सचोटीला काय झाले आहे?
सुमारे शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी बर्नी बार्नाटो हा हिऱ्यांचा व्यापारी दक्षिण आफ्रिकेतून इंग्लंडला परतला. आफ्रिकेतून आल्याआल्या त्याच्याविषयी वृत्तपत्रात जी गोष्ट लिहिली होती त्याविषयी त्याने हरकत घेतली. त्याने “काही मुद्यांमध्ये फेरफार करून” वृत्तपत्राच्या संपादकाला दुसऱ्या लेखासाठी स्वतः लिहिलेल्या काही टिपणी दिल्या आणि त्यासोबतच भल्यामोठ्या किंमतीचा धनादेश द्यायला तो विसरला नाही.
वृत्तपत्राचे संपादक जे. के. जेरोम यांनी त्या टिपणी, रद्दी कागद टाकण्याच्या टोपलीत फेकून दिल्या आणि धनादेश परत केला. बार्नाटोला याचे आश्चर्य वाटले आणि त्याने दुप्पट किंमत देण्याचे कबूल केले. परंतु, यावेळीही त्याची डाळ शिजली नाही. “तुम्हाला किती पैसे हवेत?” त्याने विचारले. हा प्रसंग आठवून जेरोम सांगतात: “मी त्याला म्हटलं, असं निदान लंडनमध्ये तरी झालेलं नाहीये.” निश्चितपणे त्यांची संपादकीय सचोटी विकाऊ नव्हती.
“नैतिक सरळपणा, इमान” अशी “सचोटीची” व्याख्या करण्यात आली आहे. सचोटी राखणारा मनुष्य विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा असतो. परंतु, आज अप्रामाणिकपणा—सचोटीतील कमी—समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांना प्रभावित करत आहे.
नैतिक सचोटी नाहीशी झाल्याचे वर्णन करण्यासाठी ब्रिटनमधील प्रसार माध्यमाने “स्लीज” हा शब्द व्यवहारांत आणला आहे. द इन्डिपेन्डन्ट या वृत्तपत्राने असे म्हटले, की स्लीज हा शब्द “प्रेम प्रकरणे आणि सरकारच्या दोन नंबरी धंद्यांपासून ते मोठमोठ्या निर्यातीच्या मागण्यात मूठ दाबण्याचा अर्थ” देतो. जीवनातील कोणतेही क्षेत्र यासाठी अपवाद नाही.
सचोटीचे अस्थिर दर्जे
अर्थातच, सचोटी म्हणजे परिपूर्णता नव्हे, पण सचोटीमुळे एखाद्या व्यक्तीचा मूलभूत गुण प्रकट होत असतो. झटपट श्रीमंत होण्याच्या या आपल्या जगाच्या मनोवृत्तीमुळे सचोटी कदाचित सद्गुण वाटणार नाही, उलटपक्षी, तो कदाचित एक अडसरच असल्याचे दिसून येईल. उदाहरणार्थ, परीक्षांच्यावेळी शिक्षकांना फसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अद्ययावत उपकरणे वापरण्यात लक्षणीय वाढ होत आहे आणि या नवनवीन फसविण्याची साधने शोधून काढणे जवळजवळ अशक्य झाले आहे. ब्रिटीश विद्यापीठाचे एक प्राध्यापक असा दावा करतात, की सुमारे निम्म्यापेक्षा अधिक ब्रिटीश विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे आणि केवळ ब्रिटनमध्येच अशी परिस्थिती आहे असे निश्चितपणे नाही.
विश्वासास पाईक नसणारे लोक जेव्हा खोटे बोलतात आणि फसवणूक करतात तेव्हा निरपराध लोकांना जी किंमत मोजावी लागते त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. भारतातील भोपाळ या शहराचीच गोष्ट घ्या, याठिकाणी १९८४ मध्ये विषारी वायूमुळे मृत्युमुखी पडलेल्या स्त्रियांची, पुरुषांची आणि मुलांची संख्या २,५०० पेक्षा अधिक आहे आणि लाखो लोक विकलांग झाले. द संडे टाईम्स या नियतकालिकाने अहवाल दिला: “बळी पडलेल्यांसाठी केलेल्या मदत पुरवठ्याच्या योजना भ्रष्टाचारामुळे पार कोसळून पडल्या. . . . हजारो बनावट दावे, फसवी कागदपत्रे आणि खोटे पुरावे या सर्वांमुळे तपासणीचे काम अवघड होऊन बसले आहे.” परिणामी, पीडितग्रस्तांसाठी असलेल्या १,६४५ कोटी (१६.४५ अब्ज) रूपयांच्या साह्य निधीतून केवळ १२.२५ कोटी रूपये गरजवंतांमध्ये सुमारे दहा वर्षांनंतर वाटण्यात आले.
धर्माबद्दल काय? धर्मामध्ये सचोटीला कोणते स्थान आहे? खेदाची गोष्ट म्हणजे, त्याचे दर्जे बहुतेक वेळा ऐहिक जगापेक्षा वेगळे नसतात. रोमन कॅथलिक बिशप इमोन कॅसीचे उदाहरण घ्या; एका अनौरस किशोरवयीन मुलाचे वडील असल्याचे त्याने कबूल केले. ब्रिटनच्या गार्डियन या वृत्तपत्राने दाखविल्याप्रमाणे कॅसीची बाब “अगदी असामान्य नाही.” याच संदर्भात द टाईम्स या नियतकालिकाने अहवाल दिला: “केलेले दुष्कर्म अपवादात्मक होते या कारणास्तव बिशप कॅसीची मानखंडना करण्यात आली नव्हती कारण ब्रह्मचर्याच्या व्रताशी केलेली फसवणूक नवीन तसेच असामान्य देखील नव्हती.” या विवादाला पुष्टी देत स्कॉटलंडमधील द ग्लॅस्गो हेराल्ड हे वृत्तपत्र दावा करते, संयुक्त संस्थांनात केवळ २ टक्के असे रोमन कॅथलिक पाळक आहेत ज्यांनी कधीही विरुद्धलिंगी व समलिंगी संबंध ठेवले नाहीत. वरील आकडेवारी अचूक असो अगर नसो; परंतु कॅथलिक पाळकांनी नैतिकतेच्या बाबतीत काय नाव कमावले आहे, हे मात्र यावरून स्पष्ट दिसते.
अशा प्रकारची उदाहरणे पाहिल्यानंतर, एखाद्यास नैतिक सचोटी राखणे शक्य आहे का? असे करणे योग्य आहे का? त्यासाठी कशाची आवश्यकता आहे आणि असे केल्याने कोणती प्रतिफळे मिळतात?