हिंसाचार सर्वत्र आहे
सिग्नलचा हिरवा दिवा लागण्याची वाट पाहत आपल्या कारमध्ये बसलेल्या चालकाला अचानक दिसले, की एक धिप्पाड मनुष्य, शिव्या देत व हवेत हातवारे करत त्याच्या दिशेने येत होता. चालकाने घाईघाईने कारचे दरवाजे लॉक केले आणि खिडक्या बंद केल्या, पण तो धिप्पाड मनुष्य जवळ येतच राहिला. कारजवळ पोहंचल्यावर त्याने कारला गदागदा हालवले आणि कारचा दरवाजा ओढला. शेवटी, रागामुळे त्याने कारच्या समोरच्या काचेवर जोराने ठोसा दिला आणि काचेचा चुराचुरा केला.
हे दृश्य कोणत्यातरी थरारक सिनेमातले आहे का? नाही! प्रशांत, आरामशीर वातावरणासाठी नावाजलेल्या हवाईच्या, ओहाऊ द्वीपावरील रस्त्यावर झालेल्या एका वादाचे हे दृश्य आहे.
यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. दरवाजांवरील कडीकोयंडे, खिडक्यांचे गज, इमारतींमधील सुरक्षा कर्मचारीवर्ग आणि “ड्रायवरकडे रक्कम नाही” अशी बसवर लिहिलेली चिन्हे सुद्धा—एकच गोष्ट दर्शवितात: हिंसाचार सर्वत्र आहे!
घरामधील हिंसाचार
घर एखाद्या व्यक्तीचे सुरक्षित स्थान आहे असे अनेक वर्षांपासून समजले जाते. परंतु, हे वर्णनात्मक चित्र जलदगतीने बदलत चालले आहे. कौटुंबिक हिंसाचार ज्यामध्ये मुलांना दिलेली गैरवागणूक, विवाहसोबत्याला मारहाण आणि मनुष्यवध यांचा समावेश होतो, संपूर्ण जगभरात ठळक बातम्या म्हणून छापला जातो.
उदाहरणार्थ, “घरगुती हिंसाचाराला बळी पडल्यामुळे ब्रिटनमध्ये, निदान ७,५०,००० मुलांवर दीर्घकालीन आघात होईल,” असे मॅन्चेस्टर गार्डियन वीकली हे साप्ताहिक म्हणते. हा अहवाल एका सर्वेक्षणावर आधारित होता ज्यामध्ये असेही दिसून आले, की “चौकशी केलेल्या चार स्त्रियांपैकी तिघी जणींनी म्हटले की त्यांच्या मुलांनी हिंसक प्रसंग पाहिले होते आणि जवळजवळ दोन तृतीयांश मुलांनी आपल्या आईला मारहाण केली जात असल्याचे पाहिले होते.” त्याचप्रकारे, यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट अनुसार, बाल दुर्व्यवहार आणि उपेक्षेवरील संयुक्त संस्थान सल्लागार बोर्ड अंदाज लावतो, की “पालक किंवा राखणदार यांच्या हातून प्रत्येक वर्षी ४ वर्षांखालील २,००० मुले दगावतात.” हे रस्त्यांवरील दुर्घटना, बुडून अथवा पडून होणाऱ्या मृत्यूच्या संख्येच्या कैकपटीने जास्त असल्याचे अहवाल म्हणतो.
घरगुती हिंसाचारामध्ये वैवाहिक सोबत्याशी गैरवर्तनाचा देखील समावेश होतो, ज्यात ढकलणे, रेटारेटी करण्यापासून थोबाडीत मारणे, लाथाडणे, गुदमरून मारणे, फटके देणे, चाकू किंवा बंदुकीचा धाक दाखवणे किंवा ठार मारण्यापर्यंतचे सर्वकाही येते. आणि आज अशा प्रकारचा हिंसाचार दोघांकडून होत आहे. एका अभ्यासात दिसून आले, की जोडप्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या अहवालापैकी एक चतुर्थांश प्रकरणांची सुरवात पुरुष करतात तर आणखी एक चतुर्थांश प्रकरणांची सुरवात स्त्रिया करतात आणि उरलेल्यांचे वर्णन धिंगाणे असे करणे उत्तम, कारण त्यामध्ये दोन्ही पक्षांचा दोष असतो.
नोकरीच्या ठिकाणी हिंसाचार
घराव्यतिरिक्त कामाचे ठिकाण पारंपारिकपणे असे ठिकाण आहे जेथे एका व्यक्तीला व्यवस्था, आदर आणि सौजन्य प्राप्त होते. पण आता तेही तसे राहिलेले नाही. उदाहरणार्थ, संयुक्त संस्थान न्याय विभागाने प्रकाशित केलेली सांख्यिकी दाखवते, की दर वर्षी ९,७०,००० पेक्षा अधिक लोक कामाच्या ठिकाणी होणाऱ्या हिंसक गुन्हेगारीला बळी पडतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, प्रोफेशनल सेफ्टी—जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ सेफ्टी इंजिनियर्स अनुसार, “चार कामगारांपैकी एक कामगार कामाच्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडण्याची संभावना असू शकते.”
कामाच्या ठिकाणी होणारा हिंसाचार बाचाबाची आणि लांच्छन इतपत मर्यादित नाही ही गोष्ट अधिक त्रासदायक आहे. तोच अहवाल पुढे म्हणतो: “संयुक्त संस्थानामध्ये, मालक आणि कामगारांविरुद्ध खासकरून इतर कामगारांनी केलेला हिंसाचार सर्वात जलदगतीने वाढणारा मनुष्यवधाचा प्रकार आहे.” सन १९९२ मध्ये, ६ कामासंबंधित मृत्यूंपैकी एक मनुष्यवध होता; स्त्रियांकरता, जवळजवळ २ पैकी १ अशी संख्या होती. एकेकाळी सुव्यवस्थित असलेल्या कामाच्या ठिकाणी हिंसाचाराची लाट वाहत असल्याचे कोणीही अमान्य करणार नाही.
क्रिडा आणि मनोरंजनामधील हिंसाचार
जीवनाच्या अधिक गंभीर उद्यमांकरीता एखाद्या व्यक्तीच्या करमणुकीसाठी किंवा तिला तजेला देण्यासाठी म्हणून क्रिडा आणि मनोरंजनात भाग घेतला जातो. आज करमणूक कोट्यावधी रुपयांचा उद्योग आहे. या लाभप्रद बाजारपेठेतून होता होईल तितका नफा मिळवण्यासाठी करमणुकीचा पुरवठा करणाऱ्यांना त्यांचा माल खपवला जाईल अशी कोणतीही पद्धत वापरण्यास संदेह वाटत नाही. व त्यातील एक पद्धत हिंसाचार आहे.
उदाहरणार्थ, फोर्ब्स नावाच्या एका व्यापारविषयक नियतकालिकाने अहवाल दिला, की व्हिडिओ खेळाच्या एका निर्मात्याकडे एक सुप्रसिद्ध युद्ध खेळ आहे ज्यामध्ये एक योद्धा त्याच्या विरोधकाचे डोके आणि पाठीचा कणा चिरतो आणि पाहणारे, “त्याला खलास कर! खलास कर!” असे ओरडत असतात. एका स्पर्धक कंपनीसाठी त्या खेळाचाच दुसरा भाग बनवण्यात आला पण त्यामध्ये ते अघोर दृश्य नाही. परिणाम? जास्त हिंसा असलेला भाग त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या भागापेक्षा ३ पैकी २ या प्रमाणाने विक्रीस जातो. याचा अर्थ, पैसाच पैसा. घरातील टी.व्ही वर पाहण्यासाठी खासपणे तयार केलेले या खेळांचे भाग बाजारात आले तेव्हा, पहिल्या दोन आठवड्यांमध्ये कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय प्रमाणात एकूण ६५० लाख डॉलर नफा मिळवला! नफा समाविष्ट असतो तेव्हा हिंसाचार उपभोक्त्यांसाठी आणखी एक आमिष आहे.
क्रिडेतील हिंसाचार दुसरी एक बाब आहे. खेळाडू जेव्हा नासधूस करतात तेव्हा त्यांना त्याचा अभिमान वाटतो. उदाहरणार्थ, १९९० मध्ये एका हॉकीच्या खेळात ८६ पेनाल्टी होत्या—सर्वात अधिक पेनाल्टी. हिंसाचारयुक्त अशांततेमुळे त्या खेळामध्ये साडेतीन तास व्यत्यय होता. एका खेळाडूच्या जबड्याचे हाड मोडल्यामुळे, पुरःपटल ओरबडून काढल्यामुळे व वार केल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आला. का बरे इतकी हिंसा? एका खेळाडूने सांगितले: “पुष्कळ हाणामारी असलेला एखादा भावनिक खेळ जिंकल्यानंतर तुम्हाला तुमच्या संघातील खेळाडूंच्या अधिक जवळ असल्यासारखे वाटते. हाणामारीनेच या खेळाला खरोखर एक आध्यात्मिक खेळ बनवले, असे मला वाटले.” आजच्या क्रीडांमध्ये पाहू जाता असे दिसते की हिंसाचार, परिणाम अपेक्षिण्याचे एक माध्यम नव्हे तर स्वतः एक परिमाण बनला आहे.
शाळेमधील हिंसाचार
शाळेकडे नेहमी अशा दृष्टिकोनातून पाहिले जाते, की जेथे तरुण लोक त्यांच्या सर्व चिंता मागे टाकून त्यांचे मन आणि शरीरे विकसित करण्यावर एकाग्र होऊ शकतात. परंतु, आज शाळा अशा प्रकारचे सुरक्षित ठिकाण राहिलेले नाही. १९९४ मध्ये एका मतनोंदणीकरवी असे दिसून आले, की संयुक्त संस्थानातील सार्वजनिक शाळांमध्ये हिंसाचार आणि टोळ्यांची समस्या पहिल्या क्रमांकाची समस्या आहे, जिने गत वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेल्या आर्थिकता या समस्येला मागे टाकले. म्हणजेच परिस्थिती खरोखर किती प्रमाणात बिकट झाली आहे?
“शाळेमध्ये किंवा शाळेच्या आसपास घडलेल्या एखाद्या हिंसक कृत्याला तुम्ही कधी बळी पडला आहात का?” या सर्वेक्षणात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक ४ पैकी १ विद्यार्थ्याने होय असे दिले. एक दशांशापेक्षा अधिक शिक्षकांनी देखील या प्रश्नाचे होय असे उत्तर दिले. त्याच सर्वेक्षणात दिसून आले, की विद्यार्थ्यांपैकीच्या १३ टक्के मुलामुलींनी शाळेमध्ये कधीकधी शस्त्र जवळ बाळगल्याचे कबूल केले. त्यांच्यातील बहुतेकांचा दावा होता की त्यांनी इतरांवर आपली छाप पाडण्यासाठी किंवा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी असे केले होते. पण एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने त्याचा शिक्षक त्याच्याकडून त्याची बंदूक घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या छातीत गोळ्या झाडल्या.
हिंसक संस्कृती
हिंसाचार सर्वत्र आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. घरामध्ये, नोकरीवर, शाळेत आणि मनोरंजनामध्ये देखील आपण एका हिंसक संस्कृतीला तोंड देतो. दररोजच त्याची झळ लागत असल्यामुळे अनेक जणांनी—त्याला बळी पडेपर्यंत—त्याचा एक सामान्य गोष्ट म्हणून स्वीकार केला आहे. आणि मग ते विचारतात, तो कधी समाप्त होईल का? तुम्हालाही त्याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे का? मग कृपया पुढील लेख वाचा.