वाचकांचे प्रश्न
येशूला आता हर्मगिदोनची तारीख माहीत आहे का?
त्याला माहीत असावी, असे मानणे बरेच तर्कशुद्ध वाटते.
हा प्रश्न उद्भवतोच का, असा कदाचित काही जण विचार करतील. “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही,” या मत्तय २४:३६ मधील येशूच्या विवेचनांमुळे बहुधा त्यांना असा प्रश्न पडत असावा. “पुत्रालाहि नाही,” या संज्ञेकडे लक्ष द्या.
हे वचन, येशूच्या शिष्यांनी त्याला, “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या उपस्थितीचे व व्यवस्थिकरणाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” असा प्रश्न विचारला तेव्हा, त्यांना त्याने दिलेल्या उत्तराचा एक भाग आहे. (मत्तय २४:३, NW) या ‘चिन्हात’ समाविष्ट असलेल्या पुराव्यांबद्दलच्या त्याच्या प्रसिद्ध भविष्यवाणीत आता, त्याने त्याची उपस्थिती सूचित करणारी युद्धे, अन्नटंचाई, भूमिकंप, खऱ्या ख्रिश्चनांचा छळ आणि पृथ्वीवरील इतर घडामोडींविषयी भाकीत केले. त्याचे अनुयायी या चिन्हावरून अंत नजीक होता हे ओळखू शकले. ही समीपता दाखवण्यासाठी त्याने, अंजिराच्या झाडाला नवीन पालवी फुटते त्यावरून उन्हाळा जवळ असल्याचे सूचित होते, या उदाहरणाचा उपयोग केला. त्याने पुढे म्हटले: “तसेच तुम्हीहि ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच, आहे असे समजा.”—मत्तय २४:३३.
परंतु, नाश केव्हा येणार हे येशूने नक्की सांगितले नाही. उलट मत्तय २४:३६ मध्ये आपण वाचल्याप्रमाणे तो म्हणाला. ते वचन शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी), यातील आहे, व अनेक आधुनिक बायबलमध्ये तसेच दिले आहे. तरीदेखील काही जुन्या भाषांतरांमध्ये “पुत्रालाहि नाही” ही संज्ञा नाही.
उदाहरणार्थ, कॅथलिक डुवे व्हर्शन मध्ये असे दिले आहे: “पण त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणालाही माहीत नाही, स्वर्गातील देवदूतांस नाही, केवळ पित्याला माहीत आहे.” किंग जेम्स व्हर्शन मध्ये देखील असेच दिले आहे. मार्क १३:३२ मध्ये “पुत्रालाहि [किंवा, देखील] नाही” ही संज्ञा असली तरीसुद्धा ती का गाळण्यात आली? कारण, १७ व्या शतकाच्या सुरवातीला, जेव्हा ही दोन भाषांतरे तयार केली जात होती तेव्हा, भाषांतरकारांकडे असलेल्या हस्तलिखितांमध्ये ही संज्ञा नव्हती. परंतु कालांतराने, अनेक जुनी ग्रीक हस्तलिखिते उजेडात आली. मत्तयाच्या मूळ वचनाच्या काळाशी अधिक जवळ असल्यामुळे त्यांच्यामध्ये मत्तय २४:३६ येथे आढळणारी, “पुत्रालाहि नाही” ही संज्ञा आहे.
कॅथलिक जेरुसलेम बायबल मध्ये ही संज्ञा आहे, शिवाय एक तळटीप देखील आहे जेथे म्हटले आहे की, “वेदान्तपर कारणांसाठी कदाचित” लॅटिन वल्गेटने ही संज्ञा गाळली असावी, ही गोष्ट मनोवेधक आहे. अर्थात! त्रैक्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्या भाषांतरकारांना अथवा नक्कलाकारांना, येशूला आपल्या पित्याला असलेले ज्ञान नव्हते या गोष्टीला सूचित करणाऱ्या संज्ञेला वगळण्याचा मोह झाला असावा. येशू आणि त्याचा पिता एका त्रैक्य देवाचे भाग होते तर त्याला अमुक एक वस्तुस्थिती कशी माहीत असू शकत नव्हती?
त्याचप्रकारे, बी. एम. मेट्सगर त्यांच्या ग्रीक नव्या करारावर पाठ्य विवेचन, (इंग्रजी) या पुस्तकात असे म्हणतात: “‘पुत्राला सुद्धा’ हे शब्द मत्तयाच्या अनेक [हस्तलिखितांमध्ये] पुराव्यांमध्ये तसेच नंतरच्या बायझनटाईन पाठात देखील नाहीत. दुसऱ्या बाजूला पाहता, ॲलेक्झॅन्ड्रीयन, पाश्चिमात्य आणि सिझेरीयन प्रकारच्या पाठाच्या सर्वात उत्तम उदाहरणांमध्ये ती संज्ञा आहे. मार्क १३:३२ मध्ये त्यांनी हे शब्द जोडले आहेत असे गृहीत धरण्यापेक्षा ते सादर करत असलेल्या सैद्धांतिक अडचणीमुळे शब्दांना वगळण्याची शक्यता अधिक आहे.”—तिरपे वळण आमचे.
प्राचीन हस्तलिखितांची ती ‘उत्तम उदाहरणे,’ ज्ञानाच्या संबंधाने असलेल्या तर्कशुद्ध प्रगतीला सादर करणाऱ्या पाठाला आधार देतात. देवदूतांना अंताच्या घटकेविषयी माहीत नव्हते; पुत्राला देखील नाही केवळ पित्याला माहीत होते. आणि हे मत्तय २०:२३ मध्ये आढळणाऱ्या येशूच्या शब्दांच्या सुसंगतेत आहे, जेथे त्याने, राज्यामध्ये प्रमुख स्थान देण्याचा अधिकार त्याला नसून पित्याला असल्याचे कबूल केले.
यास्तव, ‘जगाच्या अंताची’ तारीख येशूला पृथ्वीवर असताना माहीत नसल्याचे त्याचे स्वतःचे शब्द दाखवतात. त्यानंतर त्याला माहीत झाले आहे का?
येशू एका श्वेत घोड्यावर बसून ‘विजयावर विजय मिळवीत’ पुढे जात असल्याचे वर्णन प्रकटीकरण ६:२ देते. त्याच्यानंतर, १९१४ मध्ये चालू झालेल्या पहिल्या महायुद्धानंतर आपण अनुभवत असलेली युद्धे, दुष्काळ आणि पीडा यांचे प्रतिनिधीत्व करणारे घोडेस्वार येतात. १९१४ मध्ये येशूला देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ करण्यात आले व तो पृथ्वीवरील दुष्टांविरुद्ध येणाऱ्या लढाईत पुढाकार घेणार आहे, असा यहोवाचे साक्षीदार विश्वास बाळगतात. (प्रकटीकरण ६:३-८; १९:११-१६) येशूला आता देवाच्या नावाने विजय मिळवण्याचा अधिकार दिला असल्यामुळे, अंत केव्हा येणार, तो “विजयावर विजय” केव्हा मिळवील ते त्याच्या पित्याने त्याला सांगितले असावे हे तर्कशुद्धपणे दिसते.
येथे पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्याला तारीख सांगण्यात आलेली नाही, यास्तव “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही . . . जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा,” हे येशूचे शब्द आपल्याला अजूनही लागू होतात.—मार्क १३:३३-३७.