तुमच्या जीवनात सर्वप्रथम काय आहे?
“ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव.”—स्तोत्र १४३:८.
१. मानवी प्रयत्न आणि साध्यता यांविषयी राजा शलमोनाने काय अनुमान काढले?
कार्य आणि चिंता यांनी जीवन ग्रासलेले आहे हे कदाचित तुम्हाला माहीतच असावे आणि कदाचित याची जाणीवही असेल. त्यांचा तुम्ही विचार करता तेव्हा, त्यातील काही कार्ये व चिंता महत्त्वपूर्ण आहेत हे तुम्हाला दिसू शकेल. इतर कार्ये किंवा चिंता कमी महत्त्वपूर्ण किंवा निरर्थक असतात. या गोष्टीची तुम्हाला जाणीव आहे म्हणजेच तुम्ही आजपर्यंतच्या सुज्ञ लोकांतील एक, राजा शलमोन याच्या एकवाक्यतेत आहात. जीवनाच्या कार्यांची कसून उजळणी केल्यावर त्याने असा समारोप केला: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उपदेशक २:४-९, ११; १२:१३) पण, याचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो?
२. देव-भीरू लोकांनी स्वतःला कोणता मूलभूत प्रश्न विचारला पाहिजे व त्यामुळे कोणती संबंधित प्रश्ने उद्भवतात?
२ तुम्हाला जर ‘खऱ्या देवाचे भय धरून त्याच्या आज्ञा पाळावयाच्या’ आहेत तर स्वतःला हा आव्हानात्मक प्रश्न विचारा, ‘माझ्या जीवनात सर्वप्रथम काय आहे?’ ह्या प्रश्नावर तुम्ही रोजच विचार करणार नाही हे खरे, पण आता त्यावर विचार का करू नये बरे? वास्तविक, तो काही संबंधित प्रश्ने सुचवतो जसे की, ‘मी कदाचित माझ्या नोकरीवर किंवा पेश्यावर अथवा भौतिक वस्तूंवर तर फाजील भर देत नाही ना? माझे घर, कुटुंब आणि प्रिय जन या दृश्यात कोठे बसतात?’ एखादा तरुण विचारू शकतो, ‘शिक्षण केवढ्या प्रमाणापर्यंत माझे लक्ष व माझा वेळ खाते? एखादा छंद, खेळ, मनोरंजनाचा एखादा प्रकार किंवा तंत्रज्ञान माझ्या जीवनातील प्रमुख आवड आहे हे खरे आहे का?’ तसेच आपण कोणत्याही वयात किंवा परिस्थितीत असो, हा प्रश्न तर उचितपणे विचारला पाहिजे, की ‘देवाच्या सेवेला माझ्या जीवनात कोणते स्थान आहे?’ प्राथमिकतांच्या गरजेवर तुम्ही कदाचित सहमत असाल. पण, त्यांना सुज्ञपणे प्राथमिकता देण्यासाठी आपल्याला कसे व कोठून साहाय्य प्राप्त करता येईल?
३. ख्रिश्चनांसाठी प्राथमिकता ठरवण्यामध्ये काय समाविष्ट आहे?
३ “सर्वप्रथम” या शब्दाचा मूळ अर्थ, सर्वांआधी येणारे किंवा पहिल्यांदा पूर्ण करण्याजोग्या गरजा असा होतो. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असला किंवा त्यांच्यासोबत सहवास राखणाऱ्या देवाच्या वचनाचा प्रांजळपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक असला तरी, या वास्तविकतेचा विचार करा: “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो.” (उपदेशक ३:१) उचितपणे, यामध्ये तुमच्या कौटुंबिक नातेसंबंधाबद्दल प्रेमळ काळजी व्यक्त करणे समाविष्ट होते. (कलस्सैकर ३:१८-२१) यामध्ये लौकिक नोकरी करून आपल्या घराण्याची तरतूद करणे गोवले आहे. (२ थेस्सलनीकाकर ३:१०-१२; १ तीमथ्य ५:८) थोडासा बदल म्हणून तुम्ही एखाद्या छंदासाठी किंवा प्रासंगिक मनोरंजनासाठी वा विरंगुळ्यासाठी वेळ काढू शकता. (पडताळा मार्क ६:३१.) परंतु, या गोष्टी जीवनातील प्रमुख गोष्टी नव्हेत हे तुम्हाला त्यावर गंभीरपणे विचार केल्यावर दिसते का? याहूनही महत्त्वपूर्ण दुसरे आणखी काही तरी आहे.
४. फिलिप्पैकर १:९, १० चा संबंध आपल्या प्राथमिकता मांडण्याशी कसा आहे?
४ बायबलची मार्गदर्शक तत्त्वे प्राथमिकता मांडण्याकरता व सुज्ञ निर्णय घेण्याकरता मौल्यवान साहाय्य आहे हे तुम्ही कदाचित ओळखता. जसे की फिलिप्पैकर १:९, १० [NW] येथे ख्रिश्चनांना ‘अचूक ज्ञानाने व पूर्ण समजबुद्धीने उत्तरोत्तर अतिशय वाढत’ राहण्यास आर्जवले आहे. कोठपर्यंत? प्रेषित पौलाने पुढे म्हटले: “तुम्हाला अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची खातरी” करता येईपर्यंत. याला काही अर्थ नाही का? अचूक ज्ञानाच्या आधारावर एक समजदार ख्रिस्ती, जीवनात कोणती आस्था—प्रथम—असली पाहिजे हे ठरवू शकतो.
प्रथम काय आहे याबद्दलचे उदाहरण
५. ख्रिश्चनांकरता घालून दिलेल्या आदर्शाचे वर्णन करताना, शास्त्रवचने येशूच्या जीवनात कोणती गोष्ट सर्वप्रथम असल्याचे दाखवतात?
५ प्रेषित पेत्राच्या शब्दांत आपल्याला ज्ञानाचा एक अप्रतिम पैलू सापडतो: “याचकरता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेणेकरुन तुम्ही त्याच्या पावलांचे जवळून अनुकरण करावे म्हणून त्याने तुम्हाकरता कित्ता घालून दिला आहे.” (१ पेत्र २:२१, NW) जीवनात काय प्रथम आहे याच्या सुगाव्यांसाठी आपण येशूने याबद्दल काय विचार केला त्याचे परीक्षण करू शकतो. स्तोत्र ४०:८ त्याच्याबद्दल भविष्यसूचकपणे असे म्हणाले: “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” आणि हाच विचार त्याने अशा प्रकारे मांडला: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.”—योहान ४:३४; इब्री लोकांस १२:२.
६. देवाची इच्छा पूर्ण करण्याला येशूने केले त्याप्रमाणे आपणही केल्यास आपल्यालाही तशी प्रतिफळे कशी मिळू शकतात?
६ देवाची इच्छा पूर्ण करणे—या गुरूकिल्लीची नोंद घ्या. येशूचे उदाहरण, आपल्या शिष्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्या गोष्टी योग्यरीत्या सर्वप्रथम ठेवल्या पाहिजेत यावर जोर देते कारण तो म्हणाला होता: “पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.” (लूक ६:४०) तसेच येशू, पित्याने उद्देशिलेल्या मार्गाप्रमाणे जसजसा चालत गेला तसे त्याने दाखवून दिले, की देवाच्या इच्छेला सर्वप्रथम ठेवण्यातच “पूर्णानंद” होता. (स्तोत्र १६:११; प्रेषितांची कृत्ये २:२८) यावरून काय ध्वनित होते हे तुम्ही जाणू शकता का? देवाची इच्छा पूर्ण करण्याला येशूच्या अनुयायांनी आपल्या जीवनात प्रथम स्थान दिल्यास तेही “पूर्णानंद” व अस्सल जीवनाचा आस्वाद घेतील. (१ तीमथ्य ६:१९) तेव्हा, आपल्या जीवनात देवाची इच्छा सर्वप्रथम असली पाहिजे याच्याकरता अधिक कारणे आहेत.
७, ८. येशूने कोणत्या परीक्षांचा सामना केला व यातून आपण काय शिकतो?
७ येशूने देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला सादर केल्यानंतर लागलीच दियाबलाने त्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला. कशा प्रकारे? त्याला तीन क्षेत्रांमध्ये मोहात पाडून. प्रत्येक वेळी येशूने शास्त्रवचनीय, असंदिग्ध शब्दांत उत्तर दिले. (मत्तय ४:१-१०) परंतु, त्याच्यापुढे आणखी परीक्षा होत्याच—छळ, उपहास, यहूदाकडून विश्वासघात, खोटे आरोप आणि मग वधस्तंभावर मृत्यू. तरीसुद्धा, यातील एकाही परीक्षेमुळे देवाचा निष्ठावान पुत्र आपल्या मार्गाक्रमणापासून वळला नाही. अगदी बिकट क्षणी येशूने प्रार्थना केली: “माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. . . . तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय २६:३९, ४२) आपल्यासाठी घालून दिलेल्या आदर्शाच्या या पैलूचा आपल्यातील प्रत्येकावर खोल प्रभाव होऊन आपण सर्वांनी “प्रार्थनेत तत्पर” होऊ नये का?—रोमकर १२:१२.
८ होय, आपण जीवनात प्राथमिकता मांडतो तेव्हा, ईश्वरी मार्गदर्शन विशेषतः उपयोगी असते, खासकरून जर आपण सत्याच्या शत्रूंचा व देवाच्या इच्छेच्या विरोधकांचा सामना करत असू. विश्वासू राजा दावीद शत्रूंकडील विरोध सहन करत होता तेव्हा मार्गदर्शनाकरता त्याने केलेल्या विनवणीची आठवण करा. स्तोत्र १४३ मधील एका भागाचा विचार करताना आपण हे समजून घेऊ या. याने आपल्याला, यहोवाबरोबरचा आपला व्यक्तिगत नातेसंबंध बळकट कसा करता येईल व देवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात सर्वप्रथम ठेवण्यास कसे दृढ होता येईल ते समजण्यास मदत केली पाहिजे.
यहोवा आपल्या प्रार्थना ऐकतो व उत्तरतो
९. (अ) दावीद पापी असला तरी त्याच्या शब्दांतून व कृतींतून काय प्रकट होते? (ब) चांगले ते करणे आपण सोडून का देऊ नये?
९ पापी मर्त्य मनुष्य असताही, यहोवा आपली विनंती ऐकेल यावर दावीदाला विश्वास होता. त्याने विनम्रपणे विनवणी केली: “हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे; तू आपल्या सत्यतेने व न्याय्यत्वाने माझे ऐक. तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नको; कारण तुझ्यापुढे कोणीहि जिवंत मनुष्य नीतिमान् ठरणार नाही.” (स्तोत्र १४३:१, २) दावीदाला आपल्या अपूर्णतेची जाण होती, तरीपण देवाप्रती त्याचे अंतःकरण संपूर्ण होते. अशा प्रकारे, त्याला धार्मिकतेत उत्तर मिळेल याची खात्री होती. यामुळे आपण प्रोत्साहित होत नाही का? आपण देवाच्या धार्मिकतेत उणे पडलो तरी, आपली अंतःकरणे त्याच्याप्रती संपूर्ण असल्यास तो आपल्या प्रार्थना ऐकतो याची आपण खातरी बाळगू शकतो. (उपदेशक ७:२०; १ योहान ५:१४) तत्परतेने प्रार्थना करत असताना, या दुष्ट दिवसांमध्ये ‘बऱ्याने वाइटाला जिंकण्याचा’ आपला हेतू असला पाहिजे.—रोमकर १२:२०, २१; याकोब ४:७.
१०. दावीदाला चिंताग्रस्त काळातून का गुजरावे लागले?
१० आपल्याला शत्रू असतात त्याप्रमाणेच दावीदाचेही शत्रू होते. शौलापासून पळालेला असो, एकाकी, दुर्गम भागात आश्रय घेणारा असो किंवा शत्रूंकडून छळ होणारा राजा असो, दावीदही चिंताग्रस्त काळातून गुजरला. याचा त्याच्यावर कसा प्रभाव पडला त्याचे वर्णन त्याने अशाप्रकारे दिले: “वैरी माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहे . . . मला त्याने अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे. माझा आत्मा माझ्या ठायी व्याकुळ झाला आहे; माझे अंतर्याम घाबरे झाले आहे.” (स्तोत्र १४३:३, ४) तुम्हालाही असे कधी वाटले का?
११. देवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांनी कोणत्या चिंताग्रस्त काळांचा सामना केला आहे?
११ शत्रूंकडून दबाव, कठीण आर्थिक हालअपेष्टांमुळे परीक्षा, गंभीर आजार किंवा इतर चिंताजनक समस्या यामुळे देवाचे काही लोक निराशेला बळी पडले आहेत. कधी कधी त्यांची अंतःकरणेही जणू काय बधिर झालेली असतात. जणू काय प्रत्येक व्यक्तीने आक्रोश केला: “तू मला अनेक भारी संकटे भोगावयास लाविली, तरी तू माझे पुनरुज्जीवन करिशील . . . माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर.” (स्तोत्र ७१:२०, २१) त्यांना कशा प्रकारे मदत देण्यात आली?
शत्रूच्या प्रयत्नांचा सामना करणे
१२. धोके आणि परीक्षा यांना दावीद कशाप्रकारे सामोरा गेला?
१२ धोक्यांनी व मोठ्या परीक्षांनी घेरलेले असताना दावीदाने काय केले त्याबद्दल स्त्रोत्र १४३:५ सांगते: “मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करितो; तुझ्या हातच्या कृतीचे चिंतन करितो.” दावीदाने, देवाचे आपल्या सेवकांसोबतचे व्यवहार आणि स्वतः त्याने त्याच्या हातून मुक्तता कशी अनुभवली त्याची आठवण केली. यहोवाने आपल्या महान नावाकरता काय केले होते यावर त्याने मनन केले. होय, दावीदाने स्वतःला देवाच्या कार्यात गुंतवून ठेवले.
१३. परीक्षांचा सामना करताना, विश्वासू सेवकांच्या प्राचीन व आधुनिक उदाहरणांवरील मनन आपल्याला सहन करत राहण्यास कशी मदत करील?
१३ देवाने आपल्या लोकांबरोबर कसा व्यवहार केला त्याची आपण नेहमी आठवण करीत नाही का? निश्चितच! यामध्ये प्रारंभीच्या ख्रिस्ती काळातील “मोठ्या साक्षीरूपी मेघाने” केलेल्या रेकॉर्डचा समावेश आहे. (इब्री लोकांस ११:३२-३८; १२:१) पहिल्या शतकातील अभिषिक्त ख्रिश्चनांना देखील “पूर्वकाळचे दिवस” व त्यांनी जे काही सहन केले ते आठवण्याचे उत्तेजन देण्यात आले होते. (इब्री लोकांस १०:३२-३४) आधुनिक दिवसातील देवाच्या सेवकांच्या, जसे यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्घोषकa (इंग्रजी), या पुस्तकात कथन केलेल्या अनुभवांबद्दल काय? तेथे व इतरत्र लिहून ठेवलेले अहवाल आपल्याला, यहोवाने आपल्या लोकांना बंदी, तुरुंगवास, जमावाने केलेला हल्ला तसेच छळ व गुलामगिरीच्या छावण्यांमध्ये कशी मदत केली त्याची आठवण देतात. युद्धग्रस्त देशांमध्येही, जसे की बुरुंडी, र्वांडा, लायबेरिया आणि पूर्व युगोस्लाव्हिया येथे संकटे आहेत. विरोध होतो तेव्हा, यहोवाबरोबर अतुट नातेसंबंध कायम राखल्यामुळे देवाचे सेवक टिकून राहिले. ज्यांनी ज्यांनी त्याची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात सर्वप्रथम ठेवले होते त्यांना त्यांना त्याने टिकवून ठेवले.
१४. (अ) आपल्या सारख्याच एखाद्या प्रसंगात देव एका व्यक्तीला टिकवून ठेवतो याचे एक उदाहरण कोणते? (ब) या उदाहरणातून तुम्ही काय शिकता?
१४ पण, तुम्ही म्हणाल की मला इतक्या क्रूर दुर्व्यवहाराचा अनुभव घ्यावा लागला नाही; कधी घ्यावाही लागणार नाही असेही कदाचित तुम्हाला वाटेल. पण देव आपल्या लोकांना, ज्याला काही जण नाट्यमय परिस्थिती म्हणतील अशा परिस्थितींमध्येच नेहमी पाठिंबा देतो असे नाही. त्याने अनेक “सामान्य” व्यक्तींना “सामान्य” परिस्थितीतही पाठिंबा दिला आहे. येथे अनेक उदाहरणांपैकी केवळ एक उदाहरण आहे: वरील फोटो कोणाचा आहे ओळखलात का आणि देवाने आपल्या लोकांबरोबर केलेले व्यवहार आठवण्यास तो तुम्हाला मदत करतो का? हा फोटो डिसेंबर १, १९९६ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकात आला होता. पनेलपी माक्रीस यांनी कथन केलेला लेख तुम्ही वाचलात का? ख्रिस्ती एकनिष्ठेचे किती प्रशंसनीय उदाहरण! तिला शेजाऱ्यांकडून काय सहन करावे लागले, गंभीर विकलांगतेविरुद्ध तिने कसा लढा दिला व पूर्ण-वेळेच्या सेवेत राहण्यासाठी तिने कोणते प्रयत्न पणास लावले या गोष्टी तुम्ही आठवू शकता का? मायट्लीनी येथील तिच्या फलदायी अनुभवाविषयी काय? मुद्दा असा आहे की, तुम्ही या उदाहरणांकडे, प्राथमिकता मांडण्यास, देवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यास आपल्या सर्वांना साह्य देणारी आहेत अशा रीतीने त्यांच्याकडे पाहता का?
१५. यहोवाची कोणती काही कृत्ये आहेत ज्यावर आपण मनन करावे?
१५ दावीदाने केले त्याप्रमाणे यहोवाच्या कार्यांवर मनन करण्यासाठी ती आपल्याला बळ देतात. यहोवाने आपला उद्देश पूर्ण करताना, आपल्या पुत्राचा मृत्यू, पुनरुत्थान व गौरव यांच्याद्वारे तारणाकरता तरतूद केली. (१ तीमथ्य ३:१६) त्याने आपले स्वर्गीय राज्य स्थापन केले, सैतान व त्याच्या दुरात्म्यांची स्वर्गातून हकालपट्टी केली व या पृथ्वीवर खरी उपासना पुनः स्थापिली. (प्रकटीकरण १२:७-१२) त्याने एका आध्यात्मिक परादीसची उभारणी केली आहे व आपल्या लोकांत वाढ होण्याकरता आशीर्वाद दिला आहे. (यशया ३५:१-१०; ६०:२२) मोठ्या संकटाचा उद्रेक होण्याआधी त्याचे लोक आता अखेरची साक्ष देत आहेत. (प्रकटीकरण १४:६, ७) होय, मनन करण्याजोगे आपल्याकडे पुष्कळ काही आहे.
१६. स्वतःला कशामध्ये गुंतवून ठेवण्याचे उत्तेजन आपल्याला मिळते व याचा आपल्यावर कोणता प्रभाव पडेल?
१६ यहोवाची उपयोजित शक्ती दुर्वार आहे असे आपल्या मनावर बिंबवणाऱ्या मानवी प्रयत्नांत व्यग्र होण्याऐवजी देवाच्या हस्तकृतींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. परंतु, ही हस्तकृती स्वर्ग आणि पृथ्वीवरील सृष्टीच्या विस्मयकारक वास्तविक कार्यांपुरतीच मर्यादित नाही. (ईयोब ३७:१४; स्तोत्र १९:१; १०४:२४) त्याच्या विस्मयकारक हस्तकृतींमध्ये, आपल्या प्राचीन निवडलेल्या लोकांच्या अनुभवांद्वारे प्रदर्शित केले त्याप्रमाणे, शत्रू विरोधकांपासून आपल्या लोकांचा बचाव केलेल्या कृत्यांचा समावेश होतो.—निर्गम १४:३१; १५:६.
कोणत्या मार्गाने चालावे ते माहीत असणे
१७. यहोवा दावीदाला केवढा वास्तविक वाटत होता व यामुळे आपल्याला कोणती खात्री मिळते?
१७ जीवनाची आर्द्रता आटून जाऊ नये म्हणून मदतीसाठी दावीदाने अशी प्रार्थना केली: “मी आपले हात तुझ्यापुढे पसरितो; शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा क्षय पावत आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नको; लपवशील तर मी गर्तेंत उतरणाऱ्यांसारखा होईन.” (स्तोत्र १४३:६, ७) देवाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होती हे पापी दावीदाला माहीत होते. (स्तोत्र ३१:७) काही वेळा, आपल्यालाही आपली आध्यात्मिकता खालच्या पातळीला गेल्यासारखे वाटू शकते. पण परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसते. आपल्या प्रार्थना ऐकणारा यहोवा, प्रेमळ वडील, टेहळणी बुरूज नियतकालिकातील लेख किंवा जणू काय आपल्यासाठी तयार केलेले सभांतील भाग यासर्वांद्वारे आपल्याला तजेला देऊन आपले पुनर्वसन त्वरित घडवू शकतो.—यशया ३२:१, २.
१८, १९. (अ) यहोवाला आपण कोणती कळकळीने विनवणी करावी? (ब) आपण कशाबद्दलची खात्री बाळगू शकतो?
१८ यहोवावरील आपला भरवसा त्याला अशी विनंती करण्यास आपल्याला प्रवृत्त करतो: “तुझ्या वात्सल्याचे शब्द मला ऐकू दे; कारण तुझ्यावर माझा भाव आहे; ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव.” (स्तोत्र १४३:८) एका ग्रीक बेटावर एकाकी असलेल्या भगिनी माक्रीसची त्याने निराशा केली का? तेव्हा, त्याची इच्छा पूर्ण करण्याला तुम्ही तुमच्या जीवनात प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो तुमची निराशा करील का? देवाच्या राज्याची घोषणा करण्याच्या आपल्या कार्यात अडथळा आणण्यास अथवा पूर्णपणे थांबवण्यास दियाबल व त्याच्या प्रतिनिधींना खूप आवडेल. खऱ्या उपासनेला सामान्यपणे अनुमती असलेल्या अथवा दडपण असलेल्या देशामध्ये आपण सेवा करत असलो तरी, आपल्या संयुक्त प्रार्थना दावीदाच्या या विनंतीशी मेळ घालतात: “हे परमेश्वरा, माझ्या वैऱ्यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे.” (स्तोत्र १४३:९) आध्यात्मिक संकटांपासून आपले संरक्षण, परात्पराच्या गुप्त स्थळी राहण्यावर अवलंबून आहे.—स्तोत्र ९१:१.
१९ प्रथम काय आहे याबद्दलची आपली धारणा भक्कमपणे आधारित आहे. (रोमकर १२:१, २) यास्तव, जग तुमच्यावर मानवी योजनेत त्याला महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या गोष्टी लादण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याचा प्रतिकार करा. तुम्ही जाणत असलेली प्राथमिकता म्हणजे, देवाची इच्छा आचरणे हे तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूमधून सतत प्रदर्शित होऊ द्या.—मत्तय ६:१०; ७:२१.
२०. (अ) स्तोत्र १४३:१-९ मध्ये दावीदाबद्दल आपण काय शिकलो? (ब) आज ख्रिस्ती जन दावीदाचा आत्मा कसा प्रतिबिंबित करतात?
२० स्तोत्र १४३ अध्यायाची पहिली नऊ वचने यहोवासोबत दावीदाच्या निकट व्यक्तिगत नातेसंबंधावर जोर देतात. शत्रूंनी त्याला घेरले तेव्हा मार्गदर्शनाकरता त्याने निर्भीडपणे देवाला विनवणी केली. त्याने त्याच्यासमोर आपले हृदय मोकळे केले, योग्य मार्गाने चालण्यासाठी मदत मागितली. पृथ्वीवरील अभिषिक्त जनांचा शेष आणि त्यांचे सहकारी यांच्याबाबतीत हीच गोष्ट खरी आहे. यहोवाकडे मार्गदर्शनाकरता विनवणी करत असताना, त्याच्यासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाला ते मौल्यवान समजतात. दियाबल आणि जग याजकडून येणाऱ्या दबावातही ते देवाची इच्छा पूर्ण करण्याला सर्वप्रथम ठेवतात.
२१. आपल्या जीवनात कोणत्या गोष्टीला प्रथम स्थान असले पाहिजे हे इतरांना शिकवायचे आहे तर आपण स्वतः पहिल्यांदा त्यांच्यासमोर एक उत्तम उदाहरण असणे महत्त्वपूर्ण का आहे?
२१ यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करणाऱ्या लाखोंनी हे जाणणे जरूरीचे आहे, की देवाची इच्छा पूर्ण करण्याला प्रथम स्थान आहे. वचनाच्या आज्ञेत असणाऱ्यांपैकी होण्यामध्ये समाविष्ट असलेल्या तत्त्वांवर जोर देणाऱ्या सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तकाच्या १३ व्या अध्यायाची चर्चा करताना ही गोष्ट समजण्यास आपण त्यांना मदत करू शकतो.b अर्थातच, आपण त्यांना जे काही शिकवतो त्याचे उदाहरण त्यांनी आपल्यामध्ये पाहिले पाहिजे. सापेक्षरीत्या अल्प काळानंतर, कोणत्या मार्गाने चालले पाहिजे हे त्यांनाही दिसून येईल. आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व कशाला असले पाहिजे हे त्या लाखो जनांना व्यक्तिगतरीत्या समजल्यावर अनेक जण समर्पण व बाप्तिस्म्याची पावले उचलण्यास प्रवृत्त होतील. त्यानंतर, जीवनाच्या मार्गात त्यांनी सतत चालत राहावे म्हणून मंडळी त्यांना मदत करू शकते.
२२. पुढील लेखात कोणत्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल?
२२ देवाची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात सर्वात अधिक महत्त्व असले पाहिजे हे पुष्कळ जण लागलीच कबूल करतात. परंतु, यहोवा आपल्या सेवकांना त्याची इच्छा पूर्ण करण्यास प्रगतीशीलपणे कसे शिकवतो? यामुळे त्यांना कोणते फायदे प्राप्त होतात? पुढील लेखात या प्रश्नांवर तसेच स्तोत्र १४३:१० या मुख्य वचनावर चर्चा केली जाईल.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे १९९२ मध्ये प्रकाशित.
b सन १९९५ मध्ये वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
तुमचे काय उत्तर आहे?
◻ फिलिप्पैकर १:९, १० चा अवलंब केल्याने आपण कशाप्रकारे प्राथमिकता ठरवू शकतो?
◻ येशूच्या जीवनात कोणती गोष्ट सर्वप्रथम होती हे त्याने कसे दाखवले?
◻ दावीद परीक्षेत असताना त्याच्या कृतींतून आपण काय शिकू शकतो?
◻ स्तोत्र १४३:१-९ आज आपल्याला कोणत्या प्रकारे मदत करते?
◻ आपल्या जीवनात कोणती गोष्ट सर्वप्रथम असली पाहिजे?
[१० पानांवरील चित्रं]
दावीद यहोवावर पूर्णपणे विसंबून होता हे त्याच्या कृत्यांनी शाबीत केले