यहोवा तुमच्या जिवाभावाच्या सेवेची प्रशंसा करतो
“जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.”—कलस्सैकर ३:२३.
१, २. (अ) आपल्याला कदाचित कोणता महान विशेषाधिकार मिळू शकतो? (ब) आपल्याला हवी तेवढी देवाची सेवा आपण कदाचित काही वेळा का करू शकणार नाही?
यहोवाची सेवा करणे हा आपल्याला मिळणारा सर्वात महान विशेषाधिकार आहे. उचितपणे, हे नियतकालिक ख्रिश्चनांना स्वतःला सेवेत मग्न ठेवण्यास, होईल त्याच्यापेक्षा ‘आणखी ज्यादा’ करण्याचे उत्तेजन बऱ्याच काळापासून देत आले आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१) परंतु, देवाची सेवा करताना, आपण अधिक करावे अशी आपली खूप इच्छा असली तरीसुद्धा आपण नेहमीच ती पूर्ण करू शकत नाही. सुमारे ४० वर्षांपूर्वी बाप्तिस्मा घेतलेल्या एका अविवाहित बहिणीने म्हटले: “माझी परिस्थितीच काहीशी अशी आहे की मला पूर्ण वेळ काम करावे लागते. मी, उंची कपडालत्ता असावा किंवा ऐषआरामात सुट्या घालवता याव्यात म्हणून काम करत नाही तर माझ्या गरजा भागवण्यासाठी शिवाय वैद्यकीय आणि दातांच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी काम करते. आणि मला वाटते, की मी उरलेला वेळ यहोवासाठी देत आहे.”
२ देवाबद्दलची प्रीती आपल्याला प्रचारकार्यात होता होईल तेवढे करण्यास प्रवृत्त करते. परंतु, आपल्या जीवनातील काही परिस्थिती आपण जे करू शकतो त्यावर आळा घालतात. इतर शास्त्रवचनीय जबाबदाऱ्या तसेच कौटुंबिक बंधने पार पाडण्यातच आपला बराच वेळ आणि शक्ती खर्च होत असेल. (१ तीमथ्य ५:४, ८) ‘शेवटल्या काळातील या कठीण दिवसांत’ तर जीवन अधिकच आव्हानात्मक बनले आहे. (२ तीमथ्य ३:१) आपल्याला हवी तशी सेवा आपण करू शकत नसल्यामुळे आपले अंतःकरण आपल्याला बोचत राहते. देव आपल्या उपासनेने संतुष्ट आहे की नाही असे आपल्याला वाटू लागते.
जिवाभावाने केलेल्या सेवेचे सौंदर्य
३. यहोवा आपल्या सर्वांकडून काय अपेक्षा करतो?
३ स्तोत्र १०३:१४ मध्ये बायबल आपल्याला हमी देते, की यहोवा ‘आपली प्रकृती जाणतो; आपण केवळ माती आहो हे तो आठवतो.’ इतर कोणाला समजत नसतील परंतु तो आपल्या मर्यादा जाणतो. आपल्या क्षमतेपेक्षा अधिक तो अपेक्षित नाही. मग काय अपेक्षितो बरे? सर्वजण आपआपल्या जीवनातील परिस्थितीनुसार जे देऊ शकतात तेच अर्थात, “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.” (कलस्सैकर ३:२३) होय, यहोवा आपण—सर्वांनी—त्याची सेवा जिवाभावाने करावी अशी अपेक्षा करतो.
४. जिवाभावाने यहोवाची सेवा करणे म्हणजे काय?
४ जिवाभावाने यहोवाची सेवा करणे म्हणजे नेमके काय? ‘जिवाभावाने’ असे भाषांतरित केलेल्या ग्रीक शब्दाचा नेमका अर्थ “मनापासून” असा होतो. “जीव,” शारीरिक आणि मानसिक क्षमता असलेल्या संपूर्ण व्यक्तीला सूचित होतो. तेव्हा, जिवाभावाने सेवा करण्याचा अर्थ, स्वतःला वाहून घेणे, शक्य तितक्या प्रमाणात आपल्या सर्व क्षमता आणि सर्व शक्ती देवाच्या सेवेत उपयोगणे असा होतो. सरळ सोप्या शब्दांत सांगायचे तर, आपला जीव जेवढे करू शकतो तेवढे करणे.—मार्क १२:२९, ३०.
५. सर्वांनी एकाच प्रमाणात सेवा करण्याची गरज नाही हे प्रेषितांचे उदाहरण कसे दाखवून देते?
५ जिवाभावाने सेवा करण्याचा अर्थ, आपण सर्वांनी एकाच प्रमाणात सेवा केली पाहिजे असा होतो का? हे कदापि शक्य होणार नाही, कारण प्रत्येकाची परिस्थिती आणि क्षमता भिन्न असतात. येशूच्या विश्वासू प्रेषितांचेच उदाहरण घ्या. ते सर्वजण एकाच प्रमाणात सेवा करू शकले नाहीत. जसे की, काही प्रेषितांविषयी म्हणजे, शिमोन कनानी आणि अल्फीचा मुलगा याकोब यांच्याविषयी आपल्याला फार कमी माहिती आहे. कदाचित प्रेषित या नात्याने त्यांची सेवा मर्यादित असावी. (मत्तय १०:२-४) पण या उलट, पेत्र अनेक भारी जबाबदाऱ्या स्वीकारू शकला—इतकेच नव्हे, येशूने त्याला “स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या” देखील दिल्या! (मत्तय १६:१९) पण यामुळे पेत्राला इतरांपेक्षा उंचावण्यात आले नाही. योहानाला (सा.यु. ९६ च्या सुमारास) प्रकटीकरणातील नव्या येरुशलेमेचा दृष्टान्त झाला तेव्हा त्याने “बारा प्रेषितांची बारा नावे” कोरण्यात आलेले १२ पाये पाहिले.a (प्रकटीकरण २१:१४) काही प्रेषितांना इतरांपेक्षा अधिक करणे शक्य झाले होते तरी, यहोवाने सर्व प्रेषितांच्या सेवेचा आदर केला.
६. पेरणाऱ्याविषयी येशूने दिलेल्या दाखल्यात, “चांगल्या जमिनीत” पेरलेल्या बीजाचे काय होते व कोणते प्रश्न उद्भवतात?
६ त्याचप्रमाणे, आपण सर्वांनी एकाच मात्रेत सेवा करावी अशी यहोवा मागणी करीत नाही. हे येशूने बी पेरणाऱ्याच्या दाखल्यात दर्शवले आहे, त्यात प्रचार कार्याची तुलना बी पेरण्यासोबत केली आहे. बी वेगवेगळ्या मातीत पडले, यावरून संदेश ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणाच्या नाना प्रकारांचे उदाहरण देण्यात आले आहे. येशू म्हणाला: “चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.” (मत्तय १३:३-८, १८-२३) हे पीक काय आहे आणि ते वेगवेगळ्या मात्रेत का उत्पन्न केले जाते?
७. पेरलेल्या बीजाचे पीक काय आहे व ते विविध प्रमाणात का उत्पन्न केले जाते?
७ पेरलेले बीज “राज्याचे वचन” असल्यामुळे पीक येणे, वचनाचा प्रसार करण्याला, व इतरांना सांगण्याला सूचित करते. (मत्तय १३:१९) जीवनातील क्षमता आणि परिस्थिती विविध असल्यामुळे विविध मात्रेत—तीस ते शंभरपट—पीक उत्पन्न केले जाते. दीर्घकालीन दुर्बलतेमुळे किंवा वाढत्या वयामुळे शक्ती नाहीशी झालेल्या व्यक्तीपेक्षा सुदृढ आरोग्य आणि शारीरिक ताकद असलेली व्यक्ती प्रचारात अधिक वेळ खर्च करू शकेल. कुटुंबाचे लालनपालन करण्यासाठी पूर्ण वेळ काम कराव्या लागणाऱ्या व्यक्तीपेक्षा कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून मुक्त असलेली तरुण अविवाहित व्यक्ती जास्त करू शकेल.—पडताळा नीतिसूत्रे २०:२९.
८. जे लोक आपल्या जीवाप्रमाणे उत्तम सेवा देतात त्यांना यहोवा कसे लेखतो?
८ देवाच्या दृष्टिकोनातून, पूर्ण जिवाने तीसपट कार्य करत असलेली व्यक्ती शंभरपट कार्य करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी सेवा करत असते का? मुळीच नाही! पीकाच्या उत्पन्नात फरक असू शकतो, पण ती सेवा आपल्या पूर्ण जिवाने केलेली उत्तम सेवा ठरते तेव्हा यहोवाला आनंद होतो. लक्षात असू द्या, विविध मात्रेतील पीक ‘चांगली जमीन’ असलेल्या अंतःकरणांतूनच उगवते. ‘चांगले’ असे भाषांतरित केलेला ग्रीक शब्द (कालोस), “सुंदर” व “अंतःकरण प्रफुल्लित करणाऱ्या व डोळ्यांस सुखकारक असलेल्या” गोष्टीचे वर्णन करतो. होता होईल तेवढे केल्याने देवाच्या नजरेत आपले अंतःकरण सुंदर होते हे जाणणे किती सांत्वनदायक आहे!
एकमेकांशी तुलना न केलेले
९, १०. (अ) आपले अंतःकरण आपल्याला कोणत्या प्रकारचा नकारात्मक तर्क करायला लावू शकते? (ब) आपण जे काही करतो त्यामध्ये यहोवा आपली तुलना इतरांसोबत करीत नाही हे १ करिंथकर १२:१४-२६ मधील उदाहरण कसे काय दाखवते?
९ पण केव्हा केव्हा आपले अपरिपूर्ण अंतःकरण भलताच अंदाज लावू शकते. आपल्या सेवेची तुलना ते इतरांच्या सेवेशी करील. ‘माझ्यापेक्षा दुसरे कितीतरी अधिक सेवा करतात. मग यहोवा माझ्या सेवेने संतुष्ट कसा काय असेल बरे?’ असा तर्क आपले अंतःकरण करेल.—पडताळा १ योहान ३:१९, २०.
१० यहोवाची विचारसरणी व मार्ग आपल्या विचारसरणीपेक्षा व मार्गांपेक्षा सर्वोच्च आहेत. (यशया ५५:९) १ करिंथकर १२:१४-२६ आपल्याला, यहोवा प्रत्येकाच्या प्रयत्नांविषयी कोणता दृष्टिकोन बाळगतो याबद्दलची मर्मदृष्टी पुरवते; तेथे मंडळीची तुलना—डोळे, हात, पाय, कान असे अनेक अंग असलेल्या एका शरीरासोबत केली आहे. थोड्या वेळाकरता आपल्या शरीराचा जरा विचार करा. डोळ्यांची तुलना हातांसोबत किंवा पायांची तुलना कानांसोबत करणे किती उपहासास्पद ठरेल! प्रत्येक अंगाचे वेगवेगळे कार्य असले तरीसुद्धा ही सर्व अंगे उपयुक्त आहेत आणि महत्त्वपूर्ण समजली जातात. तसेच, इतर जण तुमच्यापेक्षा अधिक किंवा तुमच्यापेक्षा कमी सेवा करीत असले तरीसुद्धा यहोवा तुमच्या जिवाभावाच्या सेवेची कदर करतो.—गलतीकर ६:४.
११, १२. (अ) काहींना ते “अशक्त” किंवा ‘कमी योग्यतेचे’ आहेत असे का वाटू शकते? (ब) यहोवा आपली सेवा कशी लेखतो?
११ निकृष्ट प्रकृती, वाढते वय किंवा इतर परिस्थितींमुळे आपल्यावर येणाऱ्या मर्यादांमुळे केव्हा केव्हा आपल्याला वाटेल की आपण “अशक्त” किंवा ‘कमी योग्यतेचे’ आहोत. पण यहोवाचा तसा दृष्टिकोन नाही. बायबल आपल्याला सांगते: “शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेहि आवश्यक आहेत, . . . जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरूण घालून विशेष मान देतो, . . . जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळविले आहे.” (१ करिंथकर १२:२२-२४) यास्तव, प्रत्येक व्यक्ती यहोवाला प्रिय वाटू शकते. आपल्या मर्यादेनुसार केलेल्या सेवेला तो मौल्यवान समजतो. तेव्हा, अशा समजदार व प्रेमळ देवाची होता होईल तितकी सेवा करावयास तुमचे अंतःकरण प्रवृत्त होत नाही का?
१२ इतरांची बरोबरी करण्यासाठी तुम्ही केलेली सेवा यहोवा पाहत नाही तर तुम्ही स्वतः—तुमचा जीव—करू शकणारी सेवा तो पाहतो. यहोवा आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण समजतो हे, येशूने त्याच्या पार्थिव जीवनाच्या शेवटल्या दिवसांदरम्यान दोन विविध स्त्रियांसोबत जो व्यवहार केला त्यावरून मनाला भिडेल अशा मार्गाने दाखवण्यात आले आहे.
कदर बाळगणाऱ्या स्त्रीची “फार मौल्यवान” देणगी
१३. (अ) मरीयेने येशूच्या मस्तकावर व पायांवर तेल ओतले तेव्हा सभोवतालची परिस्थिती काय होती? (ब) मरीयेच्या तेलाची किंमत किती होती?
१३ निसान ८, शुक्रवारी सायंकाळी, येशू जेरुसलेमपासून जवळजवळ तीन किलोमीटर दूर असलेल्या जैतुनांच्या डोंगराच्या पूर्वेकडील उतारावरील बेथानी नावाच्या एका लहानशा गावात आला. या गावात येशूचे आवडते स्नेही—मरीया, मार्था आणि त्यांचा भाऊ लाजर हे राहत होते. कदाचित येशू नेहमी त्यांच्या घरी जायचा. पण शनिवारी सायंकाळी, येशू आणि त्याच्या मित्रांनी, कदाचित येशूनेच पूर्वी कोडी असलेल्या शिमोनाला बरे केले होते त्याच्या घरी भोजन केले. येशू मेजावर रेलून बसला असताना, मरीयेने एक नम्र कृत्य केले, ज्यावरून तिच्या भावाला पुनरुत्थित करणाऱ्या मनुष्याबद्दल तिची गाढ प्रीती व्यक्त झाली. तिने “फार मौल्यवान” सुगंधी तेलाची एक कुपी फोडली. खरंच अतिमौल्यवान होते ते तेल! त्याची किंमत ३०० रुपये [दिनार] म्हणजे जवळजवळ त्या वेळेच्या एका वर्षाचे वेतन इतकी होती. तिने हे सुगंधी तेल येशूच्या मस्तकावर व पायांवर ओतले. आणि मग आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले.—मार्क १४:३; लूक १०:३८-४२; योहान ११:३८-४४; १२:१-३.
१४. (अ) मरीयेच्या कृत्यावर शिष्यांची काय प्रतिक्रिया होती? (ब) येशूने मरीयेची बाजू कशी घेतली?
१४ हे पाहून शिष्य चडफडले! “अशी नासाडी कशासाठी?” त्यांनी विचारले. चोरटा हेतू लपवून गरजू लोकांना मदत होईल असे वरवरून दाखवणारा यहुदा म्हणाला: “हे सुगंधी तेल तीनशे रुपयास [“दिनारास,” NW] विकून ते गरिबांस का दिले नाहीत?” मरीया शांत राहिली. पण येशूने शिष्यांना म्हटले: “हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य [कालोस याचे एक रूप] केले आहे. . . . हिला जे काही करिता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लाविले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की, सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेहि हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल.” येशूच्या या प्रेमळ शब्दांमुळे मरीयेच्या अंतःकरणाला किती समाधान लाभले असावे!—मार्क १४:४-९; योहान १२:४-८.
१५. मरीयेच्या भावस्पर्शी कृत्यामुळे येशू भारावून का गेला व यातून जिवाभावाच्या सेवेबद्दल आपण काय शिकतो?
१५ मरीयेच्या या भावस्पर्शी कृत्याने येशू भारावून गेला. त्याच्या लेखी, तिने एक स्तुत्य कृत्य केले होते. येशूने त्या देणगीच्या किंमतीकडे पाहिले नाही तर ‘तिला जे काही करिता आले ते तिने केले’ या वस्तुस्थितीकडे पाहिले. तिने संधीचा फायदा घेऊन जे तिला देता येऊ शकत होते ते दिले. इतर अनुवादांत, “तिला करता आले ते सर्व तिने केले,” किंवा “तिच्या शक्तीनुसार तिने सर्वकाही केले,” असे म्हटले आहे. (ॲन अमेरिकन ट्रान्सलेशन; द जेरुसलेम बायबल) मरीयेने जिवाभावाने दिले कारण तिच्याकडे असलेली सर्वात मौल्यवान गोष्ट तिने दिली. जिवाभावाने सेवा करण्याचा हाच अर्थ होतो.
विधवेच्या “दोन टोल्या”
१६. (अ) एक गरीब विधवा दान देताना येशूचे लक्ष तिच्याकडे कसे काय गेले? (ब) विधवेच्या टोल्यांची किती किंमत होती?
१६ काही दिवसांनंतर म्हणजे निसान ११ रोजी येशू संपूर्ण दिवस मंदिरातच होता. तेथे त्याच्या अधिकाराची पृच्छा करण्यात आली शिवाय त्याने कर, पुनरुत्थान आणि इतर बाबींविषयी किचकट प्रश्नांना तिथल्या तिथे उत्तरे दिली. इतर कारणांव्यतिरिक्त ‘विधवांची घरे खाऊन टाकल्याबद्दल’ त्याने शास्त्री आणि परुशांचा धिक्कार केला. (मार्क १२:४०) मग, स्त्रियांच्या आवारात येशू बसला; तेथे यहुदी परंपरेनुसार १३ भांडारे होती. लोक त्या भांडारांमध्ये वर्गणी टाकत असल्याचे तो बारकाईने पाहत काही वेळ तेथे बसला. अनेक धनवान लोक, काही कदाचित धार्मिकतेचा बुरखा चढवून किंवा दिखाऊपणा करत आले. (पडताळा मत्तय ६:२.) एका विशिष्ट स्त्रीवर येशूची नजर खिळून राहिली. तिच्यात किंवा तिने आणलेल्या देणगीत साधारण लोकांना काही उल्लेखनीय असे दिसून आले नसते. पण, अंतःकरणे जाणणाऱ्या येशूला माहीत होते, की ती एक “गरीब विधवा” होती. तिने आणलेल्या देणगीचे मोलही त्याला माहीत होते—“दोन टोल्या, म्हणजे एक दमडी.”b—मार्क १२:४१, ४२.
१७. येशूने विधवेच्या देणगीला कसे लेखले व यावरून देवाला देण्याविषयी आपण काय शिकतो?
१७ येशूने आपल्या शिष्यांना जवळ बोलावले कारण तो त्यांना जो धडा शिकवणार होता तो त्यांनी साक्षात पाहावा अशी त्याची इच्छा होती. येशू त्यांना म्हणाला: “हे जे भांडारात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांच्यापेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे.” त्याच्या अंदाजाप्रमाणे, इतरांचे सर्व मिळून जेवढे होईल त्याच्यापेक्षा अधिक तिने टाकले होते. तिने “आपले होते नव्हते ते”—उरलेली शेवटची दमडी दिली होती. असे करून तिने स्वतःला यहोवाच्या हवाली केले होते. अशाप्रकारे, देवाला देण्याबाबत ज्या व्यक्तीचे उदाहरण देण्यात आले तिची देणगी तसे पाहिल्यास काहीच आर्थिक मूल्याची नव्हती. परंतु देवाच्या नजरेत ती अमोल होती!—मार्क १२:४३, ४४; याकोब १:२७.
जिवाभावाने सेवा करण्याविषयी यहोवाच्या दृष्टिकोनातून शिकणे
१८. येशूने त्या दोन स्त्रियांशी केलेल्या व्यवहारातून आपण काय शिकतो?
१८ या दोन स्त्रियांसोबत येशूने केलेल्या व्यवहारावरून आपण, जिवाभावाने सेवा करण्याविषयी यहोवाचा कोणता दृष्टिकोन आहे त्याबद्दलचे काही प्रोत्साहनदायक धडे शिकतो. (योहान ५:१९) येशूने त्या विधवेची तुलना मरीयेबरोबर केली नाही. मरीयेच्या “फार मौल्यवान” तेलाला त्याने जितके मौल्यवान समजले तितकेच मौल्यवान त्याने त्या विधवेच्या दोन टोल्यांनाही समजले. प्रत्येकीने सर्वात उत्तम असलेले दिल्यामुळे दोघींच्याही देणग्या देवाच्या नजरेत मौल्यवान होत्या. यास्तव, देवाच्या सेवेत तुम्हाला हवी तेवढी सेवा करता येत नसल्यामुळे, अपात्रतेची भावना उत्पन्न होत असल्यास निराश होऊ नका. तुम्ही जे सर्वोत्तम देऊ शकता ते स्वीकारण्यात यहोवाला आनंद वाटतो. लक्षात असू द्या, यहोवाला तुमच्या अंतःकरणातील ओढीची जाणीव आहे कारण तो “हृदय पाहतो.”—१ शमुवेल १६:७.
१९. इतर जण देवाची ज्याप्रकारे सेवा करतात त्याबद्दल आपण निर्णय का करू नये?
१९ आपण एकमेकांना कसे लेखतो व वागवतो त्यावर जिवाभावाने सेवा करण्याविषयी असलेल्या यहोवाच्या दृष्टिकोनाचा परिणाम झाला पाहिजे. इतरांनी केलेल्या प्रयत्नांची टिका करणे किंवा एखाद्याच्या सेवेची तुलना दुसऱ्यांच्या सेवेशी करणे किती वाईट आहे! पण दुःखाची गोष्ट, एका ख्रिस्ती स्त्रीने लिहिले: “तुम्ही पायनियर असला तर ठीक, नाही तर तुमचा काही उपयोग नाही, असे काहीजण तुम्हाला भासवतात. ‘केवळ’ नियमित राज्य प्रचारक म्हणून टिकून राहण्यास झटणाऱ्या आमच्या सारख्यांचीसुद्धा प्रशंसा केली जावी असं आम्हाला वाटतं.” एखाद्या सहख्रिश्चनाने किती प्रमाणात जिवाभावाची सेवा करावी हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही हे आपण लक्षात ठेवावे. (रोमकर १४:१०-१२) लाखो विश्वासू राज्य प्रचारकांतील प्रत्येकाने केलेल्या जिवाभावाच्या सेवेची यहोवा कदर बाळगतो तेव्हा आपणही ती बाळगावी.
२०. आपल्या सहउपासकांबद्दल नेहमी काय गृहीत धरणे उचित आहे?
२० परंतु, काही जणांना सेवेत जितके करता येते त्यापेक्षा ते कमी करत आहेत असे भासत असल्यास काय? एखाद्या सहविश्वासूचे मंद होणे यावरून हे सूचित होते, की त्याला काळजी वाहणाऱ्या वडिलांच्या साहाय्याची किंवा उत्तेजनाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे काहींसाठी जिवाभावाची सेवा मरीयेच्या महागड्या तेलासारखी नसून विधवेच्या लहान टोल्यांसारखी असेल हे आपण विसरता कामा नये. आपले बंधू व भगिनी यहोवावर प्रीती करतात आणि ही प्रीती त्यांना होता होईल तितकी—कमी नव्हे—तर अधिक सेवा करण्यास प्रवृत्त करील. निश्चितच, यहोवाचा कोणताही कर्तव्यदक्ष सेवक त्याला शक्य असतानाही देवाची सेवा कमी प्रमाणात करण्याचे निवडणार नाही!—१ करिंथकर १३:४, ७.
२१. पुष्कळ जण कोणता प्रतिफलदायी जीवनमार्ग निवडतात व कोणते प्रश्न उद्भवतात?
२१ तथापि, देवाचे अनेक लोक सर्वात प्रतिफलदायी जीवनमार्ग, अर्थात पायनियर सेवा निवडून जिवाभावाची सेवा करीत आहेत. त्यांना कोणते आशीर्वाद प्राप्त होतात बरे? शिवाय, आजपर्यंत पायनियरींग करू न शकलेल्यांबद्दल काय—आपण पायनियर आत्मा कसा प्रदर्शित करू शकतो? पुढील लेखात या प्रश्नांची उत्तरे दिली जातील.
[तळटीपा]
a यहूदाऐवजी मत्थियाला प्रेषित म्हणून निवडल्यामुळे, पौलाचे नव्हे तर मत्थियाचे नाव १२ पायांवर कोरण्यात आलेल्या नावांपैकी असावे. पौल एक प्रेषित होता तरी त्या १२ पैकी नव्हता.
b प्रत्येक नाणे, लेप्टन, म्हणजे त्या काळचे सर्वात लहान यहुदी चालू नाणे होते. दोन लेप्टा एक दिवसाच्या पगाराच्या १/६४ व्या भागाच्या तुल्य होते. मत्तय १०:२९ प्रमाणे, एक अस्सारियोन दमडी (आठ लेप्टांच्या बरोबरीचे) एखादा मनुष्य दोन चिमण्या विकत घेऊ शकत होता. गरीब लोकांना परवडू शकणारे हे सर्वात स्वस्त अन्न होते. म्हणजेच, ती विधवा खरोखर गरीब होती. कारण तिच्याकडे फक्त एक चिमणी विकत घेण्याकरता लागणाऱ्या किंमतीची अर्धीच किंमत होती शिवाय, ते एकवेळचे पूर्ण अन्न देखील नव्हते.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ यहोवाची जिवाभावाने सेवा करणे म्हणजे काय?
◻ यहोवा आपली तुलना इतरांबरोबर करीत नाही हे १ करिंथकर १२:१४-२६ मधील उदाहरण कसे दाखवून देते?
◻ मरीयेच्या महागड्या तेलाबद्दल आणि विधवेच्या दोन लहान टोल्यांबद्दल येशूने काढलेल्या उद्गारांवरून जिवाभावाने देण्याविषयी आपण काय शिकतो?
◻ आपण एकमेकांना कसे लेखतो त्यावर जिवाभावाने सेवा करण्याविषयी असलेल्या यहोवाच्या दृष्टिकोनाचा परिणाम कसा झाला पाहिजे?
[१५ पानांवरील चित्र]
मरीयेने तिच्याकडचे सर्वोत्तम ते दिले, येशूच्या शरीराला “फार मौल्यवान” तेलाने सुगंधित केले
[१६ पानांवरील चित्र]
विधवेच्या टोल्या—आर्थिक मूल्य नसलेले पण यहोवाच्या नजरेत अमोल