हा शेवटला काळ इतका वाईट का आहे?
तुम्ही बसून एखादे वर्तमानपत्र वाचता किंवा टिव्हीवरील बातम्या पाहता अथवा रेडिओवरील बातम्या ऐकता तेव्हा तुम्ही काही वाईट बातम्यांची अपेक्षा करत असता, हो ना? चालू असणारे युद्ध अद्यापही धूमसत आहे, हिंसाचारी गुन्हेगारीचा उद्रेक अजूनही होत आहे किंवा दुष्काळ अद्यापही विकसनशील राष्ट्राच्या शक्तीचे शोषण करीत आहे, अशा बातम्यांचे तुम्हाला कदाचित नवल वाटत नसेल.
या गोष्टी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी घडतात तेथून दूरवर तुम्ही राहत असल्यास अशा बातम्यांमुळे प्रत्येक वेळी तुम्ही निराश होणार नाही. नाहीतरी सर्व पीडितांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी कोणाला सवड आहे? तरीही, अनेक जण ज्या प्रकारे यातना भोगत आहेत ते आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हा मात्र आपल्या अंतःकरणाला पीळ पडल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, युद्धाविषयी वाचणे आणि त्यात किती प्राणहानी झाली याचा विचार करणे ही गोष्ट वेगळी आणि ऑडनेन नामक बोस्नियातील नऊ वर्षांच्या चिमुकल्या मुलाविषयी वाचणे ही बाब निराळी. ऑडनेनचे घर बॉम्बने जमीनदोस्त करण्यात आले; त्यातच त्याची आई मरण पावली. त्यानंतर केवळ काही महिन्यानंतर ऑडनेन आपल्या वडिलांसोबत रस्त्यावरून जात असताना त्याच्या वडिलांना गोळीने टिपण्यात आले. त्यानंतर काही आठवड्यांनी शाळेतील पटांगणात झालेल्या बॉम्ब स्फोटात त्याच्या बहिणीने रक्ताच्या थारोळ्यात त्याच्या डोळ्यांसमोर प्राण सोडला. ऑडनेनच्या या आघातावर ज्या डॉक्टरांनी उपचार केला त्यांना असे दिसून आले, की तो अगदी सुन्न, भावनाहीन झाला होता—त्याला कोणत्या गोष्टीची जिज्ञासा म्हणून राहिली नव्हती. दहशत आणि मागील आठवणींनी त्याला दिवसा स्वस्थ बसता येत नव्हते आणि रात्री दुःस्वप्नांमुळे शांत झोपही लागत नव्हती. ऑडनेनचा समावेश केवळ आकडेवारीमध्ये होत नाही. तो पीडित मुलगा आहे; आपण त्याला मदत करू शकत नाही पण आपल्याला त्याच्याबद्दल सहानुभूती मात्र वाटू शकते.
इतर जागतिक रोगांच्या बाबतीत देखील हे खरे आहे. दुष्काळाविषयी वाचणे ही एक गोष्ट आहे आणि उपासमारामुळे मरणाला टेकलेल्या, पोट फुगलेल्या तसेच हातापायाच्या काड्या झालेल्या पाच वर्षांच्या मुलीचे चित्र पाहणे ही दुसरी गोष्ट आहे. गुन्हेगारीची आकडेवारी वाचणे ही एक गोष्ट आहे आणि एका प्रौढ विधवेला निर्दयीपणे मारण्यात आल्याचे, तिला लुटल्याचे आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचे वाचणे ही दुसरी गोष्ट आहे. कुटुंबाचा ऱ्हास झाल्याचे वाचणे ही एक बाब आहे आणि आई हेतुतः आपल्या स्वतःच्या मुलाची उपासमार करते, त्याला वाईट वागणूक देते हे जाणणे दुसरी बाब आहे.
अशा गोष्टींविषयी वाचणे दुःखदायक आहे. परंतु, अशा प्रकारच्या जागतिक पीडांचा आपल्यावर थेटपणे परिणाम झाल्यास त्यामुळे होणारे दुःख यापेक्षाही अधिक असेल! तुम्ही स्वतः एखाद्या दुःखाचा अनुभव घेता तेव्हा त्यापेक्षाही मोठे असणारे जागतिक चित्र पाहून तुम्ही अगदी हताश होऊ शकता. गुन्हेगारी, युद्ध, दुष्काळ आणि रोगराई यांमुळे होणाऱ्या पीडेमध्ये अशी वाढ होत आहे जी पूर्वी मानवी इतिहासात याआधी कधीही झाली नव्हती, या वास्तविकतेला तोंड देणे भयावह आहे. या २० व्या शतकातील वास्तविकतांना तोंड दिल्यामुळे फार मोठा परिणाम होऊ शकतो—चित्तवैकल्प, दहशत आणि औदासीन्य या सामान्य गोष्टी आहेत.
अनेक धर्मांचे लोक त्रासदायक प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, जसे की परिस्थिती इतकी वाईट का आहे? मानवजात कोठे जात आहे?
दुःखाची गोष्ट म्हणजे, आज धर्म या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाहीत. तुम्ही पहिल्यांदा या नियतकालिकांच्या मुखपृष्ठावरील प्रश्न पाहिला तेव्हा तुमच्या कपाळावर आठ्या पडल्या असतील—आणि ही प्रतिक्रिया समजण्याजोगी देखील आहे. मूलतत्त्ववादी धर्म अनेकदा बायबलमधून अशा गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात ज्या प्रत्यक्षात बायबलमध्ये नाहीत—या जगाच्या नाशाच्या निश्चित दिवसाविषयी आणि घटनेविषयी. (पाहा मत्तय २४:३६.) याबद्दल बायबल खुद्द काय सांगते, हे दाखविण्याचे या नियतकालिकाचे प्रकाशक निवडतात. तुम्ही हे जाणून कदाचित आश्चर्यचकित व्हाल, की शेवटल्या दिवसांविषयी बायबलचे वर्णन वास्तविक आणि तर्कसंगत आहे. परिस्थिती वाईट का आहे याचे वर्णन करण्याखेरीज बायबल आणखी काही गोष्टींविषयी सांगते. ते भवितव्यासाठी एक आशा देते, ज्यामुळे एखाद्याला खरोखरच सांत्वन मिळते. ते कसे काय, हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला पुढील लेखांचा विचार करण्याचे आमंत्रण देत आहोत.
[Picture Credit Line on page 3]
Jobard/Sipa Press