वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१५ पृ. २५-२९
  • विषुववृत्तीय गिनीतील वाढीचा मौसम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विषुववृत्तीय गिनीतील वाढीचा मौसम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • आरंभीच्या दिवसांमध्ये बीज पेरणे
  • ‘त्यांच्या आध्यात्मिक गरजेविषयी जागृत’
  • एकत्र येऊन वाढीची बढती करणे
  • पेरलेल्या बीजाला सहनशीलतेने पाणी घालणे
  • लोकांना त्यांचे जीवन सुधारण्यास मदत करणे
  • देवाचे दास होणे
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१५ पृ. २५-२९

विषुववृत्तीय गिनीतील वाढीचा मौसम

विषुववृत्तीय गिनीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान टेकल्याटेकल्या एखाद्या प्रवाशावर तेथील भरमसाठ वाढीची छाप पडते. धावपट्टीच्या आजूबाजूला विशाल वृक्ष आहेत ज्यांच्यासमोर विमानतळावरील इमारती ठेंगण्या वाटतात. विपुल पर्जन्यवृष्टी व ८० च्या मध्यात वर्षभराच्या तापमानमुळे समुद्रकिनाऱ्‍यापासून डोंगरमाथ्यापर्यंत दाट हिरवळ आहे.

विषुववृत्तीय गिनीच्या परिसरात दुसऱ्‍या एका प्रकारची देखील जलदगतीने वाढ होत आहे, ती आहे “ईश्‍वरी वृद्धी.” (कलस्सैकर २:१९) फिलिप्पकडून मदत मिळवणाऱ्‍या इथियोपियन अधिकाऱ्‍याप्रमाणे येथे अनेक जण शास्त्रवचने समजून घेण्यास उत्सुक आहेत. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-३९) येथे एखाद्याने भर रस्त्यावर यहोवाच्या साक्षीदारांजवळ येऊन बायबल अभ्यासाची मागणी करणे असामान्य नाही. विषुववृत्तीय गिनीमध्ये अंदाजे ३२५ साक्षीदार सुमारे एक हजारपेक्षा अधिक बायबल अभ्यास चालवत आहेत.

आरंभीच्या दिवसांमध्ये बीज पेरणे

आफ्रिकेतील सर्वात चिमुकले राष्ट्र, विषुववृत्तीय गिनी, नायजेरिया व कॅमेरूनच्या दक्षिणेस वसले आहे. (नकाशा पाहा.) कोकोच्या मळ्यात काम शोधण्याकरता आलेल्या नायजेरियन साक्षीदारांनी येथे पहिल्यांदा सुवार्ता आणली. येथे अनेक इंग्रजी भाषेच्या मंडळ्या निर्माण झाल्या असल्या, तरी या बांधवांना नायजेरियात पुन्हा जावे लागले तेव्हा त्या मंडळ्या बरखास्त झाल्या. परंतु, लगेचच १९६८ मध्ये जेव्हा त्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तीन वॉचटावर मिशनरी जोडप्यांना तेथे नेमण्यात आले. राजकीय अडचणींमुळे ते जास्त काळ तेथे राहू शकले नाहीत पण त्यांनी दिलेल्या साक्षीने उत्तम परिणाम निष्पन्‍न झाले.

संत्यागो नावाच्या एका मिशनऱ्‍यांना, ब्वेनवेन्चुरा नावाचा एक बलवान मनुष्य भेटला, स्थानीय लोक याला सुपरमॅन म्हणत असत. तो बायबलचा आदर करणारा धार्मिक मनुष्य होता परंतु त्याचा स्वभाव तापट होता. कोणालाही तडाखा लगवण्यास क्षुल्लक अपमान त्याला पुरेसे कारण होते. एखाद्या पानगृहात जर त्याचा पारा चढला तर तेथे असलेले सर्व जण सैरावैरा धावत, त्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी तर लोक आपला जीव मुठीत धरून खिडक्यांमधूनही बाहेर उड्या टाकत. खरे तर, संत्यागोला त्याच्या प्रश्‍नांचा शास्त्रवचनीय पुरावा देता आला नाही, तर तो त्याला बदडून काढणार असे त्याचे ऐकत असताना ब्वेनवेन्चुरा मनात ठरवत होता. तो स्वतःस म्हणाला, ‘या सुपरमॅनला कोणी फसवू शकत नाही.’ त्याने जे काही ऐकले, विशेषकरून, परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा ऐकल्यामुळे तो मोहित होऊन बायबल अभ्यास करण्यास राजी झाला.

अभ्यास जसजसा प्रगती करत गेला तसतसे परादीसमध्ये अनंतकाळ जगण्याची ब्वेनवेन्चुरची मनीषा अधिक तीव्र झाली व अशा प्रकारचे बक्षीस प्राप्त करण्याकरता त्याला देवाच्या दर्जांनुरुप आपले जीवन व्यतीत करावे लागेल हे त्याला समजून आले. खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड” करू नये हे माहीत झाल्यावर तो आपल्या तापट स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागला.—रोमकर १२:१७.

त्याची खरी परीक्षा तेव्हा होती जेव्हा एकदा एका पानगृहात त्याच्या हातून एका गिऱ्‍हाईकाचा ग्लास चुकीने फुटला. तो मनुष्य चिडला आणि त्याने याला मारले. लगेचच, पानगृहातील सर्वांना वाटले, की आता इथे चांगलीच मारामारी होईल म्हणून सर्व जण तेथून निसटू लागले. पण ब्वेनवेन्चुरने नम्रपणे फुटलेल्या ग्लासचे पैसे भरले, त्या मनुष्याला दुसरे एक पेय घेऊन दिले व स्वतःच्या अजागळतेबद्दल त्याच्याजवळ क्षमा मागितली. बायबलच्या अभ्यासामुळे त्याच्यामध्ये इतके परिवर्तन झाल्याचे शेजाऱ्‍यांनी पाहिले तेव्हा, पुष्कळजण त्याच्याबरोबर अभ्यास करण्यास तयार होते. ब्वेनवेन्चुरचा अद्याप बाप्तिस्माही झाला नव्हता तरी तो पाच बायबल अभ्यास संचलित करत होता. त्याने गेल्या पाच वर्षांपासून वडील या नात्याने कार्य केले आहे व लोक त्याला अजूनही सुपरमॅन म्हणत असले तरी ते आता मजेत बोलतात.

‘त्यांच्या आध्यात्मिक गरजेविषयी जागृत’

१९७० च्या दशकादरम्यान, काही स्थानीय साक्षीदार त्यांना होता होईल तितका प्रचार करत व एकत्र येत राहिले. नंतर, अनेक स्पॅनिश मिशनरी जोडपी मदतीसाठी पुढे आली. १२ वर्षांपासून विषुववृत्तीय गिनीमध्ये सेवा करणारे ॲन्ड्रेस बोटॉय असे आठवून सांगतात, की ते तेथे पोहंचले तेव्हा तेथील लोक ‘त्यांच्या आध्यात्मिक गरजांविषयी किती जागृत’ असल्याचे पाहून ते प्रभावित झाले. (मत्तय ५:३) “अशा कृतज्ञ लोकांसोबत बायबलचा अभ्यास करणे खरोखरच मनास आनंदविणारे आहे,” असे ते म्हणतात.

मेरी नामक एक स्पॅनिश बहीण, मारिया नावाच्या एका तरुण स्त्रीबरोबर अभ्यास करीत होती. या स्त्रीने सांगितले होते, की तिचे पालक, फ्रॅन्सीस्को आणि फाऊस्टा या दोघांनाही अभ्यास करण्याची आवड आहे. मेरी १५ अभ्यास संचालित करत असल्यामुळे व मारियाचे पालक जरा दूरवर राहत असल्यामुळे, अनेक आठवड्यांनंतर ती त्यांना भेट देऊ शकली.

मेरी आणि तिचा पती, सेराफीन सरतेशेवटी पालकांना भेटले तेव्हा त्यांच्याकडे तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकालa हे पुस्तक आणि एक बायबल आधीपासूनच होते आणि त्यांना अभ्यास चालू करण्याची घाई लागली होती. यास्तव, त्यांनी लागलीच अभ्यास चालू केला. मारियाचे पालक पुस्तकातील साहित्याशी बरेच परिचित असल्याचे सेराफीनच्या लक्षात आले. दुसऱ्‍या भेटीच्या वेळी दुसऱ्‍या धड्याचा अभ्यास करताना देखील असेच झाले. सेराफीन आठवून सांगतो, “ते जणू काय, बाप्तिस्मा घेतलेल्या दोन साक्षीदारांबरोबरच अभ्यास करण्यासारखे होते.” तिसऱ्‍या भेटीच्या वेळी, पुस्तकातील साहित्य त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे, त्यांना यातील खरोखरच किती समजले आहे हे पाहण्यासाठी सेराफीनने प्रश्‍नोत्तर सत्र घेण्याचे सुचवले. फ्रॅन्सीस्को आणि फाऊस्टाने स्वतःहून या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास केला होता हे त्याला नंतर कळाले!

या नवीन ज्ञानाचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला होता? त्यांनी शिकलेल्या गोष्टींच्या सुसंगतेत, भुताटकीच्या सभांना उपस्थित राहण्याचे थांबवले होते व कॅथलिक चर्चसोबतचा सर्व नातेसंबंध तोडून टाकला होता. शिवाय, फ्रॅन्सीस्कोने धुम्रपान करण्याचे सोडून दिले होते तसेच पूर्णपणे रक्‍त न काढलेले मांस वर्ज्य केले. ते शिकत असलेल्या सर्व गोष्टी पाळत असल्याचे उघडपणे दिसत असल्यामुळे, आपल्या ज्ञानाविषयी इतरांना सांगण्यास सुरवात करण्याचे उत्तेजन त्यांना देण्यात आले. ते लागलीच आपल्या शेजाऱ्‍यांना प्रचार करू लागले. केवळ तीन महिन्यात ते बाप्तिस्म्यासाठी पात्र ठरले. फ्रॅन्सीस्को आता एक सेवा-सेवक आहे आणि त्यांच्या उत्तम उदाहरणामुळे व प्रचारकार्यातील आवेशामुळे त्यांच्या तीन मुली आता साक्षीदार आहेत, दोन मुलगे सभांना उपस्थित राहतात व इतर सहा नातेवाईक अभ्यास करीत आहेत.

बाप्तिस्मा झाल्यानंतर काही काळातच फ्रॅन्सीस्को, पॉब्लो नावाच्या एका भक्‍तिमान कॅथलिकाला भेटला जो त्याच्या चर्चमध्ये सेक्रिस्टन अर्थात, चर्चची देखरेख करणारा होता. जेव्हा जेव्हा पाळक चर्चमध्ये उपस्थित नसत, तेव्हा तेव्हा पॉब्लो प्रवचन देई. एखादा चर्च सदस्य आजारी असल्यास, तो त्याला भेट देई; चर्चला कोणी उपस्थित नसल्यास पॉब्लो त्याला जाऊन उत्तेजन देई; आणि जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या परिने तो होता होईल तितके त्या दुःखी कुटुंबाचे सांत्वन करी. पॉब्लो, चर्चच्या सर्व सदस्यांच्या आवडीचा होता हे समजण्याजोगे आहे.

पॉब्लोला बायबलबद्दल गाढ आदर असल्यामुळे फ्रॅन्सीस्कोने त्याला अभ्यासाविषयी विचारले तेव्हा तो लागलीच तयार झाला. बायबलचा संदेश किती रास्त होता हे समजण्यास त्याला उशीर लागला नाही व काही अभ्यासांनंतर त्याने शिकलेली शास्त्रवचने एका आजारी चर्च सदस्याला “मेंढपाळकत्वाची भेंट” देताना उपयोगात आणण्याचे ठरवले. त्यानंतर काही काळातच, पॉब्लोने त्याच्या रविवारच्या एका प्रवचनात यहोवा, हे देवाचे नाव वापरण्याचे महत्त्व व आपण मूर्तींचा उपयोग का करू नये याचे स्पष्टीकरण दिले.

त्याने जसे सत्य सहजरीत्या स्वीकारले तसे त्याच्या चर्चचे इतर सदस्य देखील अशाच प्रकारचा प्रतिसाद देतील असे त्याला वाटले. पण तीन वा चार बायबल आधारित प्रवचनांनंतर, पॉब्लोने पाहिले, की तो जी माहिती सादर करीत होता ती लोकांना आवडत नव्हती. यास्तव, त्याने चर्च सोडून यहोवाच्या साक्षीदारांसोबत नियमितरीत्या सहवास राखण्याचे ठरवले. काही महिन्यांतच, तो बाप्तिस्म्यासाठी पात्र ठरला आणि आता सुवार्तेचा एक आवेशी प्रचारक आहे. तो पूर्ण-वेळेसाठी प्रचार करू शकत नसला तरी, सध्या दहा बायबल अभ्यास संचालित करत आहे.

एकत्र येऊन वाढीची बढती करणे

विषुववृत्तीय गिनीमधील साक्षीदार, एकत्र येण्याचे सोडून न देण्याविषयी असलेला बायबलचा आदेश गांभीर्याने घेतात. (इब्री लोकांस १०:२५) १९९४ पासून सरकारने कार्याला पुन्हा एकदा अधिकृत मान्यता दिल्यापासून बांधव राज्य सभागृह प्राप्त करण्यास उत्सुक आहेत. वास्तविक पाहता, बहुतेक मंडळ्यांनी आपआपले सभागृह बांधले आहे किंवा बांधण्याच्या तयारीत आहेत.

मोंगोमो येथे रविवारच्या सभेची उपस्थिती बहुतेक वेळा राज्य प्रचारकांच्या संख्येपेक्षा अडीचपट असल्यामुळे तेथील मंडळी सभेसाठी एक मोठे सभागृह बांधण्याचा खूप प्रयत्न करीत आहे. मोंगोमा येथील इतर धर्म, आपले चर्च बांधून काढण्यासाठी बहुतेकवेळा भाड्याचे कामगार आणतात, म्हणून स्थानिक साक्षीदारांच्या कार्याकडे लक्ष गेल्याशिवाय राहिले नाही. एके दिवशी इग्लेसिया न्युवा अपोस्टोलिकाचा (नव प्रेषितीय चर्च) पाळक, वडील या कष्टाळू कामगारांना केवढे पैसे देतात हे विचारण्याकरता थांबला. त्या पाळकाने म्हटले, की आपल्याच चर्चचे सभासद असलेल्या काही गवंड्यांचा तो उपयोग करीत होता तरीदेखील काम अतिशय मंद गतीने चालले होते. राज्य सभागृह बांधणाऱ्‍या कामगारांना भाड्याने घेऊ शकतो का असा तो विचार करत होता. सर्व साक्षीदार बिनपैशाचे काम करीत होते हे त्याला जेव्हा सांगण्यात आले तेव्हा तो निरुत्तर होऊन तेथून निघून गेला.

राज्य सभागृहापासून दूर राहत असलेल्यांना सभांना उपस्थित राहण्यासाठी पुष्कळ प्रमाणात त्याग करावे लागू शकतील. १९९४ मध्ये बाप्तिस्मा घेतलेल्या च्वॉन नामक एका तरुण मनुष्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्याला गॅबॉन येथे सत्य ऐकावयास मिळाले व तेथे त्याने अनंतकाल जगू शकाल पुस्तकाचा सुरवातीचा अर्धा अभ्यास केला. मग तो विषुववृत्तीय गिनी येथे मोंगोमापासून सुमारे १०० किलोमीटर दूर असलेल्या त्याच्या मूळ गावी राहावयास आला. यामुळे आपला अभ्यास चालू ठेवण्याचे आव्हान त्याच्यासमोर उभे ठाकले. परंतु, तो यापासून परावृत्त झाला नाही. प्रत्येक महिन्याला तो सायकलवर आठ तास प्रवास करून मोंगोमाला जाई जेथे संत्यागो नामक एक स्थानिक वडील त्याचा अभ्यास घेत. तो मोंगोमा येथे काही दिवसांसाठी राहत असे आणि यादरम्यान तीन ते चार वेळा अभ्यास करीत असे. अशाप्रकारे तो त्याचा अभ्यास पूर्ण करू शकला व बाप्तिस्मा घेण्याच्या योग्यतेचा झाला.

इतर ख्रिश्‍चनांसोबत इतका कमी सहवास ठेवूनही च्वॉन त्याची आध्यात्मिकता दृढ कशी ठेवतो? प्रामुख्याने, सुवार्तेचा एक आवेशी प्रचारक होऊन. त्याने त्याच्या गावातील सर्वांना प्रचार केला आहे व त्याचा बाप्तिस्मा होण्याआधीच तो १३ बायबल अभ्यास चालवत होता. यापैकी सहा बायबल विद्यार्थी त्याचा बाप्तिस्मा पाहण्यासाठी त्याच्या बरोबर खास संमेलन दिवशी मोंगोमा येथे गेले. तो आता त्याच्या क्षेत्रातील आस्थेवाईक लोकांबरोबर टेहळणी बुरूज अभ्यास घेतो, तेथे बहुतेकवेळा सुमारे २० लोक उपस्थित असतात.

पेरलेल्या बीजाला सहनशीलतेने पाणी घालणे

सर्वच आध्यात्मिक वाढ जलद नसते. काही वेळा पेरलेल्या बीजाने सरतेशेवटी फळ उत्पन्‍न केल्याचे पाहण्यासाठी पुष्कळ सहनशीलता लागते. पाकाच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली. पाकाने, १९८४ मध्ये एडीटा नावाच्या एका पायनियर बहिणीने तिला बाजारात साक्ष दिली तेव्हा पहिल्यांदा सुवार्ता ऐकली. पुढील आठवडी जेव्हा एडीटाने पाकाला तिच्या घरी जाऊन भेट दिली तेव्हा ती बायबल अभ्यास करण्यास राजी झाली. पाका जास्त प्रगती करत नव्हती तरी देखील, एडीटा तिच्याकडे सतत जात राहिली कारण तिने पाकामध्ये काही चांगले गुण पाहिले होते. एडीटा म्हणते, “ती मेंढरासमान वाटत होती आणि यहोवाने तिचे अंतःकरण उघडावे अशी मी त्याच्याजवळ प्रार्थना करत होते.”

पाकाचा अभ्यास साडेचार वर्षांपर्यंत अधूनमधून होत होता, पण खूपच कमी प्रगती. म्हणून अनंतकाल जगू शकाल पुस्तकाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर एडीटाने, सत्य गांभीर्याने घेण्याच्या महत्त्वाविषयी पाकाशी उघड चर्चा केली. एडीटा पाकाच्या हृदयापर्यंत पोहंचण्याचा प्रयत्न करीत असताना रडली देखील.

पाका आठवून सांगते, “तो मनःपूर्वक सल्ला खरोखरच माझ्या हृदयास भिडला. तेव्हापासून मी माझ्या जीवनात बदल करू लागले. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत मी माझे नाव दाखल केले आणि त्याच वर्षी मी बाप्तिस्मा न घेतलेली एक प्रचारक बनले. सरतेशेवटी ज्या दिवशी माझा बाप्तिस्मा झाला तो दिवस माझ्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस होता!” पाकाचा सध्याचा आवेश तिच्या पूर्वीच्या उदासीनतेच्या अगदी उलट आहे. ती सध्या १३ बायबल अभ्यास संचालित करते आणि अर्थातच जे जलद प्रगती करत नाहीत अशांसोबत ती सहनशील आहे.

लोकांना त्यांचे जीवन सुधारण्यास मदत करणे

बायबल दर्जांनुरुप जीवन व्यतीत केल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांनी विषुववृत्तीय गिनीमध्ये प्रामाणिक व सभ्य म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या वर्तनामुळे स्पष्टपणे प्रभावित झालेल्या एका मनुष्याने बाटा मंडळीच्या एका वडिलांकडे येऊन विचारले: “तुमच्याकडे युक्‍तीवाद पुस्तकb आहे का? मला जगिक राहून आता कंटाळा आला आहे. मला यहोवाचा साक्षीदार व्हायला आवडेल!”

ॲन्टोनियो नामक मलाबो मंडळीचे सेवा-सेवक, एक जगिक मनुष्य साक्षीदार बनल्याचे नमुनेदार उदाहरण आहे. बायबलचा अभ्यास करण्याआधी ते दुर्वर्तनी जीवन जगत होते. घड्याळ दुरुस्तीचे काम करून कमवलेला बहुतेक पैसा ते पिण्यावर उधळून देत, शिवाय ते अनैतिक जीवन जगणारे देखील होते. कशाने त्यांना त्यांच्या जीवन शैलीत बदल करण्यास मदत केली? १ करिंथकर ६:९, १० मध्ये, ‘फसू नका, जारकर्मी, मद्यपी यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही’ असे जे जोरदारपणे लिहिले आहे ते वाचल्यावर त्यांच्यावर खोल प्रभाव पडला. देवाची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जीवन शैलीत बदल केलेच पाहिजेत हे त्यांनी जाणले. या कारणास्तव, त्यांनी आपल्या मित्रमंडळीवर लक्ष ठेवले. (नीतिसूत्रे १३:२०) पूर्वीचे मित्र त्यांना दारू पिण्यास बोलवत तेव्हा त्यांच्यासोबत जाण्यास ते नकार देत व त्याऐवजी त्यांना साक्ष देत. काही दिवसांतच त्यांनी यांना त्रास देण्याचे थांबवले.

ह्‍या प्रयत्नांमुळे काही सार्थक झाले का? ॲन्टोनियो म्हणतात: “मी माझ्या जीवन शैलीत बदल केल्यामुळे आता अतिशय सुखात आहे. आता मी साठीच्या घरात असलो तरी माझी तब्येत म्हणावी तशी चांगली आहे, पण माझ्या पूर्वीच्या दोस्तांपैकी काही मरण पावले तर काहींची तब्येत ढासळून गेली आहे. आता माझे खरे मित्र आहेत, ते त्या पूर्वीच्या दोस्तांप्रमाणे नाहीत की ज्यांना केवळ त्यांच्या पुढच्या वेळेच्या पिण्याचे पैसे भरण्यास तयार असणारा सोबती हवा असतो. सर्वांहून अधिक म्हणजे, माझा देवासोबत चांगला नातेसंबंध आहे. मी आता एक नियमित पायनियर या नात्याने कार्य करीत आहे आणि माझा असा एका मनुष्यासोबत अभ्यास चालला आहे ज्याला पिण्याची समस्या आहे, म्हणून त्याला मदत करण्यासाठी मी माझ्या अनुभवाचा उपयोग करू शकतो.”

देवाचे दास होणे

सुमारे २०० वर्षांपूर्वी, विषुववृत्तीय गिनीच्या किनाऱ्‍यावरून काही लोकांना एकत्र करून गुलाम म्हणून अमेरिकेला जहाजाने नेण्यात आले. आज, पुष्कळ जण स्वेच्छेने दास बनत आहेत—देवाचे दास. या दास्यत्वाने त्यांना खरे स्वातंत्र्य दिले आहे, बॅबिलोनी सिद्धान्त व भुताटकीच्या रुढींपासून त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. समाधानकारक व उत्पादनशील जीवन कसे व्यतीत करावे हेही त्यांना या दास्यत्वाने शिकवले आहे. येशूने जे अभिवचन दिले होते त्याचा ते अनुभव घेत आहेत: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.”—योहान ८:३२.

१९९५ च्या स्मारक विधीला १,९३७ लोक—त्या देशातील प्रचारकांच्या संख्येपेक्षा जवळजवळ सहा पट अधिक लोक—उपस्थित असल्यामुळे पुढे आध्यात्मिक वाढ होण्याची आशा आहे. विषुववृत्तीय गिनीतील साक्षीदार, आवेशाने जसजसे सत्याचे बीज पेरून पाणी घालत राहतात तसतसे ‘देव त्यांना वाढवीत राहील’ याची त्यांना खातरी आहे. (१ करिंथकर ३:६) विषुववृत्तीय गिनीमध्ये आध्यात्मिक वाढीकरता अगदी उचित मौसम आहे, यात काही शंका नाही!

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेले.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेले.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा