जागतिक ऐक्य कधी वास्तविकता बनेल का?
“पुढील काही पिढ्यांमध्ये, आपण राहत असलेल्या स्वतंत्र राष्ट्रांच्या या जगाचे रूपांतर निष्कपट आंतरराष्ट्रीय समाजात करण्यात आपण यशस्वी ठरलो . . . तर युद्धाची प्राचीन संस्था देखील नाहीशी करण्यात आपण परिणामकारी ठरलेलो असू . . . पण आपण अपयशी ठरलो तर कदाचित . . . संस्कृती नावाची गोष्ट राहणारच नाही.” असे युद्ध (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात लष्कर इतिहासकार ग्वीन डायर म्हणतात.
इतिहासाची पाने, राष्ट्रांनी आणि इतर शक्तिशाली गटांनी आपापसातले मतभेद युद्धाद्वारे मिटवल्याच्या अहवालांनी रंगलेली आहेत, असे डायर म्हणतात. त्यांच्या कलहाने कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. राजा शलमोनाने आपल्या दिवसातील लोकांवर याचा कसा परिणाम झाला याचे दिलेले वर्णन आजही अगदी मिळतेजुळते आहे. त्याने लिहिले: “ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलुमांचे मी फिरून निरीक्षण केले; तो पाहा, गांजलेल्यांचे अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलूम करणाऱ्यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.”—उपदेशक ४:१.
आजकाल, वरील इतिहासकार दाखवतो त्याप्रमाणे, ‘गांजलेल्यांच्या अश्रूंबद्दल’ दया वाटण्याखेरीज स्वतंत्र राष्ट्रांच्या जगाचे रूपांतर एका निष्कपट आंतरराष्ट्रीय समाजात करण्याचा मार्ग शोधून काढायला आणखी कारण आहे: संस्कृतीचे टिकून राहणेच धोक्यात आले आहे! आधुनिक युद्धांचा आधार घेणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचा नायनाट होईल व कोणीही वाचणार नाही असे दिसते.
जागतिक ऐक्याची चिन्हे?
जागतिक ऐक्याची किती आशा आहे? पृथ्वीच्या अस्तित्वाला धोका पोंहचवणाऱ्या विभाजक घटकांवर मानवी समाज मात करू शकतो का? काहींच्या मते, होय. ब्रिटनच्या डेली टेलीग्राफचे लष्कर संपादक, जॉन कीगन लिहितात: “गोंधळ आणि अनिश्चिततेच्या अंधाऱ्या रात्रीनंतर, युद्धरहित जगाची पहाट उजेडणार असे दिसते.”
त्यांच्या या आशावादी दृष्टिकोनाचे कारण काय असावे? मानवजातीच्या युद्धाचा दीर्घ इतिहास आणि यशस्वीरित्या नियंत्रण करण्याची असमर्थतता स्पष्ट झाल्यावरही पुष्कळ लोकांना आशा का वाटते? (यिर्मया १०:२३) ‘मानवजात प्रगतीपथावर आहे. इतिहासात, सातत्याने प्रगती होत असल्याचे दिसून आले आहे,’ असा एके काळी काहींनी वाद केला. आजही, अनेकांचा असा विश्वास आहे की, माणसाच्या अंतर्जात चांगुलपणामुळे सरतेशेवटी वाईटावर विजय मिळवला जाईल. ही वास्तववादी आशा आहे का? का ही भ्रांती असून त्यामुळे आणखीनच निराशा निर्माण होईल? जगाचा संक्षिप्त इतिहास (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात, इतिहासकार जे. एम. रॉबर्ट्स यांनी वास्तववादी दृष्टीने लिहिले: “जगाच्या भवितव्याला उज्ज्वल म्हणताच येणार नाही. मानवी दुःखाचा शेवट कुठेच दिसत नाही किंवा तसा विश्वास करायला कारणही नाही.”
लोक आणि राष्ट्रे आपापसातल्या अविश्वासावर किंवा विभाजक भेदांवर खरोखर मात करतील असे मानायला खरीखुरी कारणे आहेत का? की मानवी प्रयासांव्यतिरिक्त काही करायची आवश्यकता आहे? पुढील लेखामध्ये या प्रश्नांचा विचार केला आहे.
[Picture Credit Line on page 2]
Background globe on the cover: Mountain High Maps® Copyright © 1995 Digital Wisdom, Inc.