स्पॅनिश बायबलकरता कॉसयोडोरो डी रेनॉ यांचा संघर्ष
स्पेनमध्ये सोळाव्या शतकाच्या सुमारास बायबलचे वाचन करणे अत्यंत धोकादायक होते. कॅथलिक चर्चने, कर्मठवादाविरुद्ध उठणारी अतिमंद ज्योत झळकताच ती विझवण्याची सूचना धर्म विचारिणी सभेस दिली होती. परंतु, दक्षिण स्पेनमधील एका युवकाने केवळ शास्त्रवचनेच वाचली नाहीत तर स्पेनच्या प्रत्येक रहिवाशास त्या शास्त्रवचनांचे वाचन करता यावे म्हणून त्याने त्यांचे प्रादेशिक भाषेत भाषांतर करण्याची प्रतिज्ञाही केली. त्याचे नाव होते कॉसयोडोरो डी रेनॉ.
रेनॉ यांची बायबलमधील आस्था, स्पेनमध्ये सेविलच्या सीमेवर वसणाऱ्या सॉन ईसीड्रो डेल कॉम्पो येथील मठात त्यांनी घालवलेल्या वर्षांदरम्यान जागरूक झाली. १५५० च्या दशकादरम्यान या असामान्य मठातील बहुसंख्य मठवासी आपली अधिकृत कामगिरी पूर्ण करण्याऐवजी शास्त्रवचने वाचण्यातच अनेक तास खर्च करत होते. मग बायबलच्या संदेशाने त्यांची विचारसरणी बदलली. मूर्तींच्या वापराबद्दल आणि मरणोत्तर प्रायश्चित भूमीच्या विश्वासासंबंधी असणारी कॅथलिक तत्त्वे त्यांनी नाकारली. शेवटी, परिसरात त्यांचे विचार ज्ञात झाले आणि मग स्पेनच्या धर्म विचारिणी सभेद्वारे अटक केल्या जाण्याच्या भीतीने त्यांनी परदेशी पलायन करण्याचे ठरवले. स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे यशस्वीरित्या पसार झालेल्या १२ जणांपैकी रेनॉ हे एक होते.
शिकस्तीने झालेल्या या सुटकेनंतर आपला छळ करणाऱ्यांपासून चार हात लांब राहण्यात कसेतरी यशस्वी व्हावे, याकरता युरोपच्या एका शहरातून दुसऱ्या शहरात त्यांनी प्रवास केला. १५६२ साली विफल झालेल्या धर्म विचारिणी सभेच्या सभासदांनी सेविलमध्ये त्यांची प्रतिमा जाळली, परंतु त्या क्रूर दहशतीमुळे देखील रेनॉ यांनी शास्त्रवचनांचे भाषांतर करण्याच्या आपल्या नियुक्त कार्यापासून कच खाल्ली नाही. त्यांचा छळ करणाऱ्यांनी त्यांना पकडण्याकरिता बक्षीस जाहीर केले होते आणि अटक करण्याच्या भीतीत सतत राहात असताही त्यांनी स्पॅनिश भाषेत भाषांतर करण्याकरिता अविश्रांत कार्य केले. “मी आजारी होतो किंवा प्रवास करत होतो त्या समयांव्यतिरिक्त, . . . मी लेखणी खाली ठेवलीच नाही.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
रेनॉ यांनी दहा वर्षांत आपले कार्य पूर्ण केले. सन १५६९ रोजी स्वित्झर्लंडमधील बास्ल येथे, त्यांनी भाषांतर केलेले संपूर्ण बायबल प्रकाशित झाले. हे उठावदार कार्य, मूळ भाषांतून स्पॅनिश भाषेत केलेल्या अनेक भाषांतरांमधील सर्वांगीण असे पहिलेच भाषांतर होते. अनेक शतकांपर्यंत लॅटिन बायबल उपलब्ध होते परंतु, लॅटिन ही काही निवडक उच्चभ्रू लोकांचीच भाषा होती. प्रत्येकाला बायबल समजलेच पाहिजे हा रेनॉ यांचा दृढ संकल्प होता आणि ते लक्ष्य गाठण्याकरिता त्यांनी आपला जीव जोखीमेत घातला.
त्यांच्या भाषांतराच्या प्रस्तावनेत त्यांनी आपल्या कारणांचे स्पष्टीकरण दिले. ”पवित्र शास्त्रवचनांचे सामान्य भाषेत भाषांतर करण्यास निषेध करणे हे अपरिहार्यपणे देवाचा अतिशय अपमान करते शिवाय मानवाच्या हिताकरिता ते धोकेदायक आहे. हे स्पष्टपणे सैतानाचे व ज्यांच्यावर त्याचे नियंत्रण आहे अशांचे कार्य आहे. . . . देवाने आपले वचन, सर्वांनी ते समजून घ्यावे व व्यावहारिकरित्या ते लागू करावे या उद्देशाने मानवास दिले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेता जो कोणी त्याचे कोणत्याही भाषेत भाषांतर करण्यास निषेध करील त्याचा हेतू निश्चितच चांगला असू शकत नाही.”
हे विधान निश्चितच धाडसाचे होते कारण स्पेनच्या धर्म विचारिणी सभेच्या निषिद्ध पुस्तक यादीने “कॅसटिलियन भाषेत [स्पॅनिश] किंवा इतर कोणत्याही प्रादेशिक भाषेत” बायबलचे भाषांतर करणे विधिबहिष्कृत केल्यानंतर केवळ १८ वर्षांनंतरच हे विधान प्रकाशित झाले. रेनॉ यांनी मनुष्याच्या भीतीला वश होऊन सत्यावरील आपल्या प्रेमाला लगाम घालू दिला नाही हे अगदी उघड आहे.
स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांना बायबल उपलब्ध करून देण्याच्या उत्कट इच्छेव्यतिरिक्त, रेनॉ यांना होताहोईल तितके सर्वात अचूक भाषांतर करण्याचीही इच्छा होती. त्यांच्या प्रस्तावनेत, त्यांनी मूळ भाषांतून थेटपणे भाषांतर करण्याचे फायदे विशद केले. बायबलच्या लॅटिन भाषांतरात काही चुका नकळत राहिल्याचे स्पष्टीकरण रेनॉ यांनी दिले. यांपैकी चटकन नजरेत येणारी चूक म्हणजे ईश्वरी नामाचे निष्कासन, ही होय.
स्पॅनिश भाषांतरांत ईश्वरी नाम
रेनॉ यांना याची जाणीव झाली की देवाचे नाव यहोवा, हे मूळ लिखाणामध्ये जसे आढळते त्याचप्रकारे प्रामाणिकपणे व इमाने इतबारे केलेल्या बायबलच्या कोणत्याही भाषांतरातही ते आलेच पाहिजे. ईश्वरी नामाच्या ठिकाणी “देव” किंवा “प्रभू” यांसारख्या पदव्या घालण्याची प्रथा अनुसरण्याचे त्यांनी नाकारले. त्यांच्या भाषांतराच्या प्रस्तावनेत त्यांनी आपली कारणे अगदी तडकपणे स्पष्ट केली.
“आम्ही (Iehoua) हे नाम, सर्वात प्रबळ अशी कारणे असल्याशिवाय तसे ठेवलेले नाही. प्रथम म्हणजे, आमच्या भाषांतरात जेथे कोठे ते आढळते, त्याचप्रमाणे इब्री लिखाणामध्येही ते आढळते आणि काहीएक कमी करता कामा नये किंवा काहीही भर घालता कामा नये . . . असे आज्ञापिलेल्या देवाच्या नियमाबद्दल बेईमान होऊ नये व त्याचा पावित्र्यभंग करू नये म्हणून आम्हाला ते नाम वगळता किंवा बदलताही येत नाही, असे आमचे मत आहे. दियाबलाने चालवलेली ही प्रथा [ते नाम वगळण्याची], आधुनिक गुरूंच्या अंधश्रद्धेमुळे उदयास आली, जे त्याला पूज्य मानण्याचा दावा करतात परंतु खरे तर त्यांनी ते पवित्र नाम स्मृतिशेष केले आहे व ज्याद्वारे देवाला इतर सर्व . . . दैवतांपासून स्वतःस अलग करण्याची इच्छा होती तेच नाम त्यांनी देवाच्या लोकांच्या मनांतून पुसून टाकले आहे.”
देवाचे नाम गौरविण्याच्या रेनॉ यांच्या स्तुत्य आकांक्षेचे दूरगामी परिणाम उत्पन्न झाले. आज आपल्या काळापर्यंतही, अफाट अशा बहुसंख्य स्पॅनिश भाषांतरांनी—कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट दोहोंनी—शेवटपर्यंत ईश्वरी नामाचा वापर करण्याचे हेच पूर्वोदाहरण अनुसरले आहे. मुख्यतः, रेनॉ यांच्यामुळेच देवाला एक व्यक्तिगत नाव आहे जे इतर सर्व दैवतांपासून त्याला विभेद्य करते, हे बायबलच्या कोणत्याही स्पॅनिश भाषांतराच्या वाचकांच्या त्वरित लक्षात येऊ शकते.
लक्षवेधक गोष्ट ही, की रेनॉ यांच्या बायबलच्या मुखपृष्ठावर इब्री भाषेतील यहोवाचे नाम अगदी सुस्पष्टपणे दिसून येते. रेनॉ यांनी आपला जीवनक्रम देवाचे वचन जतन करण्याच्या उदात्त कारणास्तव समर्पित केला व करोडो लोक वाचू शकतील अशा एका भाषेत ते उपलब्ध केले.