शखेम खोऱ्यामध्ये वसलेले शहर
परमेश्वराने आपल्या लोकांसाठी त्या देशाचा आतील भाग निवडला होता; तो भाग म्हणजे शखेम शहर असून ते एबाल आणि गरिज्जीम पर्वतांच्यामध्ये वसलेले होते. येथे—सुमारे चार हजार वर्षांपूर्वी—यहोवाने अब्रामाला असे अभिवचन दिले: “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.”—उत्पत्ति १२:६, ७.
या अभिवचनाच्या एकवाक्यतेत अब्रामाचा नातू याकोब याने शखेमामध्ये तळ ठोकला आणि तेथे एक वेदी उभारली ज्यास त्याने “देव, इस्राएलाचा देव असे” म्हटले. कदाचित याकोबाने आपल्या कुटुंबासाठी आणि कळपांसाठी पाण्याची व्यवस्था म्हणून या प्रदेशात विहीर खोदली, या विहिरीला शेकडो वर्षांनंतरही “याकोबाचा झरा” असे म्हटले जात होते.—उत्पत्ति ३३:१८-२०, तळटीप NW, योहान ४:५, ६, १२.
तथापि, याकोबाच्या कुटुंबातील सर्वच सदस्य खऱ्या उपासनेसाठी आवेशी होते असे नाही. त्याची मुलगी दीना हिने शखेमच्या कनानी मुलींसोबत मैत्री जोडली. दीना त्यावेळी भर तारुण्यात होती, आपल्या कुटुंबाच्या तंबूंची सुरक्षा सीमा ओलांडून ती जवळील नगरात जाऊ लागली आणि तेथे तिने स्वतःचे मित्रमैत्रिण देखील बनविले.
आपल्या नगरात वारंवार उघडपणे एकट्याने येणाऱ्या या अविवाहित युवतीकडे तेथील तरुण कोणत्या दृष्टीने पाहत होते? तेथील अधिपतीच्या मुलाची “नजर तिजवर गेली आणि तो तिला घेऊन गेला आणि तिजपाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.” दीनाने अनैतिक कनानी लोकांसोबत मैत्री जोडून आपल्या पायावर धोंडा का पाडून घेतला? यामुळे तर नाही ना, की तिला आपल्या वयाच्या मुलींची सोबत हवी होती? आपल्या भावांप्रमाणे ती इतकी हट्टी आणि स्वैराचारी होती का? उत्पत्तीचा अहवाल वाचा आणि आपली मुलगी वारंवार शखेमाला गेल्यामुळे झालेल्या विदारक परिणामांमुळे याकोबाची आणि लेआची झालेली निराशा आणि त्यांना वाटणारी लज्जा जाणून घेण्याचा प्रयत्न करा.—उत्पत्ति ३४:१-३१; ४९:५-७; टेहळणी बुरूज (इंग्रजी) जून १५, १९८५ पृष्ठे ३१ सुद्धा पाहा.
जवळजवळ ३०० वर्षांनंतर ईश्वरशासित मार्गदर्शनाची उपेक्षा करण्याचा परिणाम पुन्हा एकदा पाहायला मिळाला. शखेमामध्ये यहोशवाने इस्राएली इतिहासातील अविस्मरणीय संमेलनांची व्यवस्था केली. खोऱ्यातील दृश्याची कल्पना करा. दहा लाखांपेक्षा अधिक लोक—पुरुष, स्त्रिया आणि मुले—जे इस्राएलाच्या सहा वंशांतून असून गरिज्जीम पर्वताच्या समोर उभे आहेत. खोऱ्याच्या पलीकडे दुसऱ्या सहा वंशांचे जवळजवळ तेवढेच लोक एबाल पर्वतासमोर उभे आहेत.a तसेच तेथे खालच्या बाजूस कराराच्या कोशाजवळ आणि इस्राएलाच्या दोन समुहांमध्ये याजक आणि यहोशवा उभे आहेत. किती भव्य ते दृश्य!—यहोशवा ८:३०-३३.
या विराट समुहाच्या वरील बाजूस असलेले हे दोन पर्वत सुंदरता आणि शुष्कपणा यांतील फार मोठी तफावत दाखवत आहेत. गरिज्जीमचा वरील डोंगरउतार हिरवागार आणि फलदायक दिसतो, परंतु एबालचा डोंगरउतार फिक्कट आणि ओसाड आहे. इस्राएली लोक यहोशवाने बोलण्याची वाट पाहत असतात तेव्हा रोमांचित गलबला निर्माण होतो, हा आवाज तुम्हाला जाणवतो का? या नैसर्गिक सभागृहात प्रत्येक आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो.
यहोशवाला ‘मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक’ वाचण्यास चार ते सहा तास लागतात; त्या दरम्यान इतर लोक देखील त्यात सहभागी होतात. (यहोशवा ८:३४, ३५) उघडपणे, गरिज्जीमच्या समोर उभे असलेले इस्राएली लोक प्रत्येक आशीर्वादानंतर आमेन! असे म्हणतात; परंतु एबालच्या समोर उभे असलेल्या लोकांचे आमेन! प्रत्येक शापावर जोर देते. कदाचित एबालचे ओसाड दृश्य, आज्ञाभंग केल्यामुळे होणाऱ्या विदारक परिणामाचे लोकांना स्मरण करून देण्यासाठी मदत करते.
“जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानितो तो शापित असो,” असा इशारा यहोशवा देतो. दहा लाखांपेक्षा अधिक लोक एकस्वरात प्रतिसाद देतात “आमेन!” पुढे जाण्याआधी या प्रतिसादाचा आवाज विरण्यासाठी यहोशवा अंमळ थांबतो आणि नंतर म्हणतो: “जो आपल्या शेजाऱ्याच्या शेताच्या सीमेची खूण सरकवितो तो शापित असो.” पुन्हा एकदा अनेक परदेशी लोकांसहित सहा वंशांचे लोक ओरडतात: “आमेन!” (अनुवाद २७:१६, १७) तुम्ही त्या ठिकाणी असता तर पर्वतांमधील या सभेचे तुम्हाला कधी विस्मरण झाले असते का? तुमच्या मनावर आज्ञाधारकपणाच्या गरजेची कायमची छाप पडली नसती का?
सुमारे २० वर्षांनंतर आपल्या मृत्यूच्या काही काळापूर्वी यहोशवाने पुन्हा एकदा त्या राष्ट्रास एकत्रितरीत्या शखेमामध्ये बोलावले जेणेकरून त्यांना त्यांचा निश्चय दृढ करता यावा. त्याने त्यांच्यासमोर एक निवड ठेवली आणि ही निवड प्रत्येक व्यक्तीने व्यक्तीशः करायची होती. त्याने म्हटले “तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा; . . . मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार.” (यहोशवा २४:१, १५) निश्चितपणे, शखेममध्ये झालेल्या या विश्वासप्रेरक अधिवेशनांनी स्वतःचा प्रभाव पाडला. म्हणून यहोशवाच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांपर्यंत इस्राएलांनी त्याच्या विश्वासू उदाहरणाचे अनुकरण केले.—यहोशवा २४:३१.
सुमारे १५ शतकांनंतर जेव्हा येशू गरिज्जीम पर्वताच्या छायेत विश्रांती घेत होता तेव्हा तेथे एक आनंदमय संभाषण झाले. लांबचा प्रवास केल्यामुळे येशू थकलेला होता आणि याकोबाच्या झऱ्याजवळ बसला होता इतक्यात एक शोमरोनी स्त्री पाण्याची घागर घेऊन तेथे आली. येशूने तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले तेव्हा तिला त्याचे फार आश्चर्य वाटले कारण यहुदी लोक शोमरोनी लोकांसोबत बोलत नसत त्यामुळे त्यांच्या भांड्यांतून पाणी पिणे तर दूरच राहिले. (योहान ४:५-९) येशूच्या पुढील शब्दांनी तिला अधिकच आश्चर्यचकीत केले.
“जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” (योहान ४:१३, १४) या अभिवचनामधील त्या स्त्रीच्या आस्थेची कल्पना करा कारण या खोल विहिरीतून पाणी शेंदणे फार कष्टाचे होते. येशूने हे देखील सांगितले, की देवाजवळ जाण्यासाठी जेरुसलेम, गरिज्जीम पर्वतासारख्या ऐतिहासिक महत्त्वाखेरीज कोणत्याही धार्मिक ऐतिहासिक ठिकाणांची काहीएक आवश्यकता नाही. ठिकाण नव्हे, तर हृदयाची प्रवृत्ती आणि वर्तणूक महत्त्वाची होती. “खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करितील. . . . कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे,” असे येशूने म्हटले. (योहान ४:२३) हे शब्द किती सांत्वना देणारे राहिले असतील! हे खोरे पुन्हा एकदा असे ठिकाण बनले जेथून यहोवाची सेवा करण्यासाठी लोकांना आर्जविण्यात आले.
आज नेबलस शहर शखेमाच्या भग्नावशेषांच्या आसपास आहे. गरिज्जीम पर्वत आणि एबाल अद्यापही खोऱ्यामध्ये चांगल्या स्थितीत असून गतकाळातील घटनांचे मूक साक्षीदार म्हणून उभे आहेत. या पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या याकोबाच्या विहिरीस अद्यापही भेट देता येऊ शकते. या ठिकाणी घडलेल्या घटनांवर आपण मनन करतो तेव्हा यहोशवा आणि येशू यांच्याप्रमाणे खऱ्या उपासनेस उंचावण्याच्या महत्त्वाचे आपल्याला स्मरण दिले जाते.—पडताळा यशया २:२, ३.
[तळटीपा]
a गरिज्जीम पर्वतासमोर शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ व बन्यामीनचे सहा वंश उभे होते. एबाल पर्वतासमोर रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफतालीचे सहा वंश उभे होते.—अनुवाद २७:१२, १३.
[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]
Pictorial Archive (Near Eastern History) Est.