तुम्हाला आठवते का?
टेहळणी बुरूजचे अलीकडील अंक तुम्हाला आवडले का? तुम्हाला खालील प्रश्नांची उत्तरे देता येतात का ते पाहा:
◻ येशूने, “ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे” असे म्हटले तेव्हा त्याचा अर्थ ख्रिश्चन लोक पापांची क्षमा करू शकतात असा होतो का? (योहान २०:२३)
सर्वसाधारणपणे ख्रिश्चनांना किंवा मंडळीतील नियुक्त वडिलांनाही पापांची क्षमा करण्याचा ईश्वरी अधिकार आहे, अशा निष्कर्षास पोहंचण्यासाठी कोणताही शास्त्रवचनीय आधार नाही. येशूच्या शब्दांचा संदर्भ दाखवतो की, प्रेषितांना आत्म्याच्या कार्यहालचालीद्वारे पापांची क्षमा करण्याचा किंवा न करण्याचा अद्वितीय अधिकार देण्यात आलेला होता. (प्रेषितांची कृत्ये ५:१-११; २ करिंथकर १२:१२ पहा.)—४/१५, पृष्ठ २८.
◻ जे. जे. स्ट्यूअर्ट परोन यांच्या, प्रथमतः १८६४ मध्ये प्रकाशित झालेल्या स्तोत्रसंहिता या पुस्तकाच्या अनुवादाबद्दल कोणती उल्लेखनीय बाब आहे?
परोन यांनी त्यांच्या अनुवादात, “त्यातील वाक्यसंप्रदाय आणि पोटवाक्याची रचना या दोन्ही बाबतीत, इब्री भाषेत आहे तेच रूप” वापरण्याचा प्रयत्न केला. असे करताना, ईश्वरी नामाचा “यहोवा” या रूपाचा पुनः वापर करण्याकरिता त्यांनी आपली पसंती दर्शविली.—४/१५, पृष्ठ ३१.
◻ जगाच्या सरकारांसोबत संबंध राखण्याबाबत येशूने त्याच्या अनुयायांना कोणते मार्गदर्शन दिले?
येशूने म्हटले: “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरा.” (मत्तय २२:२१) तो असेही म्हणाला, “जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.” (मत्तय ५:४१) येशू कायदेशीर मागण्यांप्रती इच्छुक अधीनतेच्या तत्त्वाचे स्पष्टीकरण देत होता, मग ती मानवी नातेसंबंधात असो किंवा देवाच्या नियमाच्या सुसंगतेत असलेल्या सरकारी अपेक्षांबाबत असो. (लूक ६:२७-३१; योहान १७:१४, १५)—५/१, पृष्ठ १२.
◻ ‘सत्यमार्गाने चालण्याचा’ काय अर्थ होतो? (स्तोत्र ८६:११)
यामध्ये देवाच्या अपेक्षा पूर्ण करणे व विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणे त्याची सेवा करणे समाविष्ट आहे. (स्तोत्र २५:४, ५; योहान ४:२३, २४)—५/१५, पृष्ठ १८.
◻ यहोवाने योनाला निनवेस पाठविले याकरवी काय साध्य करण्यात आले?
शेवटी, निनवेमधील योनाच्या प्रचार कार्याद्वारे निनवेचे पश्चात्तापी लोक व दुसरीकडे विश्वास आणि नम्रतेच्या बाबतीत अत्यंत उणे असलेले हट्टी इस्राएली लोक यांत किती विरोधाभास आहे हे स्पष्ट झाले. (पडताळा अनुवाद ९:६, १३; योना ३:४-१०.)—५/१५, पृष्ठ २८.
◻ उत्पत्ति ३:१५ येथे उल्लेखण्यात आलेले “सर्प” व “स्त्री” हे कोण आहेत?
सर्प हा भित्रा साप नव्हे तर त्याचा उपयोग करणारी व्यक्ती अर्थात, दियाबल सैतान आहे. (प्रकटीकरण १२:९) ती “स्त्री” हव्वा नसून यहोवाची स्वर्गीय संघटना, म्हणजे आत्म्याने अभिषिक्त असलेल्या त्याच्या पृथ्वीवरील सेवकांची माता आहे. (गलतीकर ४:२६)—६/१, पृष्ठ ९.
◻ एखादा, मोठ्या बाबेलमधून निघून संरक्षण कसे प्राप्त करू शकतो? (प्रकटीकरण १८:४)
त्याने खोट्या धार्मिक संघटनांमधून स्वतःला पूर्णपणे वेगळे करणे इतकेच नव्हे, तर त्यांच्या रूढी व त्यांच्यामधून निर्माण होणाऱ्या आत्म्यापासून स्वतःला वेगळे करण्यास हवे. यानंतर, त्याला यहोवाच्या ईश्वरशासित संघटनेमधील सुरक्षित स्थानी संरक्षण मिळेल. (इफिसकर ५:७-११)—६/१, पृष्ठ १८.
◻ गरुडाचा शास्त्रवचनांत वारंवार उल्लेख का करण्यात आला आहे?
बायबल लेखकांनी बुद्धी, ईश्वरी संरक्षण व चपळपणा यांसारख्या गुणांचे द्योतक म्हणून गरुडाच्या वैशिष्ट्यांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला आहे.—६/१५, पृष्ठ ८.
◻ पार्थिव आशा असलेल्या आजच्या देवाच्या सेवकांकडे अभिषिक्त ख्रिश्चनांसारखाच देवाचा आत्मा आहे का?
मूलतः, त्याचे उत्तर होय, असे आहे. प्रभूचा आत्मा दोन्ही वर्गांच्या लोकांकरता समप्रमाणात उपलब्ध आहे व ज्ञान आणि समज दोघांना समानतेने सुसाध्य आहेत तसेच ते आत्मसात करण्यासाठी समानतेने संधी दिल्या जातात.—६/१५, पृष्ठ ३१.
◻ जेरूसलेम येथील मंदिरात इस्राएलच्या याजकांकरवी करण्यात आलेल्या पवित्र सेवेचे परीक्षण करणे हे आज आपल्यासाठी फायदेकारक का आहे?
असे केल्याने, पापी मानव आज देवाबरोबर समेट करू शकतात अशा दयापूर्ण व्यवस्थेला आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. (इब्री लोकांस १०:१-७)—७/१, पृष्ठ ८.
◻ जेरूसलेम येथे बांधलेल्या दुसऱ्या मंदिरास शलमोनाने बांधलेल्या मंदिरापेक्षा मोठे वैभव कसे लाभले?
हे दुसरे मंदिर शलमोनाच्या मंदिरापेक्षा १६४ वर्षे अधिक टिकले. पुष्कळ देशांतील पुष्कळ उपासक त्याच्या अंगणात एकत्र आले. याहूनही महत्त्वपूर्ण म्हणजे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने मंदिराच्या अंगणात शिक्षण देण्याद्वारे ह्या दुसऱ्या मंदिराला बहुमान मिळाला.—७/१, पृष्ठे १२, १३.
◻ देवाने त्याचे आध्यात्मिक मंदिर केव्हा अस्तित्वात आणले?
हे सा. यु. २९ मध्ये, बाप्तिस्म्याच्या वेळी येशूने केलेल्या प्रार्थनेला देवाने स्वीकृती दर्शवली त्यावेळेस घडले. (मत्तय ३:१६, १७) अर्पणासाठी तयार असलेल्या येशूच्या शरीराच्या प्रस्तुतीवर देवाच्या स्वीकृतीचा अर्थ असा झाला, की एका आध्यात्मिक अर्थाने, जेरूसलेमच्या मंदिरातील वेदीपेक्षा मोठी वेदी क्रियाशील झाली होती.—७/१, पृष्ठे १४, १५.
◻ आपण क्षमाशील का असावे?
ख्रिस्ती ऐक्य टिकवून ठेवावयाचे आहे तर, ज्याने क्षमा मागितली आहे अशा अपराध्याला क्षमा करणे जरूरीचे आहे. वैरभाव व अढी जोपासल्यामुळे आपल्या मनाची शांती हिरावून घेतली जाते. आपण क्षमाशील नसल्यास, आपल्यासमोर एक धोका आहे आणि तो म्हणजे एक ना एक दिवस यहोवा देव आपल्या पापांना क्षमा करण्याचे थांबवील. (मत्तय ६:१४, १५)—७/१५, पृष्ठ १८.
◻ इस्राएल लोक कशाप्रकारे पवित्र होऊ शकत होते?
केवळ, पवित्र देव, यहोवासोबत त्यांच्या घनिष्ट नातेसंबंधाद्वारे व त्याची शुद्ध उपासना करण्याद्वारे ते पवित्र होऊ शकत होते. ‘परमपवित्राची’ उपासना पावित्र्याने, तसेच शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेने करण्यासाठी त्याजविषयी अचूक ज्ञान संपादन करणे हे त्यांच्यासाठी अगत्याचे होते. (नीतिसूत्रे २:१-६; ९:१०)—८/१, पृष्ठ ११.