वाचकांचे प्रश्न
इफिसकर ३:१४, १५ म्हणते की, देवापासून “आकाशातल्या व पृथ्वीवरल्या प्रत्येक कुटुंबाला नाव मिळाले आहे.” (पंडिता रमाबाई भाषांतर) स्वर्गात कुटुंबे आहेत का आणि कोणत्याही प्रकारे प्रत्येक कुटुंबाला यहोवापासून नाव मिळते का?
माता, पिता व मुले यांनी मिळून बनलेली—पृथ्वीवर जशी कुटुंबे आहेत, तशी सर्व दैहिकरित्या एकमेकांशी संबंधित असलेली कुटुंबे स्वर्गात नाहीत. (लूक २४:३९; १ करिंथकर १५:५०) देवदूत विवाहबद्ध होत नाहीत असे येशूने स्पष्टरित्या दर्शविले व कोणतीही गोष्ट हे सूचित करत नाही की ते संतती उत्पन्न करतील.—मत्तय २२:३०.
तथापि, यहोवा देव त्याच्या स्वर्गीय संघटनेशी, लाक्षणिकरित्या विवाहबद्ध झाल्याचे बायबल सांगते. एका आध्यात्मिक अर्थाने तो विवाहित आहे. (यशया ५४:५) ही स्वर्गीय संघटना, संतती उत्पन्न करते, जसे की देवदूत. (ईयोब १:६; २:१; ३८:४-७) या अर्थाने मग, स्वर्गात एक विस्मयकारक आध्यात्मिक कुटुंब अस्तित्वात आहे.
याशिवाय, येशू ख्रिस्त व १,४४,००० यांची मिळून बनलेली त्याची मंडळीय वधू, यांचे एक नवीन लाक्षणिक कुटुंब स्वर्गात विकसित होत आहे. (२ करिंथकर ११:२) या अभिषिक्तांपैकी अनेकजण, स्वर्गीय जीवन आपल्या दृष्टीसमोर ठेवून आधीच मृत्यू पावले आहेत. काही अद्याप पृथ्वीवर जिवंत आहेत. हे सगळे स्वर्गातील, ‘कोकऱ्याच्या लग्नाची’ आतुरतेने वाट पाहात आहेत. बायबल त्या लग्नाचा संबंध, जवळ येत असलेल्या मोठ्या संकटाच्या घटकेशी लावते—मोठ्या बाबेलचा नाश आणि मग बाकीच्या सैतानी व्यवस्थीकरणाचे निष्कासन.—प्रकटीकरण १८:२-५; १९:२, ७, ११-२१; मत्तय २४:२१.
पार्थिव कुटुंबांबाबत, वैयक्तिकरित्या, प्रत्येक कौटुंबिक गटाला थेट यहोवापासून नाव प्राप्त होते असे इफिसकर ३:१५ मध्ये प्रेषित पौल सूचित करत नाही. या उलट, हे उघड आहे की पौलाच्या मनात, विस्तारित कौटुंबिक वंशावळी आहेत, ज्या एखादे नाव जतन करतात. यहोशवा ७:१६-१९ एक उदाहरण पुरवते. यहोवा तेथे आखानाचे पाप उघड करत होता. प्रथम दोष, यहूदा वंशावर केंद्रित किंवा त्यापर्यंतच सीमित होता. नंतर हा दोष जेरह कुळापर्यंत मर्यादित केला गेला. शेवटी आखानाच्या घराण्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. आखान, त्याच्याबरोबर त्याची पत्नी व मुले यांना, आखानाचे आजोबा, जब्दी, यांच्या घराण्याचा (किंवा, कुटुंबाचा) भाग असल्याचे ओळखले किंवा म्हटले जात होते. तेच कुटुंब नंतर एक विस्तारित गट होते, ज्याने त्यांचा पूर्वज जेरहाचे नाम जतन केले होते.
इब्री लोकांमध्ये, अशा प्रकारच्या कौटुंबिक वंशावळी अत्यंत महत्त्वाच्या असून, पुष्कळांची बायबल यादीत नोंदही आहे. लेवीय नियमाखालील विवाह किंवा दीराबरोबरील विवाहाद्वारे, वारसदारांना आपल्या कुटुंबाचे आडनाव पुढे चालवण्यासाठी, यहोवाने आवश्यक असेल तेथे तरतूद करून त्यांच्या जतन करण्याच्या प्रयत्नाला पाठबळ दिले.—उत्पत्ति ३८:८, ९; अनुवाद २५:५, ६.
अशाच प्रकारच्या मोठ्या व विस्तारित कुटुंबांचे आणखी एक उदाहरण म्हणून, दावीदाचा पुत्र येशू, याचे उदाहरण विचारात घ्या. तो नक्कीच दावीद राजाचे प्रत्यक्ष संतान नसून, दावीदाचा मृत्यू झाल्यावर शतकांनंतर त्याचा जन्म झाला. तरीसुद्धा, मशीहाचे एक ओळखचिन्ह हे होते, की तो दावीदाच्या घराण्यातला असावयाचा होता, जे सर्वसाधारणपणे यहुद्यांना माहीत होते. (मत्तय २२:४२) येशूची माता व त्याचा दत्तक पिता, ह्या दोघांद्वारे तो दावीदाच्या वंशावळीतला होता.—मत्तय १:१; लूक २:४.
परंतु, अशा ह्या कुटुंबांना देवापासून नाव कसे काय प्राप्त होते? वस्तुस्थिती अशी आहे, की असे काही थोडकेच प्रसंग होते—जसे अब्राहाम व इसहाक यांच्या बाबतीत—जेव्हा यहोवाने खरोखरच एका कुटुंब प्रमुखाला नाव दिले होते. (उत्पत्ति १७:५, १९) परंतु हे अपवाद होते. बहुतेककरून यहोवा, प्रत्येक कुटुंबाला, वारशाने प्राप्त होणारे आडनाव देत नाही.
अर्थात, यहोवाने जेव्हा आदाम आणि हव्वेला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका,” ही आज्ञा दिली, तेव्हाच त्याने मानवी कौटुंबिक संस्थेची सुरवात केली. (उत्पत्ति १:२८) आणि यहोवाने अपरिपूर्ण आदाम आणि हव्वेला, संतती उत्पन्न करण्यास मुभा देऊन, सर्व मानवी कुटुंबांसाठी पाया रचला. (उत्पत्ति ५:३) यास्तव, एकापेक्षा जास्त अर्थाने, देवाला कौटुंबिक नावांचा उगम असल्याचे म्हणता येईल.
आज अनेक संस्कृतींमध्ये, कुटुंबांची नावे पिढ्यांपिढ्या सजीव ठेवण्याची गरज आता भासत नाही. तथापि, सर्व राष्ट्रांमध्ये ख्रिस्ती, कौटुंबिक व्यवस्थेसाठी यहोवाचे आभार मानतात, आणि आपले वैयक्तिक कौटुंबिक घटक यशस्वी करण्यासाठी जोराचा यत्न करून ते त्याचा सन्मान करतात.