यांना माहीत नसते. मोएससच्या बाबतीत, त्याला जेव्हा ते ज्ञान प्राप्त झाले तेव्हा त्या ज्ञानामुळे जीवनाला कलाटणी देण्यास त्याला शक्‍ती आणि धैर्य प्राप्त झाले. स्तोत्रकर्त्याने देवाला केलेल्या प्रार्थनेचे मोएससला सुद्धा उत्तर मिळाले: “तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर; ती मला मार्ग दाखवोत; तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहंचवोत.”—स्तोत्र ४३:३.

बेलिझ येथील डॅनिएलच्या बाबतीत देखील काहीसे असेच घडले. डॅनिएलला राहायला घर नव्हते असे नाही—त्याच्याकडे एक चांगली नोकरी देखील होती. पण तो मागील २० वर्षांपासून अंमली पदार्थ, मद्यपानाचे व्यसन आणि अनैतिक जीवनाशी संघर्ष करत होता. डॅनिएल कॅथलिक धर्मात लहानाचा मोठा झाला होता तरी सुद्धा त्याला जीवनात कोणताही उद्देश असल्याचे दिसून येत नव्हते आणि त्याच्या मनात देवाच्या अस्तित्वाविषयी शंकाही निर्माण झाली होती. अखेरीस तो मदतीसाठी वेगवेगळ्या चर्चेसला जाऊ लागला, पण त्याला तेथे दिसून आले, की त्याचे चर्चला जाणारे मित्र आणि त्याचे पाळक मित्र सुद्धा अंमली पदार्थ आणि अल्कोहॉलचा दुरुपयोग करत आहेत. या दरम्यान त्याची पत्नी देखील त्याच्याशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत होती.

अगदी निराश होऊन डॅनिएलने पुनर्वसन केंद्रात स्वतःला दाखल केले. तेथून सुटल्यानंतर आपल्याला मदत मिळाली नाहीतर पुन्हा एकदा आपण अंमली पदार्थांकडे जाऊ याची त्याला पूर्ण कल्पना होती. पण कोणत्या प्रकारची मदत? पुनर्वसन केंद्रातून सुटल्यानंतर दोन दिवसांनी, मे १९९६, मध्ये डॅनिएल एका यहोवाच्या साक्षीदाराकडे गेला आणि त्याने अशी आश्‍चर्यकारक विनंती केली: “कृपा करून माझा बायबल अभ्यास घ्या.” त्या साक्षीदाराने डॅनिएलसोबत आठवड्यातून दोनदा बायबल अभ्यास घेण्याची व्यवस्था केली आणि डॅनिएलने लवकरच त्याचे जीवन यहोवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत आणण्यास पावले उचलली आणि त्याने त्याचे जुने मित्र सोडले व त्यांऐवजी ज्यांनी अंमली पदार्थांचा आणि अल्कोहॉलचा दुरुपयोग केला नाही तसेच ज्यांनी अनैतिक जीवन जगण्याचे थांबवले अशा ख्रिस्ती लोकांशी त्याने मैत्री केली. अशा प्रकारे, बायबलचे हे वचन सत्य असल्याचे डॅनिएलला दिसून आले: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खाचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्रे १३:२०) लवकरच त्याने असे म्हटले: “शुद्ध विवेक राखणं म्हणजे काय, हे मला माझ्या संपूर्ण जीवनात पहिल्यांदाच कळलं होतं.” डॅनिएलच्या जीवनाचे रूपांतर झाले होते.

प्वेर्त रिको, येथील आणखी एका मनुष्याने उल्लेखनीय रूपांतराचा अनुभव घेतला. तो तुरुंगात होता आणि त्याने कित्येक लोकांचा खून केल्यामुळे त्याला खतरनाक समजण्यात येत असे. बायबलमधील सत्यामुळे त्यात बदल होणे शक्य होते का? होय. यहोवाच्या एका साक्षीदाराने त्याला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकाच्या काही प्रती दिल्या आणि त्याने लगेच आणखी मागितल्या. त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास सुरू करण्यात आला आणि बायबलमधील सत्याने त्याच्या हृदयावर परिणाम करण्यास सुरवात केली कारण त्याने स्वतःत केलेले बदल सर्वांना दिसू लागले. त्याने स्वतःमध्ये केलेल्या परिवर्तनाचा एक पुरावा म्हणजे त्याने आपले लांब केस कापले आणि कित्येक दिवसांनंतर दाढी केली.

मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍या आणि स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल करणाऱ्‍या पापी लोकांना यहोवा क्षमा करतो, असे बायबल सांगते. पौलाने लिहिले: “अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? . . . आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही . . . धुतलेले, . . . असे झाला.” (१ करिंथकर ६:९, ११) निःसंशये, या शब्दांमुळे त्या मनुष्याला सांत्वन मिळाले शिवाय प्रेषितांची कृत्ये २४:१५ येथील शब्दांनी देखील: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” त्याने म्हटले: “मेलेल्या लोकांचं जेव्हा पुनरूत्थान होईल तेव्हा मला तिथं असण्याची इच्छा आहे कारण मी ज्यांना जीवानिशी मारलं आहे, अशा लोकांची मला तेव्हा क्षमा मागता येईल.”

नवीन कुटुंब

अर्जेन्टिना येथील, लुईस नामक यहोवाचा साक्षीदार असलेल्या एका पूर्णवेळेच्या सुवार्तिकाची भेट एका तरुणाशी झाली; या तरुणाचा इतिहास फारच दुःखद होता. जन्म होताच त्याच्या पालकांनी त्याला टाकून दिले होते; त्याचे बालपण वेगवेगळ्या अनाथाश्रमांत गेले होते. तो जेव्हा २० वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईचा पत्ता त्याला कळला आणि तिच्यासोबत राहण्याचे त्याने ठरवले. त्याने फार कष्ट करून खूप पैसे जमा केले आणि त्याची आई ज्या शहरात होती तेथे तो गेला. त्याचे पैसे संपत नाहीत तोपर्यंत तिने त्याला तिच्यासोबत राहू दिले आणि पैसे संपल्यानंतर तिने त्याला घर सोडण्यास सांगितले. यामुळे त्याला जीव नकोसा झाला होता.

तथापि, या तरुणाला बायबलमधील सत्य सांगण्यास लुईसला संधी मिळाली. त्या सत्यात पुढील आश्‍वासनाचा समावेश होता: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्‍वर मला जवळ करील.” (स्तोत्र २७:१०) आपला एक स्वर्गीय पिता असून तो आपला कधीही त्याग करणार नाही, हे त्या तरुणाला समजले. तो आता आनंदी आहे कारण तो नव्या कुटुंबाचा, यहोवाच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहे.

आपल्याला टेहळणी बुरूज नियतकालिक आवडले, असे याच देशातील एका इसमाने यहोवाच्या साक्षीदाराला सांगितले. का? कारण या नियतकालिकामुळे त्याचा विवाह मोडतामोडता वाचला होता. तो एके दिवशी आपले काम आटोपून घरी निघण्याच्या बेतात होता तेव्हा त्याला “घटस्फोट” असे मोठ्या अक्षरातील शीर्षक असलेले टेहळणी बुरूज नियतकालिक कचऱ्‍याच्या टोपलीत पडलेले दिसले. त्याचा विवाह धोक्यात असल्यामुळे आणि त्यांनी एकमेकांपासून फारकत घेण्याची कायदेशीर कारवाई आधीच सुरू केल्याने त्याने ते नियतकालिक घेतले आणि वाचण्यास सुरवात केली. त्याने ते घरी आणून त्याच्या पत्नीसोबत वाचले. या नियतकालिकामध्ये देण्यात आलेला बायबलवर आधारित सल्ला लागू करण्याचा या जोडप्याने प्रयत्न केला. (इफिसकर ५:२१–६:४) लवकरच, त्यांच्या नातेसंबंधात सुधारणा झाली. त्यांनी विभक्‍त होण्याची कारवाई थांबवली आणि संयुक्‍त विवाहित जोडपे या नात्याने ते आता बायबलचा अभ्यास करत आहेत.

उरुग्वेमध्ये, लुईस नामक आणखी एक दुःखी मनुष्य होता. अंमली पदार्थांचे व्यसन, भूतविद्या, मूर्तिपूजा, अल्कोहॉलचा दुरुपयोग—यांसारख्या गोष्टींमुळे त्याचे जीवन अगदी उद्धवस्त झाले होते. अखेरीस, पूर्ण हताश होऊन तो नास्तिक बनला. त्याच्या मित्राने त्याला एक पुस्तक दिले, जीवन कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? (इंग्रजी)b यामुळे यहोवाच्या साक्षीदारांशी त्याचा थोडासा संपर्क आला, पण लुईस पुन्हा अल्कोहॉल आणि अंमली पदार्थांकडे वळला. एकदा तो अगदी हताश होऊन कचऱ्‍याच्या ढिगाऱ्‍यावर बसला होता तेव्हा त्याने “येशू ख्रिस्ताच्या देवाला” प्रार्थना केली कारण त्याला देवाचे निश्‍चित नाव माहीत नव्हते.

आपल्या जगण्याचे काही कारण असल्यास ते आपल्याला दाखवावे, अशी प्रार्थना त्याने देवाला केली. लुईस सांगतो: “त्यानंतरच्याच दिवशी माझ्या ओळखीच्या एकानं त्याच्या उपयोगी नसलेलं एक पुस्तक मला दिलं. त्याचं शीर्षक? प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!c” या पुस्तकाने त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्यास मदत केली. देवाची सेवा कशी करावी, याचे मार्गदर्शन करणारा धर्म आपल्याला मिळावा म्हणून लुईसने पुन्हा प्रार्थना केली. आणि काय आश्‍चर्य! दरवाजावरील बेल वाजली आणि यहोवाचे दोन साक्षीदार दरवाजात उभे. लुईसने त्यांच्यासोबत लगेचच बायबल अभ्यासाला सुरवात केली. त्याने लवकरच प्रगती केली आणि बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार म्हणून तो स्वतःला आशीर्वादित मानतो. तो आता शुद्ध जीवन जगत आहे आणि जीवनातील उद्देश शोधण्यात इतरांना मदत करत आहे. त्याच्या बाबतीत स्तोत्र ६५:२ येथील शब्द खरे ठरले आहेत: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते.”

फिलिपाईन्समधील, ॲलन एकेकाळी आंदोलन संघटनेचा विद्यार्थी होता. “भवितव्यातील पिढीने समानतेचा अनुभव घ्यावा म्हणून सरकार पाडणे” असा उद्देश असलेल्या संघटनेचा तो सदस्य होता. तथापि, एके दिवशी त्याचा संपर्क यहोवाच्या साक्षीदारांशी आला आणि मानवजातीकरता असलेला देवाचा उद्देश त्याला बायबलमधून समजला. त्या उद्देशामध्ये पुढील प्रेरित अभिवचनाचा समावेश आहे: “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:१०, ११) ॲलन म्हणतो: “मला लवकरच असे कळून आले, की आमची चळवळ ज्या गोष्टीसाठी संघर्ष करीत होती त्या गोष्टीचे फार पूर्वीच बायबलमध्ये अभिवचन देण्यात आले आहे. आम्हाला ज्या गोष्टींची उत्कट इच्छा होती त्या सर्व गोष्टी देवाच्या राज्यात पूर्ण होतील.” ॲलन आता देवाच्या राज्याचा समर्थक आहे आणि बायबलमधील सत्यावर विश्‍वास ठेवण्यास तो इतरांना मदत करत आहे.

होय, देवाच्या वचनातील, बायबलच्या सत्याकडे लोक जेव्हा लक्ष देतात तेव्हा त्यांच्या जीवनांचे रूपांतर होते. खरोखरच, अशी वेळ येत आहे जेव्हा बचावलेली सर्व मानवजात त्यांचे जीवन देवाच्या एकवाक्यतेत आणील. ते खरोखरच किती मोठे रूपांतर असेल! तेव्हा पुढील भविष्यवाणीची पूर्णता झालेली असेल: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—यशया ११:९.

[तळटीप]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

c वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा