त्यांना बालपणापासून प्रशिक्षित करा
अद्ययावत संशोधनावरून दिसून येते की “आवाजांमुळे भ्रुणांत इंद्रियविज्ञानशास्त्रीय प्रतिक्रिया घडून येतात.” विनिपेग फ्री प्रेस (इंग्रजी) हे वृत्तपत्र सांगते त्याप्रमाणे, उत्तर कॅरॉलिना विश्वविद्यालयातील संशोधकांना “असे आढळले की, माता आपल्या गर्भातील मुलांना काही वाचून दाखवतात तेव्हा जन्मानंतर हेच उतारे पुन्हा वाचल्यास नवजात शिशू त्याला प्रतिक्रिया दाखवतात.” गर्भवती असताना स्त्रियांनी मोठ्याने वाचल्यास त्यांच्या बाळाच्या व्यक्तिमत्त्वात चांगली नीतिमुल्ये बिंबवण्यात नक्कीच मदत मिळू शकेल. तीमथ्याला ‘बालपणापासूनच पवित्र शास्त्राची माहिती होती’ असे बायबल म्हणते. (२ तीमथ्य ३:१४, १५) स्पष्टपणे, बालपणापासून त्याला प्रशिक्षण देण्याचे महत्त्व त्याची आई व त्याची आजी यांना माहीत होते; मोठ्याने वाचणे देखील कदाचित या प्रशिक्षणात समाविष्ट असावे.
लेखक जिम ट्रलीझ यांच्या म्हणण्याप्रमाणे वाचन हे, “आधुनिक काळात आपल्या समाजातील सर्वात प्रभावशाली जीवनावश्यक कौशल्य आहे.” मोठ्याने वाचल्यास भाषा व शब्दसमुच्चय यांसंबंधीच्या कौशल्यांत आणखीन भर पडते.
निदान तुम्ही आपल्या बाळासोबत बोलू लागता तेव्हापासूनच मोठ्याने वाचून दाखवणे सुज्ञपणाचे ठरते. तुमचे न जन्मलेले किंवा नुकतेच जन्मलेले बाळ सुरवातीला तुम्ही काय बोलता हे समजू शकणार नाही; तरीसुद्धा यामुळे घडून येणारे संभाव्य दीर्घकालीन लाभ तुमचे प्रयत्न सार्थक करतील. नीतिसूत्रे २२:६ म्हणते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”
अनुरूप व त्याचवेळेस लाभदायकही असणारे कोणते साहित्य वाचता येण्याजोगे आहे? तुमच्या बाळासाठी दररोज मोठ्याने बायबल वाचा. शिवाय इतर यथायोग्य प्रकाशने, उदाहरणार्थ, थोर शिक्षकाचे ऐका, बायबल कथांचं माझं पुस्तक, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य व टेहळणीबुरुज तसेच सावध राहा! नियतकालिकांतील लेख देखील वाचा.
असे करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वेळ काढावा लागेल हे खरे असले तरीसुद्धा अशाप्रकारे घालवलेला वेळ नक्कीच व्यर्थ नाही. तुम्हाला आपल्या बाळाबद्दल असलेली काळजी व प्रेम व्यक्त करण्याचा हा एक सहजसोपा मार्ग आहे.