वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ७/१५ पृ. १४-१९
  • तुम्ही सद्‌गुणी मार्ग अनुसरत आहात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही सद्‌गुणी मार्ग अनुसरत आहात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्याने सद्‌गुणी मार्ग अनुसरला
  • त्यांनी सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवले
  • आज सद्‌गुणी मार्ग अनुसरणे
  • जपून राहा!
  • अभ्यास आणि मनन यांचे महत्त्व
  • सद्‌गुण आणि संगती
  • सद्‌गुणी मार्ग कायम अनुसरत राहा
  • आपण आपल्या विश्‍वासात सात्त्विकतेची भर कशी घालू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • सात्विकतेने कसे चालावे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सात्विकतेने का चालावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • अनीतीने भरलेल्या जगात सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ७/१५ पृ. १४-१९

तुम्ही सद्‌गुणी मार्ग अनुसरत आहात का?

“जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.”—फिलिप्पैकर ४:८.

१. अनीती म्हणजे काय, आणि ती यहोवाच्या उपासनेला का भ्रष्ट करू शकलेली नाही?

अनीती म्हणजे नैतिक ऱ्‍हास किंवा भ्रष्टता. आपण ज्यात राहात आहोत, त्या जगास तिने संपूर्णतः व्यापून टाकले आहे. (इफिसकर २:१-३) तथापि, यहोवा देव त्याच्या शुद्ध उपासनेला मुळीच भ्रष्ट होऊ देणार नाही. ख्रिस्ती प्रकाशने, सभा, संमेलने आणि अधिवेशने यांतून आपल्याला अधार्मिक आचरणाच्या धोक्यांविषयी समयोचित सूचना दिल्या जातात. आपल्याला देवाच्या नजरेत ‘जे बरे त्याला चिकटून राहण्याकरता’ सयुक्‍तिक शास्त्रवचनीय मदत देण्यात येते. (रोमकर १२:९) म्हणूनच एक संघटना या नात्याने, यहोवाचे साक्षीदार निष्कलंक, सद्‌गुणी राहण्याचा प्रयत्न करताहेत. पण वैयक्‍तिक रित्या आपले कसे? मुद्द्‌याचे म्हणजे, तुम्ही सद्‌गुणी मार्ग अनुसरत आहात का?

२. सद्‌गुण म्हणजे काय, आणि सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा का करावी लागते?

२ सद्‌गुण म्हणजे नैतिक गुणवत्ता, चांगुलपणा, योग्य आचार आणि विचार. हा एक निष्क्रियतेचा गुण नसून एक सक्रिय, सकारात्मक गुण आहे. सद्‌गुण म्हणजे केवळ पाप करण्याचे टाळणे नव्हे, तर चांगला मार्ग अनुसरणे. (१ तीमथ्य ६:११) प्रेषित पेत्राने सह ख्रिश्‍चनांना आग्रह केला: ‘आपल्या विश्‍वासात सद्‌गुणाची भर घाला.’ कशाप्रकारे? “[देवाच्या मोलवान वचनांना प्रतिसाद देऊन] होईल तितका प्रयत्न करून.” (तिरपे वळण आमचे.) (२ पेत्र १:५, १०) आपल्या पातकी स्वभावामुळे, सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवण्यासाठी खरोखर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. तथापि, देवाचे भय बाळगणाऱ्‍यांनी गतकाळात, मोठमोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले असतानाही असे केले होते.

त्याने सद्‌गुणी मार्ग अनुसरला

३. राजा आहाज कोणत्या दुष्कृत्यांसाठी जबाबदार होता?

३ बायबलमध्ये सद्‌गुणी मार्ग अनुसरलेल्यांचे कितीतरी अहवाल आहेत. सद्‌गुणी हिज्कीयाचेच उदाहरण घ्या. पुराव्यानुसार, त्याचा पिता अर्थात यहुदाचा राजा आहाज हा मोलेखचा उपासक होता. “आहाज राज्य करू लागला तेव्हा तो वीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याचा पूर्वज दावीद याने आपला देव परमेश्‍वर याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. तो इस्राएलांच्या राजांच्या मार्गाने चालला; ज्या राष्ट्रास परमेश्‍वराने इस्राएल लोकांपुढून घालविले होते त्यांच्या अमंगळ आचारास अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पिले [“पुत्राला अग्नीत घातले,” NW]. तो उच्च स्थानी, पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे.” (२ राजे १६:२-४) काहींचे म्हणणे आहे की ‘अग्नीत घालणे’ या वाक्यांशात नरबलीचा नव्हे तर एका विशिष्ट प्रकारच्या शुद्धीकरण विधीचा संकेत आहे. तथापि जॉन डे यांच्या मोलेख—जुन्या करारातील नरबली देवता (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हटलेले आहे: “पारंपरिक तसेच प्युनिक [कार्थेजिनियन] लिखाणांत याचा पुरावा आहे आणि पुरातनवस्तूशास्त्रातही याचा पुरावा आहे की कनानी लोकसमाजात . . . नरबली देण्याची प्रथा अस्तित्वात होती आणि म्हणून जुन्या करारात त्याचे [नरबलीचे] जे अप्रत्यक्ष उल्लेख आढळतात त्यांकडे संशयाने पाहण्याचे कारण नाही.” याशिवाय, २ इतिहास २८:३ यात तर स्पष्टपणे म्हटलेले आहे की आहाजाने “आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पिली.” (पडताळा अनुवाद १२:३१; स्तोत्र १०६:३७, ३८.) किती ही अधार्मिक  कृत्ये!

४. अनीतीने भरलेल्या वातावरणात हिज्कीयाचे वर्तन कसे होते?

४ अशा अनीतीने भरलेल्या वातावरणात हिज्कीयाचा कसा निभाव झाला? ११९ वे स्तोत्र लक्षवेधक आहे कारण काहींच्या मते हे हिज्कीयाने, अद्याप एक राजकुमार असताना रचले होते. (स्तोत्र ११९:४६, ९९, १००) त्याअर्थी, हे शब्द त्याच्या स्थितीकडे संकेत करत असावेत: “अधिपतिहि बसून आपसात माझ्याविरुद्ध बोलतात; पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करितो. माझा जीव खेदाने गळून जातो, [“मला झोप लागत नाही,” NW].” (स्तोत्र ११९:२३, २८) खोट्या धर्माच्या उपासकांनी वेढलेला हिज्कीया कदाचित राजाच्या दरबारातील लोकांच्या थट्टेचे पात्र बनला असावा, इतके की त्याला झोपही लागेनाशी झाली. तरीसुद्धा त्याने त्याचे सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवले, कालांतराने तो राजा बनला आणि तेव्हा देखील “तो परमेश्‍वराच्या दृष्टीने जे ठिक ते करी. . . . इस्राएलाचा देव परमेश्‍वर याजवर त्याचा भाव असे.”—२ राजे १८:१-५.

त्यांनी सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवले

५. दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांना कोणकोणत्या परीक्षांना तोंड द्यावे लागले?

५ सद्‌गुणी वर्तनाच्या बाबतीत दानीएल आणि हनन्या, मीशाएल व अजऱ्‍या नावाच्या त्याच्या तीन हिब्रू सोबत्यांचे उदाहरण देखील अनुकरणीय आहे. त्यांना जबरीने त्यांच्या मायदेशातून बॅबिलोनला हद्दपार करण्यात आले. या चार हिब्रू युवकांना बॅबिलोनी नावे देण्यात आली—बेल्टशस्सर, शद्रख, मेशख व अबेद्‌नगो. ‘राजा खात असे ती मिष्टान्‍ने’ त्यांना देण्यात आली आणि यांत देवाच्या नियमशास्त्रानुसार निषिद्ध ठरवलेल्या खाद्यपदार्थांचाही समावेश होता. शिवाय, त्यांना “खास्द्यांची विद्या व भाषा” यांसंबंधी तीन वर्षांचे प्रशिक्षणही घ्यायला भाग पाडण्यात आले. यात केवळ एक नवीन भाषा शिकणेच अंतर्भूत नव्हते कारण या ठिकाणी ‘खास्दी’ हा शब्द विद्वान वर्गाला दिलेल्या किताबाच्या संदर्भात आहे. त्याअर्थी या हिब्रू युवकांना भ्रष्ट बॅबिलोनियन शिकवणुकींच्या देखील संपर्कात आणण्यात आले.—दानीएल १:१-७.

६. दानीएलाने सद्‌गुणी मार्ग अनुसरला असे आपल्याला का म्हणता येईल?

६ बॅबिलोनी आचारविचारांशी जुळवून घेण्यासाठी प्रचंड दबाव असतानाही, दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांनी अनीतीऐवजी सद्‌गुणी वर्तन निवडले. दानीएल १:२१ म्हणते: “दानीएल हा कोरेश राजाच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत तेथे राहिला.” होय, दानीएल ८० वर्षांहून अधिक काळापर्यंत यहोवाचा एक सद्‌गुणी सेवक “राहिला”—या काळादरम्यान कितीतरी बलाढ्य राजे सत्तेवर आले आणि नामशेष झाले. नीतिभ्रष्ट राज्याधिकाऱ्‍यांनी कित्येक कटकारस्थाने रचली, शिवाय बॅबिलोनियन धर्मांत लैंगिक अनीतीची व्याप्ती होती, पण हे सर्व असूनही दानीएल देवाला विश्‍वासू राहिला. त्याने सद्‌गुणी मार्ग अनुसरला.

७. दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांनी अनुसरलेल्या मार्गातून आपल्याला कोणता धडा मिळतो?

७ देवाची भिती बाळगणारा दानीएल आणि त्याचे सोबती यांच्याकडून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्यांनी सद्‌गुणी मार्ग अनुसरला आणि बॅबिलोनियन संस्कृतीसोबत एकरूप व्हायला ते तयार झाले नाहीत. त्यांना बॅबिलोनियन नावे देण्यात आली तरीसुद्धा यहोवाचे सेवक असल्याची आपली ओळख त्यांनी कधीही गमावली नाही. किंबहुना, सुमारे ७० वर्षे उलटून गेल्यावरही, बॅबिलोनियन राजाने दानीएलाला संबोधित केले ते त्याच्या हिब्रू नावानेच! (दानीएल ५:१३) आपल्या दीर्घायुष्यात, दानीएलाने क्षुल्लक भासणाऱ्‍या गोष्टींतही तडजोड करण्यास नकार दिला. तरुणपणीच, “राजा खात असे ते मिष्टान्‍न व पीत असे तो द्राक्षारस यांचा आपणास विटाळ होऊ देऊ नये असा दानीएलाने मनाचा निश्‍चय केला.” (दानीएल १:८) दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांनी घेतलेल्या या अविचल भूमिकेने, त्यांना पुढे ज्या जीवन-मरणाच्या परीक्षांना तोंड द्यावे लागले त्यातून यशस्वीपणे पार होण्यास नक्कीच मदत केली असावी.—दानीएल, अध्याय ३ आणि ६.

आज सद्‌गुणी मार्ग अनुसरणे

८. ख्रिस्ती तरुण सैतानाच्या जगासोबत एकरूप होण्यास कशाप्रकारे नकार देऊ शकतात?

८ दानीएल आणि त्याच्या तीन सोबत्यांसारखेच, आज देवाच्या लोकांनीही सैतानाच्या दुष्ट जगासोबत एकरूप होण्यास नकार दिला पाहिजे. (१ योहान ५:१९) तुम्ही एक तरुण ख्रिश्‍चन असल्यास, तुम्हाला तुमच्या मित्रमंडळीकडून पेहराव, श्रृंगार आणि संगीत यांच्याबाबतीत त्यांच्या अतिरेकी आवडीनिवडींची नक्कल करण्याकरता भयंकर दबाव सहन करावा लागत असेल. तथापि, प्रत्येक फॅड किंवा स्टाइलचे डोळे मिटून अनुकरण करण्याऐवजी, खंबीर राहा आणि स्वतःला “ह्‍या युगाबरोबर समरुप” होऊ देऊ नका. (रोमकर १२:२) ‘अभक्‍तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्‍तीने वागा.’ (तीत २:११, १२, १३) तुमच्या मित्रमंडळीची नव्हे, तर यहोवाची स्वीकृती मिळवणेच सर्वात महत्त्वाचे आहे.—नीतिसूत्रे १२:२.

९. व्यापार विश्‍वात वावरणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना कोणत्या दबावांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे आणि त्यांनी स्वतःचे वर्तन कसे राखावे?

९ प्रौढ ख्रिश्‍चनांना देखील दबावांना तोंड द्यावे लागते आणि त्यांनीही सद्‌गुणी असले पाहिजे. ख्रिश्‍चन व्यापाऱ्‍यांना आक्षेपार्ह मार्गांचा अवलंब करण्याचा किंवा सरकारी कायदे आणि करासंबंधी नियम यांकडे डोळेझाक करण्याचा मोह होऊ शकतो. उद्योगातील प्रतिस्पर्धी किंवा सहकर्मचारी यांचे वर्तन कसेही असले तरीसुद्धा, ‘आपली मात्र सर्व बाबतीत चांगले वागण्याची इच्छा आहे.’ (इब्री लोकांस १३:१८) शास्त्रवचनांनुसार आपण आपल्या मालकांशी, कर्मचाऱ्‍यांशी, ग्राहकांशी, आणि प्रापंचिक सरकारांशी व्यवहार करताना प्रामाणिक आणि निःपक्ष राहण्यासाठी बांधील आहोत. (अनुवाद २५:१३-१६; मत्तय ५:३७; रोमकर १३:१; १ तीमथ्य ५:१८; तीत २:९, १०) आपण देवाणघेवाणीच्या व्यवहारांतही चोख राहण्याचा कसोशीने प्रयत्न करू. अचूक नोंदी ठेवल्यामुळे आणि ठरावांना लेखी रूप दिल्यामुळे आपण बरेच गैरसमज टाळू शकतो.

जपून राहा!

१०. संगीत निवडण्याच्या बाबतीत ‘जपून राहण्याची’ गरज का आहे?

१० स्तोत्र ११९:९ (पं.र.भा.) यात देवाच्या नजरेत सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवण्याच्या आणखी एका पैलूवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. स्तोत्रकर्ता गातो: “तरुण आपला मार्ग कशाने निर्मळ करील? तुझ्या वचनाप्रमाणे त्याला जपण्याने.” सैतानाच्या सर्वात प्रभावी शस्त्रांपैकी एक म्हणजे संगीत, ज्यात माणसाच्या भावना चेतवण्याचे सामर्थ्य असते. खेदाने म्हणावे लागते की संगीताच्या बाबतीत काही ख्रिश्‍चन ‘जपून राहिले’ नाहीत आणि रॅप किंवा हेवी मेटल यांसारख्या अतिरेकी स्वरूपाच्या संगीताकडे ते आकर्षित झाले आहेत. काहीजणांचे कदाचित असे म्हणणे असेल की संगीताने आमचे नुकसान होत नाही किंवा आम्ही गाण्याच्या शब्दांकडे लक्षच देत नाही. आणखी काही असेही म्हणतील की त्यांना गाण्यातली स्ट्राँग बीट किंवा गिटार्सचा जोरदार आवाज ऐकायला खूप मजा येते. पण एखादी गोष्ट करताना मजा येते किंवा नाही हा प्रश्‍न ख्रिश्‍चनांसाठी महत्त्वाचा नाही. ते याचा विचार करतात की “प्रभूला काय संतोषकारक आहे.” (तिरपे वळण आमचे.) (इफिसकर ५:१०) हेवी मेटल आणि रॅप संगीत सहसा अनादर, जारकर्म एवढेच काय तर सैतानवादालाही प्रोत्साहन देतात, असल्या गोष्टींना देवाच्या लोकांमध्ये निश्‍चितच थारा नाही.a (इफिसकर ५:३) तरुण असो किंवा वृद्ध, आपण सर्वांनी या प्रश्‍नावर विचार केला पाहिजे, की माझ्या संगीताच्या निवडीतून मी सद्‌गुणाचा मार्ग अनुसरत आहे की अनीतीचा?

११. टीव्ही कार्यक्रम, व्हिडियोपट आणि चित्रपटांच्या बाबतीत ख्रिस्ती व्यक्‍ती कशाप्रकारे जपून राहू शकते?

११ बरेच टीव्ही कार्यक्रम, व्हिडियोपट आणि चित्रपट अनीतीला प्रोत्साहन देतात. एका विख्यात मानसिक-आरोग्य तज्ज्ञाच्या मते, आजकाल निर्माण होत असलेल्या बऱ्‍याच चित्रपटांत ‘चंगळवाद, लैंगिकता, हिंसाचार, हाव, आणि स्वार्थीपणाच’ प्रामुख्याने पाहायला मिळतो. म्हणून जपून राहण्यात, आपण पाहण्यासाठी काय पसंत करतो याविषयीही निवडक असणे समाविष्ट आहे. स्तोत्रकर्त्याने देवाला विनंती केली: “निरर्थक गोष्टी पाहण्यापासून माझी दृष्टि वळीव.” (स्तोत्र ११९:३७) जोसफ नावाच्या एका ख्रिश्‍चन तरुणाने हेच तत्त्व अवलंबले. एका चित्रपटात लैंगिक आणि हिंसक दृश्‍ये उघडपणे दाखवण्यात येऊ लागली तेव्हा त्याने चित्रपटगृहातून काढता पाय घेतला. असे करायला त्याला लाज वाटली का? जोसफ उत्तर देतो, “नाही, अजिबात नाही. मी आधी यहोवाचा आणि त्याला खूष करण्याचा विचार केला.”

अभ्यास आणि मनन यांचे महत्त्व

१२. सद्‌गुणी मार्ग अनुसरण्यासाठी वैयक्‍तिक अभ्यास आणि मनन करणे आवश्‍यक का आहे?

१२ वाईट गोष्टींना टाळणे पुरेसे नाही. सद्‌गुणाचा मार्ग अनुसरण्यात देवाच्या वचनात नमूद असलेल्या चांगल्या गोष्टींचे वाचन आणि त्यांवर मनन करणेही अंतर्भूत आहे जेणेकरून ही नीतिमान तत्त्वे जीवनात लागू करता येतील. स्तोत्रकर्ता उत्साहाने म्हणाला, “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.” (स्तोत्र ११९:९७) बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशनांच्या वैयक्‍तिक अभ्यासाचा तुमच्या दर आठवड्याच्या कार्यक्रमांत समावेश आहे का? देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास आणि त्यावर प्रार्थनापूर्वक मनन करण्यासाठी वेळ काढणे सहजासहजी जमत नाही हे कबूल आहे. पण सहसा इतर कामांतून वेळ काढणे शक्य असते. (इफिसकर ५:१५, १६) कदाचित पहाटेची वेळ तुम्हाला प्रार्थना, अभ्यास आणि मनन करण्यासाठी उपयुक्‍त ठरेल.—पडताळा स्तोत्र ११९:१४७.

१३, १४. (अ) मनन करण्याला पर्याय का नाही? (ब) कोणत्या शास्त्रवचनांवर मनन केल्याने आपल्याला लैंगिक अनैतिकतेचा तिरस्कार करण्यास मदत होईल?

१३ मनन करण्याला पर्याय नाही, कारण त्याकरवी आपण जे शिकलो ते आठवणीत ठेवू शकतो. आणखीन महत्त्वाचे म्हणजे, त्याकरवी आपल्याला ईश्‍वरी दृष्टिकोनांचा पुरस्कार करण्यासाठी मदत मिळू शकते. उदाहरणार्थ: देव जारकर्मास निषिद्ध ठरवतो हे माहीत असणे वेगळे आणि ‘वाइटाचा वीट मानून बऱ्‍याला चिकटून राहणे’ वेगळे. (रोमकर १२:९) “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा,” असा आग्रह करणाऱ्‍या कलस्सैकर ३:५ यासारख्या इतर बायबल वचनांवर मनन केल्याने लैंगिक अनैतिकतेविषयी यहोवाला जसे वाटते तसेच आपल्यालाही वाटू लागेल. स्वतःला विचारून पाहा: ‘मी कोणत्या प्रकारच्या कामवासनेला जिवे मारले पाहिजे? मी अशा कोणत्या गोष्टींना टाळावे ज्या अशुद्ध वासना जागृत करू शकतील? विरुद्ध लिंगी व्यक्‍तींसोबत माझ्या वागण्याबोलण्याच्या बाबतीत मी कोणते बदल करावेत?—पडताळा १ तीमथ्य ५:१, २.

१४ पौल ख्रिश्‍चनांना जारकर्मापासून दूर राहण्याचे आणि आत्मनियंत्रण ठेवण्याचे प्रोत्साहन देतो, अशासाठी की “कोणी ह्‍या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये.” (१ थेस्सलनीकाकर ४:३-७) स्वतःला विचारा: ‘जारकर्म करणे नुकसानकारक का आहे? याबाबतीत मी पाप केल्यामुळे माझ्या स्वतःवर आणि इतर कोणावर कोणते नुकसान ओढवेल? माझ्यावर आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक रितीने कोणते परिणाम होतील? मंडळीत, देवाच्या नियमाचे उल्लंघन करून पश्‍चात्ताप न केलेल्यांविषयी काय? त्यांचे काय झाले?’ अशाप्रकारच्या आचरणाविषयी शास्त्रवचने काय म्हणतात ते मनावर घेतल्याने देवाच्या नजरेत जे वाईट आहे त्याविषयी आपला तिरस्कार आणखी वाढेल. (निर्गम २०:१४; १ करिंथकर ५:११-१३; ६:९, १०; गलतीकर ५:१९-२१; प्रकटीकरण २१:८) पौल म्हणतो, की जारकर्म करणारा ‘माणसाचा नव्हे तर देवाचा अव्हेर करतो.’ (१ थेस्सलनीकाकर ४:८) कोणता खरा ख्रिश्‍चन आपल्या स्वर्गीय पित्याचा अव्हेर करील?

सद्‌गुण आणि संगती

१५. सद्‌गुणी मार्गाचे अनुसरण करण्यात संगतीची काय भूमिका आहे?

१५ सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवण्यासाठी आणखी एक सहायक म्हणजे चांगली संगती, मंडळीबाहेर आणि मंडळीच्या आत देखील. स्तोत्रकर्त्याने गीत गायिले: “तुझे भय धरणाऱ्‍या सर्वांचा, तुझे विधि पाळणाऱ्‍यांचा, मी सोबती आहे.” (स्तोत्र ११९:६३) ख्रिस्ती सभांमध्ये मिळणारी हितावह संगती आपल्यासाठी आवश्‍यक आहे. (इब्री लोकांस १०:२४, २५) आपण इतरांपासून अलिप्त राहिल्यास, आपली विचारसरणी आत्मकेंद्रित बनू शकते आणि मग अनीती सहज आपल्यावर विजयी होईल. (नीतिसूत्रे १८:१) तथापि, प्रेमळ ख्रिस्ती सहवासामुळे सद्‌गुणी वर्तन टिकवून ठेवण्याचा आपला संकल्प आणखी बळकट होईल. अर्थात आपण वाईट संगतीपासूनही जपून राहिले पाहिजे. शेजारीपाजारी, सहकारी आणि वर्गमित्र यांसोबत मनमिळाऊपणे वागण्यात काही गैर नाही. पण, जे ख्रिस्ती सद्‌गुणाचा मार्ग अनुसरत नाहीत अशांशी जास्त जवळीक न साधणेच खऱ्‍या शहाणपणाचे ठरेल.—पडताळा कलस्सैकर ४:५.

१६. आज सद्‌गुणाचा मार्ग अनुसरत राहण्यासाठी १ करिंथकर १५:३३ हे वचन लागू करणे कशाप्रकारे सहायक ठरू शकेल?

१६ पौलाने लिहिले: “कुसंगतीने नीति बिघडते.” हे विधान करून तो सत्य मानणाऱ्‍यांना ताकीद देत होता की पुनरुत्थानाची शास्त्रवचनीय शिकवणूक अमान्य करणाऱ्‍या तथाकथित ख्रिश्‍चनांसोबत मैत्रीसंबंध राखल्यास, ते स्वतःचा विश्‍वास गमावू शकत होते. पौलाची ही ताकीद ज्या तत्त्वावर आधारलेली होती तेच तत्त्व आपल्या संगतीच्या बाबतीतही लागू होते. (१ करिंथकर १५:१२, ३३) अर्थात, केवळ आपल्या वैयक्‍तिक दृष्टिकोनाशी सहमत नसल्यामुळे आपण आपल्या बंधूभगिनींना दूर सारू इच्छित नाही. (मत्तय ७:४, ५; रोमकर १४:१-१२) तरीपण, मंडळीत कोणाचे वर्तन आक्षेपार्ह असल्यास किंवा त्यांची प्रवृत्ती असंतुष्ट आणि सतत कुरकूर करण्याची असल्यास, सतर्क राहण्याची गरज आहे. (२ तीमथ्य २:२०-२२) ज्यांच्या सहवासात राहिल्याने “परस्परांच्या योगाने . . . उत्तेजन” लाभते अशांसोबत जवळचे संबंध ठेवणे सुज्ञपणाचे आहे. (रोमकर १:११, १२) असे केल्याने आपल्याला सद्‌गुणाचा मार्ग अनुसरण्यास आणि ‘जीवनाच्या मार्गावर’ टिकून राहण्यास साहाय्य मिळेल.—स्तोत्र १६:११.

सद्‌गुणी मार्ग कायम अनुसरत राहा

१७. गणना अध्याय २५ नुसार, इस्राएली लोकांवर कोणते संकट ओढवले आणि यातून आपण कोणता धडा शिकतो?

१७ वाग्दत्त देश ताब्यात घेण्याच्या बेतातच असताना, हजारो इस्राएली लोकांनी अनीतीचा मार्ग अनुसरला—आणि त्यांच्यावर संकट ओढवले. (गणना, अध्याय २५) आज, यहोवाचे लोक नीतिमान नव्या जगाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. जे लोक या जगाच्या अनीतिमान गोष्टींचा अव्हेर करतात त्यांनाच या नव्या जगात प्रवेश करण्याचा अद्‌भुत सुयोग प्राप्त होईल. अपरिपूर्ण मानव असल्यामुळे आपला कदाचित वाईट गोष्टींकडे ओढा असेल, पण देव आपल्याला पवित्र आत्म्याच्या धार्मिक निर्देशनाचे अनुसरण करण्यासाठी साहाय्य पुरवू शकतो. (गलतीकर ५:१६; १ थेस्सलनीकाकर ४:३, ४, ५) म्हणूनच, आपण यहोशवाने इस्राएल राष्ट्राला दिलेला उपदेश लक्षात ठेवू या: “परमेश्‍वराचे भय धरा, त्याची सेवा सात्विकतेने व खऱ्‍या मनाने करा.” (यहोशवा २४:१४) देवाला अप्रसन्‍न करण्याविषयीचे श्रद्धापूर्ण भय आपल्याला सद्‌गुणी मार्गावर चालत राहण्यास सहायक ठरेल.

१८. अनीती आणि सद्‌गुणासंबंधाने, सर्व ख्रिश्‍चनांचा कोणता संकल्प असावा?

१८ तुम्हाला देवाला प्रसन्‍न करण्याची मनापासून इच्छा असल्यास, पौलाच्या सल्ल्याचे पालन करण्याचा संकल्प करा: “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‌गुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा.” तुम्ही असे केल्यास, त्यातून कोणते प्रतिफळ मिळेल? पौल म्हणाला: “ते आचरीत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.” (फिलिप्पैकर ४:८, ९) खरोखर, यहोवाच्या मदतीने तुम्ही अनीतीचा अव्हेर करून सद्‌गुणी मार्ग अनुसरत राहू शकता.

[तळटीप]

a Ssbw९४ MR पृष्ठे ३६-४० तसेच सावध राहा! (इंग्रजी) फेब्रुवारी ८, फेब्रुवारी २२, मार्च २२, १९९३ आणि नोव्हेंबर २२, १९९६ या अंकांतील “तरुण लोक विचारतात . . .” हे सदर पाहा.

उजळणीचे मुद्दे

◻ सद्‌गुणी मार्ग अनुसरण्याकरता काय आवश्‍यक आहे?

◻ हिज्कीया, दानीएल, आणि तीन इब्री तरुण यांनी सद्‌गुणी वर्तन कशाप्रकारे टिकवून ठेवले?

◻ सैतानाच्या डावपेचांविरुद्ध लढा देताना आपण दानीएलासारखे कसे असू शकतो?

◻ करमणुकीच्या बाबतीत ख्रिश्‍चनांनी कशारितीने जपून राहिले पाहिजे?

◻ सद्‌गुणी मार्ग अनुसरण्यात अभ्यास, मनन आणि संगती कशाप्रकारे अंतर्भूत आहे?

[१५ पानांवरील चित्र]

मोलेखच्या उपासकांनी वेढलेला असतानाही तरुण हिज्कीयाने सद्‌गुणी मार्ग अनुसरला

[१७ पानांवरील चित्रं]

करमणुकीच्या बाबतीत ख्रिश्‍चनांनी जपून राहिले पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा