यहोवाचे साक्षीदार आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवीत आहेत
यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ १९९८ दरम्यान आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवण्याची योजना करीत आहेत. ही घोषणा, शनिवार ऑक्टोबर ५, १९९६ रोजी, जर्सी सिटी संमेलन सभागृहात भरलेल्या वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्व्हानियाच्या वार्षिक सभेत जेव्हा करण्यात आली तेव्हा सर्वांनी उत्साहाने प्रतिसाद दिला.
नेहमीच्या प्रांतीय अधिवेशनांव्यतिरिक्त, १९९८ च्या मध्यात उत्तर अमेरिकेत पुष्कळ आंतरराष्ट्रीय अधिवेशने भरवली जातील. या अधिवेशनांमुळे पृथ्वीवरील अनेक भागांतील हजारो साक्षीदार एकत्र येतील अशी अपेक्षा केली जाते. होता होईल तितक्या देशांच्या प्रतिनिधींना येण्याकरता, वॉच टावर संस्थेच्या १०० पेक्षा अधिक शाखा दप्तरांना उत्तर अमेरिकेत नेमलेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी किती प्रतिनिधी जाऊ शकतील त्याची संख्या कळवली जाईल.
उत्तर अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या सर्वांनाच जाता येणार नाही हे उघड आहे. परंतु, हजारो जण त्यांच्या जवळपास असलेल्या एखाद्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहू शकतील. युरोपमधील दोन अथवा तीन देशांमध्ये आणि इतर अधिवेशने, आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण पॅसिफिक व कॅरिबियन येथे भरवण्याच्या योजना राबवल्या जात आहेत.
उचित समयी, संस्थेची शाखा दप्तरे, अधिवेशन ज्या शहरांमध्ये भरवले जाईल किंवा जेथे त्यांना आमंत्रण मिळाले आहे त्याबद्दल मंडळ्यांना कळवतील. अधिवेशनाच्या तारखांविषयी आणि प्रतिनिधी निवडण्याच्या योजनांविषयी माहिती दिली जाईल. प्रतिनिधी निवडीचे अर्ज भरू इच्छिणारे, या खास घटनांची वाट पाहताना पैशांची बचत करण्यास सुरवात करू शकतात.
संपूर्ण जगभरातील सर्व यहोवाचे साक्षीदार १९९८ च्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांमध्ये जे राखून ठेवले आहे त्याची वाट पाहू शकतात. सर्व देशांतील प्रांतीय अधिवेशनांत तोच कार्यक्रम सादर केला जाईल.