वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१ पृ. ४-७
  • स्वप्ने भविष्य भाकीत करू शकतात का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • स्वप्ने भविष्य भाकीत करू शकतात का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाकडून नसलेली स्वप्ने
  • दाव्यांची पारख करा
  • आपण स्वप्न पाहिले पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • नेहमीसाठी टिकणारं राज्य
    बायबलमधून शिकू या!
  • मोठ्या झाडासारखं एक राज्य
    बायबलमधून शिकू या!
  • यहोवाने बादशहांना धडा शिकविला तेव्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१ पृ. ४-७

स्वप्ने भविष्य भाकीत करू शकतात का?

प्राचीन काळापासून मानवजातीने स्वप्नांबद्दल नितान्त आवड बाळगली आहे. ईजिप्शियन लोकांनी स्वप्नांचा अर्थ सांगणारी पुष्कळ पुस्तके तयार केली आणि बॅबिलोनियन लोकांमध्ये स्वप्नांचे अर्थ सांगणारे लोक होते. आजारी लोकांना, त्यांच्या स्वप्नांमध्ये आरोग्याबद्दलच्या सूचना मिळण्याकरता त्यांना ॲसक्लेपियसच्या मंदिरांत झोपवावे अशी ग्रीक लोकांमध्ये रीत होती. आपल्या सामान्य युगाच्या दुसऱ्‍या शतकात, आर्टिमीडोरसने एक पुस्तक निर्माण केले ज्यामध्ये त्याने स्वप्न चिन्हांचा अर्थ दिला. तेव्हापासून निर्माण करण्यात आलेली अशा प्रकारची अनेक पुस्तके त्याच्या पुस्तकावर आधारित आहेत. आजवर, स्वप्नांचा अर्थ सांगण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले जातात पण ते खरोखरच भावी घटना समजण्याची कुवत प्रदान करतात का?

त्यांना भविष्यसूचक महत्त्व असण्याकरता, त्यांच्यावर एखाद्या सर्वश्रेष्ठ शक्‍तीचा प्रभाव पडला पाहिजे. बायबलमध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग आढळतील जेथे देवाने ती शक्‍ती प्रदान केली. त्याने त्याच्या सेवकांना तसेच त्याची उपासना न करणाऱ्‍यांनाही भविष्यसूचक स्वप्ने दिली. वास्तविक पाहता, ईयोब ३३:१४-१६ म्हणते: ‘देव स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टान्तात, मनुष्य गाढ निद्रेत असता, बिछान्यावर पडून झोप घेत असता बोलतो. देव त्याचे कान उघडतो.’

देवाने असे, सामान्य युगाच्या १,७०० पेक्षा अधिक वर्षांआधी हयात असलेल्या योसेफ नावाच्या एका मनुष्याच्या दिवसांमध्ये ईजिप्शियन फारोच्या बाबतीत केले. फारोचे स्वप्न उत्पत्ति ४१:१-७ मध्ये आढळते व २५ ते ३२ वचनांमध्ये योसेफ त्याचा अर्थ सांगतो, की ते स्वप्न, सात वर्षांकरता ‘मिसर देशात मोठा सुकाळ’ येणार व त्याच्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येणार असल्याचे भाकीत करते. योसेफाने फारोला स्पष्टीकरण दिले: “देवाने आपण काय करणार हे फारोस दर्शविले आहे.” (उत्पत्ति ४१:२८) ते स्वप्न, वास्तविकतेत जे घडले त्याचे भविष्यसूचक होते.

बॅबिलोनियन लोकांच्या प्रख्यात राजालाही असाच अनुभव आला. नबुखद्‌नेस्सरला एक स्वप्न पडले ज्यामुळे तो अतिशय अस्वस्थ झाला पण त्याला ते स्वप्न आठवत नव्हते. म्हणून त्याचे स्वप्न काय होते व त्याचा अर्थ काय हे सांगण्यासाठी त्याने त्याच्या जादूगारांना बोलावले. त्यांना त्याची ही विनंती पूर्ण करणे शक्य नव्हते.—दानीएल २:१-११.

देवाने राजाला ते स्वप्न दिल्यामुळे, त्याने संदेष्टा दानीएलला ते स्वप्न कोणते होते व त्याचा अर्थ काय होता हे प्रकट करण्यास शक्य केले. दानीएल २:१९ म्हणते: “रात्रीत दृष्टांतात हे रहस्य दानीएलास प्रगट झाले.” दानीएलाने या स्वप्नाचे श्रेय देवाला दिले: “सरकारनी जे रहस्य विचारिले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यांस राजाला सांगता येणार नाही; तरी रहस्ये प्रगट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळी काय होणार हे नबुखद्‌नेस्सर महाराजांना कळविले आहे.”—दानीएल २:२७, २८.

काही वेळा देवाने आपल्या लोकांना स्वप्नांद्वारे बोध दिला व इतर वेळी त्याने ईश्‍वरी कृपेची खातरी दिली किंवा तो त्यांना कशी मदत करत होता हे समजण्यास साहाय्य केले. याकोबाच्या बाबतीत देवाने आपली स्वीकृती एका स्वप्नाद्वारे दिली.—उत्पत्ति ४८:३, ४.

येशूचा दत्तक पिता योसेफ याला, मरीया गर्भवती असल्याचे कळाले तेव्हा त्याने तिला सोडून देण्याचा निश्‍चय केला. परंतु, त्याने असे करू नये याबद्दलच्या सूचना त्याला स्वप्नाद्वारे मिळाल्या. मत्तय १:२० म्हणते: “असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, ‘योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.’” नंतर एका स्वप्नाद्वारे त्याला हा इशारा मिळाला: “प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, ‘ऊठ, बाळक व त्याची आई ह्‍यांना घेऊन मिसर देशास पळून जा.’”—मत्तय २:१३.

देवाकडून नसलेली स्वप्ने

देवाचे लोक नसलेल्यांमध्ये स्वप्नांचा अर्थ सांगणे सर्वसामान्य होते ही वस्तुस्थितीच सूचित करते, की सर्वसाधारण स्वप्नांना विश्‍वसनीय भविष्य प्रकटविणारे असे लेखले जाऊ शकत नाही. देवाचा संदेष्टा यिर्मया याच्या दिवसांतील खोटे संदेष्टे म्हणत असत: “मी स्वप्न पाहिले आहे, स्वप्न पाहिले आहे!” (यिर्मया २३:२५) देव त्यांच्याद्वारे बोलत होता असा विचार करण्यास लावून लोकांना फसवण्याचा त्यांचा उद्देश होता. अशा स्वप्न पाहणाऱ्‍यांविषयी यिर्मयाला असे म्हणण्यास प्रेरणा मिळाली: ‘सेनाधीश यहोवा, इस्राएलाचा देव म्हणतो, ‘तुमच्यांत वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ यांनी तुम्हांस फसवू नये; ते पाहत असलेल्या स्वप्नांबद्दल त्यांच्याकडून काहीही ऐकू नका. कारण ते माझ्या नामाने तुम्हांस खोटा संदेश देतात,’ असे यहोवा म्हणतो.’—यिर्मया २९:८, ९.

हे खोटे संदेष्टे “दैवज्ञ” असल्यामुळे त्यांना पडलेली स्वप्ने, लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने दुष्ट आत्मिक शक्‍तींकडून असू शकत होती. जखऱ्‍या १०:२ मध्ये जे म्हटले आहे तेही हेच सूचित करते: “तेराफीम व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटा दृष्टांत पाहिला आहे व फसविणारी स्वप्ने सांगितली आहेत.”

दियाबल हा आद्य फसवणूक करणारा आहे जो हजारो वर्षांपासून, यिर्मया व जखऱ्‍याच्या दिवसांतील खोट्या संदेष्ट्यांनी केल्याप्रमाणे, धार्मिक पुढाऱ्‍यांचा, देव त्यांच्याशी दृष्टान्त व स्वप्ने यांद्वारे बोलला असा दावा करण्यास उपयोग करत आला आहे. अशांबद्दल प्रेरित बायबल लेखक यहुदाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना लिहिले: “दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत; ती अभक्‍तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करुन तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात; आणि आपला एकच स्वामी व प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याला ते नाकारतात.” हे लोक जणू काय “विषयस्वप्नात” आहेत असे तो म्हणाला.—यहूदा ४, ८.

दाव्यांची पारख करा

देव आपल्याशी स्वप्नाद्वारे बोलला अथवा भविष्यातील घटनांबद्दलची आपली स्वप्ने सत्य ठरली असा एखादा मनुष्य कदाचित दावा करू शकतो पण त्याच्यावर विश्‍वास ठेवून अंधळेपणाने त्याला अनुसरण्यास हे पुरेसे कारण नाही. इस्राएल लोकांना, अनुवाद १३:१-३, ५ मध्ये दिलेल्या लिखित सूचनांची नोंद घ्या: “तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा अथवा स्वप्न पाहणारा प्रगट झाला व त्याने तुम्हाला काही चिन्ह किंवा चमत्कार दाखविला, आणि त्या चिन्हाचा किंवा त्या चमत्काराचा तुम्हाला प्रत्यय आला आणि तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याचे त्याने तुम्हाला सुचविले, तरी त्या संदेष्ट्याचे किंवा त्या स्वप्न पाहणाऱ्‍याचे तुम्ही ऐकू नका. . . . त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणाऱ्‍याला जिवे मारावे.” आपल्या लोकांच्या एकनिष्ठेची परीक्षा घेण्याकरता देवाने अशा लोकांना खोटे बोलण्याची परवानगी दिली होती.

वैभूतिक स्वप्न पाहणाऱ्‍यांच्या दाव्यांवर अंधळेपणाने विश्‍वास ठेवण्याऐवजी, अदृश्‍य आद्य फसवणूक करणारा जो “सर्व जगाला ठकविणारा,” आहे त्याच्याकडून आपली फसवणूक करून घेण्याचे टाळण्यासाठी त्यांच्या दाव्यांची पारख करणे हे सुज्ञपणाचे आहे. (प्रकटीकरण १२:९) पण त्यांची विश्‍वसनीयरीत्या पारख कशी करता येऊ शकते?

देवाचे लिखित वचन, सत्य दर्शवणारे आपले ईश्‍वर प्रदत्त मार्गदर्शक आहे. त्याच्याविषयी येशू ख्रिस्त म्हणाला: “तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१७) म्हणून १ योहान ४:१ मध्ये आपल्याला असा सल्ला दिला आहे: “प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्‍वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्‍याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.” बायबलसोबत काळजीपूर्वकपणे तुलना केल्यास, त्यांचे दावे, तत्त्वज्ञान आणि कृत्ये बायबलच्या विरोधात असतील. सत्य काय आहे याचा आधार देवाचे वचन आहे.

स्वप्न पाहणारा व विशेष ज्ञान असल्याचा दावा करणारा, वास्तविकतेत भविष्य सांगणे वा इतर भुताटकीचा उपयोग करतो का? असल्यास, देवाचे वचन त्याचे खंडन करते. “चेटुक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.”—अनुवाद १८:१०-१२.

आपल्यामध्ये कधीही न मरणारा जीव आहे असा जर तो दावा करतो तर, “जो जीव पाप करीत आहे—तो मरेल,” असे स्पष्टपणे देवाचे वचन जे म्हणते त्याच्या तो विरोधात जातो. (यहेज्केल १८:४, NW) तो स्वतःला उंचावून लोकांनी आपले अनुसरण करावे म्हणून त्यांना आपल्याकडे आकर्षित करत आहे का? मत्तय २३:१२ सावध करते: “जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल.” तसेच प्रेषितांची कृत्ये २०:३० ख्रिश्‍चनांना इशारा देते: “तुम्हापैकीहि काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.”

तो हिंसक कृत्यांचे समर्थन करतो का? याकोब ३:१७, १८ अशाप्रकारे त्याचा धिक्कार करते: “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्‍यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे; पण शांति करणाऱ्‍यासाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.” तो जगामध्ये राजकीय अधिकार अथवा प्रभाव प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहे का? देवाचे वचन अशा व्यक्‍तीवर असे म्हणण्याद्वारे जोरदारपणे दोष लावते: “जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” अशा प्रकारे बायबल लबाडीला उजेडात आणते.—याकोब ४:४.

एखाद्याला जेव्हा त्याच्या कौटुंबिक सदस्याच्या किंवा मित्राच्या मृत्यूचे स्वप्न पडते तेव्हा त्याला या व्यक्‍तीबद्दल चिंता आहे म्हणून कदाचित असे स्वप्न पडले असावे. ज्या रात्री स्वप्न पडले अगदी त्याच रात्री एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू होणे, स्वप्न भविष्यसूचक होते हे शाबीत करत नाही. अशा प्रकारचे प्रत्येक स्वप्न जे वास्तविक असल्यासारखे भासते परंतु अशी शेकडो स्वप्ने आहेत जी तशी नाहीत.

देवाने गत काळामध्ये त्याचे लिखित वचन निर्माण केले जात होते तेव्हा भविष्यसूचक घटना प्रकट करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी स्वप्नांचा उपयोग केला असला तरी, आज त्याला तसे करण्याची काही गरज नाही. त्या लिखित वचनात, या समयात मानवजातीला लागणाऱ्‍या देवाकडच्या सर्व सूचना आहेत आणि त्यातील भविष्यवाण्यांचा संबंध भवितव्यातील हजारपेक्षा अधिक वर्षांच्या घटनांशी आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७) यास्तव, आपण याची खात्री बाळगू शकतो, की आपल्याला पडणारी स्वप्ने भविष्यातील घटनांविषयी देवाकडून येणारे निर्देश नसून आपले मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी मेंदूची आवश्‍यक कार्ये आहेत.

[७ पानांवरील चित्रं]

फारोच्या स्वप्नाने भवितव्यात येणाऱ्‍या गोष्टी दर्शवल्या त्याप्रमाणे देवाचे वचन आपल्या भवितव्यावर प्रकाश पाडते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा