बायबल अद्वितीय पुस्तक
असे म्हणण्यात आले आहे, की बायबलचा जगात सर्वात जास्त खप झाला आहे आणि हे उचित देखील आहे. कारण इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा बायबलचे अधिक वाचन केले जाते आणि ते अधिक लोकप्रिय देखील आहे. आजपर्यंत त्याच्या (पूर्णतः अथवा अंशतः) अंदाजे ४०० कोटी प्रती २,००० पेक्षा अधिक भाषांमध्ये वितरीत केल्या आहेत.
तथापि, बायबल ईश्वरी अधिकृत असल्याचा दावा केला जाणे ही गोष्ट त्याच्या वितरणापेक्षाही अधिक आस्थेची गोष्ट आहे. ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले: ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे.’ (२ तीमथ्य ३:१६) याचा काय अर्थ होतो? “परमेश्वरप्रेरित” (ग्रीक, थिओन्युस्टोस) या संज्ञेचा अक्षरशः अर्थ “देव-श्वासित” असा आहे. न्युमा या संबंधित ग्रीक शब्दाचा अर्थ “आत्मा” असा आहे. म्हणून असा दावा केला जातो, की देवाच्या पवित्र आत्म्याने मानवी लेखकांना प्रेरित केले, जणू त्यांच्यामध्ये श्वासच फुंकला जेणेकरून अंतिम उत्पादन मनुष्याचे नव्हे तर देवाचे वचन असल्याचे ठामपणे म्हणता येऊ शकेल. बायबलची एकूण सुसंगतता, शास्त्रीय अचूकता, लेखकांची प्रामाणिकता तसेच न्याय्यता आणि विशेषतः पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांमुळे बायबलचा अभ्यास केलेले खरोखरच आश्चर्यचकित होतात. या पुस्तकाचा स्रोत मनुष्यापेक्षा फार उच्च आहे, याची कोट्यवधी विचारशील वाचकांना यामुळे खात्री पटली आहे.a
परंतु देवाने बायबलच्या लिखाणासाठी कितपत काटेकोरपणे मार्गदर्शन दिले होते? काही जण म्हणतात, की देवाने शब्द न् शब्द सांगितला. तर काही जण म्हणतात, की त्याने बायबलमधील शब्द प्रेरित केले नाहीत, परंतु केवळ त्यातील विचार प्रेरित केले. तथापि, वास्तविकतेत प्रेरणा एका पद्धतीपर्यंतच मर्यादित नाही कारण देवाने असे म्हटले, तो “प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.” (तिरपे वळण आमचे.) (इब्री लोकांस १:१; पडताळा १ करिंथकर १२:६.) बायबल ज्या ४० लोकांनी लिहिले त्यांच्याशी देव कोणत्या प्रकारांनी बोलला याचे परीक्षण आपण पुढील लेखात करू या.
[तळटीपा]
a आणखी माहितीसाठी वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी) या पुस्तकाची पृष्ठे ५३-४ आणि ९८-१६१ पाहा.