शूनेम प्रेम आणि हिंसा यांसाठी प्रख्यात
दक्षिणीय गालीलमध्ये, इज्रेलच्या तराईवर, पूर्वेस शूनेम हे शहर वसलेले होते. या छोट्या शहराने बायबल इतिहासाच्या दोन महत्त्वाच्या लढायांची साक्ष दिली, पण ते शहर एकनिष्ठ प्रेमाचे उदाहरण मांडलेल्या दोन स्त्रियांच्या जन्मस्थानासाठी देखील प्रसिद्ध होते.
शूनेमच्या मागील बाजूस एक टेकडी होती तिला मोरे म्हणून ओळखण्यात येत असे, मैदानाच्या पलीकडे, सुमारे आठ किलोमीटर अंतरावर गिलबोवा पर्वत होता. या दोन टेकड्यांमध्ये पाण्याची मुबलकता असलेली, सुपीक जमीन—इस्राएलमधील सर्वात फलदायक जमीन होती.
शूनेमभोवती असणाऱ्या हा कसदार ग्रामीण भूप्रदेश आतापर्यंत सांगण्यात आलेल्या अतिशय मोहक प्रेमकथांसाठी—गीतरत्न यासाठी पार्श्वभूमी पुरवतो. हे गीत आपल्याला एका ग्रामीण मुलीबद्दल सांगते जिने शलमोन राजाच्या पत्नींपैकी एक होण्याचे आमंत्रण नाकारून आपल्या मेंढपाळ सोबत्याशी लग्न करण्याचे पसंत केले. तिचे मन जिंकण्यासाठी शलमोनाने आपले सर्व चातुर्य आणि संपत्ती पणाला लावली. त्याने वारंवार तिची स्तुती केली: “ही प्रभातीसारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ . . . ती कोण?” तिला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपण्याचे आणि सोन्याने मढवण्याचे त्याने वचन दिले.—गीतरत्न १:११; ६:१०.
आपल्या राजेशाही जीवनाची तिला झलक देण्यासाठी, शलमोन तिला आपल्यासोबत जेरूसलेमला घेऊन गेला, तेव्हा त्याच्यासोबत ६० उत्तम सैनिक होते. (गीतरत्न ३:६-११) त्याने तिला आपल्या राजेशाही दरबारात मुक्कामास ठेवले, हा दरबार इतका मंत्रमुग्ध करणारा होता, की शबाच्या राणीने ते वैभव पाहिले तेव्हा ती देखील “गांगरून गेली” होती.—१ राजे १०:४, ५.
पण शूनेमची कन्या आपल्या मेंढपाळ मुलाशी एकनिष्ठ होती. तिने म्हटले: “वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ” आहे. (गीतरत्न २:३) शलमोन त्याच्या हजारो द्राक्षमळ्यांचा आनंद घेवो. तिच्या प्रियकरासोबत—तिच्याकरता एक द्राक्षमळा पुरेसा होता. तिचे प्रेम डळमळीत होऊ शकत नव्हते.—गीतरत्न ८:११, १२.
आणखी एक स्त्री शूनेममध्ये राहत असे. तिच्या दैहिक स्वरूपाबद्दल आपल्याला काही सुद्धा माहीत नाही, पण ती मनाने सुंदर होती हे मात्र नक्की. बायबल म्हणते, की तिने ‘तत्परता दाखवली’—किंवा तिने प्रयत्नांची पराकाष्टा केली—जेणेकरून अलीशाची नियमित जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था व्हावी.—२ राजे ४:८-१३.
तिने आणि तिच्या पतीने अलीशासाठी तयार केलेल्या माडीवरील खोलीत दीर्घ, थकवा आणणाऱ्या प्रवासानंतर अलीशा कृतज्ञतेने परततो त्या प्रसंगाची आपण कल्पना करू शकतो. त्याच्या सेवाकार्याचा कालावधी ६० वर्षांचा असल्यामुळे तो त्यांच्या घरी वारंवार गेला असावा. अलीशा त्या मार्गाने जेव्हा गेला तेव्हा त्याला आपल्या घरी राहावे म्हणून या शूनेमकरीण स्त्रीने का आग्रह केला? कारण तिने त्याच्या कामाचे मूल्य जाणले होते. या नम्र, निःस्वार्थ संदेष्ट्याने राष्ट्राचा विवेक म्हणून राजांना, याजकांना आणि सामान्य लोकांना यहोवाची सेवा करण्याच्या त्यांच्या कर्तव्याचे स्मरण म्हणून कार्य केले.
यामध्ये कोणतीही शंका नाही, की येशूच्या मनात शुनेमकरीण स्त्री होती कारण त्याने म्हटले: “संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारितो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल.” (मत्तय १०:४१) या देवभिरू स्त्रीला यहोवाने विशेष प्रतिफळ प्रदान केले. ती कित्येक वर्षांपासून वांझ होती, तरी तिने एका मुलाला जन्म दिला. काही वर्षांनंतर देशात सात वर्षांचा दुष्काळ पडला तेव्हा तिला ईश्वरी साहाय्य देण्यात आले. हा प्रेरक अहवाल आपल्याला या गोष्टीचे स्मरण देतो, की देवाच्या सेवकांना दाखवण्यात येणाऱ्या दयेकडे आपला स्वर्गीय पिता केव्हाही दुर्लक्ष करत नाही.—२ राजे ४:१३-३७; ८:१-६; इब्री लोकांस ६:१०.
दोन निर्णायक युद्धे
या दोन एकनिष्ठ स्त्रियांचे घर म्हणून जरी शूनेमची आठवण करण्यात येत असली तरी, त्याने दोन युद्धांची साक्ष देखील दिली ज्यामुळे इस्राएलाच्या इतिहासाला पूर्ण कलाटणी मिळाली. मोरे आणि गिलबोवा या टेकड्यांच्या मधल्या भागात—जवळच चांगली रणभूमी होती. बायबल काळातील सेनापती नेहमी अशा ठिकाणी तळ ठोकायचे जेथे पाण्याची मुबलकता असायची, जेथे संरक्षणासाठी उंच भूप्रदेश असायचा आणि शक्य असल्यास कोरड्या दरीचा प्रदेश उंचावरून पाहण्यासाठी मोक्याची ठिकाणे आणि लोकांच्या तुकड्या, घोडे आणि रथ मावतील इतकी मोठी जागा असायची. या सर्व गोष्टी शूनेम आणि गिलबोवा या ठिकाणी होत्या.
शास्त्यांच्या काळात, मोरेच्या समोरील मैदानावर १,३५,००० मिद्यानी, अमालेकी आणि इतर लोकांनी छावणी उभारली होती. त्यांचे उंट “समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे अगणित होते.” (शास्ते ७:१२) त्यांच्यासमोर मैदानाच्या पलीकडे, गिलबोवा पर्वताच्या पायथ्याशी हरोदच्या विहिरीजवळ, इस्राएल लोक शास्ता गिदोनच्या नेतृत्वाखाली होते, त्याच्याकडे केवळ ३२,००० सैनिक होते.
युद्धाच्या काही दिवसांदरम्यान एक पक्ष दुसऱ्या पक्षाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणार होता. उपहास करणाऱ्या सैन्यांच्या तुकड्यांचे थवे, युद्धातील उंट, रथ आणि घोडे यांमुळे इस्राएलच्या सैनिकांना धडकी भरणे शक्य होते. यामध्ये कोणतीही शंका नाही, की मिद्यानी—जे सुरवातीपासूनच आपआपल्या नियुक्त ठिकाणी तयार होते, पण त्यावेळी मात्र इस्राएल लोक जमा होत होते—एक भयंकर दृश्य शाबीत झाले. गिदोनाने जेव्हा विचारले: “ज्याला भीति वाटत असेल किंवा जो घाबरून गेला असेल” असा कोण आहे? तेव्हा त्याच्या सैन्यातील दोन तृतीयांश लोक रणांगण सोडून गेले.—शास्ते ७:१-३.
आता इस्राएली सैन्यातील केवळ १०,००० लोकांनी १,३५,००० शत्रू सैन्यांकडे आपले लक्ष केंद्रित केले आणि लवकरच यहोवाने इस्राएली सैन्यांची संख्या ३०० पर्यंत कमी केली. इस्राएली लोकांच्या रीतीनुसार, या लहान गटाला तीन तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. अंधार पडल्यानंतर ते पांगले आणि शत्रूच्या छावणीच्या तिन्ही बाजूला आपआपल्या नियुक्त ठिकाणी पोहंचले. त्यानंतर गिदोनच्या आज्ञेनुसार, या ३०० लोकांनी आत दिवट्या असलेले घडे फोडले, त्यांनी त्या दिवट्या वर धरल्या आणि असा घोष केला, “परमेश्वराची तरवार गिदोनाची तरवार!” त्यांनी त्यांची रणशिंगे फुंकली आणि ते फुंकतच राहिले. अंधारात, गोंधळलेल्या या संमिश्र सैनिकांच्या जमावाला वाटले, की त्यांच्यावर जणू ३०० ताफे हल्ला चढवत आहेत. यहोवाने त्यांच्यातील प्रत्येकाला एकमेकांविरुद्ध चेतवले आणि “सर्व सेना पळू लागली; तिने ओरडत ओरडत पळ काढला.”—शास्ते ७:१५-२२; ८:१०.
शौल राजा होता त्यावेळी शूनेम येथे दुसरे युद्ध झाले. बायबल अहवाल देते, की “पलिष्ट्यांनी एकवट होऊन शूनेम येथे छावणी दिली; इकडे शौलाने सर्व इस्राएल जमा करून गिलबोवा येथे छावणी दिली,” काही वर्षांपूर्वी गिदोनच्या सैन्याने अगदी असेच केले होते. पण शौलाचा गिदोनप्रमाणे यहोवावर पूर्ण विश्वास नव्हता त्यामुळे त्याने एन-दोरमधील दुरात्मिक माध्यमांचा सल्ला घेण्याचे पसंत केले. त्याने जेव्हा पलिष्ट्यांची छावणी पाहिली तेव्हा तो “घाबरला आणि त्याच्या मनाचा थरकाप झाला.” त्यानंतर जे युद्ध झाले त्यात इस्राएल लोकांची दाणादाण उडाली आणि त्यांचा चांगलाच पराजय झाला. शौल आणि योनाथान दोघेही या युद्धात मृत्युमुखी पडले.—१ शमुवेल २८:४-७; ३१:१-६.
यामुळे शूनेमचा इतिहास प्रेम आणि हिंसा अर्थात यहोवावरील विश्वास आणि दुरात्म्यावरील भरवसा याकरता प्रख्यात झाला. या खोऱ्यात दोघा स्त्रियांनी प्रेमात आणि आदरातिथ्यात निष्ठा दाखवली आणि दोघा इस्राएली नेत्यांनी निर्णायक युद्धे लढली. ही चारही उदाहरणे, यहोवावर विसंबून राहण्याचे महत्त्व दाखवून देतात कारण त्याची सेवा करणाऱ्यांना प्रतिफळ देण्यात तो कधीही चुकत नाही.
[३१ पानांवरील चित्र]
प्राचीन शूनेमच्या क्षेत्रातील आर्वाचीन शुलाम गाव आणि पृष्ठभूमीत मोरे
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.