“देवाच्या मंदिराचा” ग्रीसमधील मूर्तींबरोबर मेळ?
उन्हाळ्याच्या त्या अगदी उष्ण दिवशी, सूर्याचे किरण रस्त्यावरील चकाकणाऱ्या दगडांवर पडत होते. परंतु, ही अतिउष्णता, टेकडीवरील मंदिराकडे चाललेल्या भक्तिमान कर्मठ ग्रीक यात्रेकरूंच्या घोळक्याचा आवेश किंवा तीव्र दृढनिश्चय कमी करू शकत नाही असे दिसते.
तुम्ही दमलेल्या एका वृद्ध स्त्रीला पाहता, ती देशाच्या दुसऱ्या टोकापासून प्रवास करून आली आहे व थकलेली आहे तरी पुढे चालत राहण्याचा यत्नपूर्वक प्रयत्न करीत आहे. टेकडीच्या थोडेसे वर घामेघूम झालेला एक उत्सुक मनुष्य लोकांच्या गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करतोय. चेहऱ्यावर अतिशय यातना व निराशेचे भाव असणारी एक तरुणी आपल्या रक्तबंबाळ झालेल्या गुडघ्यांवर रांगत आहे. या सर्वांचे ध्येय? प्रसिद्ध “संताच्या” प्रतिमेसमोर प्रार्थना करावयास आणि शक्य असल्यास तिला स्पर्श करून तिचे चुंबन घ्यावयास वेळेवर पोहंचण्याकरता ह्या सर्वांची धडपड चालली होती.
संपूर्ण जगभरात ‘संतांच्या’ उपासनेप्रीत्यर्थ असलेल्या ठिकाणांमध्ये अशाच प्रकारची दृश्ये दिसतात. या सर्व भाविकांची खात्री पटलेली असते की या मार्गाने ते, देवाच्या इच्छेनुरुप त्याच्या मार्गाचे अनुसरण करीत आहेत व अशाप्रकारे ते आपली भक्ती व विश्वास प्रकट करतात. आमचा कर्मठ ख्रिस्ती विश्वास (इंग्रजी), नामक पुस्तक म्हणते: “आम्ही [“संतांचा”] स्मरणोत्सव पाळतो व त्यांच्या पवित्र व्यक्तित्त्वाची स्तुती व सन्मान करतो. . . , तसेच आमच्याकरीता देवाकडे त्यांच्या प्रार्थना व आमच्या जीवनातील गरजांकरीता त्यांच्या विनंत्या व साहाय्य मागतो. . . . आमच्या आध्यात्मिक व शारीरिक गरजांसाठी आम्ही या चमत्कार करणाऱ्या संतांवर अवलंबून राहतो.” शिवाय, रोमन कॅथलिक चर्चच्या धर्मचार्यसभेच्या नियमांनुसार, देवाकडे मध्यस्थी करणारे या अर्थाने “संतांचा” धावा केला पाहिजे व “संतांच्या” अवशेषांची व मूर्तींची उपासना केली पाहिजे.
खऱ्या ख्रिश्चनाला देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” करण्याची प्रमुख चिंता असली पाहिजे. (योहान ४:२४) याकारणास्तव, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक प्रथांमध्ये “संतांच्या” उपासनेची सुरवात कशा प्रकारे करण्यात आली त्याबद्दलच्या काही वस्तुस्थितींचा आपण विचार करू या. अशा प्रकारचे परीक्षण, देवाला स्वीकारणीय असलेल्या मार्गाने त्याच्याकडे जाण्याची इच्छा असलेल्या सर्वांना प्रबोधनकारक ठरेल.
“संतांना” कशाप्रकारे अंगीकारण्यात आले
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने, ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध करण्यात आलेल्या व त्याच्यासोबत त्याचे भावी सहवारीस या नात्याने देवाच्या सेवेकरता वेगळे करण्यात आलेल्या सर्व आरंभीच्या ख्रिश्चनांना “पवित्र जन,” अथवा “संत” असे संबोधतात. (प्रेषितांची कृत्ये ९:३२; २ करिंथकर १:१; १३:१३)a पुरुष आणि स्त्रिया, मंडळीतील प्रमुख आणि कनिष्ठ अशा सर्वांचे, या पृथ्वीवर असताना “पवित्र जन” असे वर्णन करण्यात आले. त्यांचा मृत्यू होण्याआधीपासूनच त्यांना शास्त्रवचनीय अर्थाने संत म्हणून ओळखले जात होते.
परंतु, सा. यु. दुसऱ्या शतकानंतर धर्मत्यागी ख्रिस्ती धर्म विकसित होत होता तेव्हा ख्रिस्ती धर्माला लोकप्रिय बनवण्याचा प्रयत्न करण्याची प्रवृत्ती होती, असा धर्म जो मूर्तिपूजक लोकांना अपीलकारक वाटेल आणि ते लागलीच त्याचा स्वीकार करतील. हे मूर्तिपूजक अनेक दैवतांची उपासना करणारे होते आणि नवीन धर्म काटेकोरपणे एकेश्वरवादी होता. यास्तव, प्राचीन देव, उपदेव, व मिथ्याकथेतील वीरपुरुष यांची जागा घेणाऱ्या “संतांना” अंगीकारण्याद्वारे तडजोड करणे शक्य होते. यावर विवेचन करताना, इक्लिसिआस्तिकी इस्तोरिआ (एक्लेसियासटिकल हिस्ट्री) नामक पुस्तक म्हणते: “मूर्तिपूजक असलेल्यांमधून ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केलेल्यांना, त्यांनी त्यागलेल्या त्यांच्या वीर पुरुषांच्या कार्यांचा संबंध हुतात्म्यांसोबत लावण्यास व पूर्वीच्या वीर पुरुषांना ते जो आदर देत होते तो आदर या हुतात्म्यांना देण्यास सुरवात करण्यास सोपे गेले. . . . परंतु, बहुतेकवेळा संतांचा अशाप्रकारचा आदर पूर्णपणे मूर्तीपूजाच होती.”
ख्रिस्ती धर्मजगतामध्ये “संतांना” कशाप्रकारे अंगीकारण्यात आले त्याबद्दल आणखी एक संदर्भ ग्रंथ स्पष्टीकरण देतो: “ग्रीक कर्मठ चर्चच्या संतांना आदर देण्यामध्ये आपल्याला, मूर्तिपूजक धर्मात असलेल्या जोरदार प्रभावाच्या स्पष्ट खुणा दिसतात. [लोकांनी] ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याआधी, ऑलिंपियन देवतांना बहाल केलेले गुण आता संतांना देण्यात येत होते. . . . नवीन धर्माच्या सुरवातीच्या वर्षांपासून त्याच्या अनुयायांनी, सूर्यदेव (फोबस अपोलो) याच्या जागी संदेष्टा एलीयाला घेतले, टेकडी व डोंगरांवरील, प्रकाश देणाऱ्या फोबस अपोलोच्या सन्मानार्थ प्राचीन ग्रीकांनी बांधलेल्या प्रत्येक ठिकाणी या दैवताच्या प्राचीन मंदिराच्या किंवा देऊळाच्या अवशेषांवर किंवा जवळपास चर्चेस बांधले. . . . ते, कुमारी देवी अथीनाला कुमारी मरिया म्हणून देखील ओळखू लागले. अशा प्रकारे, अथीनाची मूर्ती नाश करण्यात आली तेव्हासुद्धा धर्मांतर केलेल्या मूर्तिपूजकाच्या मनात एकप्रकारच्या पोकळीची भावना निर्माण झाली नाही.”—निओटेरॉन एनजिक्लोपडिकन लेक्सिकन (न्यू एन्सायक्लोपेडिक डिक्शनरी), खंड १, पृष्ठे २७०-१.
उदाहरणार्थ, सा. यु. चौथ्या शतकाच्या अखेरीस अथेन्समधील परिस्थितीचे परीक्षण करा. त्या शहराचे बहुसंख्य रहिवाशी अजूनही मूर्तिपूजक होते. त्यांच्या पवित्र विधींपैकी दोन टप्प्यांचा इल्यूसिनियन गुह्य विधीb होता जो दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अथेन्सच्या वायव्य दिशेपासून २३ किलोमीटर दूर असलेल्या इल्यूसिसच्या शहरात साजरा केला जाई. या गुह्य विधींना उपस्थित राहण्याकरता, मूर्तिपूजक अथेनी लोकांना पवित्र मार्ग (हायईरा होडोस) अनुसरावा लागे. आराधनेकरता पर्यायी ठिकाण देण्याच्या प्रयत्नात, त्या शहराचे नेते बरेच चतुर ठरले. मूर्तिपूजकांना आकर्षविण्यासाठी व या गुह्य विधींना उपस्थित राहण्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी त्याच रस्त्यावर, म्हणजे अथेन्सपासून जवळजवळ १० किलोमीटरवर डॅफ्नी मठ बांधण्यात आले. डॅफ्नाईओस अथवा पायथिओस अपोलो या ग्रीक देवाला वाहिलेल्या प्राचीन मंदिराच्या पायावर मठाचे चर्च बांधण्यात आले.
“संतांच्या” आराधनेत मूर्तिपूजक दैवतांच्या केलेल्या भेसळीचा पुरावा ग्रीस, कायथेराच्या बेटावरही आढळू शकतो. एका बेटाच्या शिखरावर दोन लहान लहान बायझंटिन देवळे आहेत—एक “सेंट” जॉर्जला आणि दुसरे कुमारी मरियेला समर्पित केले आहे. हे स्थळ शिखरावरील एक मिनोअन देऊळ होते जे सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी उपासना स्थळ म्हणून वापरले जात होते असे उत्खननात प्रकट केले आहे. सा. यु. सहाव्या किंवा सातव्या शतकादरम्यान, “ख्रिश्चनांनी” शिखरावरील देवळाच्याच जागेवर त्यांच्या “संत” जॉर्जचे देऊळ बांधले. यांनी उचलेले हे पाऊल अतिशय लाक्षणिक होते कारण, मिनोअन धर्माचे हे सुधारित केंद्र, अशा ठिकाणी होते जे एजीअन सागराच्या समुद्र मार्गांवरूनही दिसत होते. आवर लेडी व “सेंट” जॉर्ज यांची मर्जी टिकवून ठेवण्यासाठी तेथे दोन चर्चेस बांधण्यात आली. सेंट जॉर्जचा सण “खलाशांचा संरक्षक,” “सेंट” निकोलसच्या सणाच्या दिवशीच साजरा केला जाई. धार्मिक सेवा उरकण्यासाठी, “प्राचीन काळी मिनोअन याजक करत असत त्याप्रमाणे आज [ग्रीक कर्मठ] पाळक डोंगरावर चढतील!” असे, या शोधाची बातमी देणाऱ्या एका वृत्तपत्राने म्हटले.
मूर्तीपूजक ग्रीक धर्माचा धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मजगतावर केवढ्या प्रमाणावर पगडा बसला आहे त्याचा सारांश देताना एक ऐतिहासिक संशोधक या गोष्टीकडे अंगुली दर्शवतात की: “ख्रिस्ती धर्माचा मूर्तिपूजक मूलाधार नेहमी लोकप्रिय विश्वासांमध्ये अपरिवर्तित राहतो व अशाप्रकारे परंपरेच्या टिकून राहण्याच्या गुणाची साक्ष देतो.”
‘आपल्याला ठाऊक आहे अशाची उपासना’
येशूने शोमरोनी स्त्रीस म्हटले: ‘आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करितो. खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करितील, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे.’ (योहान ४:२२, २३) लक्षात घ्या, खरेपणाने उपासना करणे अत्यावश्यक आहे! तेव्हा, सत्याच्या अचूक ज्ञानाविना व सत्याबद्दलच्या खोल प्रीतीविना स्वीकृत मार्गाने देवाची उपासना करणे अशक्य आहे. खरा ख्रिस्ती धर्म, मूर्तिपूजेकडून उसने घेतलेल्या परंपरा आणि प्रथांवर नव्हे तर सत्यावर आधारित असला पाहिजे. लोक जेव्हा यहोवाची उपासना चुकीच्या मार्गाने करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला कसे वाटते हे आपल्याला माहीत आहे. करिंथ या प्राचीन ग्रीक शहरातील ख्रिश्चनांना पौलाने लिहिले: “ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? . . . देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार?” (२ करिंथकर ६:१५, १६) देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ घालण्याचा कोणताही प्रयत्न त्याला किळसवाणा वाटतो.
शिवाय, देवाकडे मध्यस्थी करणारे या नात्याने “संतांचा” धावा करून त्यांना प्रार्थना करणे या कल्पनेला शास्त्रवचने स्पष्टपणे मनाई करतात. येशूने त्याच्या आदर्श प्रार्थनेत, प्रार्थना केवळ त्याच्या पित्यालाच उद्देशून केल्या पाहिजेत असे शिकवले कारण, त्याने आपल्या शिष्यांना असे मार्गदर्शन दिले: “ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गांतील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) येशू पुढे म्हणाला: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.” तसेच, प्रेषित पौलाने म्हटले: “एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांमध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.”—योहान १४:६, १४; १ तीमथ्य २:५.
देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला खरोखरच वाटत असेल तर, त्याचे वचन मार्गदर्शन देते त्या मार्गानेच आपण त्याच्याकडे गेले पाहिजे. यहोवाकडे जाण्याच्या केवळ एकाच महत्त्वपूर्ण मार्गावर जोर देत पौलाने असेही लिहिले: “जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीहि करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे.” “ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.”—रोमकर ८:३४; इब्री लोकांस ७:२५.
‘आत्म्याने व खरेपणाने उपासना करणे’
धर्मत्यागी ख्रिस्ती धर्माकडे, मूर्तिपूजकांना त्यांच्या खोट्या उपासनेचा त्याग करून येशू ख्रिस्ताच्या सत्य शिकवणुकी अनुसरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आध्यात्मिक शक्ती नव्हती अथवा देवाच्या पवित्र आत्माचा आधारही नव्हता. उलट धर्मांतरीत लोक, सत्ता आणि लोकप्रियता याच्या शोधात त्याने मूर्तिपूजक विश्वास आणि रूढी आत्मसात केल्या. याकारणास्तव, तो देव आणि ख्रिस्ताला स्वीकृत असणारे स्थिर ख्रिश्चन घडवू शकला नाही तर, नकली विश्वास धारण करणारे, राज्यात प्रवेश मिळवण्यास अपात्र असे “निदण” घडवले.—मत्तय १३:२४-३०.
परंतु, या अंत समयात यहोवाच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या उपासनेच्या पुनःस्थापनेची अतिमहत्त्वपूर्ण हालचाल आहे. यहोवाचे लोक विश्वभरात त्यांची संस्कृती, समाज किंवा धार्मिक पार्श्वभूमीची तमा न बाळगता बायबलच्या दर्जांनुरूप आपले जीवन आणि विश्वास आचरण्याचा प्रयत्न करीत आहेत. देवाची उपासना “आत्म्याने व खरेपणाने” कशी करावी याबद्दल तुम्हाला आणखी शिकायचे आहे तर, तुम्ही राहता तेथील यहोवाच्या साक्षीदारांशी कृपया संपर्क साधा. तुमच्या तर्कशक्तीवर व देववचनाच्या अचूक ज्ञानावर आधारित त्याची स्वीकारयोग्य पवित्र सेवा करण्यास तुम्हाला मदत करावयास त्यांना अतिशय आनंद वाटेल. पौलाने लिहिले: “बंधुजनहो, मी देवाच्या करूणेमुळे तुम्हाला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” आणि कलस्सैकरांना तो म्हणाला: “आम्हीहि ते ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धि व्हावी.”—रोमकर १२:१, २; कलस्सैकर १:९, १०.
[तळटीपा]
a काही बायबल भाषांतर, हेगिओस या ग्रीक शब्दाचे भाषांतर “पवित्र जन,” इतरांना, “संत” असे करतात.
b दर वर्षी, अथेन्स व इल्यूसिसमध्ये सप्टेंबर महिन्यात महा इल्यूसिनिया साजरा करण्यात येई.
[२८ पानांवरील चौकट/चित्रं]
पार्थनॉनचा असामान्य वापर
“ख्रिस्ती” सम्राट थीओडोसियस दुसरा, याने अथेन्सच्या शहराशी संबंधित हुकूम देऊन (सा. यु. ४३८), मूर्तिपूजक विधी व गुह्य संप्रदाय रद्द केले, मूर्तिपूजक देवळे बंद केली. त्यानंतर त्यांचे ख्रिस्ती चर्चेसमध्ये रूपांतर करता येऊ शकत होते. एखाद्या मंदिराचे यशस्वीरीत्या रूपांतर करण्याची एकच अपेक्षा, त्यामध्ये क्रूसाची स्थापना करून त्याला शुद्ध करणे ही होती.
रूपांतर केलेल्या मंदिरांपैकी पहिले, पार्थनॉनचे होते. पार्थनॉनचा “ख्रिस्ती” मंदिर म्हणून उचितपणे उपयोग व्हावा म्हणून त्याचे बरेच नूतनीकरण करण्यात आले. सा. यु. ८६९ पासून ते अथेन्सचे कॅथड्रल होते. सुरवातीला, त्याला ‘पवित्र बुद्धीचे’ चर्च असा मान देण्यात आला होता. ही, त्या वस्तुस्थितीची उद्देशपूर्ण स्मरणिका असावी, की त्या मंदिराची आदिम “मालकीण” अथीना, बुद्धीची देवता होती. नंतर, ते मंदिर “आवर लेडी द अथेनियन”ला समर्पित करण्यात आले. कर्मठांनी आठ शतकांपर्यंत त्याचा उपयोग केल्यावर, त्या मंदिराचे रूपांतर अथेन्सच्या सेंट मेरीचे कॅथलिक चर्चमध्ये करण्यात आले. पार्थनॉनचे हे धार्मिक “चक्र,” १५ व्या शतकात ओटोमन तुर्क लोकांनी त्याचे रूपांतर एका मशिदीत केले तोपर्यंत चालू होते.
आज हजारो पर्यटक, पार्थनॉनला अर्थात बुद्धीची ग्रीक देवता, अथीना पार्थनॉसच्या (“कुमारी”) प्राचीन डोरीक मंदिराला केवळ ग्रीक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहावयास येतात.
[२६ पानांवरील चित्र]
डॅफ्नी मठ—प्राचीन अथेन्सच्या मूर्तिपूजकांसाठी उपासनेचे पर्यायी स्थळ