आपण स्वप्न पाहिले पाहिजे
तुम्हाला स्वप्ने पडतात का? होय पडतात आणि असे मानणे उचित आहे कारण, मला स्वप्न पडत नाहीत असा आपण दावा केला तरी आपण सर्वच जण झोपेत असताना स्वप्न पाहतो. सर्व स्वप्नांपैकी ९५ टक्क्यापेक्षा अधिक स्वप्ने आपल्याला आठवत नाहीत असा अंदाज केला जातो. तुम्हाला कोणती स्वप्ने आठवतात? खरे तर, जाग येण्याआधीच्या काळात पाहिलेली स्वप्नेच आपल्याला नेहमी आठवतात.
स्वप्न अन्वेषकांना आढळून आले आहे, की झोप ही एक प्रगतिशील क्रिया आहे जी पहिल्या काही तासांमध्ये गाढ असते आणि त्यानंतर ती हलकी होते. डोळ्यांच्या जलद हालचाली दरम्यान स्वप्न पाहणे घडते त्याला रेम निद्रा (REM sleep) असे संबोधले जाते. रेम निद्रा आणि गैर-रेम निद्रा आलटून पालटून घडत असते. गैर रेम/रेम निद्रेचे चक्र सुमारे ९० मिनिटे टिकते व हे चक्र संपूर्ण रात्रीत पाच ते सहा वेळा घडते ज्यामध्ये शेवटले चक्र आपण जागे होण्याच्या काही काळ आधीच घडते.
झोपेमध्ये असताना तुमचा मेंदू कमी कार्यक्षम असतो असा विचार करणे चुकीचे आहे. असे आढळून आले आहे, की मेंदू जागृतावस्थेच्या काही स्थितींपेक्षा स्वप्नांदरम्यान अधिक कार्यक्षम असतो, याला अवधान व स्मृती यांजशी संबंधित असलेल्या मस्तिष्कस्तंभातील विशिष्ट चेताकोश अपवाद आहेत. हे चेताकोश रेम निद्रेदरम्यान विश्रांती घेतात असे दिसते. परंतु, सामान्यपणे मेंदूमधील तंत्रिका कोशिकांमध्ये अंतराकोशिकी दळणवळण चालू असते.
आपला मेंदू शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव आहे ज्यामध्ये सेकंदाला शंभर ते दोनशे वा तीनशे संकेत पाठवणारे कोट्यवधी घटक आहेत. एका मानवी मेंदूमध्ये, पृथ्वीवर जितके लोक आहेत त्यापेक्षाही जास्त घटक आहेत. काही संशोधकांचा अंदाज आहे, की मेंदूमध्ये २० ते ५० कोटी पेक्षा अधिक घटक आहेत. त्याची गुंतागुंत बायबल लेखक दावीदाने मानवी शरीराविषयी जे म्हटले त्याला पुष्टी देते की, “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत.”—स्तोत्र १३९:१४.
स्वप्नांची दुनिया
जागृतावस्थेत आपले पाचही ज्ञानेंद्रिय निरंतर मेंदूला माहिती व प्रतिमा पाठवत असतात, परंतु झोपेच्या वेळी असे नसते. मेंदू कोणत्याही बाहेरील ऐंद्रिय आदानाविना स्वतःमध्ये प्रतिमा तयार करतो. म्हणूनच आपण स्वप्नांमध्ये जे पाहतो व ज्या हालचाली अनुभवतो त्या काही वेळा भ्रमासारख्या असतात. यामुळे आपण निसर्गजात कायद्याविरुद्ध कार्य करू शकतो जसे, की सुपरमॅनसारखे उडणे किंवा कड्यावरून पडून देखील इजा न होणे. वेळेचा विपर्यास होऊ शकतो ज्यामुळे भूतकाळ जणू काय वर्तमान काळ दिसतो. अथवा आपण पळण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या हालचालींवर ताबा नसल्यासारखे आपल्याला वाटते—आपले पाय हालचाल करू इच्छित नसतात. अर्थात, आपल्या जागृतावस्थेत आपल्यावर खोल प्रभाव पडला असेल आणि आपण तीव्र अनुभव अनुभवले असतील तर त्यांचा आपल्या स्वप्नांवर परिणाम होऊ शकतो. युद्धाचे भयजनक अत्याचार अनुभवलेले अनेक जण सहजपणे त्यांना विसरून जाऊ शकत नाहीत, अथवा एखाद्या गुन्हेगाराने केलेला हल्ला देखील काहीजण विसरू शकत नाहीत. जागृतावस्थेत असताना घडलेले अशा प्रकारचे अस्वस्थ करणारे अनुभव आपल्या स्वप्नांमध्ये दिसू शकतात ज्यामुळे दुःस्वप्न घडू शकते. झोपी जाण्याआधी आपल्या मनात असलेल्या साधारण गोष्टी स्वप्नांमध्ये डोकाऊ शकतात.
कधीकधी आपण एखादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि आपल्याला झोपेत त्या समस्येवर उपाय मिळतो. यावरून असे दिसते, की संपूर्ण झोप स्वप्नांची नसते. त्यातील एक भाग विचार करणे हा आहे.
स्वप्ने आणि आपला मेंदू यावरील एक पुस्तक असे सांगते: “झोपेतील सर्वात सामान्य मानसिक क्रिया म्हणजे स्वप्न पाहणे नव्हे तर विचार करणे होय. झोपेत असताना विचार करण्याचा संबंध ऐंद्रिय भ्रम यासोबत नसतो व तो अकल्पनीय नसतो. ते सामान्य आहे, बहुधा कालच्या वा उद्याच्या वास्तविक जीवनाच्या घटनांशी संबंधित असते व बहुतेककरून सर्वसाधारण, असर्जनशील व वारंवार घडणारे असते.”
काहींना वाटते, की त्यांच्या स्वप्नांच्या विषयांमध्ये त्यांच्याकरता खास संदेश आहेत. त्या स्वप्नांचा अर्थ समजून घेण्याकरता ते आपल्या बिछान्याजवळ एक नोंदवही ठेवतात जेणेकरून ते जागे झाल्यावर त्यांची नोंद करू शकतात. स्वप्न चिन्हांचा अर्थ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुस्तकांच्या उपयुक्ततेविषयी ॲन फॅरडे त्यांच्या स्वप्नांचा खेळ (इंग्रजी) या पुस्तकात म्हणतात: “स्वप्नांच्या विषयांचा व चिन्हांचा अर्थ पाहण्यासाठी तुम्ही जी स्वप्नांसंबंधित पुस्तके पाहता ती, पारंपारिक असोत अथवा काही आधुनिक मानसशास्त्रीय सिद्धान्तावर आधारित असोत, तेवढ्याच प्रमाणात निरर्थक असतात.”
स्वप्ने प्रामुख्याने मेंदूतून उद्भवत असल्यामुळे ती आपल्याकरता खास संदेश देतात असा विचार करणे समंजसपणाचे नाही. आपल्या मेंदूला निरोगी अवस्थेत ठेवण्यास साहाय्य करणारे ते मेंदूचे सामान्य कार्य आहे अशा दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडे पाहावे.
पण अशा लोकांबद्दल काय जे म्हणतात, की त्यांनी स्वप्नात एका नातेवाईकाचा किंवा मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहिले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना समजले, की ती व्यक्ती खरोखरच मरण पावली? स्वप्ने भविष्य भाकीत करू शकतात असे यावरून सूचित होत नाही का? पुढील अंकात, आपण भविष्यसूचक स्वप्नांमागे काय आहे ते पाहणार आहोत.