सर्वच तक्रारी चुकीच्या असतात का?
आपण ज्यांची तक्रार करू शकत नाही अशा त्रासांपेक्षा अधिक यातनामय असा कोणता त्रास असू शकतो?—माकी डी कूसटीन. १७९०-१८५७.
तब्बल दोन वर्षांपर्यंत ती एका सहकर्मीकडून लैंगिक शोषण सहन करीत होती. तिने प्रतिकार केला तर उलट तिलाच शिव्या ऐकाव्या लागल्या व मुद्दामहून तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आत कुढत असलेल्या तणावामुळे तिचे आरोग्य ढासळत चालले होते, पण ती करणार तरी काय? आणखी एक विद्यार्थी जो वर्गात नेहमी प्रथम क्रमांकावर असायचा त्याला शाळेतून काढण्यात आले; कारण त्याचा विवेक त्याला, शाळा मागणी करत असलेल्या सैनिकी कवायतींत भाग घेण्यास अनुमती देत नव्हता. आपल्यावर अन्याय झाला आहे असे या दोघांनाही वाटले, पण त्यांनी तक्रार करावी का? आणि जरी केली, तरी ते न्याय मिळण्याची आशा करू शकतात की त्यांचे प्रकरण आणखीनच चिघळेल?
अशाप्रकारच्या आणि इतर आणखी तक्रारी आज सर्वसामान्य बनल्या आहेत कारण आपण निकृष्ट दर्जांच्या जगात अपरिपूर्ण लोकांमध्ये जगत आहोत. तक्रारींमध्ये, एखाद्या प्रसंगावर मूकपणे असंतोष, शोक, दुःख किंवा राग व्यक्त करण्यापासून एखाद्या पार्टीविरुद्ध आरोप करणे समाविष्ट आहे. बहुतेक लोकांना तक्रार करण्यास व प्रतिबंध करण्यास आवडत नाही; पण मग एखाद्याने नेहमीच शांत राहावे का? याबाबत बायबलचा दृष्टिकोन काय आहे?
स्वतःवर आणि इतरांवर होणारे दुष्परिणाम
यात काहीच शंका नाही, की तक्रारी स्वभाव हानीकारक असतो शिवाय बायबलही अशा स्वभावाचा धिक्कार करते. कुरकूर करणारी व्यक्ती स्वतःवर शारीरिक व आध्यात्मिक हानी ओढवून घेत असते आणि ज्यांच्याबद्दल कुरकूर करते त्यांना राग आणवून देत असते. कुरकूर करणाऱ्या बायकोबद्दल बायबलमधील एक नीतिवचन असे म्हणते: “पावसाच्या झडीच्या दिवशी सतत गळते टिपके, व कटकटी बायको ही सारखी आहेत.” (नीतिसूत्रे २७:१५) यहोवाविरुद्ध अथवा त्याच्या एखाद्या योजनेविरुद्ध तक्रार करणे खासकरून दोषास्पद आहे. इस्राएल राष्ट्र ४० वर्षांपर्यंत रानातून प्रवास करत असताना चमत्कारिकरीत्या त्यांना पुरवण्यात आलेल्या मान्नाला त्यांनी ‘हलके अन्न’ म्हणून नाव ठेवले तेव्हा यहोवाने त्या अनादरणीय कुरकूर करणाऱ्यांना शिक्षा देण्याकरता विषारी सर्प सोडले ज्यामुळे अनेक जन मृत्युमुखी पडले.—गणना २१:५, ६.
येशूनेही आपल्या अनुयायांना आपल्या सहमानवांतील चुकांरूपी ‘कुसळांविषयी’ तक्रार करण्याऐवजी आपल्या स्वतःत असलेली कमतरतारूपी मोठी “मुसळ” पाहण्याचा सल्ला दिला. (मत्तय ७:१-५) तसेच पौलाने, “सबब नाही . . . कारण दोषी ठरविणारा तूहि त्याच गोष्टी करितोस,” असे म्हणून इतरांना दोष लावण्याचा (तक्रारीचा एक प्रकार) निषेध केला. तक्रार करण्याविरुद्धच्या या इशाऱ्यांकडे आपण लक्ष दिल्यास, निष्कारण टीकास्त्र उचलण्यापासून व तक्रारी स्वभावापासून आपण दूर राहू शकतो.—रोमकर २:१.
सर्वच प्रकारच्या तक्रारी चुकीच्या असतात का?
मग, सर्वच प्रकारच्या तक्रारी निषिद्ध आहेत अशा निष्कर्षाप्रत आपण यावे का? नाही. आपण ज्या दोषी जगात राहत आहोत त्यात खूप अन्याय आहे ज्यांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. येशूने एक दाखला दिला; एका अधार्मिक न्यायाधीशाने एका पीडित विधवेच्या याचिकेला कंटाळून एकदाचा न्याय देऊन टाकला ह्यासाठी की तिने नेहमी येऊन ‘त्याला रंजीस आणू नये.’ (लूक १८:१-८) काही बाबतीत आपल्यालाही, चुकांची सुधारणा होईपर्यंत तक्रारी करत राहाव्या लागतील.
देवाचे राज्य यावे म्हणून प्रार्थना करण्याचे उत्तेजन देण्याद्वारे येशूने आपल्याला या सद्य जगाच्या उणिवा जाणून उपायाकरता देवाचा ‘धावा करण्यास’ आर्जवले नाही का? (मत्तय ६:१०) सदोम आणि गमोराच्या दुष्टतेविषयीची “ओरड” यहोवापर्यंत पोहंचली तेव्हा ‘त्या लोकांची वागणूक त्यांच्या ओरडीनुसार आहे की नाही’ हे पाहण्याकरता व त्यांचे निवारण करण्याकरता त्याने आपले संदेशवाहक धाडले. (उत्पत्ति १८:२०, २१) यहोवाने परिस्थितीत सुधारणा करण्याकरता त्या दोन शहरांचे आणि त्यांतील दुर्वर्तनी रहिवाशांचे उच्चाटन करून ज्यांनी तक्रार केली होती अशांना आराम पोहंचवला.
ख्रिस्ती मंडळी
मग, ख्रिस्ती मंडळीतील बांधवांमधील परिस्थिती काही वेगळी असली पाहिजे का? अपरिपूर्ण असले तरीसुद्धा, ख्रिस्तीजन देवाची सेवा शांतीने व ऐक्याने करण्याचा कटाक्षाने प्रयत्न करीत आहेत. पण, कधीकधी त्यांच्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे आराम मिळण्याकरता तक्रारीची आवश्यकता भासेल. पहिल्या शतकात, पेन्टेकॉस्टनंतर लगेचच अभिषिक्त जनांच्या मंडळीत एक परिस्थिती उद्भवली. नव्याने मतांतर केलेले अनेक ख्रिस्ती आणखी बोध व उत्तेजन मिळण्याकरता जेरुसलेममध्येच राहिले. तेव्हा त्यांच्याजवळ असलेली अन्नसामग्री त्यांनी आपआपसात वाटून घेतली. परंतु, मग, “हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.” प्रेषितांनी तक्रार करणाऱ्यांना, काय ही पीडा असे न समजता, परिस्थितीत सुधारणा करण्याकरता पावले उचलली. आदराने व उचित भावनेने केलेल्या रास्त तक्रारी, मंडळीत देखरेख करणारे विनम्रपणे ऐकून घेतील व त्यात सुधारणा करतील.—प्रेषितांची कृत्ये ६:१-६; १ पेत्र ५:३.
उचित अधिकाराजवळ तक्रार करा
उचित भावनेने व उचित अधिकाराजवळ तक्रार करणे आवश्यक आहे हे वरील उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आले का? जसे, भरमसाठ कर भरावा लागत असल्याची पोलिसांजवळ तक्रार करणे अथवा एखाद्याच्या शारीरिक आजाराबद्दल न्यायाधीशांकडे तक्रार करणे निरर्थक ठरेल. तसेच, ज्या व्यक्तीला अधिकार नाही किंवा जिच्यात मदत करण्याची ताकद नाही अशा व्यक्तीकडे मंडळीतील किंवा मंडळीच्या बाहेरील परिस्थितीविषयी तक्रार करणे अनुचित ठरेल.
आज बहुतांश राष्ट्रांत, काही प्रमाणापर्यंत साहाय्य मिळण्याची आशा देणारी न्यायालये किंवा उचित प्राधिकारी आहेत ज्यांना अपील करता येऊ शकते. या लेखाच्या सुरवातीला ज्या विद्यार्थ्याचा उल्लेख करण्यात आला त्याने आपली तक्रार कोर्टात नेली, न्यायाधीशांनी त्याच्या बाजूने निकाल दिला आणि शाळेने त्याच्याकडे क्षमा मागून त्याला पुन्हा शाळेत घेतले. तसेच, लैंगिक शोषण होणारी महिला कामगार हिला देखील महिला कामगार संघाकडून साहाय्य मिळाले. शाळेच्या मंडळाकडून तिची माफी मागण्यात आली. तिच्या मालकांनी तिचे लैंगिक शोषण थांबवण्याकरता पावले उचलली.
परंतु सर्वच तक्रारींना अशारीतीने न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करू नये. सुज्ञ राजा शलमोनाने वास्तविकपणे निरीक्षिले: “जे वाकडे आहे ते सरळ होत नाही.” (उपदेशक १:१५) आपण हे जाणून आहोत की काही परिस्थितींची सुधारणा देव आपल्या नियुक्त समयीच करील म्हणून आपल्याला थांबून राहणे आवश्यक आहे.
[३१ पानांवरील चित्र]
वडील जन तक्रारी ऐकून घेतात व त्यानुसार कार्य करतात