‘देवाच्या पर्वताच्या’ प्रदेशात ‘साक्षीदारांचा जमाव’
एखाद्या खंडाच्या नकाशावर, पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीला धरून गिनीच्या आखाताच्या कडेने तुम्ही पूर्वेस सरकत गेला, तर ती किनार दक्षिणेला जेथे वळते तेथेच तुम्हाला कॅमेरून दिसेल. किनाऱ्यावरून असेच दक्षिणेच्या दिशेने गेल्यास, तुम्ही काळ्या रेतीच्या विस्तीर्ण सागरकाठाजवळ येता. कॅमेरून, ज्वालामुखी पर्वत असल्यामुळे तेथील वाळू काळी आहे.
हा निमुळत्या आकाराचा ४,०७० मीटर पर्वत शिखर सर्व क्षेत्र व्यापतो. सूर्यास्त कॅमेरून पर्वताला आपल्या प्रकाशाने न्हाऊन टाकते तेव्हा, अंजिरी, नारंगी, सोनेरी व किरमिजी रंगाच्या विविध छटा पाहण्यालायक असतात. समुद्र आणि जवळपासच्या दलदली, आरशाप्रमाणे या छटांना प्रतिबिंबित करत असल्यामुळे आकाश आणि पृथ्वी यांच्यातील फरक जवळजवळ अशक्यच वाटतो. त्या भागात राहणाऱ्या चेतनवादी जातीच्या लोकांनी या पर्वताला मोंगा मा लोबा, म्हणजे “देवांचे रथ” किंवा सर्वसामान्यपणे “देवाचा पर्वत” अशी नावे दिली आहेत हे समजण्यास आपल्याला सोपे जाते.
दूरवरच्या दक्षिणेकडे नारळाच्या झाडांची झालर असलेला पांढऱ्या रेतीचा विस्तीर्ण सागरकाठ आहे. या वर्णनात्मक सागरकाठाव्यतिरिक्त, काँगो आणि मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक तसेच उत्तरेकडील नायजेरिया व उप-सहार चॅडपर्यंत प्रदेशाचा बहुतेक भाग दाट विषुववृत्तीय अरण्याने व्यापला आहे. प्रदेशाचा पश्चिमी भाग डोंगराळ असून पर्यटकाला युरोपच्या भागांची आठवण करून देतो. परंतु, तेथील उष्ण हवामानामुळे तुम्ही विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहात हे विसरणार नाही. ग्रामीण परिसरातील वैचित्र्यामुळे अनेक पर्यटक मार्गदर्शक कॅमेरूनचे वर्णन आफ्रिकेची लघुप्रतिकृती असे करतात. हे मत, तेथील वेगवेगळ्या जमातींमुळे व २२० पेक्षा अधिक नोंदणीकृत भाषा व पोटभाषांमुळे बळकट होते.
तुम्ही कॅमेरून येथे भेट देण्यास गेला तर कदाचित दूआलाच्या बंदरावर किंवा याऊंदे नावाच्या राजधानीत असलेल्या एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये राहाल. पण लोकांच्या विशेषकरून, ‘देवाच्या पर्वताच्या’ या प्रदेशात ‘साक्षीदारांचा जमाव’ गोळा करण्यात व्यग्र असलेल्या २४,००० पेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांच्या राहणीमानाची माहिती मिळण्याची संधी तुम्ही कदाचित हातची घालवून बसाल.a यांच्यातील काहींना भेटण्यासाठी देशातून एक फेरफटका मारू या का? या पश्चिम आफ्रिकी देशाचा शोध अर्थातच समृद्धपणे प्रतिफलदायी ठरेल.
डोंगा, बुश टॅक्सी की सायकल?
कॅमेरूनची सर्वात लांब नदी सानागा, समुद्राला मिळते त्याठिकाणी एक मोठा त्रिभुजप्रदेश तयार होतो. या विस्तृत भागातील सर्व रहिवाशांप्रत पोहंचण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांना बहुतेकवेळा डोंगातून प्रवास करावा लागतो. हेच तर एमबीऑको येथील एका लहान गटातील नऊ राज्य प्रचारक करतात. यांपैकी दोघेजण २५ किलोमीटर दूर असलेल्या योयो नावाच्या गावात राहतात. एमबीऑको येथे पोहंचण्यासाठी त्यांना जोरजोराने डोंगा वल्हवावा लागतो, तरीसुद्धा ते ख्रिस्ती सभांना नेहमी हजर असतात. या गटाला भेट देताना, एका प्रवासी पर्यवेक्षकाने यहोवाचे साक्षीदार—या नावामागील संघटना नावाचा इंग्रजीतील एक व्हिडिओ दाखवण्याचे सुचवले. परंतु हे बोलणे सोपे होते करणे नव्हे. अशा दूरच्या खेड्यात त्यांना व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर, दूरचित्रवाणी संच आणि त्यास चालवण्यासाठी वीज पुरवठा कोठे मिळणार होता बरे?
भेटीच्या आठवड्यादरम्यान, काही प्रचारक स्थानिक चर्चच्या पाळकाकडे गेले. पाळकाने त्यांचे आनंदाने स्वागत केल्याचे पाहून यांना आश्चर्य वाटले, व त्यांनी त्याच्याबरोबर बायबलची उत्साहपूर्ण चर्चा केली. पाळकाकडे केवळ व्हिसीआरच नव्हे तर एक विद्युतजनित्र देखील असल्याचे त्यांच्या नजरेस पडल्यावर, त्यांनी सर्व धैर्य एकवटून, तो त्याचे हे साहित्य त्यांना वापरण्यासाठी देऊ शकेल का असे विचारले. पाळकाला बायबलची झालेली चर्चा आवडल्यामुळे, त्याने मदत करण्याची तयारी दर्शवली. शनिवारी संध्याकाळी १०२ जण व्हिडिओ पाहण्यासाठी आले होते, ज्यामध्ये पाळक आणि त्याच्या चर्चमधील बऱ्याच मंडळीचा देखील समावेश होता. योयोतील त्या दोन साक्षीदारांनी दोन डोंगांमधून पुष्कळ आस्थेवाईक लोकांना सोबत आणले. भरतीच्या वेळी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने डोंगा वल्हवणे त्यांना इतके कठीण वाटले नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला व त्यांना उत्तेजन देखील मिळाले. शिवाय ते, यहोवाचा आदर करण्याचा उद्देश असणाऱ्या महान संघटनेतील होते यामुळे त्यांना अभिमानही वाटत होता.
डोंगा जेथे जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी जाण्यासाठी एखादा बुश टॅक्सीचा वापर करू शकतो. या टॅक्सी प्रवाशांची वाट पाहत जेथे उभ्या असतात ती जागा नेहमीच वर्दळीची असते. थंड पाणी व केळी विक्रेते, आणि हमाल यांच्या गडबडीमध्ये आपण सहजपणे गोंधळून जाऊ शकतो. उभ्या असलेल्या बुश टॅक्सींमध्ये प्रवाशांना गोळा करण्याचे काम हमालांचे असते; आणि या सर्व टॅक्सी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे “निघण्यास तयार असतात.” परंतु, “तयार” म्हणजे लगेचच निघणार असे समजू नका. प्रवाशांना तासन्तास, कधीकधी तर कितीतरी दिवसांसाठी ताटकळत थांबून राहावे लागते. सर्व प्रवाशांना एकदाचे आत कोंबल्यानंतर व चालकाने छतावर सामान, खाण्याचे जिन्नस, केव्हा केव्हा तर जिवंत कोंबड्या व बकऱ्या ठेवल्यानंतर, बुश टॅक्सी उबड-खाबड, धूळीच्या रस्त्यावरून निघते.
एका प्रवासी पर्यवेक्षकाने अशा वाहतुकीला कंटाळून स्वतंत्रपणे प्रवास करण्याचे पसंत केले. ते आता सर्व प्रवास आपल्या सायकलवर करतात. ते म्हणतात: “एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीला सायकलनं प्रवास करण्याचे ठरवल्यापासून, भेटीसाठी मी नेहमी वेळेवर पोहंचतो. हा प्रवास अनेक तासांचा असला, तरी मला निदान बुश टॅक्सीसाठी एक दोन दिवस ताटकळत उभं राहावं लागत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही रस्ते पूरामुळे पूर्णपणे नाहीशे होतात. चिखल आणि पाण्याचे हे भाग पार पाडण्याकरता तुम्हाला तुमचे बूट काढावे लागतात. एके दिवशी माझा एक बूट एका नाल्यात पडला आणि मला तो सापडला नाही, पण कितीतरी आठवड्यांनंतर, साक्षीदारांची एक लहान मुलगी मासे पकडण्यासाठी आली असताना तिला अचानक तो बूट सापडला! पाण्यामध्ये माश्यांसोबत राहिलेला माझा एक बूट मला मिळाल्यामुळे मी बूटांची ही जोडी पुन्हा घालू शकत असल्यामुळे मला आनंद वाटतो. यहोवाच्या साक्षीदारांनी अद्याप जेथे प्रचार केला नाही अशा क्षेत्रांमध्ये मी कधी कधी जातो. मी काय आणलं आहे अशी गावातली लोकं मला सारखी विचारत असतात. म्हणून मी नियतकालिके व माहितीपत्रके माझ्या सोबत ठेवतो. जेव्हा जेव्हा मी थांबतो, तेव्हा तेव्हा बायबल आधारित ही प्रकाशनं त्यांना सादर करून संक्षिप्त साक्ष देतो. मला खात्री आहे की यहोवा, पेरलेल्या या बीयांना वाढवेल.”
दूर, अंतःप्रदेशात
यहोवाचे साक्षीदार कॅमेरूनच्या मध्यभागी, दाट अरण्यांच्या कुशीत दडलेल्या गावांमधील लोकांप्रत राज्याची सुवार्ता घेऊन जाण्यास झटतात. यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात, पण परिणाम मात्र सुखद असतात.
मेरी नावाच्या एका पूर्ण-वेळेच्या सेविकेने आरलेट नामक एका तरुणीबरोबर बायबल अभ्यास चालू केला. पहिला अभ्यास संपल्यानंतर, मेरीने आरलेटला तिच्यासोबत दारापर्यंत येण्यास जमेल का असे विचारले, आफ्रिकेच्या या भागात तशी रीत होती. परंतु या तरुणीने तिला सांगितले, की तिचा पाय अतिशय दुःखत असल्यामुळे तिला चालता येत नाही. आरलेटच्या पायाला एक प्रकारचा रोग जडला होता. त्या रोगात मादी पिसू, मांसात प्रवेश करते ज्यामुळे शरीराच्या त्या भागात पू साचतो. मेरीने धैर्याने एक एक करून सर्व पिसवा काढल्या. नंतर तिला असेही कळले की रात्रीच्या वेळी या मुलीला दुरात्मे छळतात. मेरीने तिला, ती यहोवावर भरवसा कसा ठेवू शकते, विशेषकरून प्रार्थनेमध्ये त्याच्या नावाचा मोठ्याने उच्चार करू शकते हे समजावून सांगितले.—नीतिसूत्रे १८:१०.
आरलेटने जलद प्रगती केली. पहिल्यांदा जेव्हा ती अभ्यास करत होती तेव्हा, ती शारीरिकरीत्या व बुद्धिमत्तेत जी उल्लेखनीय प्रगती करत होती ती पाहून तिच्या कुटुंबातील सदस्यांना काही गैर वाटले नाही. पण नंतर जेव्हा त्यांना कळले की तिला एक यहोवाची साक्षीदार व्हावयाचे आहे तेव्हा त्यांनी तिला अभ्यास थांबवण्यास सांगितले. तीन आठवड्यांनंतर, आरलेट किती अस्वस्थ होती हे तिच्या आईला दिसून आल्यामुळे तिने मेरीशी संपर्क साधला आणि अभ्यास पुन्हा चालू करण्यास सांगितले.
एका विभागीय संमेलनाला उपस्थित राहण्याची वेळ आली तेव्हा, मेरीने आरलेटला दोन्ही दिवशी घेऊन जाण्यासाठी एका टॅक्सी चालकाला पैसे दिले. परंतु, रस्त्यापासून आरलेटच्या घरापर्यंत जाणारी वाट अतिशय वाईट स्थितीत असल्यामुळे त्याने घरापर्यंत जाण्यास नकार दिला. म्हणून मेरीने कसेतरी करून आरलेटला रस्त्यापर्यंत आणले. यहोवाने या प्रयत्नांवर खरोखरच आशीर्वाद दिला. आज आरलेट सर्व सभांना उपस्थित राहते. तिला मदत करण्यासाठी मेरी अविश्रांतपणे तिला नेण्यासाठी येते. त्या दोघींना प्रत्येक फेरीला ७५ मिनिटे चालावे लागते. रविवारच्या दिवशी सकाळी ८:३० वाजता सभा असल्यामुळे, मेरीला आपले घर ६:३० वाजताच सोडावे लागते; पण तरीदेखील त्या दोघी तेथे वेळेवर पोहंचतात. आरलेट अल्पावधीतच तिच्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेण्याची आशा करते. मेरी म्हणते: “तिने अभ्यास चालू केला होता तेव्हा कोणी तिला पाहिले नसल्यास, तिने आतापर्यंत किती बदल केले आहेत याची कल्पना त्याला करता येणार नाही. यहोवाने तिला अशा प्रकारे आशीर्वाद दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते.” मेरी खरोखरच आत्म-त्यागी प्रीतीचे एक उत्तम उदाहरण आहे.
दूर उत्तरेकडे
उत्तर कॅमेरून वैधर्म्य व आश्चर्य यांनी युक्त आहे. पावसाळ्यात, त्याचे रूपांतर एका मोठ्या हिरव्यागार बागेत होते. पण जेव्हा होरपळून टाकणारे ऊन येते तेव्हा सर्व गवत वाळून जाते. दुपारच्या वेळी जेव्हा सूर्य त्याचा रोष व्यक्त करत असतो व सावली कोठेच सापडत नसते तेव्हा मेंढरे लाल मातीच्या घरांच्या भिंतींना होताहोईल तितके चिकटून उभे राहण्याचा प्रयत्न करत असतात. रेती आणि वाळलेल्या गवतांमध्ये हिरव्यागारपणाचा लवलेश केवळ बाओबाब वृक्षाच्या पानांमध्ये दिसून येतो. परंतु हे वृक्ष, विषुववृत्तीय अरण्यांतील त्यांच्या जातीतील वृक्षांपेक्षा जास्त उंच नसले तरी ते तितकेच चिवट असतात. रुक्ष हवामानात टिकाव धरून राहण्याची त्यांची क्षमता उचितपणे, सत्याचा प्रकाश चमकवण्यासाठी या प्रदेशात राहण्यासाठी गेलेल्या काही साक्षीदारांच्या आवेशाचे व धैर्याचे उदाहरण देते.
या क्षेत्रातील काही मंडळ्या एकमेकांपासून ५०० ते ८०० किलोमीटरच्या अंतरावर आहेत, आणि त्यामुळे एकाकीपणाची भावना खरोखरच जाणवते. परंतु तेथील लोकांमध्ये भरपूर आस्था आहे. इतर ठिकाणातील साक्षीदार मदतीसाठी येथे स्थानांतर करतात. प्रभावशाली होण्यासाठी त्यांना तेथील स्थानिक पोटभाषा फुफुल्डे शिकावी लागते.
गारूआतील एका साक्षीदाराने, सुमारे १६० किलोमीटर दूर असलेल्या त्याच्या मूळच्या गावी काही दिवसांसाठी प्रचार करण्याचे ठरवले. त्याला तेथे काही आस्था दिसून आली, पण वाहतुकीचा खर्च जास्त असल्यामुळे तो तेथे नियमितरीत्या जाऊ शकत नव्हता. काही आठवड्यांनंतर, त्याला एक पत्र मिळाले जे एका आस्थेवाईक व्यक्तीकडून होते. ही व्यक्ती त्याला पुन्हा येऊन भेट देण्यास आर्जवत होती. पण जाण्यायेण्याच्या भाड्याचे पैसे नसल्यामुळे तो जाऊ शकला नाही. पण तो आस्थेवाईक मनुष्य चक्क गारूआमधील या साक्षीदाराच्या घरी, गावातील आणखी दहा लोक त्याची वाट पाहत आहेत हे सांगण्यासाठी आल्याचे पाहून त्याला किती आनंद झाला त्याची जरा कल्पना करा!
दुसऱ्या एका गावात, चॅडच्या सीमेजवळ, ५० आस्थेवाईक लोकांनी त्यांचा स्वतःचा एक बायबल अभ्यास गट तयार केला आहे. त्यांनी त्यांच्यातील तीन लोकांची, चॅडमधील जवळच्या मंडळीत सभांना उपस्थित राहण्याची व्यवस्था केली. परतल्यानंतर, हे तिघे जण इतर सर्वांबरोबर बायबलचा अभ्यास घेत असत. खरेच, येशूचे शब्द येथे अगदी उचितपणे लागू होऊ शकतात: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”—मत्तय ९:३७, ३८.
शहरांमध्ये साक्ष देणे
अनेक वर्षांपर्यंत साहित्यांच्या टंचाईनंतर, सुमारे दोन वर्षांआधी, टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके कॅमेरूनमध्ये मुबलकपणे उपलब्ध झाली. पुष्कळ लोक ही नियतकालिके पहिल्यांदाच वाचत असल्यामुळे ते त्यांच्याबद्दल पुष्कळ उत्साही व आस्थेवाईक आहेत. या शहरांतील एकामध्ये नेमणूक मिळालेल्या एका तरुण खास पायनियर जोडप्याने, त्यांच्या नवीन क्षेत्रात पहिल्याच सकाळी ८६ नियतकालिकांचे वाटप केले. काही प्रचारक तर एका महिन्यात २५० इतक्या नियतकालिकांचे वाटप करतात! त्यांच्या यशाचे रहस्य काय आहे बरे? सर्वांना नियतकालिके सादर करणे.
जनतेसाठी खुले असलेल्या कार्यालयात काम करणारा एक साक्षीदार नेहमी त्याच्या टेबलावर नियतकालिके ठेवतो. एकदा एका स्त्रीने ती नियतकालिके पाहिली पण घेतली नाहीत. साक्षीदाराने तिची आस्था समजून घेतली, तिला एक प्रत सादर केली आणि तिने ती स्वीकारली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा आल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. ती फक्त तिने नेलेल्या नियतकालिकाचे पैसे देण्यासाठीच आली नव्हती तर तिला आणखी काही नियतकालिके हवी होती. कशासाठी? ती बलात्काराची बळी असल्यामुळे त्याच विषयावर असणारे एक नियतकालिक तिने निवडले होते. तिने रात्रभरात ते नियतकालिक व त्यात दिलेल्या सूचना वारंवार वाचून काढल्या होत्या. तिला खूप बरे वाटल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांविषयी आणखी माहीत करून घ्यायचे होते.
बालचमू देखील बायबलमधील आशेचा संदेश सांगण्यात भाग घेऊ शकतात. एका सहा वर्षीय साक्षीदार चिमुरडीला तिच्या शिक्षकाने कॅथलिक गाणे गाण्यास सांगितले असता, ती एक यहोवाची साक्षीदार आहे असे सांगून तिने गाण्यास नकार दिला. तिच्या शिक्षकाने मग तिला तिच्या धर्माचे एक गाणे गाण्यास सांगितले जेणेकरून तो तिला त्यानुसार गुण देऊ शकेल. या चिमुरडीने “परादीसचे देवाने दिलेले अभिवचन” हे शीर्षक असलेले गीत तिला जसे आठवत होते त्याप्रमाणे गायिले. शिक्षकाने तिला विचारले, “तू गाण्यामध्ये परादीसचा उल्लेख केलास ना, ते परादीस कुठंय?” लवकरात लवकर पृथ्वीवर परादीस स्थापन करण्याचा देवाचा उद्देश असल्याचे या मुलीने स्पष्टीकरण दिले. या उत्तरामुळे स्तिमित होऊन ती ज्या पुस्तकाचा अभ्यास करते ते पुस्तक त्यांनी तिच्या पालकांकडे मागितले. धर्मावर असलेल्या धड्यांमधून तिला जे काही शिकवण्यात येत होते त्याऐवजी या पुस्तकातून ती जे काही शिकली होती त्यानुसार ते तिला गुण देऊ इच्छित होते. तिच्या पालकांनी शिक्षकाला सुचवले, की जर ते तिला योग्य गुण देऊ इच्छितात तर त्यांनी सर्वप्रथम अभ्यास केला पाहिजे. त्यांच्यासोबत एक बायबल अभ्यास चालू करण्यात आला.
भेट देण्याची योजना करत आहात?
जगाच्या अनेक भागांमध्ये आज, राज्याच्या सुवार्तेप्रती लोक नाराजी व्यक्त करत आहेत. देव किंवा बायबलमध्ये त्यांना आस्था वाटत नाही. इतर जण भीतीने गर्भगळीत होऊन दारावर कोणी अनोळखी व्यक्ती आली तर तिच्यासोबत बोलतही नाहीत. या सर्व गोष्टी यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या सेवेमध्ये खरोखरच आव्हानात्मक ठरतात. पण कॅमेरूनमध्ये परिस्थिती किती वेगळी आहे!
घरोघरी प्रचार करणे तर येथे आल्हाददायक वाटते. दारावर ठोठवण्याऐवजी येथे “काँग, काँग, काँग” अशी बोलावण्याची रीत आहे. मग आतून “कोण आहे?” असा आवाज आल्यावर आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत अशी स्वतःची ओळख करून देतो. बहुतेकवेळा, पालक आपल्या मुलांना बांक आणून ते एखाद्या झाडाखाली, कदाचित आंब्याच्या झाडाखाली ठेवण्यास सांगतात. देवाचे राज्य काय आहे व मानवजातीच्या पीडादायक परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी ते काय करणार आहे याबद्दलचे स्पष्टीकरण देण्यात आपला वेळ चांगला जातो.
अशा प्रकारची एक चर्चा झाल्यानंतर लगेचच एका स्त्रीने आपल्या मनातली गोष्ट सांगितली: “मी जे सत्य शोधत आहे ते, मी ज्या धर्मात जन्मले व वाढले त्यामध्ये सापडत नाही याचे मला वाईट वाटते. देवाने मला सत्य दाखवले आहे त्याबद्दल मी त्याचे आभार मानते. मी आमच्या चर्चमध्ये डिकन (अधिकारी) होते. प्रत्येक डिकन, कुमारिका मरीयेला आपल्या विनंत्या सांगू शकतील या कारणास्तव तिचा पुतळा आपल्या घरी एक आठवड्याकरता ठेवतात. माझ्या बाबतीत पाहता, मी तर मरीयेला, मला सत्य जाणण्यास मदत करावी अशी विनंती नेहमी करत होते. आता देवाने मला दाखवून दिले की सत्य तिच्याकडे नाही. मी यहोवाचे खरोखर आभार मानते.”
देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना मिळणाऱ्या अतिआनंदाचा तुम्हालाही अनुभव घ्यावा असे कधी वाटले तर, पश्चिम आफ्रिकेच्या या भागाला भेट का देऊ नये बरे? डोंगा, बुश टॅक्सी अथवा सायकल यांद्वारे ‘आफ्रिकेच्या लघुप्रतिकृतीचा’ शोध लावण्याव्यतिरिक्त तुम्ही ‘देवाच्या पर्वतावर’ ‘साक्षीदारांचा जमाव’ गोळा करण्यास हातभार लावत असाल.
[तळटीपा]
a “गिलियड” असा भाषांतरीत केलेल्या इब्री शब्दाचा संभाव्य अर्थ ‘साक्षीदारांचा जमाव,’ असा आहे. सन १९४३ पासून, वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला, संपूर्ण जगभरात तसेच कॅमेरूनमध्ये प्रचार कार्याची सुरवात करण्यासाठी मिशनऱ्यांना पाठवत आहे.