शलमोन राजाच्या धनसंपत्तीची अतिशयोक्ती केली आहे का?
“प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे.”—१ राजे १०:१४.
या बायबल वचनानुसार, राजा शलमोनाने एका वर्षात २५ टन सोने प्राप्त केले! त्याची किंमत आज २४,००,००,००० डॉलर इतकी होईल. ही संख्या, १८०० या वर्षात संपूर्ण जगभरात जितके सोने खाणीतून खणण्यात आले त्याच्या जवळजवळ दुप्पट होती. हे शक्य आहे का? पुरातत्त्वीय प्रमाण काय दाखवतो? शलमोनाच्या धनसंपत्तीबद्दलचा बायबलचा अहवाल निश्चितच विश्वास करण्याजोगा आहे असे ते सुचवते. बायबलच्या पुरातत्त्वविद्येची उजळणी (इंग्रजी), म्हणते:
◻ इजिप्तचा तिसरा थुटमोस राजा (सा. यु. पू. दुसरे सहस्त्र वर्ष) याने करनाक येथे अमोन-रा दैवताच्या मंदिराला अदमासे १३.५ टन सोन्याच्या वस्तूंचा नजराणा दिला—व हा त्या नजराण्याचा केवळ एक भाग होता.
◻ ईजिप्शियन कोरीव लेखांवर पहिला ओसॉरकॉन राजा (सा. यु. पू. पहिल्या सहस्त्र वर्षाच्या सुरवातीस) याने दैवतांना अदमासे ३८३ टन सोने व चांदी भेट म्हणून अर्पित केल्याचा अहवाल आहे.
तसेच, मानवाची महान युगे (इंग्रजी), श्रृंखलेतील अभिजात ग्रीस (इंग्रजी), हा खंड पुढीलप्रमाणे अहवाल देतो:
◻ थ्रेस येथील पॉनगेयमच्या खाणींतून, दुसरा फिलिप्प राजा (सा. यु. पू. ३५९-३३६) याच्यासाठी प्रती वर्षी ३७ टनपेक्षा अधिक सोने काढले जाई.
◻ फिलिप्पचा मुलगा ॲलेक्झॅन्डर द ग्रेटने (सा. यु. पू. ३३६-३२३) पर्शियन साम्राज्याची राजधानी सुसा हिजवर कब्जा मिळवला तेव्हा सुमारे १,२०० टन सोन्याचे धन सापडले.
तेव्हा, राजा शलमोनाच्या धनसंपत्तीबद्दल बायबलचे वर्णन ओढूनताणून केलेले नाही. हेही लक्षात असू द्यावे, की शलमोन त्याकाळी “धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता.”—१ राजे १०:२३.
शलमोनाने त्याच्या धनसंपत्तीचा उपयोग कसा केला? त्याचे सिंहासन “उत्तम सोन्याने” मढवलेले होते, त्याची पानपात्रे “सोन्याची” होती व त्याच्याकडे “सोन्याचे पत्रे ठोकून” केलेल्या २०० मोठ्या ढाली व ३०० लहान ढाली होत्या. (१ राजे १०:१६-२१) विशेषकरून, शलमोनाकडील सोने जेरुसलेममधील यहोवाच्या मंदिराकरता वापरण्यात आले. मंदिरातील समया, व पवित्र पात्रे जसे की काटे, कटोरे, प्याले व पेले सोन्या-चांदीची बनवली होती. परम पवित्र स्थानातील ४.५ मीटर उंचीचे करुब, धूपवेदी आणि मंदिराची संपूर्ण आतील बाजूही त्याने सोन्याने मढवली होती.—१ राजे ६:२०-२२; ७:४८-५०; १ इतिहास २८:१७.
सोन्याने मढवलेल्या मंदिराविषयी काय? सोन्याचा अशाप्रकारे वापर प्राचीन जगात मुळीच असामान्य नव्हता ही मनोरंजक गोष्ट आहे. बायबलच्या पुरातत्त्वविद्येची उजळणी अशी नोंद करते, की इजिप्तचा तिसरा अमिनोफिसने “थीब्स येथे, थोर अमुन दैवताच्या नावाने एक मंदिर करून त्यास सन्मानित केले, ‘हे मंदिर संपूर्णपणे सोन्याने मढवलेले होते, रुप्याने सजवलेली जमीन होती [आणि] त्याचे सर्व द्वार इलेक्ट्रमचे होते.’” इलेक्ट्रम हा सोने व चांदीचा मिश्र धातू आहे. शिवाय, ॲसेरियाच्या एस्सर-हडनने (सा. यु. पू. सातवे शतक) अशूरच्या मंदिराच्या भिंतींवर व द्वारावर सोन्याचे पत्रे ठोकले होते. हरान येथील सीनच्या मंदिराविषयी बॅबिलोनच्या नॅबोनिडसने (सा. यु. पू. सहावे शतक) लिहिले: “मी सोन्याचांदीने त्याच्या भिंती सजवल्या व सूर्याप्रमाणे त्यांना चकाकी आणली.”
अशाप्रकारे, राजा शलमोनाच्या धनसंपत्तीविषयीचा बायबल अहवाल अतिशयोक्ती करत नसल्याचे ऐतिहासिक अहवाल सूचित करतात.