“त्यांना घालवून देऊ नका!”
“एका किंवा दोघा यहोवाच्या साक्षीदारांनी तुमच्या दारावरील बेल वाजवल्यास, त्यांना घालवून देऊ नका!” असा सल्ला कोरीएरा डेल्ला सेरा हे वृत्तपत्र देते. हे वर्तमानपत्र एका घटनेचा उल्लेख करीत होते; ही घटना उत्तर इटलीतील ट्रेविसोमध्ये घडली. या घटनेमध्ये एक व्यापारी दहा लाखापेक्षा जास्त लीरे (६०० अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक) गमवण्याच्या धोक्यात होता कारण त्याने त्याला भेटण्यासाठी आलेल्या दोन साक्षीदारांना घालवून दिले होते.
वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, दोन साक्षीदारांनी या मनुष्याला स्वतःची ओळख पुढील शब्दांनी करून दिली: “आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत आणि आमच्याकडे तुम्हाला देण्याकरिता एक मोलवान गोष्ट आहे.” त्यानंतर, त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करू न देताच त्या विक्षिप्त व्यापाऱ्याने दरवाजा बंद केला.
या मनुष्याने त्यांचे ऐकले असते तर त्याला हे कळले असते, की साक्षीदार त्याच्या घरी त्याचे पाकीट देण्यासाठी गेले होते; हे पाकीट त्यांना बागेतील एका बाकावर सापडले होते. साक्षीदार यापेक्षा अधिक काही करू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी ते पाकीट त्यातील ऐवजासहित जवळच्या पोलीस ठाण्यात दिले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी ते पाकीट योग्य त्या मालकाच्या स्वाधीन केले.
ईल गाटसेटीनो द ट्रेविसो या वृत्तपत्राने म्हटले, “या दोन दुर्दैवी [साक्षीदारांच्या] ठिकाणी दुसरा कोणी असता तर त्याने संभाव्यपणे . . . पाकीटामधील ती भली मोठी रक्कम काढून घेतली असती. परंतु यहोवाचे साक्षीदार तसे मुळीच करणार नाहीत, त्यांना पूर्णपणे प्रामाणिक असण्याचे अगत्य आहे.”
“पूर्णपणे प्रामाणिक” राहण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना कोणती गोष्ट प्रेरित करते? ती गोष्ट म्हणजे, येशूच्या शिकवणुकींच्या एकवाक्यतेत, त्यांचे यहोवा आणि त्यांच्या शेजाऱ्यांवरील प्रेम. (मत्तय २२:३७-३९) या कारणास्तव, यहोवाचे साक्षीदार घरोघरी जाऊन यहोवा देवाने अभिवचन दिलेल्या वैभवी ‘नव्या पृथ्वीच्या’ सुवार्तेविषयी घोषणा करतात. आशेचा हा संदेश इतर कोणत्याही भौतिक संपत्तीपेक्षा कितीतरी अधिक मोलवान आहे!—२ पेत्र ३:१३.