वृद्ध पालकांचा आदर केल्यामुळे मिळणारी प्रतिफळे
देवाचे खरे उपासक आपल्या पालकांचा आदर करतात, त्यांचा सन्मान करतात तसेच त्यांची काळजी देखील घेतात कारण त्यांचे त्यांच्यावर प्रेम असते. असे करणे त्यांच्या उपासनेचा एक भाग आहे. बायबल म्हणते: “त्यांनी [मुलांनी किंवा नातवंडांनी] आपल्या घरच्यांबरोबर सुभक्त्यनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडण्यास शिकावे, कारण देवाच्या दृष्टीने हे मान्य आहे.” (तिरपे वळण आमचे.) (१ तीमथ्य ५:४) आपण तरुण असू किंवा वयस्क असू आपल्या पालकांचे आणि आजीआजोबांचे “उपकार” फेडणे आपल्यासाठी रास्त आहे. असे करण्याद्वारे त्यांचे प्रेम, त्यांनी उपसलेले कष्ट आणि कित्येक वर्षे आपली घेतलेली काळजी या गोष्टींची आपल्याला कदर असल्याचे आपण दाखवतो. आपल्या जीवनाबद्दल आपण आपल्या पालकांचे ऋणी आहोत!
याकडे लक्ष द्या, की पालकांचे आणि आजीआजोबांचे उपकार फेडणे “देवाच्या दृष्टीने मान्य आहे.” याचा संबंध आपल्या ‘ईश्वरी भक्तीसोबत’ आहे. अशा प्रकारे, या सल्ल्याचा अवलंब करण्याद्वारे आपल्याला प्रतिफळ मिळते कारण आपल्याला हे ठाऊक आहे, की देव ज्यामुळे आनंदित होतो तेच नेमके आपण करत आहोत. त्यामुळे आपल्यालाही सौख्यानंद प्राप्त होतो.
दिल्यामुळे आनंद मिळतो, विशेषतः ज्यांनी आपल्याला उदारपणे दिले आहे, त्यांना दिल्यामुळे आपल्याला आनंद होतो. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) बायबलमधील पुढील तत्त्वाच्या एकवाक्यतेत कार्य करणे किती प्रतिफळदायक आहे: “तुझ्या बापाला व तुझ्या आईला सुख दे. तुला जन्म देणारीला आनंदात ठेव”!—नीतिसूत्रे २३:२५, कॉमन लँग्वेज भाषांतर.
आपल्या पालकांचे आणि आजीआजोबांचे उपकार आपण कसे फेडू शकतो? तीन प्रकारे: भौतिकरीत्या, भावनात्मकरीत्या आणि आध्यात्मिकरीत्या. प्रत्येक प्रकारामुळे प्रतिफळे प्राप्त होतात.
भौतिकरीत्या देणे
देवाची सेवा करणाऱ्यांना हे माहीत आहे, की जवळच्या कौटुंबिक सदस्यांकरता भौतिक गोष्टींची तरतूद करणे महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाने बोध केला: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:८.
तुन्जी आणि जॉय पश्चिम आफ्रिकेत वास्तव्यास आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची होती तरी देखील त्यांनी जॉयच्या वृद्ध पालकांना आपल्या घरी राहण्यासाठी बोलावले. वडील आजारी होते आणि कालांतराने त्यांचा मृत्यू झाला. तुन्जी सांगतात: “पापा आम्हाला सोडून गेले तेव्हा आईंनी माझ्या पत्नीला मिठी मारली आणि म्हटलं: ‘तूझ्या हातांत जे काही होतं ते सर्वकाही तू केलं. पापांच्या मृत्यूमुळं तू स्वतःला कोणत्याही प्रकारे दोषी समजू नको.’ पापा गेल्यामुळे आम्हाला फार चुकल्याचुकल्यासारखं वाटतं, आम्ही त्यांच्याकरता सर्वोत्तम औषधे आणली आणि आम्हाला ते हवे आहेत, त्यांची गरज आम्हाला आहे, याची नेहमीच आम्ही त्यांना जाणीव दिली; देवाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला. या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे.”
अर्थात, इतरांना भौतिकरीत्या मदत करणे सर्वांनाच शक्य होत नाही. नायजेरियात राहणाऱ्या एका इसमाने असे म्हटले: “एखाद्या मनुष्याला स्वतःचाच चरितार्थ चालवता येत नसेल, तर दुसऱ्या व्यक्तीला कसं सांभाळू शकेल?” अनेक देशांत पुढील वर्षांत परिस्थिती आणखीन बोकाळलेली असेल. संयुक्त राष्ट्रसंघाने भाकीत केल्यानुसार, काही काळानंतर आफ्रिकेतील उप-सहारातील निम्मे लोक पूर्णतः गरिबीत जीवन कंठत असतील.
तुमची आर्थिक परिस्थिती हालाखीच्या असल्यास तुम्ही दरिद्री विधवेच्या सत्यकथेपासून सांत्वन प्राप्त करू शकता. येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने एका विधवेला मंदिराच्या दानपेटीत अल्प अनुदान टाकताना पाहिले. तिने ‘अगदी कमी किंमतीच्या दोन टोल्या’ दिल्या होत्या. तथापि, तिच्या परिस्थितीची कल्पना असल्यामुळे येशूने म्हटले: “मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानांत टाकले; हिने तर आपल्या कमाईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”—लूक २१:१-४.
त्याचप्रमाणे, आपण आपल्या पालकांची किंवा आजीआजोबांची भौतिकरीत्या तरतूद करण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मग ती भौतिक संपन्नता अल्प असली तरी यहोवा पाहतो आणि कदर करतो. आपण आपल्या सामर्थ्यापलीकडे करावे, अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करत नाही. कदाचित आपल्या पालकांना किंवा आजीआजोबांना देखील अशाच प्रकारे वाटेल.
भावनात्मकरीत्या देणे
आपल्या पालकांची आणि आजीआजोबांची काळजी घेण्यात त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यापेक्षा अधिक काही समाविष्ट आहे. आपल्या सर्वांना भावनात्मक गरजा असतात. आपल्यावर प्रेम करावे, आपल्याला विचारावे, इतरांना आपण हवेहवेसे वाटावे आणि आपण कुटुंबाचा महत्त्वाचा सदस्य व्हावे असे प्रत्येकाला वाटते आणि यास वृद्धजन अपवाद नाहीत.
केनियामध्ये राहणाऱ्या मेरीने आपल्या वृद्ध सासूची काळजी तीन वर्षे घेतली. मेरी म्हणते: “भौतिक गरजा पूर्ण करण्याखेरीज आम्ही त्यांच्याशी नेहमी बोलत असू. आईंकडून फारसं घरकाम होत नव्हतं, पण आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि आम्ही दोघी जिवलग मैत्रिणी झालो आहोत. काहीवेळा आम्ही देवाबद्दल बोलतो आणि काहीवेळा आमच्या शेजारच्या लोकांविषयी. त्यांनी आता वयाची ९० वर्षे ओलांडली तरी त्यांची स्मरणशक्ती अद्यापही उत्तम आहे. त्या जेव्हा १९१४ च्या सालाआधी लहान होत्या तेव्हाचे दिवस त्यांना आताही आठवतात आणि त्या दिवसांविषयी आमच्याशी त्या गप्पा मारतात.”
मेरी पुढे म्हणते: “वृद्ध व्यक्तीची काळजी घेणं ही इतकी सोपी गोष्ट नाही, परंतु त्यांचा सहवास लाभल्याने आम्हाला अनेक मोठी प्रतिफळं मिळालीत. आमच्या कुटुंबात शांती आणि सुसंगतता आहे. मी त्यांना मदत करत असल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये देखील मदत करण्याचा आत्मा प्रेरित झाला आहे. माझे पती माझा खूप आदर करतात. माझ्यासोबत कोणी वरच्या आवाजात बोललेलं आईंनी ऐकल्यास त्या लगेचच माझी कड घेतात. त्या असताना माझ्याशी कर्णकटू शब्दांत बोलायला कोणी धजवत नाही!”
आध्यात्मिकरीत्या देणे
भौतिकरीत्या आणि भावनात्मकरीत्या देण्याद्वारे देणाऱ्याला प्रतिफळे मिळतात तेच आध्यात्मिकरीत्या देण्याच्या बाबतीत खरे आहे. प्रेषित पौलाने रोममधील ख्रिस्ती मंडळीला लिहिले: “तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्वासाच्या योगाने आपणा उभयतास, मला तुम्हाविषयी, व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.”—रोमकर १:११, १२.
त्याचप्रकारे देवाची सेवा करणाऱ्या वृद्धजनांना आध्यात्मिकरीत्या देण्याद्वारे परस्परांना उत्तेजन प्राप्त होते. नायजेरियामध्ये राहणाऱ्या ओसॉन्डू लिहितात: “मला माझे आजीआजोबा त्यांच्या काळातील गोष्टी सांगतात आणि ते मला फारच मनोरंजक वाटतं. माझे आजोबा, त्यांनी ५० च्या आणि ६० च्या दशकादरम्यान पूर्ण-वेळेचे सेवक म्हणून काम केल्याचं आम्हाला सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज पाहायला मिळतं. ते, आताच्या मंडळीच्या रचनेची तुलना ते जेव्हा साक्षीदार झाले त्या काळाशी करतात. पायनियर या नात्यानं त्यांच्या या अनुभवांमुळे मला मदत होते.”
ख्रिस्ती मंडळीतील इतर सदस्य देखील वृद्धांना मदतीचा हातभार लावू शकतात. आधी उल्लेख करण्यात आलेले तुन्जी यांनी त्यांच्या मंडळीत काय घडले याविषयी सांगितले: “एकदा एका तरुण बांधवाला जाहीर व्याख्यान देण्यासाठी सांगण्यात आलं होतं तेव्हा ते भाषण दोघांना मिळून तयार करता यावं म्हणून त्याने त्या भाषणाची रूपरेषा पापांकडे आणली. एकदा टेहळणी बुरूज संचालक पापांकडे आले आणि त्यांनी पापांना असं म्हटलं: ‘तुम्हाला जास्त अनुभव आहे. त्यामुळे मला कोठे सुधारणा करण्याची गरज आहे, ते जरा मला सांगा.’ पापांनी त्या वडिलांना व्यवहार्य सल्ला दिला. मंडळीच्या प्रार्थनेत बांधवांनी कित्येकवेळा पापांच्या नावाचा उल्लेख केला. आपण इतरांना हवेहवेसे आहोत असं त्यामुळे त्यांना वाटलं.”
उत्तम वागणुकीमुळे लोक देवाकडे आकर्षित होतात
काहीवेळा, आपण आपल्या पालकांप्रती आणि आजीआजोबाप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करतो तेव्हा आपण लोकांना देवाकडे आकर्षित करत असतो. प्रेषित पौलाने लिहिले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून . . . देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र २:१२.
ॲन्ड्रू, पश्चिम आफ्रिकेतील ख्रिस्ती वडील, सत्य न मानणाऱ्या आपल्या आजारी पित्याची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा ९५ किलोमीटरचा प्रवास करतात. ते म्हणतात: “मी यहोवाचा साक्षीदार झालो तेव्हा माझ्या वडिलांनी कडा विरोध केला. परंतु ते आजारी असताना मी ज्याप्रकारे त्यांची देखभाल केली ते पाहिल्यानंतर त्यांनी माझ्या धाकट्या भावंडांना आर्जवलं, ‘तुम्हाला सुद्धा तुमच्या भावाचा धर्म स्वीकारावा लागेल!’ त्यामुळे ते प्रेरित झाले आणि आता माझी नऊच्या नऊ भावंडे यहोवाचे साक्षीदार आहेत.”
आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करणे, त्यांची काळजी घेणे हे विशेषतः आर्थिक बिकट परिस्थिती असताना एक आव्हान असू शकते. परंतु ख्रिस्ती तसे करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना अनेक प्रतिफळे मिळतात. थोडक्यात, त्यांना देण्यातील आनंद प्राप्त होतो तसेच “सर्वांचा पिता” असलेल्या यहोवा देवाला ते हर्षित करत आहेत हे जाणल्याने त्यांना समाधान मिळते.—इफिसकर ४:६.
[६ पानांवरील चौकट]
ज्यांची काळजी घेतली जाते आणि जे काळजी घेतात अशांसाठी ईश्वरी सल्ला
उत्तेजनात्मक असा: “आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.”—रोमकर १५:२.
दृढ असा: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलतीकर ६:९.
नम्र असा: “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरविण्याच्या बुद्धीने . . . काहीहि करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.”—फिलिप्पैकर २:३.
चांगले करणारे असा: “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे.”—१ करिंथकर १०:२४.
समजूतदार असा: “तुमची सहनशीलता [“समजूतदारपणा,” NW] सर्वांना कळून येवो.” —फिलिप्पैकर ४:५.
कनवाळू असा: “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा . . . एकमेकांना क्षमा करा.”—इफिसकर ४:३२.
[७ पानांवरील चित्र]
मंडळीतील तरुण वडील, वृद्धजनांच्या अनुभवापासून लाभ प्राप्त करू शकतात