एक अधिक चांगला मार्ग
यहोवाच्या साक्षीदारांना जगातील आध्यात्मिकतेच्या लोपाची आणि समाजात भिनलेल्या अनैतिक व धार्मिक अस्थिरतेची काळजी वाटते. यामुळे, त्यांना केव्हा केव्हा मूलतत्त्ववादी संबोधले जाते. पण ते तसे आहेत का? नाही. त्यांची ठाम धार्मिक मते असली तरी, मूलतत्त्ववादी ही संज्ञा ज्याप्रमाणे वापरण्यात येते त्या अर्थाने ते नाहीत. एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनाला बढावा देण्यासाठी ते राजकीय नेत्यांवर दबाव आणत नाहीत व ज्यांच्याशी त्यांचे एकमत होत नाही अशांविरुद्ध ते कोणतीही प्रदर्शने किंवा हिंसा करत नाहीत. त्यांना एक अधिक चांगला मार्ग सापडला आहे. ते, आपला नेता येशू ख्रिस्त याचे अनुकरण करतात.
यहोवाच्या साक्षीदारांना याची खात्री पटली आहे की धार्मिक सत्य अस्तित्वात आहे व ते बायबलमध्ये आढळते. (योहान ८:३२; १७:१७) परंतु बायबल ख्रिश्चनांस, धर्मवेडेपणाला अनुमती न देणारे गुण जसे की दया, चांगुलपणा, सौम्यता व समंजसपणा विकसित करण्यास शिकवते. (गलतीकर ५:२२, २३; फिलिप्पैकर ४:५) बायबलमधील याकोब नामक पुस्तकात, “शुद्ध . . . शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण,” असे ज्याचे वर्णन केले आहे ते “वरून येणारे ज्ञान” विकसित करण्यास ख्रिश्चनांना उत्तेजन दिले आहे. याकोब पुढे म्हणतो: “शांति करणाऱ्यासाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.”—याकोब ३:१७, १८.
येशूला सत्याविषयी खूप चिंता होती हे यहोवाच्या साक्षीदारांच्या आठवणीत आहे. त्याने पंतय पिलाताला सांगितले: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) तो सत्याचा निर्भय समर्थक होता तरी, आपली मते इतरांवर लादण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. उलट त्याने त्यांच्या मनांस व अंतःकरणांस आकर्षविले. पृथ्वीवरून खोटेपणा व अन्याय कसा व केव्हा काढून टाकणार त्याचा निर्णय आपला “उत्तम व सरळ” स्वर्गीय पिता घेणार आहे हे त्याला माहीत होते. (स्तोत्र २५:८) यास्तव, ज्यांनी त्याला सहमत दर्शवले नाही अशांवर त्याने दबाव आणला नाही. उलट, त्याच्या दिवसांतील कट्टर धार्मिक पुढाऱ्यांनीच येशूवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.—योहान १९:५, ६.
यहोवाच्या साक्षीदारांचे धार्मिक सिद्धान्तांबद्दल ठाम मत आहे व नैतिकतेच्या बाबतीत ते भक्कम मूल्ये प्रदर्शित करतात. प्रेषित पौलाप्रमाणे, त्यांनाही “प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच,” याची खात्री पटली आहे. (इफिसकर ४:५) “जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत,” या येशूच्या शब्दांचीही त्यांना जाणीव आहे. (मत्तय ७:१३, १४) तरीसुद्धा, ते इतरांना आपले विश्वास अनुसरण्यास बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. उलट, ते पौलाचे अनुकरण करतात व “देवाबरोबर समेट” करू इच्छिणाऱ्यांना “विनंती” करतात. (२ करिंथकर ५:२०) हाच अधिक चांगला मार्ग आहे. तो देवाचा मार्ग आहे.
धार्मिक मूलतत्त्ववाद, हा शब्द आज ज्याप्रमाणे उपयोगात आणला जातो, त्यापेक्षा अतिशय भिन्न आहे. मूलतत्त्ववादी समाजावर आपले तत्त्व लादण्यासाठी अनेक व्यूह रचतात, ते हिंसेचाही उपयोग करतात. असे करताना ते राजकीय व्यवस्थेचा अंतर्भाग बनतात. परंतु, येशूने म्हटले की त्याच्या अनुयायांनी ‘जगाचे भाग नसावे.’ (योहान १५:१९; १७:१६; याकोब ४:४) या शब्दांच्या सुसंगतेत, यहोवाचे साक्षीदार राजकीय वादविवादांमध्ये कडक तटस्थता बाळगतात. फियोरीपॉजिनॉ नामक इटालियन बातमीपत्र कबूल करते त्याप्रमाणे ते “कोणावरही कशाचीही बळजबरी करीत नाहीत; ते सांगत असलेले स्वीकारण्यास अथवा नाकारण्यास प्रत्येक जण स्वतंत्र आहे.” परिणाम? बायबलमधून साक्षीदार देत असलेला शांतीमय संदेश सर्व प्रकारच्या लोकांना, एकेकाळी मूलतत्त्ववादी असलेल्या लोकांनाही आकर्षित करतो.—यशया २:२, ३.
भक्कम मूल्ये जोपासणारे जग
मूलतत्त्ववाद्यांना ज्यांची चिंता लागली आहे त्या समस्या मानव सोडवू शकत नाही हे यहोवाच्या साक्षीदारांनी जाणले आहे. आपण लोकांना देवावर विश्वास करण्यास अथवा आपले व्यक्तिगत धार्मिक मत स्वीकारण्यास बळजबरी करू शकत नाही. हे शक्य आहे असा विचार केल्यामुळेच तर, धर्मयुद्धे, मध्ययुगीन धर्मसभा आणि अमेरिकी इंडियन्सचे “धर्मांतर” यासारख्या भयंकर गोष्टी इतिहासात घडल्या. परंतु, आपला देवावर भरवसा असल्यास आपण त्याच्या हाती सर्वकाही सोपवून देण्यास तयार असू.
बायबलनुसार, देवाने आपल्या नियमाचे उल्लंघन करण्यास व त्याद्वारे दुःख व यातना घडू देण्यास एक विशिष्ट कालमर्यादा ठेवली आहे. ती कालमर्यादा आता जवळजवळ समाप्त होत आहे. येशू केव्हाच देवाच्या स्वर्गीय राज्यामध्ये राजा म्हणून राज्य करत आहे व लवकरच ते राज्य मानवी सरकारांना काढून टाकण्यासाठी कार्य करील व मानवजातीचा दिवसेंदिवसाचा अधिकार हाती घेईल. (मत्तय २४:३-१४; प्रकटीकरण ११:१५, १८) परिणामी, शांती व धार्मिकता विपुल असलेले जागतिक परादीस असेल. तेव्हा खऱ्या देवाची उपासना कशी केली पाहिजे याबद्दल कोणतीच अनिश्चितता नसेल. “नीतिमान् पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) प्रेमळ-दया, सत्य, न्याय आणि चांगुलपणा यासारखी असीम मूल्ये विजय मिळवतील आणि त्यामुळे सर्व आज्ञाधारक मानवजातीचे कल्याण होईल.
भविष्यातील त्या समयाच्या प्रतिक्षेत स्तोत्रकर्ता एका काव्यात्मक पद्धतीने पुढील प्रमाणे म्हणतो: “दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; नीति व शांति ह्यांनी एकमेकींचे चुंबन घेतले आहे; पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे; स्वर्गांतून नीतिमत्व अवलोकन करीत आहे. जे उत्तम ते परमेश्वर देईल; आणि आमची भूमि आपले फळ देईल. त्याच्यापुढे नीतिमत्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.”—स्तोत्र ८५:१०-१३.
आपण जगाला बदलवू शकत नाही पण आजही ईश्वरी मूल्ये विकसित करू शकतो. अशाप्रकारे, देवाला त्याच्या नवीन जगात ज्याप्रकारचे लोक हवेत त्याप्रकारचे होण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. मग आपण, स्तोत्रकर्त्याने उल्लेखलेल्या नम्र लोकांपैकी होऊ: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” (स्तोत्र ३७:११) देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्यांना तो पाठबळ व आशीर्वाद देतो आणि त्यांच्या भवितव्यासाठी आश्चर्यकारक गोष्टींचे अभिवचन देतो. “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो,” असे प्रेषित योहानाने लिहिले.—१ योहान २:१७.
[७ पानांवरील चित्र]
यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याच्या सुवार्तेशी परिचित होण्यास सर्वांना आमंत्रण देतात
[Picture Credit Line on page 6]
पृष्ठे ३, ४, ५ व ६ वरील दिवा: Printer’s Ornaments/by Carol Belanger Grafton/Dover Publications, Inc.