ग्रीसमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा आणखी एक विजय
ऑक्टोबर ६, १९९५ रोजी अथेन्समधील त्रीसदस्यीय न्यायाधीशांच्या न्यायालयाने यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्ण-वेळेच्या दोन सेवकांच्या संदर्भातील कायदेशीर खटल्याची सुनावणी दिली. एकदा यहोवाचे साक्षीदार एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरी साक्ष देण्यासाठी गेले तेव्हा त्याने त्यांच्यावर धर्मांतराचा आरोप ठेवला आणि त्यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदवली.
अध्यक्षीय स्त्री-न्यायाधीशाने विचारलेल्या प्रश्नांवरून हे दिसून आले, की तिला यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याविषयी फार आस्था होती. उदाहरणार्थ, तिने विचारले: “तुम्ही हे काम केव्हापासून करताय? या वर्षांदरम्यान लोक तुमच्याबरोबर कसे वागत राहिलेत? तुमच्या कार्याला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आलाय? तुम्ही दारोदारी जाऊन लोकांना काय सांगता?” त्यानंतर देण्यात आलेली उत्तम साक्ष न्यायालयाच्या या कचेरीत उपस्थित असलेल्या सर्वांनी कान देऊन ऐकली.
सरकारी वकिलाने देखील आपली बाजू मांडल्याचे पाहून साक्षीदारांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याने असे म्हणून आपल्या बोलण्याचा समारोप केला: “आपल्या देवावर विश्वास ठेवणं आणि त्याची उपासना करणं इतकाच यहोवाच्या साक्षीदारांचा संविधानिक हक्क नाही, तर दारोदारी, चौकाचौकांत आणि रस्त्यांवर त्यांची इच्छा असल्यास साहित्याचे मोफत वाटप करून आपल्या विश्वासाचा प्रसार करण्याचा देखील त्यांना संविधानिक हक्क आहे.” न्यायालयांनी आणि राज्यसभेने दिलेले दोषमुक्तीचे अनेक अहवाल या सरकारी वकिलाने आधार म्हणून सादर केले. त्याने कोक्कीनाकीस व्ही. ग्रीस, या खटल्याचा देखील उल्लेख केला; या खटल्याचा निकाल मानवी प्राधिकाराच्या युरोपिय न्यायालयाने यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने दिला होता.a या सरकारी वकिलाने इशारा दिला: “कृपया याची नोंद घेण्यात यावी, की या खटल्यात ग्रीसला दंड देखील भरावा लागला होता. म्हणून अशा प्रकारचे खटले न्यायनिवाड्यासाठी आणतो तेव्हा आपण सावधगिरी बाळगण्यास हवी. खरे तर, अशा प्रकारचे खटले सुरवातीला न्यायालयात आणता कामा नये.”
सरकारी वकिलाने एवढे बोलल्यानंतर साक्षीदारांच्या वकिलाला बोलण्याकरता विशेष काही उरलेच नाही. तथापि, त्याने या गोष्टीवर जोर देण्याची संधी दवडली नाही, की धर्मांतराचा कायदा बेसनदशीर आहे आणि तो ग्रीसला आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रमात टाकत राहिला आहे.
अध्यक्षीय न्यायाधीशाने दुसऱ्या दोन न्यायाधिशांकडे ओझरते पाहिले आणि बांधवाला तसेच बहिणीला एकमताने दोषमुक्त करण्यात आले. ही न्याय चौकशी एक तास आणि दहा मिनिटे चालली, अखेरीस यहोवाच्या नावाकरता तसेच त्याच्या लोकांकरता हा एक विजयच होता.
कोक्कीनाकीसच्या खटल्याची सुनावणी केल्यानंतर मानवी प्राधिकाराच्या युरोपिय न्यायालयाने धर्मांतराच्या खटल्यांच्या बाबतीत केलेली ही चौथी दोषमुक्ती आहे. आपल्या प्रचाराच्या संबंधाने असणाऱ्या समस्या आता जवळजवळ नाहीशा झाल्यामुळे प्रचारकार्य कोणत्याही अडथळ्याविना चालू ठेवण्यास शक्य असल्यामुळे ग्रीसमधील यहोवाचे साक्षीदार आनंदी आहेत.
[तळटीप]
a टेहळणी बुरूज, (इंग्रजी) सप्टेंबर १, १९९३, पृष्ठे २७-३१ पाहा.