बायबल देवाने कसे प्रेरित केले?
दळणवळण आज अद्भुतरीत्या राखले जाते. टेलिफोन, फॅक्स मशिन, कॉम्प्युटर यांच्या साह्याने जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात इतक्या तत्परतेने संदेश पाठविणे शक्य होईल, असा विचार काही वर्षांपूर्वी कोणाच्या मनात चुकून देखील आला नसेल.
परंतु मनुष्य ज्या दळणवळणावर स्वामित्व प्राप्त करू शकत नाही अशा प्रकारचे एक अद्भुत दळणवळण आहे—ईश्वरी प्रेरणा. यहोवाने आपले लिखित वचन अर्थात पवित्र बायबल तयार करण्यासाठी ४० लेखकांना प्रेरणा दिली. ज्याप्रमाणे मानवाकडे दळणवळण राखण्याचे एकापेक्षा अधिक मार्ग उपलब्ध आहेत त्याप्रमाणे यहोवाने देखील शास्त्रवचने प्रेरित करण्यासाठी नानाविध पद्धतींचा वापर केला आहे.
श्रुतलेखन. देवाने विशिष्ट संदेश दळणवळणाच्या साह्याने कळविले आणि नंतर ते बायबल अहवालाचा भाग झाले.a उदाहरणार्थ, नियमशास्त्राच्या कराराचे नियमन बनविण्याचा विचार करा. यहोवाने मोशेला म्हटले: “ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.” (निर्गम ३४:२७) “देवदूतांच्या योगे” प्राप्त झालेल्या या ‘वचनांची’ मोशेने नक्कल काढली आणि ही वचने आपल्याला निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवादाच्या पुस्तकात पाहण्यास मिळू शकतात.—प्रेषितांची कृत्ये ७:५३.
यशया, यिर्मया, यहेज्केल, आमोस, नहूम आणि मीखा यांच्यासहित इतर अनेक संदेष्ट्यांना देवाचे विशिष्ट संदेश देवदूतांमार्फत प्राप्त झाले. काहीवेळा या मनुष्यांनी “परमेश्वर म्हणतो” या वाक्यांशाने आपला अभिप्राय सुरू केला. (यशया ३७:६; यिर्मया २:२; यहेज्केल ११:५; आमोस १:३; मीखा २:३; नहूम १:१२) देवाने काय म्हटले हे त्यांनी नंतर लिखित स्वरूपात मांडले.
दृष्टान्त, स्वप्ने आणि ध्यानावस्था. दृष्टान्त म्हणजे झलक, दृश्य, किंवा संदेश जो एखाद्या मनुष्याच्या मनावर जागृत अवस्थेत सामान्यतः काही असामान्य मार्गांनी बिंबवला जातो. उदाहरणार्थ, पेत्र, याकोब आणि योहान “जागे झाले” तेव्हा त्यांनी रूपांतरित येशूचा दृष्टान्त पाहिला. (लूक ९:२८-३६; २ पेत्र १:१६-२१) काही बाबतींत संदेश स्वप्नाद्वारे किंवा रात्रीच्या दृष्टान्ताद्वारे देण्यात आला; हा संदेश प्राप्त करणारी व्यक्ती झोपेत असली तरी काही अंशी भानावर असे. यामुळेच दानीएलाने असे म्हटले: “मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात . . . दृष्टान्त घोळत होते.”—किंवा रोनाल्ड ए. नॉक्स हा अनुवादक असे भाषांतर करतो: “मी पडल्यापडल्या जणू माझ्या स्वप्नात पाहात आहे.”—दानीएल ४:१०.
यहोवाने ज्या व्यक्तीला ध्यानावस्थेत नेले ती व्यक्ती स्पष्टपणे एकाग्रतेत अगदी गढून गेली असली तरी किमान अर्धवट तरी जागृत अवस्थेत असे. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १०:९-१६.) बायबलमध्ये भाषांतरित “ध्यानावस्था” (एकस्टासिस) या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘दूर करणे किंवा विलग करणे’ असा होतो. नेहमीच्या स्थितीपासून मन मोकळे करणे, हा अर्थ या शब्दातून ध्वनित होतो. अशा प्रकारे ध्यानावस्थेत असलेल्या व्यक्तीला तिच्या आसपासच्या गोष्टींचे भान नसले तरी दृष्टान्त प्राप्त करण्यास ती पूर्णपणे ग्रहणक्षम असते. ‘परादीसमध्ये उचलून नेण्याचा आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये ऐकल्याचा,’ दृष्टान्त प्रेषित पौलाला झाला तेव्हा तो कदाचित अशाच प्रकारच्या ध्यानावस्थेत राहिला असावा.—२ करिंथकर १२:२-४.
देवाच्या श्रुतलेखित संदेशांच्या ज्यांनी नकला केल्या त्यांच्या विरुद्धतेत, दृष्टान्त मिळालेल्या किंवा स्वप्ने पाहिलेल्या अथवा ध्यानावस्था अनुभवलेल्या बायबल लेखकांनी पाहिलेल्या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी स्वतःचे शब्द निवडण्याचे स्वातंत्र्य काही प्रमाणात बहुतेकवेळा घेतले. हबक्कूकला सांगण्यात आले: ‘हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणालाही तो वाचता येईल.’—हबक्कूक २:२.
तर मग, श्रुतलेखित उताऱ्यांखेरीज बायबलचे इतर भाग पूर्णतः प्रेरित नव्हते, असा याचा अर्थ होतो का? निश्चित नाही. यहोवाने आपल्या आत्म्याद्वारे त्याचा संदेश प्रत्येक लेखकाच्या मनावर चांगल्या प्रकारे बिंबवला होता जेणेकरून मनुष्याचे नव्हे, तर देवाचे विचार प्रकट व्हावेत. जरी यहोवाने लेखकाला योग्य शब्द निवडण्याची परवानगी दिली होती तरी कोणतीही आवश्यक माहिती वगळली जाऊ नये आणि सरतेशेवटी देवाचे शब्द म्हणून याकडे पाहण्यात यावे म्हणून यहोवाने लेखकाचे मन आणि हृदय मार्गदर्शित केले होते.—१ थेस्सलनीकाकर २:१३.
ईश्वरी प्रकटीकरण. बायबलमध्ये भविष्यवाणी आहे—आधीच प्रकट केलेला आणि लिहून ठेवलेला इतिहास—आणि ही गोष्ट क्षुद्र मानवाच्या क्षमतेच्या पलीकडची आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे “ग्रीसचा राजा” अर्थात जगज्येता अलेक्सझांडरचे उदय पावणे आणि पतन होणे यांविषयी सुमारे २०० वर्षांपूर्वीच भाकीत करण्यात आले होते. (दानीएल ८:१-८, २०-२२) मानवी डोळ्यांनी कधीही पाहिल्या नाहीत अशा घटनांविषयी देखील बायबल प्रकट करते. आकाशाची आणि पृथ्वीची निर्मिती हे याचे एक उदाहरण होय. (उत्पत्ति १:१-२७; २:७, ८) स्वर्गात झालेली संभाषणे सुद्धा बायबलमध्ये आहेत ज्यांपैकी काहींचा उल्लेख ईयोबाच्या पुस्तकात करण्यात आला आहे.—ईयोब १:६-१२; २:१-६.
देवाने लेखकाला थेटपणे प्रकटीकरण दिले नसले तरी अशा प्रकारच्या घटना देवाने एखाद्या व्यक्तीला कळविल्या आणि त्यामुळे त्या घटना मौखिक किंवा लिखित इतिहास झाल्या तसेच त्या घटना जोपर्यंत बायबल अहवालाच्या भाग होत नाहीत तोपर्यंत त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्यात आल्या. (पृष्ठ ७ वरील पेटी पाहा.) काहीही असले तरी आपण या गोष्टीची खात्री बाळगू शकतो, की अशा प्रकारच्या सर्व माहितीचा स्रोत यहोवा होता आणि या बायबल लेखकांचे अहवाल चुकांमुळे, अतिशयोक्तीमुळे किंवा मिथ्येमुळे दूषित होऊ नयेत म्हणून खुद्द यहोवाने त्यांना मार्गदर्शित केले होते. भविष्यवाणीबद्दल पेत्राने लिहिले: “पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”b—२ पेत्र १:२१.
कठीण परिश्रमाची आवश्यकता
बायबल लेखक ‘पवित्र आत्म्याने प्रेरित झाले’ होते तरी देखील त्यांना त्यांच्या परीने योग्य ती दक्षता बाळगण्याची गरज होती. उदाहरणार्थ, शलमोनाने ‘विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली. त्याने सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा प्रयत्न केला.’—उपदेशक १२:९, १०.
काही बायबल लेखकांनी साहित्य लिहिण्यासाठी कमालीचे संशोधन केले होते. उदाहरणार्थ, लूकने आपल्या शुभवर्तमानाच्या अहवालाविषयी लिहिले: “सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या . . . अनुक्रमाने” लिहिल्या आहेत. अर्थातच, देवाच्या आत्म्याने लूकचे प्रयत्न आशीर्वादित केले होते, त्यामुळे त्याला विश्वासयोग्य ऐतिहासिक अहवाल शोधण्यास आणि त्यावेळी हयात असलेली येशूची आई मरिया तसेच तिच्यासारख्या इतर भरवशाच्या प्रत्यक्ष साक्षीदारांकडून माहिती प्राप्त करण्यास मदत मिळाली. माहितीचा अचूक अहवाल तयार करण्यासाठी त्यावेळी लूकला देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन प्राप्त होणार होते.—लूक १:१-४.
लूकच्या शुभवर्तमानाच्या विषमतेत योहानाचे शुभवर्तमान म्हणजे प्रत्यक्ष अहवाल होता जो येशूच्या मरणानंतर सुमारे ६५ वर्षांनी लिहिण्यात आला. योहानाची स्मरणशक्ती काळाच्या ओघात क्षीण होऊ नये म्हणून यहोवाच्या आत्म्याने त्याची स्मरणशक्ती जैसे थे च्या स्थितीत ठेवली होती यात काही शंका नाही. येशूने आपल्या अनुयायांना जे अभिवचन दिले होते त्याच्याशी हे सुसंगत ठरणार होते: “पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.”—योहान १४:२६.
काही बाबतींत बायबल लेखकांनी, आरंभीच्या ऐतिहासिक लेखकांच्या मूळ लेखांमधून काही संग्रह घेतले आणि या ऐतिहासिक लेखकांतील सर्वच जणांना प्रेरणा झालेली नव्हती. यिर्मयाने पहिले आणि दुसरे राजे अशाच प्रकारे रचले. (२ राजे १:१८) एज्राने पहिला आणि दुसरा इतिहास यांकरता साहित्य गोळा करता यावे म्हणून ईश्वरप्रेरित नसलेल्या १४ स्रोतांचा उल्लेख केला आणि त्यांत ‘दावीद राज्याच्या दिवसांतील बखरीचा’ आणि ‘यहूदा व इस्राएलच्या बखरीचा’ देखील समावेश आहे. (१ इतिहास २७:२४; २ इतिहास १६:११) मोशेने तर ‘परमेश्वराच्या संग्राम नावाच्या ग्रंथाला’ देखील उद्धृत केले—हा ग्रंथ म्हणजे देवाच्या लोकांच्या युद्धांचे विश्वसनीय अहवाल, हे उघड आहे.—गणना २१:१४, १५.
अशा प्रकारांमध्ये, केवळ विश्वसनीय साहित्य निवडण्यासाठी पवित्र आत्म्याने बायबल लेखकांना सक्रियपणे मदत केली होती आणि त्यानंतरच ही माहिती प्रेरित बायबल अहवालाचा भाग झाली.
व्यवहार्य सल्ला—कोणाकडून?
सूक्ष्म व्यक्तिगत निरीक्षणावर आधारलेला व्यवहार्य सल्ला बायबलमध्ये आहे. उदाहरणार्थ, शलमोनाने लिहिले: “मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीहि इष्ट नाही; हेहि देवाच्या हातून मिळते असे माझ्या ध्यानात आले.” (उपदेशक २:२४) जरी पौलाने विवाहविषयक सल्ला ‘त्याच्या स्वतःच्या मताप्रमाणे’ दिला होता तरी त्याने पुढे असे म्हटले: “मलाहि देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.” (१ करिंथकर ७:२५, ३९, ४०) पौलाकडे देवाचा आत्मा निश्चितच होता कारण प्रेषित पेत्राने नमूद केल्याप्रमाणे पौलाने जे लिहिले होते ते त्याला “देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे” होते. (तिरपे वळण आमचे.) (२ पेत्र ३:१५, १६) अशा प्रकारे देवाच्या आत्म्याने मार्गदर्शित होऊन तो आपले स्वतःचे मत प्रकट करत होता.
बायबल लेखकांनी व्यक्तिगत ठाम मत व्यक्त केले तेव्हा उपलब्ध शास्त्रवचनांचा अभ्यास आणि अवलंबाच्या धर्तीवर त्यांनी तसे केले. त्यांनी केलेले लिखाण देवाच्या विचारांशी जुळणारे होते याची आपण खात्री बाळगू शकतो. त्यांनी जो अहवाल नमूद केला होता तो देववचनाचा भाग झाला.
हेही खरे आहे, की बायबलमध्ये चुकीची विचारसरणी असणाऱ्या काही लोकांची देखील विधाने आहेत. (ईयोब १५:१५ याची ४२:७ सोबत तुलना करा.) बायबलमध्ये अशी देखील काही विधाने आहेत ज्यांमुळे देवाच्या सेवकांच्या यातनामय भावना प्रकट झाल्या; परंतु त्यांना तसे का वाटले याचे सविस्तर वर्णन पाहायला मिळाले नाही.c अशी व्यक्तिगत विधाने करण्यात आली होती तेव्हा देखील अचूक अहवाल नमूद करण्यासाठी देवाच्या आत्म्याने लेखकाला मार्गदर्शित केले होते, ज्यामुळे चुकीचा युक्तिवाद ओळखता येणे आणि तो उघड होणे शक्य झाले. खेरीज, लेखकाचे विचार साधार आहेत किंवा कसे, ही गोष्ट प्रत्येक बाबतीत कोणत्याही समंजस वाचकाला संदर्भावरून स्पष्ट होते.
थोडक्यात, संपूर्ण बायबल देवाचा संदेश आहे, असा आपण विश्वास बाळगू शकतो. बायबलमध्ये असलेले सर्वकाही आपल्या उद्देशाशी सुसंगत आहे आणि आपली सेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन त्यात पुरवले आहे, याची यहोवाने खरोखरच खात्री केली आहे.—रोमकर १५:४.
मानवी लेखक—का?
बायबलच्या लिखाणास्तव यहोवाने केलेल्या मनुष्यांच्या वापरातून त्याची मोठी सुज्ञता दिसून येते. याचा विचार करा: देवाने हेच काम देवदूतांवर सोपवले असते तर बायबल अशाच प्रकारे अपीलकारक वाटले असते का? देवदूतांच्या दृष्टिकोनातून देवाचे गुण आणि व्यवहार वाचून आपण रोमांचित झालो असतो हे खरे आहे. पण बायबल मानवांनी लिहिले नसते तर बायबलचा संदेश आत्मसात करण्यास आपल्याला कदाचित फार जड गेले असते.
उदाहरणादाखल: राजा दावीदाने व्यभिचार आणि हत्या केली व त्यानंतर पश्चात्ताप केला, बायबल असे केवळ नमूद करू शकत होते. परंतु आपल्या कामांविषयी केलेला मनःपूर्वक खेद आणि यहोवाच्या क्षमेसाठी केलेली याचना दावीदाने स्वतःच्या शब्दांत मांडणे किती चांगले आहे! “माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे,” त्याने लिहिले. “हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.” (स्तोत्र ५१:३, १७) म्हणूनच बायबलमध्ये स्नेह, विविधता आहे आणि ते मानवाला अपीलकारक देखील आहे.
होय, यहोवाने स्वतःचे वचन आपल्याला देण्यासाठी सर्वोत्तम मार्ग निवडला आहे. जरी अपरिपूर्ण आणि सदोष मानवांची निवड करण्यात आली होती तरी त्यांना आत्म्याने प्रेरित करण्यात आले होते त्यामुळे त्यांच्या लिखाणांत कोणत्याही प्रकारची चूक राहणार नव्हती. अशा प्रकारे, बायबल अनमोल आहे. त्याचा सल्ला साधार आहे आणि पृथ्वीवरील भावी परादीसबद्दल असणाऱ्या त्यातील भविष्यवाण्या भरवशाच्या आहेत.—स्तोत्र ११९:१०५; २ पेत्र ३:१३.
दररोज देववचनाचा एखादा भाग वाचण्याची सवय आपण स्वतःला का लावून घेऊ नये बरे? पेत्राने लिहिले: “तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धि व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे निऱ्या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, ३) हे देवाचे प्रेरित वचन असल्यामुळे तुम्हाला सर्व शास्त्रवचने ‘सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी असल्याचे दिसून येतील. ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.’—२ तीमथ्य ३:१६, १७.
[तळटीपा]
a दहा आज्ञा देण्यात आल्या केवळ त्यावेळीच देवाने “आपल्या बोटाने” माहिती लिहिली. मोशेने गुंडाळीवर किंवा इतर लेखन साहित्यांवर त्या शब्दांची निव्वळ नक्कल केली.—निर्गम ३१:१८; अनुवाद १०:१-५.
b ग्रीक भाषांतरित शब्द ‘प्रेरित झालेले’ फेरो प्रेषितांची कृत्ये २७:१५, १७ येथे वाऱ्याने वाहवत चालल्या नावेचे वर्णन करण्यासाठी एका वेगळ्या पद्धतीने वापरला आहे. म्हणून पवित्र आत्म्याने बायबल लेखकांचे ‘कार्य नियंत्रित’ केले. खोटी माहिती काढून टाकण्यास आणि फक्त वास्तविक माहितीचा समावेश करण्यास पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरित केले.
c उदाहरणार्थ, १ राजे १९:४, वचने १४ आणि १८ सोबत पडताळा; ईयोब १०:१-३; स्तोत्र ७३:१२, १३, २१; योना ४:१-३, ९; हबक्कूक १:१-४, १३.
[७ पानांवरील चौकट/चित्रं]
मोशेला माहिती कोठून मिळाली?
मोशेने बायबलमधील उत्पत्तीचे पुस्तक लिहिले, पण त्याने ज्या काही घटनांची नोंद केली त्या सर्व घटना त्याच्या जन्माच्या फार आधी घडल्या होत्या. तर मग, त्याला ही सर्व माहिती मिळाली तरी कोठून? त्याला ही माहिती देवाने थेटपणे प्रकट केली असावी किंवा काही घटनांचे अहवाल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकरीत्या पोहंचविण्यात आले असावेत. आरंभीच्या काळात मानवाचे आयुष्य मोठे असल्यामुळे मोशेने उत्पत्तीत नमूद केलेल्यांपैकी पुष्कळ गोष्टी आदामानंतरच्या पाच पिढ्या—मथुशलह, शेम, इसहाक, लेवी आणि अम्राम यांच्याद्वारे मोशेपर्यंत पोहंचल्या असाव्यात.
खेरीज, मोशेने लिखित अहवालांचा देखील विचार केला असावा. याबाबतीत हे उल्लेखनीय आहे, की “वंशावळी [“इतिहास,” NW] येणेप्रमाणे,” मोशे असा उल्लेख चर्चा केलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या सुरवातीला वारंवार करतो. (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति ६:९; १०:१; ११:१०, २७; २५:१२, १९; ३६:१, ९; ३७:२) काही विद्वानांच्या मते, येथील इब्री भाषांतरित शब्द “इतिहास,” टोलेडोहथ अस्तित्वात असलेल्या कोणत्याही लिखित ऐतिहासिक दस्तऐवजाला सूचित करतो आणि मोशेने अशाच प्रकारच्या ऐतिहासिक दस्तऐवजाचा आपल्या लिखाणकामासाठी उपयोग केला होता. अर्थातच, आपण असे निर्णायकपणे म्हणू शकत नाही.
उत्पत्तीच्या पुस्तकातील माहिती वरील तिन्ही पद्धतींनी प्राप्त करण्यात आली असावी—काही माहिती थेट प्रकटणाद्वारे, काही मौखिक संचारणाद्वारे आणि काही लिखित अहवालांद्वारे. परंतु यहोवाच्या आत्म्याने मोशेला प्रेरित केले होते ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे त्याच्या लिखाणाकडे देवाचे वचन म्हणून यथायोग्यपणे पाहिले जाते.
[४ पानांवरील चित्र]
देवाने अनेक प्रकारे बायबलच्या लिखाणासाठी लोकांना प्रेरित केले