वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ७/१५ पृ. २०-२३
  • तुमच्या मुलाचे जीवन वाचवा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या मुलाचे जीवन वाचवा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जिव्हाळ्याचे मित्र व्हा
  • देवावरील प्रेम
  • देवाचे भय
  • आनंदी प्रतिफळ
  • तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • पालकांनो आपल्या मुलांना प्रेमाने वळण लावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • आईवडिलांनो आपल्या मुलांना यहोवावर प्रेम करायला मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • आध्यात्मिकरित्या सुदृढ कुटुंबाची उभारणी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ७/१५ पृ. २०-२३

तुमच्या मुलाचे जीवन वाचवा!

मायकल आणि आल्फिना दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू-नटलच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेल्या खेड्यात राहतात. सात मुलांचे संगोपन करण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. पत्नीच्या पूर्ण साहाय्यामुळे मायकलने त्याच्या परीने, पित्यांसाठी असणाऱ्‍या बायबलमधील आज्ञेचे पालन केले: ‘आपल्या मुलांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.’ (इफिसकर ६:४) परंतु काही वेळा समस्या ह्‍या उद्‌भवतात.

उदाहरणार्थ, खेळायला अधिक वेळ मिळावा म्हणून आफ्रिकेतील गुराखी मुले त्यांचे कळप एकत्र करतात; यात काही गैर असल्याचे त्यांना वाटत नाही. काही वेळा ते एकमेकांची लावालावी करतात किंवा अर्वाच्य गोष्टींची चर्चा करतात. मायकलने त्याच्या मुलांना स्पष्ट ताकीद दिली होती, की गुरे राखायला गेल्यानंतर त्यांनी अशा प्रकारच्या मुलांपासून दोन हात दूर राहावे. (याकोब ४:४) तथापि, कामावरून घरी येताना त्याने त्यांना काही वेळा त्या मुलांसोबत पाहिले. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्याची मायकलला गरज भासली होती.—नीतिसूत्रे २३:१३, १४.

मायकल आपल्या मुलांचा कोंडमारा करत होता, असे तुम्हाला वाटते का? काहींना तसे वाटेलही, परंतु येशू ख्रिस्ताने म्हटले: “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.” (मत्तय ११:१९) मायकल आणि आल्फिना यांनी मुलांसोबत वेळ घालवण्याद्वारे तसेच त्यांना बायबल अहवाल आणि त्यातील सत्ये शिकवण्याद्वारे घरात प्रेमळ वातावरण तयार केले होते.

मायकल आणि आल्फिना यांना चार मुली आहेत—तिमबेकिली, सफीवा, तॉलकली आणि तिमबकॉनी. या सर्वजणी देवराज्याच्या पूर्ण वेळेच्या प्रचारक आहेत. त्यांची दोन मुले यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून काम पाहतात. त्यांचा तिसरा मुलगा सेवा सेवक या नात्याने काम करतो आणि त्याची पत्नीसुद्धा पूर्ण वेळेची सुवार्तिक आहे.

मोठे कुटुंब असलेल्या अनेक ख्रिस्ती पालकांना आपल्या मुलांचे संगोपन करण्यात यश मिळाले आहे. तथापि, काही मुलांचे पालकीय संगोपन चांगल्या प्रकारे होत असले तरी देखील ते सत्याचा त्याग करतात. निःसंशये, त्यांचे पालक उधळ्या पुत्राचा दृष्टान्त आपल्या मनी बाळगतात आणि या आशेनिशी जगतात, की त्यांचा मुलगा किंवा मुलगी पश्‍चात्ताप करेल आणि अखेरीस त्याचा अथवा तिचा उद्धार होईल.—लूक १५:२१-२४.

तथापि, खेदाची गोष्ट म्हणजे काही ख्रिस्ती पालक त्यांची सर्वच्या सर्व मुले या जगात गमावत आहेत. आफ्रिकेच्या भागांत ही विशेष चिंतेची बाब आहे, येथील मुले किशोरावस्थेपर्यंत पालकांच्या अधीन असल्याचे दिसते. परंतु ऐन तारुण्यात ही मुले सैतानी जगाच्या अनैतिक मार्गांद्वारे भुलवली जातात. (१ योहान ५:१९) परिणामी, अनेक पिता, मंडळीचे वडील या नात्याने सेवा करण्यास पात्र ठरत नाहीत. (१ तीमथ्य ३:१, ४, ५) अर्थातच, आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, असा दृष्टिकोन ख्रिस्ती वडिलांनी बाळगला पाहिजे. तर मग, आपल्या मुलांचे जीवन वाचवावे म्हणून पालकांना काय करता येण्यासारखे आहे?

जिव्हाळ्याचे मित्र व्हा

येशू हा परिपूर्ण तर होताच, शिवाय ज्ञानात आणि अनुभवात इतर कोणत्याही मानवापेक्षा तो फार श्रेष्ठ होता. तथापि, त्याने त्याच्या अपरिपूर्ण शिष्यांना जिव्हाळ्याचे मित्र या नात्याने पाहिले. (योहान १५:१५) यामुळेच त्याच्यासोबत राहण्याची त्यांची इच्छा होती आणि त्याच्या अस्तित्वात त्यांची भरभराटच झाली. (योहान १:१४, १६, ३९-४२; २१:७, १५-१७) पालक यापासून शिकू शकतात. घरात प्रेमळ, मैत्रीपूर्ण वातावरण असल्यास सूर्यप्रकाशाच्या दिशेने लहानसे झुडूप ज्याप्रमाणे जोमाने वाढते त्याप्रमाणे मुलांचा देखील उत्कर्ष होतो.

पालकांनो, तुमची मुले त्यांच्या सर्व चिंतानिशी तुमच्याकडे निःसंकोचपणे येतात का? तुम्ही त्यांचे ऐकता का? कोणताही निष्कर्ष काढण्याआधी चित्र अधिक स्पष्ट व्हावे म्हणून तुम्ही त्यांचे विचार, त्यांच्या भावना जाणून घेता का? विशिष्ट प्रश्‍नांची उत्तरे बायबल प्रकाशनांमध्ये शोधण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत संशोधन करून त्यांना धीराने मदत करता का?

दक्षिण आफ्रिकेतील एक आई सांगते: “शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच आम्ही आमच्या मुलीला दिवसभरात घडलेल्या गोष्टी सांगण्याचे उत्तेजन द्यायचो. उदाहरणार्थ, मी तिला विचारत असे: ‘शाळेच्या जेवणाच्या सुट्टीत तू कोणाबरोबर होतीस? तुझ्या नव्या शिक्षिकेबद्दल मला काही सांग पाहू. ती कशी दिसते? या आठवड्यात काय काय करायचं तू ठरवलंयस?’ एके दिवशी आमची मुलगी घरी आली आणि तिने म्हटले, की इंग्रजीच्या शिक्षिका संपूर्ण वर्गाला एका चित्रपटाला घेऊन जाणार आहेत आणि नंतर आम्हाला त्या चित्रपटावर विचार मांडायचे आहेत. त्या चित्रपटाचं नाव जरा आक्षेपार्हच होतं. त्या चित्रपटाविषयी अधिक माहिती काढल्यानंतर तो चित्रपट ख्रिस्ती व्यक्‍तीसाठी योग्य नसल्याचं आम्हाला कळलं. आम्ही त्याविषयी कुटुंबात चर्चा केली. दुसऱ्‍याच दिवशी आमच्या मुलीने शिक्षिकेकडे जाऊन तिला सांगितले, की त्या चित्रपटाचे नैतिक दर्जे तिच्या ख्रिस्ती विश्‍वासाच्या एकवाक्यतेत नसल्यामुळे तिला तो चित्रपट पाहायचा नाही. त्या शिक्षिकेने यावर विचार केला आणि नंतर आमच्या मुलीचे असे म्हणून आभार मानले, की वर्गाला त्या चित्रपटासाठी घेऊन जाण्याची आता तिची इच्छा नव्हती अन्यथा तिच्यावर नंतर पश्‍चात्ताप करण्याची पाळी आली असती.” या पालकांनी त्यांच्या मुलींमध्ये नियमितपणे दाखविलेल्या प्रेमळ आस्थेमुळे त्यांना चांगले प्रतिफळ मिळाले. ती आनंदी, आशावादी आहे आणि आता वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या दक्षिण आफ्रिका शाखा दफ्तरात स्वयंसेवक म्हणून काम करते.

इतर लोकांच्या मुलांशी व्यवहार करताना येशूने उत्तम उदाहरण मांडले. त्याने त्यांच्या सोबतीचा आनंद घेतला. (मार्क १०:१३-१६) आपल्या मुलांसोबत काम करण्यात पालकांनी किती आनंदी असले पाहिजे! आफ्रिकेच्या काही भागांत वडिलांनी त्यांच्या मुलांसोबत चेंडू किंवा इतर खेळ खेळणे शरमेची गोष्ट मानली जाते. परंतु ख्रिस्ती पित्यांनी स्वतःला इतके पण महत्त्व देऊ नये की ते आपल्या मुलांसोबत खेळू शकत नाहीत. आपल्यासोबत वेळ घालवण्यात आनंद मानणारे पालक लहान मुलांना हवेसे वाटतात. यामुळे मुलांना स्वतःच्या चिंता सहजगत्या व्यक्‍त करता येतात. अशा प्रकारच्या भावनात्मक गरजांकडे दुर्लक्ष केले जाते आणि विशेषतः त्यांच्याकडे वारंवार बोट दाखविले जाते तेव्हा मुले चिडतात किंवा विलग होतात.

कौटुंबिक नातेसंबंधांबद्दल कलस्सैकरांना लिहितेवेळी पौलाने म्हटले: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्‍न होतील.” (कलस्सैकर ३:२१) कडक शिस्त आणि जिव्हाळ्याच्या मैत्रीचा विलक्षण अभाव यांत काहीवेळा असंतुलन असल्याचे यावरून दिसून येईल. मुलांवर अर्थात किशोरवयीनांवर देखील प्रेम केले जाते, त्यांची कदर केली जाते तेव्हा ते कदाचित आवश्‍यक ती शिस्त स्वीकारतील.

देवावरील प्रेम

पालक आपल्या मुलांना जो सर्वात मौल्यवान वारसा देऊ शकतात तो आहे प्रेम व्यक्‍त करण्यातील त्यांचे स्वतःचे उदाहरण. आपले पालक देवावर खरे प्रेम व्यक्‍त करतात आणि दाखवतात, हे मुलांना पहायला आणि ऐकायला मिळणे गरजेचे आहे. दक्षिण आफ्रिकेतील वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या शाखा दफ्तरात काम करणारा एक युवक सांगतो: “मी लहान होतो तेव्हा मी माझ्या बाबांना घरकामात मदत करायचो. मी केलेल्या छोट्याशा कामाचं देखील बाबा फार कौतुक करत असल्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करायला फार आवडायचं. त्या वेळेचा उपयोग ते मला यहोवाविषयी अनेक गोष्टी सांगण्यासाठी करत. उदाहरणार्थ, मला आठवतं, की एके शनिवारी आम्ही मोठी मेहनत करून बागेतील गवत कापत होतो. त्या दिवशी खरोखरच फार उकाडा होता. बाबा अक्षरशः घामाघूम झाले होते त्यामुळे मी धावत जाऊन दोन प्याल्यांत बर्फ टाकून पाणी आणलं. तेव्हा बाबांनी म्हटलं: ‘यहोवा किती बुद्धिमान आहे हे तुला दिसतं का? बर्फ पाण्यावर तरंगतो. तो जर पाण्यात बुडला असता तर सरोवरांतील आणि तळ्यांतील सर्व जीवसृष्टी नाश पावली असती. उलटपक्षी, बर्फ संरक्षक आवरण म्हणून कार्य करतो! यामुळे यहोवाला अधिक चांगल्या प्रकारे जाणण्यास आपल्याला मदत होत नाही का?’a नंतर, तटस्थ राहिल्यामुळे मला तुरुंगात डांबण्यात आलं तेव्हा विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ होता. एके रात्री निराश मनःस्थितीत मी माझ्या तुरुंगाच्या कोठडीत होतो तेव्हा बाबांचे ते शब्द मला आठवले. ते शब्द किती अर्थभरीत होते! माझ्याच्यानं झाल्यास मी सर्वदा यहोवाची सेवा करीन.”

होय, पालक जे काही करतात त्या प्रत्येक गोष्टीत मुलांना देवावरील प्रेम पाहायला मिळण्यास हवे. देवावरील प्रेम आणि स्वेच्छिक आज्ञापालन हे विशेषतः ख्रिस्ती सभांची उपस्थिती, क्षेत्र सेवेतील सहभाग तसेच कौटुंबिक बायबल वाचन व अभ्यास यांमागील प्रेरक शक्‍तीद्वारे निदर्शनास येण्यास हवे. (१ करिंथकर १३:३) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनापासून केलेल्या कौटुंबिक प्रार्थनेत देवावरील प्रेम दिसून आले पाहिजे. तुमच्या मुलांना अशा प्रकारचा वारसा देण्याच्या महत्त्वावर जितका जोर द्यावा तितका तो कमीच आहे. यामुळेच इस्राएलांना आज्ञा देण्यात आली होती: “तू आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्‍तीने प्रीति कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:५-७; पडताळा मत्तय २२:३७-४०.

पापमय स्वभावाचा आपला वारसा, देवावर प्रेम करण्यातील आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्यातील मोठा अडसर आहे. (रोमकर ५:१२) यास्तव बायबल अशीही आज्ञा देते: “अहो परमेश्‍वरावर प्रीति करणाऱ्‍यांनो, वाइटाचा द्वेष करा.” (स्तोत्र ९७:१०) वाईट विचारांमुळे बहुतेकवेळा वाईट कामे परिणीत होतात. हे टाळण्यासाठी मुलाने दुसरा महत्त्वपूर्ण गुण देखील विकसित केला पाहिजे.

देवाचे भय

प्रीतीसोबत यहोवाला अप्रसन्‍न करण्याचे आदरयुक्‍त भय फार स्पृहणीय आहे. स्वतः येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी परिपूर्ण उदाहरण घालून दिले आहे, त्याला ‘यहोवाचे भय मानण्यात’ आनंद मिळाला. (यशया ११:१-३) मूल आपल्या ऐन तारुण्यात पोहंचते तेव्हा त्याच्या लैंगिक भावना अतिशय तीव्र होतात त्यावेळी अशा प्रकारचे भय त्याच्यासाठी फार महत्त्वाचे असते. अनैतिक वर्तनाकडे नेणाऱ्‍या जगिक दबावांना विरोध करण्याकरता देवाचे भय युवकाला मदत करू शकते. (नीतिसूत्रे ८:१३) काही समाजांतील पालक लैंगिक पाशांचा कसा सामना करावा याबद्दल त्यांच्या मुलांना शिकवायला टाळाटाळ करतात. खरे तर अशा गोष्टींची चर्चा करणे गैर आहे, असे अनेकांना वाटते. परंतु अशा प्रकारच्या पालकीय दुर्लक्षितपणाचा काय परिणाम झाला आहे?

बूगा, ऑमॉको आणि त्सॉयियॉना या तीन वैद्यकीय तज्ज्ञांनी दक्षिण आफ्रिकेमधील ट्रान्सकीच्या ग्रामीण भागांतील १,७०२ मुलींची आणि ९०३ मुलांची मुलाखत घेतली. दक्षिण आफ्रिका वैद्यकीय नियतकालिक (इंग्रजी) याने अहवाल दिला, “७६ टक्के मुलींनी आणि ९०.१ टक्के मुलांनी संभोग उपभोगल्याचे पाहणीत दिसून आले.” या मुलींचे सरासरी वय १५ होते आणि त्यांपैकी अनेक जणींना समागमासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. २५० पेक्षा अधिक जणींना एकदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा गर्भधारणा झाली होती. लैंगिक संक्रमित आजारांचे उच्च प्रमाण हा देखील याचा परिणाम होता.

विवाहपूर्व संभोग कसा टाळावा, याविषयी आपल्या मुलांना शिकविण्याच्या आवश्‍यकतेकडे अनेक पालक कानाडोळा करतात, हे उघड आहे. उलटपक्षी, वरील नियतकालिक पुढे म्हणते: “गर्भधारणा आणि मातृत्व हा स्त्रीत्वाचा बहुमान आहे, असे ट्रान्सकीच्या ग्रामीण भागांत मानले जाते आणि मुली वयात येतात तेव्हा त्यांना हे समजते.” जगाच्या इतर भागांत देखील अशाच प्रकारची समस्या आहे.

लैंगिकतेविषयी समजण्यासाठी पालकांनी आपल्याला मदत केली नाही म्हणून आफ्रिकेतील अनेक युवक याचे खापर त्यांच्या पालकांच्या डोक्यावर फोडतात. तुमचे तारुण्य त्यापासून सर्वोत्तम लाभ मिळवणे (इंग्रजी) या पुस्तकाचा उपयोग करण्यात काही ख्रिस्ती पालकांची पंचाईत झाली आहे.b लैंगिक अवयवांचा आदरणीय वापर आणि वयात येतेवेळी होणारे बदल यांविषयी या पुस्तकाच्या पृष्ठे २०-३ वर वर्णन करण्यात आले आहे.

लैंगिकतेबद्दल असणाऱ्‍या देवाच्या दृष्टिकोनाची आपल्या मुलांसोबत चर्चा करण्याचे आव्हान पेलवणारे पालक खरोखरच वाखाणणी करण्याजोगे आहेत. एखादी गोष्ट समजण्याच्या मुलाच्या क्षमतेनुसार, हे प्रगतिशीलपणे उत्तमप्रकारे साध्य केले जाऊ शकते. मुलाचे वय, यासारखी गोष्ट विचारात घेऊन शारीरिक अवयव आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख करताना पालकांना स्पष्ट असण्याची गरज असेल. अन्यथा, जे काही सांगण्यात येत आहे ते सर्व अननुभवी युवकाच्या डोक्यावरून जाईल.—१ करिंथकर १४:८, ९.

दक्षिण आफ्रिकेतील एका पित्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे, ते वर्णन करतात: “लैंगिक विषयासारख्या संवेदनशील विषयाची चर्चा माझ्या मुलींसोबत देखील करण्याच्या अनेक संधी मला मिळाल्या. तथापि, माझ्या पत्नीने तुमचे तारुण्य त्यापासून सर्वोत्तम लाभ मिळवणे या पुस्तकाचा उपयोग करून आमच्या मुलींकडे विशेष लक्ष दिले. [पृष्ठे २६-३१ पाहा.] माझा मुलगा १२ वर्षांचा होता तेव्हा मी त्याला लांब डोंगरावर फिरायला घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावेळी आम्ही मुलाच्या शरीराच्या विकासाची आणि विवाहानंतर त्याचा होणारा विशिष्ट उद्देश या गोष्टींची सविस्तर चर्चा केली. हस्तमैथुनाची सवय टाळणे व तो आपल्या आई आणि बहिणींचा जसा आदर करतो त्याचप्रमाणे त्याने इतर मुलींचाही आदर करावा याविषयांची देखील मी त्याच्यासोबत चर्चा केली.”

आनंदी प्रतिफळ

नुकताच उल्लेख केलेल्या आईवडिलांनी प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांच्या तिन्हीही मुलांना वाढविण्यात त्यांना चांगले परिणाम मिळाल्यामुळे ते आनंदी आहेत. आता ते तिघेही जण प्रौढ झाले असून विश्‍वासू ख्रिश्‍चनांशी विवाहित आहेत. त्यांचा मुलगा आणि त्यांचे दोघेही जावई ख्रिस्ती मंडळीत वडील म्हणून काम पाहतात आणि दोन जोडपी अनेक वर्षांपासून पूर्ण वेळेच्या सुवार्तिक कार्यात राहिले आहेत.

होय, आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होण्यासाठी कठीण परिश्रम करणारे पालक बायबलच्या शिकवणींना प्रतिसाद देणाऱ्‍या त्यांच्या मुलांकडून आनंदी प्रतिफळाची अपेक्षा करू शकतात. नीतिसूत्रे २३:२४, २५ म्हणते: “सुज्ञ मुलास जन्म देतो तो त्याजविषयी आनंद पावतो. तुझी मातापितरे आनंद पावोत.” या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेल्या मोठ्या कुटुंबाचा विचार करा. आल्फिना म्हणते: “माझ्या मुलांनी केलेल्या आध्यात्मिक प्रगतीचा मी विचार करते तेव्हा माझे अंतःकरण आनंदाने भरून जाते.” हे आनंदी प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी सर्व ख्रिस्ती पालक कार्य करोत.

[तळटीपा]

a पाणी थिजण्याच्या बिंदूस येते तेव्हा त्याची घनता कमी होऊन बर्फ पाण्याच्या वर तरंगू लागतो. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, जीवन येथे कसे आले—उत्क्रांतीने अथवा निर्मितीने? (इंग्रजी), या पुस्तकातील पृष्ठे १३७-८ पाहा.

b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित, तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे (इंग्रजी) हे पुस्तक सुद्धा पाहा.

[२३ पानांवरील चित्र]

जीवनातील वास्तविकतांचे वर्णन करण्यासाठी पिता उचित प्रसंगाचा उपयोग करू शकतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा