वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१५ पृ. ४-७
  • मृत्यूनंतर जीवन—कसे, कोठे, केव्हा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मृत्यूनंतर जीवन—कसे, कोठे, केव्हा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अमरत्व हे उत्तर आहे का?
  • मृतांची अवस्था
  • संपूर्ण मनुष्याचा मृत्यू होतो
  • पुनरुत्थान—आनंदाचा समय
  • हे केव्हा होईल?
  • पुनरुत्थानाच्या आशेचा परिणाम
  • आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • मृत्यूनंतर जीवन—बायबल काय म्हणते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • पुनरुत्थानावरील तुमचा विश्‍वास किती भक्कम आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • ‘ते पुनरुत्थानात परत येतील हे आम्ही जाणतो’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१५ पृ. ४-७

मृत्यूनंतर जीवन—कसे, कोठे, केव्हा?

मानवी मृत्यूमुळे जीवनाचा कायमचाच नाश होतो असे नाही, अशी हमी मनुष्याचा निर्माणकर्ता आणि जीवनदाता व्यक्‍तिगतपणे देतो. याशिवाय, केवळ काही कालमर्यादेपर्यंतच नव्हे तर पुन्हा मरणाचा अनुभव न येण्याच्या आशेने जगणे शक्य आहे याची देखील देव खात्री पुरवतो! प्रेषित पौलाने स्पष्टपणे आणि तरीही आत्मविश्‍वासाने लिहिले: “त्याने [देवाने] त्याला [येशू ख्रिस्ताला] मेलेल्यांतून उठवून ह्‍याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये १७:३१.

तरी देखील, मूलभूत तीन प्रश्‍न अद्यापही अनुत्तरित आहेत: मृत व्यक्‍ती परत जिवंत कशी होऊ शकते? हे केव्हा होईल? नवीन जीवन कोठे दिले जाते? या प्रश्‍नांची जगभरामध्ये विविध उत्तरे देण्यात आली आहेत, परंतु मनुष्यांस त्यांच्या मृत्यूच्या वेळी नेमके काय होते हे समजून घेणे, हीच या बाबतीत सत्याची शहानिशा करण्याची गुरुकिल्ली आहे.

अमरत्व हे उत्तर आहे का?

मानवांचा एक भाग अमर आहे आणि त्यांचे केवळ शरीर मरते, असा विश्‍वास सर्वत्र बाळगला जातो. अशा प्रकारचा दावा तुम्ही निश्‍चितच ऐकला असेल. अमर असल्याचा दावा केला जाणारा हा भाग विविध प्रकारे “जीव” किंवा “आत्मा” या अर्थाने वापरला जातो. तो मृत्यूनंतरही जिवंत राहतो आणि इतरत्र कोठेही अस्तित्वात असतो, असे म्हटले जाते. खरे पाहता, अशा विश्‍वासाचा उगम बायबलमधून झालेला नाही. हे खरे आहे, की प्राचीन बायबलच्या पात्रांनी मृत्यूनंतरच्या जीवनाकडे दृष्टी लावली, परंतु आपल्यातील एखादा अमर भाग मृत्यूनंतर जिवंत राहतो या कल्पनेसह त्यांनी असे केले नाही. त्यांनी खात्रीने, पुनरुत्थानाच्या चमत्काराद्वारे भवितव्यात पृथ्वीवर पुन्हा जिवंत होण्याकडे आपली दृष्टी लावली होती.

भवितव्यातील मृतांच्या पुनरुत्थानावर ज्यांचा विश्‍वास होता त्यांपैकीचे एक उल्लेखनीय उदाहरण कुलपिता अब्राहाम याचे आहे. आपला मुलगा इसहाक यास अर्पण करण्याविषयी अब्राहामाच्या स्वेच्छेचे वर्णन करताना इब्री लोकांस ११:१७-१९ आपल्याला सांगते: “अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्‍वासाने इसहाकाचे अर्पण केले . . . तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला” कारण इसहाकाचे अर्पण व्हावे अशी देवाची इच्छा नव्हती. पुढील काळात (आत्मिक जगातील त्वरित जीवन चालू राहण्याऐवजी) पुन्हा जिवंत होण्याविषयी इस्राएलांमधील विश्‍वासाबद्दलचा पुरावा देताना संदेष्टा होशेय याने लिहिले: “अधोलोकाच्या [मानवजातीची सामान्य कबर] तावडीतून मी त्यांना उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्‍त करीन काय?”—होशेय १३:१४.

तर मग, यहुदी विचारसरणीमध्ये आणि विश्‍वासामध्ये अंगभूत असलेल्या मानवी अमरत्वाची कल्पना केव्हा आली? एन्सायक्लोपीडिया जुडायका मान्य करते, की “ग्रीक प्रभावामुळे यहुदी धर्मामध्ये जिवाचे अमरत्व ही संकल्पना रूढ झाल्याची शक्यता आहे.” तथापि, धार्मिक यहुद्यांनी खिस्ताच्या समयापर्यंत पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवला आणि भवितव्यातील पुनरुत्थानाकडे आपली दृष्टी लावली. हे आपण येशू आणि मार्था यांच्यातील संभाषणाद्वारे स्पष्टपणे पाहू शकतो; हे संभाषण मार्थाचा भाऊ लाजर याच्या मृत्यूच्या वेळेचे आहे: “मार्था येशूला म्हणाली, प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता; . . . येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”—योहान ११:२१-२४.

मृतांची अवस्था

या बाबतीत पुन्हा एकदा तर्क करण्याची काही एक आवश्‍यकता नाही. बायबलचे हे साधे सत्य आहे, की मृत पूर्णपणे कोणत्याही भावनेविना किंवा ज्ञानाविना ‘झोपलेले’, अचेतन अवस्थेत आहेत. अशा प्रकारचे सत्य क्लिष्ट अथवा समजण्यास अवघड पद्धतीने बायबलमध्ये सादर करण्यात आलेले नाही. सहज समजतील अशा खालील शास्त्रवचनांचा विचार करा: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; . . . जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.”—स्तोत्र १४६:३, ४.

येशू ख्रिस्ताने मरणाची तुलना झोपेशी का केली असावी, हे समजण्याजोगे आहे. प्रेषित पौल, येशू ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांतील संभाषण नमूद करतो: “तो त्यांना म्हणाला, आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवावयास जातो. ह्‍यावरून शिष्य त्याला म्हणाले, प्रभुजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल. येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणाऱ्‍या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजर मेला आहे.”—योहान ११:११-१४.

संपूर्ण मनुष्याचा मृत्यू होतो

मानवी मृत्यूच्या प्रक्रियेमध्ये संबंधित मनुष्याचे केवळ शरीरच मरत नाही, तर त्यामध्ये संपूर्ण मनुष्याचा समावेश होतो. मानवाच्या शरीराच्या मृत्यूनंतर जिवंत राहू शकेल असा मानवामध्ये अमर जीव नाही असा निष्कर्ष आपण बायबलच्या स्पष्ट विधानांवरून काढला पाहिजे. जीव मरू शकतो, हे शास्त्रवचने स्पष्टपणे दाखवून देतात. “पाहा! सर्व जीव—माझे आहेत. जसा पित्याचा जीव तसा पुत्राचा जीवही—माझा आहे. जो जीव पाप करीत आहे—तो मरेल.” (यहेज्केल १८:४, NW) “अमर” किंवा “अमरत्व” या गोष्टी मानवांमध्ये अंगभूत असल्याचे कोठेही सांगण्यात आलेले नाही.

बायबलमध्ये “जीव” असे भाषांतरित केलेल्या इब्री आणि ग्रीक शब्दांची मनोरंजक पार्श्‍वभूमी अभिनव कॅथलिक विश्‍वकोश (इंग्रजी), पुरवतो: “जु.क. [जुना करार] मध्ये जीव निफेश आहे, न.क. [नवा करार] मध्ये [सायके]. . . . निफेश हा शब्द ज्या मूळ शब्दापासून आला त्याचा शक्यतो अर्थ श्‍वास घेणे असा होतो आणि अशा प्रकारे . . . श्‍वास जिवंत आणि मृत यांतील भेद स्पष्ट करत असल्यामुळे निफेश याचा अर्थ जीवन किंवा स्वतः अथवा सामान्य व्यक्‍तिगत जीवन असा होऊ लागला. . . . जु.क. यात शरीर आणि जीव यांमध्ये कोणतेही द्विभाजन [दोन भागात विभाजन] नाही. इस्राएली मनुष्याने बाबींना मूर्तपणे संपूर्ण रूपात पाहिले, त्याने मनुष्यांना संयुक्‍त असे न पाहता त्यास व्यक्‍ती म्हणून पाहिले. निफेश ही संज्ञा आपण जरी जीव या शब्दाने अनुवादित केली असली तरी शरीरापासून किंवा विशिष्ट मनुष्यापासून विलग असा कधीही या संज्ञेचा अर्थ होत नाही. . . . न.क. मधील [सायके] ही संज्ञा निफेश या संज्ञेशी जुळणारी आहे. याचा अर्थ जीवनाचा उगम, जीवन किंवा जिवंत प्राणी होऊ शकतो.”

अशाप्रकारे, मृत्यूच्या वेळी, पूर्वी जिवंत असलेला मनुष्य किंवा जिवंत जीव अस्तित्वात राहत नाही, हे तुम्ही पाहू शकता. शरीर दफन व कालांतराने हळूहळू कुजण्याद्वारे अथवा दहन करण्याद्वारे तत्काळ परत “मातीला” किंवा पृथ्वीच्या घटकांना जाऊन मिळते. यहोवाने आदामाला म्हटले: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) तर मग, मरणानंतर जीवन कसे शक्य आहे? कारण मरण पावलेल्या व्यक्‍तीविषयी देवाकडे त्याची स्वतःची स्मरणशक्‍ती आहे. मानवांस निर्माण करण्याची यहोवाकडे आश्‍चर्यकारक शक्‍ती आणि क्षमता आहे म्हणून तो विशिष्ट व्यक्‍तीच्या जीवनशैलीचा अहवाल आपल्या स्मरणशक्‍तीमध्ये जतन करू शकतो याचे आश्‍चर्य वाटता कामा नये. होय, एखाद्यास पुन्हा जिवंत बनविण्याच्या सर्व संभावना देवावर अवलंबून आहेत.

हाच अर्थ “आत्मा” या शब्दाचा आहे ज्याविषयी असे सांगितले जाते, की तो खऱ्‍या देवाकडून मिळतो आणि त्याकडे तो परत जातो. याच्या परिणामाविषयी सांगताना उपदेशक पुस्तकाचा प्रेरित लेखक वर्णन करतो: “तेव्हा माती पूर्ववत्‌ मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल.”—उपदेशक १२:७.

केवळ देवच एखाद्यास जिवंत करू शकतो. देवाने एदेन बागेत जेव्हा मनुष्य निर्माण केला आणि त्याच्या नाकपुड्यांत “जीवनाचा श्‍वास” फुंकला, यहोवाने त्या जीवन-शक्‍तीच्या साह्‍याने त्याच्या शरीरातील सर्व पेशी कार्यान्वयित केल्या. (उत्पत्ति २:७) ही जीवन-शक्‍ती गर्भधारणा आणि जन्माच्या साहाय्याने पालकांकडून मुलांना मिळणे शक्य असल्यामुळे यथायोग्यपणे मानवी जीवनाचे श्रेय देवास प्राप्त होऊ शकते; अर्थात, ते जीवन त्यांना पालकांद्वारे प्राप्त झालेले असले तरी देखील.

पुनरुत्थान—आनंदाचा समय

पुनरुत्थान आणि पुनर्जन्म यांमध्ये कोणताही संभ्रम होता कामा नये, पवित्र शास्त्र पुनर्जन्मास कोणतेही समर्थन देत नाही. मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा एका किंवा त्यापेक्षा अधिक अस्तित्वांमध्ये पुन्हा जन्म होतो, असा पुनर्जन्माचा विश्‍वास आहे. असे म्हटले जाते, की एखाद्याच्या मागील जीवनाशी तुलना करता त्यानंतरच्या त्याच्या अस्तित्वाचा स्तर उच्च किंवा नीच असतो आणि त्याने आधीच्या जीवनात ज्या प्रकारची कामे केल्याचे गृहीत धरले जाते त्यावर हा स्तर अवलंबून असतो. या विश्‍वासानुसार एखाद्याचा मानवामध्ये अथवा प्राण्यामध्ये कदाचित ‘पुन्हा जन्म’ होईल. पण बायबल जे शिकवते त्याच्या अगदी विरोधात हे आहे.

“पुनरुत्थान” हा शब्द ग्रीक शब्द अनॅस्टॅसीस या शब्दापासून अनुवादित करण्यात आला आहे ज्याचा शब्दशः अर्थ “परत उभे राहणे” असा होतो. (इब्री भाषांतरकारांनी अनास्टासिस या शब्दाचे भाषांतर इब्री शब्द टेकीयाथ हाममेथीम म्हणजे “मृतांचे पुनरुज्जीवन” असे केले.) एखाद्याची जीवनशैली पुन्हा कार्यरत होण्याचा पुनरुत्थानामध्ये समावेश होतो, ही जीवनशैली देवाने स्वतःच्या स्मरणामध्ये ठेवली आहे. एखाद्याच्या बाबतीत असणाऱ्‍या देवाच्या इच्छेनुसार, मनुष्यास मानवी शरीरात किंवा आत्मिक शरीरात जिवंत केले जाते; तरी देखील त्याची व्यक्‍तिगत ओळख कायम राहते, तो मेला तेव्हाचे त्याचे व्यक्‍तिमत्त्व आणि त्याची स्मृती कायम राहते.

होय, बायबल दोन प्रकारच्या पुनरुत्थानांविषयी सांगते. एक स्वर्गीय पुनरुत्थान आहे जे आत्मिक शरीरात होते आणि असे पुनरुत्थान होणाऱ्‍यांची संख्या तुलनात्मकरीत्या अल्प आहे. येशू ख्रिस्ताचे अशाच प्रकारचे पुनरुत्थान झाले. (१ पेत्र ३:१८) त्याने हे दाखवून दिले, की त्याच्या पदचिन्हावर चालणाऱ्‍या अनुयायांमधून काही निवडक लोकांना याचा अनुभव मिळेल आणि याची सुरवात विश्‍वासू प्रेषितांपासून होणार होती, अशांना त्याने अभिवचन दिले: “मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो; आणि मी . . . पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन; ह्‍यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीहि असावे.” (योहान १४:२, ३) बायबल यास ‘पहिले पुनरुत्थान’ असे संबोधते जे वेळ आणि श्रेणी यांमध्ये पहिले आहे. शास्त्रवचने अशा स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित लोकांचे वर्णन देवाचे याजक आणि ख्रिस्त येशूसोबत राजे या नात्याने राज्य करणारे म्हणून करतात. (प्रकटीकरण २०:६) ‘पहिले पुनरुत्थान’ होणाऱ्‍यांची संख्या मर्यादित आहे तसेच शास्त्रवचने स्वतः हे प्रकट करतात, की विश्‍वासू पुरुष आणि स्त्रियांपैकी केवळ १,४४,००० जणांचा यामध्ये समावेश करण्यात येईल. इतरांना आपल्या विश्‍वासाची साक्ष देण्यात क्रियाशील असण्याद्वारे त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत यहोवा देव आणि ख्रिस्त येशू यांबद्दल आपल्या सचोटीचे प्रमाणे दिलेले असेल.—प्रकटीकरण १४:१, ३ ४.

निःसंदेह, स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित लोकांसाठी मृतांचे पुनरुत्थान होण्याचा समय मोठा आनंदाचा आहे. परंतु या आनंदाचा कळस येथेच होत नाही कारण पृथ्वीवरील पुनरुत्थानाचे देखील अभिवचन देण्यात आले आहे. या सद्य दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंतामधून बचावणाऱ्‍या अमर्याद लोकांना हे पुनरुत्थित जण येऊन मिळतील. स्वर्गीय पुनरुत्थानासाठी कमी संख्येने पात्र असणाऱ्‍यांचे दृश्‍य पाहिल्यानंतर प्रेषित योहानाला ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांच्या मोठ्या लोकसमुदायाचा’ दृष्टान्त देण्यात आला. या पृथ्वीवर कोट्यवधी, संभवतः अब्जावधी लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल तेव्हा तो किती आनंदाचा समय असेल!—प्रकटीकरण ७:९, १६, १७.

हे केव्हा होईल?

संघर्ष, रक्‍तपात, प्रदूषण आणि हिंसाचार—या आजच्या परिस्थितीत मृतांना पुन्हा जीवन प्राप्त झाले तर त्यामुळे मिळणारा आनंद आणि प्रमोद क्षणभंगूर ठरेल. नाही, ‘नव्या पृथ्वीची’ स्थापना होईपर्यंत पुनरुत्थानाला थांबावे लागेल. या पृथ्वीचा नाश करण्याचा आणि तिचे अपूर्व सौंदर्य खराब करण्याचा तसेच तिच्यावरील लोकांना अत्यंत पीडा देण्याचा चंग बांधलेल्या लोकांना आणि संस्थांना पूर्णपणे काढून टाकल्याची जरा कल्पना करा.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण ११:१८.

हे उघड आहे, की मानवजातीच्या सामान्य पुनरुत्थानाची वेळ अद्याप पुढे आहे. तरी पण आनंदाची बातमी ही आहे, की या गोष्टीस जास्त वेळ लागणार नाही. हे खरे, की त्यास या सद्य वाईट व्यवस्थीकरणाचा नाश होण्याची वाट पाहावी लागेल. तथापि, ‘मोठ्या संकटास’ अचानक तोंड फुटण्याची वेळ अगदी जवळ असल्याचे अनेक पुरावे सिद्ध करतात, हे संकट “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाई”ची परिसीमा असेल ज्यास सामान्यपणे हर्मगिदोन असे सूचित केले जाते. (मत्तय २४:३-१४, २१; प्रकटीकरण १६:१४, १६) या रम्य पृथ्वी ग्रहावरील सर्व दुष्टाईस या लढाईद्वारे काढण्यात येईल. त्यानंतर हजार वर्षांचे येशू ख्रिस्ताचे राज्य येईल, तेव्हा पृथ्वीला प्रगतिशीलपणे परादीस अवस्थेत आणण्यात येईल.

बायबल हे प्रकट करते, की हजार वर्षांच्या या कारकिर्दीच्या दरम्यान मृत लोकांचे पुनरुत्थान करण्यात येईल. येशू पृथ्वीवर असताना त्याने दिलेल्या या अभिवचनाची तेव्हा पूर्णता होईल: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९.

पुनरुत्थानाच्या आशेचा परिणाम

भवितव्यातील पुनरुत्थानाची किती उत्तम ही आशा—अशी वेळ जेव्हा मृतांना पुन्हा जिवंत करण्यात येईल! उतरते वय, आजार, अनपेक्षित संकटे आणि दुःख तसेच रोजचे दबाव व जीवनातील समस्या या सर्व काठिण्यांस तोंड देतेवेळी आपल्याला किती उत्तेजन मिळते! मृत्यूमुळे होणारे अतिशय दुःख यामुळे दूर होते—सर्वच दुःख यामुळे दूर होत नसले तरी भवितव्याबद्दल आशाहीन असणाऱ्‍यांपासून आपण वेगळे होतो. प्रेषित पौलाने पुनरुत्थानाच्या आशेच्या सांत्वनदायक परिणामास पुढील शब्दांत मान्य केले: “बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्‍यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्‍वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.”—१ थेस्सलनीकाकर ४:१३, १४.

प्राच्य मनुष्य ईयोब याने निरीक्षण केलेल्या दुसऱ्‍या एका सत्याचा आपण कदाचित आधीच अनुभव घेतला असेल: “मी सडलेल्या वस्तूप्रमाणे, कसरीने खाल्लेल्या वस्त्राप्रमाणे जीर्ण झालो आहे. स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो. तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.” (ईयोब १३:२८–१४:२) जीवनाची अनिश्‍चितता आणि कटू सत्याची आपल्याला देखील जाणीव आहे, ते म्हणजे “कालवश व दैववश” आपल्यापैकी कोणावरही येऊ शकतो. (उपदेशक ९:११) आपल्यापैकी कोणालाही मरण्याच्या प्रक्रियेस तोंड देण्याच्या विचाराने आनंद होणार नाही. तरीदेखील पुनरुत्थानाची निश्‍चित आशा मृत्यूचे ग्रासून टाकणारे भय दूर करण्यास मदत करते.

प्रोत्साहित व्हा! मृत्यूमधील संभाव्य निद्रेनंतर पुनरुत्थानाच्या चमत्काराद्वारे पुन्हा जिवंत होण्याकडे आपली दृष्टी लावा. अनंत जीवनाच्या भवितव्याच्या आशेकडे आत्मविश्‍वासाने पाहा आणि अशा प्रकारचा आशीर्वादित समय भवितव्यात अगदी जवळ आहे हे जाणून आणखी आनंद करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा