गरजवंतांना प्रेम दाखवणे
गरजू भाऊ-बहिणींना प्रेम दाखवणे ही ख्रिश्चनांची जबाबदारी तर आहेच शिवाय तो एक विशेषाधिकारही आहे. (१ योहान ३:१७, १८) प्रेषित पौलाने लिहिले: “आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) एक बांधव सुमारे चार दशकांपासून यहोवाची सेवा करत आले आहेत, अलीकडेच त्यांची पत्नी आजारी असताना आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांना ख्रिस्ती बंधुत्वाच्या प्रेमाचा अनुभव मिळाला. ते लिहितात:
“माझी पत्नी आजारी पडली तेव्हा मी तिची घरीच काळजी घेत होतो, त्यामुळे मला जवळजवळ दोन महिने कामावर जाता आलं नाही. पण त्याकाळात मंडळीतील स्नेही, मदतीसाठी धावून आले तेव्हा मला किती हायसं वाटलं! पैशाच्या रूपात मिळालेल्या अनेक बक्षिसांमुळे गहाण ठेवलेल्या वस्तू सोडवण्यासाठी तसेच वीजेचं आणि पाण्याचं बिल भरण्यासाठी मला मोठी मदत झाली, त्या बक्षिसांच्या आतील कार्डावर असं लिहिण्यात आलं होतं, ‘मदतीसाठी हा थोडासा हातभार.’
“माझ्या पत्नीचा मृत्यू होण्याच्या दोन आठवड्यांआधी आमच्या विभागीय पर्यवेक्षकांनी आम्हाला एक उत्तेजनात्मक भेट दिली. आठवड्याच्या शेवटी मंडळी ज्या स्लाईडस् पाहणार होती त्याही त्यांनी आम्हाला दाखवल्या. टेलिफोनवरून आम्ही सभा ऐकत होतो—विभागीय पर्यवेक्षकांनी संचालित केलेल्या क्षेत्र सेवेच्या सभा देखील आम्ही ऐकल्या. यांपैकी एका सभेच्यावेळी सर्वजण क्षेत्र सेवेसाठी एकत्र जमले होते तेव्हा त्यांनी माझ्या पत्नीला देखील ‘हॅलो’ असं म्हटलं. अशा प्रकारे ती जरी शरीरानं सर्वांपासून दूर होती तरी तिला कधी एकाकी वाटलं नाही.
“तिचा मृत्यू झाल्यानंतर तासाभराच्या आतच मंडळीचे सर्वच्या सर्व वडील माझ्या घरी जमले होते. त्या दिवशी शंभरापेक्षा अधिक भाऊ-बहिणी माझ्या घरी आले. सर्वांसाठी खायला पुरेल इतकं ‘भरपूर’ जेवण पुरवण्यात आलं होतं. मला जी मदत, सहानुभूतीच्या अभिव्यक्ती, सांत्वनाचे शब्द देण्यात आले आणि माझ्याकरता ज्या प्रार्थना करण्यात आल्या ते सर्व सांगायला शब्द अपूरे पडतील. या सर्व गोष्टी माझ्यासाठी किती शक्तिवर्धक होत्या! माझ्यासाठी आणण्यात येणारं जेवण आणि घरच्या साफसफाईच्या कामातील मदत आता थांबवा असं शेवटी मला बांधवांना सांगावं लागलं.
“अशा प्रकारचे निःस्वार्थ दयेचे, चिंतेचे आणि प्रेमाचे भाव यहोवाच्या संघटनेशिवाय कोठे असू शकतात? आज खरे मित्र फार कमी आहेत. यहोवाने आपल्याला आध्यात्मिक भाऊ-बहिणींचं मोठं विस्तृत कुटुंब देऊन आशीर्वादित केलं आहे!”—मार्क १०:२९, ३०.