वाचकांचे प्रश्न
शेरडे आणि मेंढरे यांबद्दल येशूच्या दाखल्याविषयी अभ्यास करताना आपण रोमांचित झालो होतो. ऑक्टोबर १५, १९९५ च्या “टेहळणी बुरूज” अंकात प्रस्तुत केलेली नवीन समज विचारात घेता, यहोवाचे साक्षीदार आज विभाजनाचे कार्य पार पाडत आहेत असे अद्यापही आपण म्हणू शकतो का?
होय. याविषयी अनेकांनी विचार केला आहे हे समजण्याजोगे आहे कारण मत्तय २५:३१, ३२ म्हणते: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करील.” मोठे संकट सुरू झाल्यानंतर या वचनांची पूर्णता का होते याविषयी ऑक्टोबर १५, १९९५ च्या टेहळणी बुरूज अंकाने दाखविले. येशू देवदूतांसोबत आपल्या वैभवाने येऊन न्यायाच्या राजासनावर बसेल. त्यानंतर तो लोकांना वेगळे करील. कोणत्या अर्थाने? या काळापूर्वी लोकांनी काय केले आणि काय केले नाही, या धर्तीवर तो त्यांचा न्यायनिवाडा करील.
याची तुलना आपण न्यायालयीन खटल्याकडे नेणाऱ्या चालू कायदेशीर कार्यवाहीशी करू शकतो. न्यायालयाने नियम लागू करून शिक्षा फर्माविण्याच्या आधी पुष्कळ कालावधीपर्यंत पुरावे जमा केले जातात. सध्या जिवंत असलेले लोक शेरडे किंवा मेंढरे होतील याचा पुरावा पुष्कळ काळापासून जमा करण्यात येत आहे. आणि या पुराव्यात आणखी भर पडत आहे. परंतु येशू आपल्या राजासनावर बसतो तेव्हा हा खटला पूर्णपणे तयार झालेला असेल. न्यायदंड घोषित करण्यासाठी तो तयार असेल. सार्वकालिक नाशासाठी किंवा सार्वकालिक जीवनासाठी लोकांना वेगळे करण्यात आलेले असेल.
तथापि, जीवन किंवा मरण यांसाठी करण्यात येणारे लोकांचे विभाजन ज्याचा उल्लेख मत्तय २५:३२ येथे आहे, अद्यापही भवितव्यात होणार असल्यामुळे त्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे विभाजन, विलग करणे होणार नाही, असा याचा अर्थ होत नाही. बायबलमधील मत्तयच्या १३ व्या अध्यायात एका विभाजनाच्या कार्याविषयी उल्लेख करण्यात आला आहे ज्याची पूर्णता पहिल्यांदा होते. मनोरंजक गोष्ट म्हणजे, एकमेव खऱ्या देवाच्या उपासनेतील ऐक्य या पुस्तकातील पृष्ठे १७९-८० वरील “लोकांचे विभाजन करणे” या उपशीर्षकाखाली याबद्दल माहिती देण्यात आली आहे.a हे पुस्तक म्हणते: “येशूने ह्या युगाच्या अंताशी ठळकपणे जोडलेल्या इतरही महत्त्वाच्या घटना आहेत. ‘राज्याच्या पुत्रां’ना ‘दुष्टाच्या पुत्रां’पासून अलग करणे ही त्यातली एक होय. वैऱ्याने मागाहून निदण पेरलेल्या गव्हाच्या शेताबद्दल येशूने दिलेल्या दाखल्यात त्याने हे सांगितले.”
हे पुस्तक मत्तय १३:२४-३० येथे उल्लेख करण्यात आलेल्या येशूच्या दाखल्याचा उल्लेख करत होते; या दाखल्याचे स्पष्टीकरण ३६-४३ वचनांत करण्यात आले आहे. ३८ व्या वचनाकडे लक्ष द्या, गव्हाचे चांगले बी राज्याच्या पुत्रांचे प्रतिनिधित्व करते तर निदण दुष्टाच्या पुत्रांना सूचित करते. ३९ आणि ४० वचने दाखवून देतात, की आपण जगत असलेल्या या काळात—‘या व्यवस्थीकरणाच्या शेवटी’—निदण गोळा केले जाते. ते वेगळे केले जाते आणि अखेरीस जाळण्यात, नाश करण्यात येते.
हा दृष्टान्त अभिषिक्त ख्रिश्चनांना लागू होतो (ज्यांना शेरडे आणि मेंढरे यांच्या दृष्टान्तात येशूचे बांधव असे संबोधण्यात आले आहे). तथापि, ही गोष्ट स्पष्ट आहे, की एक महत्त्वपूर्ण विभाजन आपल्या काळात पूर्ण होत आहे; ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे परंतु स्वतःला ‘दुष्टाचे पुत्र’ शाबीत करणाऱ्यांपासून अभिषिक्त जणांची वेगळी ओळख पटली जाते.
लोक विभक्त किंवा विलग होतील याबद्दल येशूने इतरही उदाहरणे दिली. विनाशाकडे नेणाऱ्या रुंद मार्गाविषयी त्याने काय म्हटले ते आठवा: “त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ७:१३) हे विवेचन केवळ अखेरच्या परिणामाबद्दल नव्हते. ते चालू कार्यवाहीबद्दल होते आणि काही जणांना जीवनाकडे नेणारा संकोचित मार्ग सापडतो हे आज देखील खरे आहे. प्रेषितांना पाठवताना येशूने म्हटले, की त्यांना काही योग्य लोक देखील भेटतील, याचे सुद्धा स्मरण ठेवा. इतर जण लायक नसतीलही आणि “त्यांच्याविरुद्ध साक्ष” व्हावी म्हणून प्रेषितांना आपल्या पायाची धूळ झाडून टाकायची होती. (लूक ९:५) आज ख्रिस्ती आपले सेवाकार्य पूर्ण करतात तेव्हा असेच घडते हे खरे नाही का? काही जण चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवतात तर इतर जण आपण पोहंचवत असलेल्या ईश्वरी संदेशाचा अव्हेर करतात.
शेरडे आणि मेंढरे याबद्दलच्या टेहळणी बुरूज मधील लेखांनी नमूद केले: “दाखल्यात वर्णन केलेला न्याय नजीकच्या भवितव्यात होणार असला तरी, आता देखील काहीतरी महत्त्वपूर्ण घडत आहे. आपण ख्रिस्ती या नात्याने, लोकांमध्ये विभाजन करणाऱ्या संदेशाची घोषणा करण्याच्या जीवन बचावणाऱ्या कार्यात गोवलेलो आहोत. (मत्तय १०:३२-३९).” आपले अनुकरण केल्यामुळे वडलांच्या विरुद्ध मुलगा, आईच्या विरुद्ध मुलगी—अशी फूट पडणार असल्याचे येशूने म्हटले होते आणि याविषयी मत्तयाच्या १० व्या अध्यायातील उताऱ्यात आपल्याला वाचण्यास मिळते.
अखेरीस, आत्म्याने अभिषिक्त झालेल्या ख्रिस्ताच्या बांधवांनी राज्य संदेशाचा जगव्याप्त प्रचार पुढे नेला आहे. लोक हा संदेश ऐकून अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया दाखवतात तेव्हा ते स्वतःची ओळख करून देत असतात. ‘अमूक व्यक्ती मेंढरू आहे आणि अमूक व्यक्ती शेरडू आहे,’ असे आपण मत्तयातील २५ व्या अध्यायाच्या अर्थानुसार म्हणू शकत नाही आणि असे म्हणता कामा नये. तथापि, आपण लोकांना सुवार्ता सांगितल्यामुळे ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत आणि ते येशूच्या बांधवांप्रती कशा प्रकारची प्रतिक्रिया दाखवतात—त्यावरून त्यांचे कोणते स्थान आहे हे कळते. यास्तव, न्यायालयातील खटल्याच्या वाढत्या पुराव्याप्रमाणे, येशूच्या बांधवांना पाठिंबा देणारे आणि असा पाठिंबा देण्यास नकार देणारे यांच्यामधील विभाजन स्पष्ट दिसत आहे. (मलाखी ३:१८) या टेहळणी बुरूज अंकाने दाखवले, की येशू लवकरच सिंहासनाधिष्ठ होईल आणि न्यायदंड घोषित करील; तेव्हा लोकांना जीवनासाठी किंवा नाशासाठी अखेरीस कायदेशीररीत्या वेगळे करण्यात येईल.
[तळटीप]
a वॉचटॉवर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे १९९४ मध्ये प्रकाशित.