“तुमचं चर्च कुठंय?”
हा प्रश्न मोझांबिकमधील यहोवाच्या साक्षीदारांना अनेकदा विचारण्यात आला आहे. खरं तर, अलीकडच्या काळापर्यंत या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण होते. याचे कारण म्हणजे या देशात यहोवाच्या साक्षीदारांना १९९१ पर्यंत कायदेशीर मान्यता मिळालेली नव्हती. यामुळे स्पष्टपणे ओळखण्याजोगी आणि प्रस्थापित उपासनेची ठिकाणे असणे शक्य नव्हते.
तथापि, फेब्रुवारी १९, १९९४ मध्ये परिस्थिती बदलली. गर्मी आणि भर उन्हात मोझांबिकमध्ये पहिल्यांदा उभारण्यात आलेल्या दोन राज्यसभागृहांचे समर्पण करण्यात आले. मोझांबिक किनारपट्टीच्या निम्म्या अंतरावर असणाऱ्या बेरिआ बंदराच्या शहरात एकत्रित होण्याकरिता तयार केलेल्या या उत्तम वास्तुंच्या समर्पण प्रसंगी एकूण ६०२ जण उपस्थित होते. ही राज्य सभागृहे त्या शहरात असलेल्या तीन मंडळ्यांच्या गरजा भागवतील.
इमारतींचा पाया घालण्यापासून ते त्या पूर्ण होईपर्यंतच्या या संपूर्ण प्रकल्पासाठी एक वर्ष आणि दोन महिने कठीण परिश्रम करावे लागले. शेजारील झिंबाब्वे देशातील ३० किंवा त्यापेक्षा अधिक स्वयंसेवकांनी अनेकदा येथे येऊन स्थानिक साक्षीदारांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. या कार्यहालचालींचा पाया असलेल्या बेरिआमधील मिशनरी गृहात सर्वांची निवासव्यवस्था होणे शक्य नसल्यामुळे काही जण सप्ताहांती आणि काही वेळा तर सलग कित्येक आठवडे मिशनरी गृहाच्या बाहेर उभारलेल्या तंबूत राहिले.
मॉसॉम्बा आणि मॉनॉवा या मंडळ्यांकरिता तयार करण्यात येणाऱ्या राज्य सभागृहाच्या बांधकामाची जागा बेरिआच्या मुख्य रस्त्यावर होती. एका मिशनऱ्याने निरीक्षण केले: “तो दिवस फार गडबडीचा होता, कामानं वेग घेतला तेव्हा उल्लेखनीय प्रगती दिसून आली. वाहन चालकांचे लक्ष राज्य सभागृहामुळं वेधलं जात होतं यामुळं गाडी चालविण्याकडं दुर्लक्ष होऊन त्यांचा अपघात होताहोता ते वाचल्याचं मी पाहिलय.” काम पाहण्यासाठी अनेक पांथस्थ येथे थांबत असत आणि विशेषतः विभिन्न वंशांचे लोक एक होऊन काम करीत असल्याचे पाहून ते प्रभावित होत.
या कामात फार मोठे प्रयोजन आणि संघटन गोवलेले होते. या देशात बांधकाम साहित्याचा आणि साधनसामुग्रीचा तुटवडा असतानाही पुरवठा कमी आहे म्हणून इतर प्रकल्पांप्रमाणे राज्य सभागृहाचे काम कधीही थांबले नाही. एके प्रसंगी, सिमेंटच्या ८०० गोण्यांची आवश्यकता होती आणि हा पुरवठा करणारे एकमेव ठिकाण तेथे होते परंतु सिमेंट भरण्यासाठी पुरेशा गोण्या या कारखान्याकडे नव्हत्या. यास्तव राजधानी, मापुतो येथील वॉच टावर सोसायटीच्या शाखा दफ्तराशी बांधवांनी संपर्क साधला तेव्हा विमानाद्वारे गोण्या पाठविण्यात आल्या आणि नंतर त्या सिमेंटच्या कारखान्यात नेऊन त्यांत सिमेंट भरण्यात आले. विनाव्यत्यय काम पार पडत गेले.
दुसऱ्या प्रसंगी, छपराला आधार देणारे सांगाडे बसविण्यात येत होते तेव्हा तेथे काम करणाऱ्यांना स्टील बीम कमी असल्याचे लक्षात आले. या दुर्भिक्षामुळे प्रकल्पासाठी लागणारे स्टील ६०० किलोमीटर अंतरावरून मागवण्यात आले होते! हे काम पुष्कळ वेळेपासून न्याहाळत असणाऱ्या एका व्यक्तीकडे काम करणाऱ्यांपैकी एक जण आला आणि काम पूर्ण करण्यासाठी त्यांना स्टील कोठे मिळू शकेल असे त्याने त्यास विचारले. त्या मनुष्याने उत्तर दिले: “इथं उभं राहून मला आता एका तासापेक्षा अधिक वेळ झालाय आणि हा निश्चितच काही योगायोग नाही. तुम्ही जे काम करताय आणि या प्रकल्पामागील तुमची भावना या गोष्टींची वाहवा केल्याशिवाय मला राहवत नाही. तुम्हाला हवं असणारं स्टील माझ्याजवळ आहे आणि ते बक्षीस म्हणून तुम्हाला देण्यास मला आवडेल.” ही मदत अगदी समयोचित ठरली.
या प्रकल्पामागे किती मोठी बांधकाम-कंपनी होती, हे पाहून निरीक्षकांनी तोंडात बोटे घातली. हे यहोवाचे साक्षीदार असून स्वंयसेवक म्हणून ते काम करीत आहेत, असे सांगण्यात या काम करणाऱ्यांना मोठा आनंद होत होता. बघ्यांना विशेषतः कोणत्या गोष्टीने प्रभावित केले? एकाने म्हटले: “तुम्ही संघटित लोक आहात. तुम्ही वेगवेगळ्या वंशांचे असून देखील बांधव या नात्याने एकत्रितरीत्या काम करता.” परिणामी, अनेकांनी बायबल अभ्यासाची विचारणा केली. सभांवर देखील याचा परिणाम झाला आहे. उदाहरणार्थ, माँगा मंडळीतील सभेची सरासरी उपस्थिती साक्षीदारांच्या संख्येपेक्षा दुप्पट झाली आहे.
नवीन राज्य सभागृहे स्थानिक साक्षीदारांसाठी खरोखरच फार मोठा आशीर्वाद ठरले आहेत. पूर्वी बहुतेक जण अविकसित ठिकाणी असलेल्या पडवीत अथवा गवताचे छत किंवा पातळ पत्रे असलेल्या खासगी घरात एकत्र जमत असत. पाऊस पडल्यानंतर ते भिजत असत तरी देखील ते सभांना विश्वासूपणे उपस्थित राहत होते. अनेक दशकांपर्यंत मोझांबिकमधील साक्षीदारांना अशाच प्रकारची “राज्य सभागृहे” ठाऊक होती. मॉसॉम्बा मंडळीतील कॅटॉनॉ गॅब्रिएल नामक वडिलांनी म्हटले: “हा प्रकल्प वास्तवात उतरविण्यासाठी देणगी दिलेल्या आमच्या जगव्याप्त बांधवांचे आम्ही ऋणी आहोत.” एका युवा साक्षीदाराला आठवते: “आम्ही जेव्हा कॉरिकॉ (“पुर्नशिक्षण शिबिर” याठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांना सुमारे १२ वर्षांकरिता स्थानबद्ध करण्यात आले होते) येथे होतो तेव्हा आम्ही असे म्हणत असू, की ‘आपण विश्वासूपणे टिकून राहू या आणि यहोवा आपल्याला प्रतिफळ देईल.’ नवीन राज्य सभागृह यहोवापासून मिळालेले प्रतिफळ आहे.” त्यांच्या या शब्दांवरून त्यांची मनःपूर्वक कृतज्ञता आणि यहोवाची स्तुती करण्याचा त्यांचा निर्धार दिसून येतो.
बांधकामात सहभागी झालले अनेक युवक पायनियर-आत्म्याने प्रेरित झाले आणि त्यांनी नंतर नियमित पायनियर सेवाकार्य पत्करले. माँगा मंडळीतील नियमित पायनियर असलेल्या इजाबेल या युवा बहिणीने राज्य सभागृहाचे समर्पण होण्याच्या आदल्या दिवशी पूर्णपणे स्वच्छ असलेल्या राज्य सभागृहाला पाहून म्हटले: “माझ्याकरिता बेरिआ शहरातील ही सर्वात सुंदर जागा आहे. या ठिकाणी असणं माझ्यासाठी फार मोठ्या आनंदाची गोष्ट आहे.” ऑडो कॉस्ता नामक मिशनऱ्यांनी असे सांगितले, की साक्षीदारांच्या प्रामाणिकपणाची कल्पना असल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी खास आयात-प्रक्रियांसाठी परवानगी दिली होती. नंतर त्यांनी पुढे म्हटले: “आम्ही अगदी थकून गेलो होतो, पण यहोवाचा आदर आणि महिमा करण्यासाठी असलेल्या या कामाचे प्रतिफळ पाहणं आमच्यासाठी आनंदाचं होतं.”
“तुमचं चर्च कुठंय? असे बेरिआ शहरातील एखादा प्रेमळ रहिवासी जेव्हा-जेव्हा विचारतो तेव्हा-तेव्हा साक्षीदार या दोन नवीन राज्य सभागृहांपैकी एकाविषयी त्याला अशा शब्दांत सांगतात, “ते इंटरनॅशनल रोड, ॲव्हिंडा ॲकोरडा डे लूसाका, फोर्थ स्कॉड्रन पोलिस स्टेशनच्या अगदी पलीकडे आहे.” यामध्ये एक सुधारणा करून ते पुढे म्हणतात, “परंतु ते चर्च नाहीए. ते राज्य सभागृह आहे.”
[१५ पानांवरील नकाशा/चित्रं]
(For fully formatted text, see publication)
आफ्रिका
मोझांबिक
बेरिआ
मापुतो