निऊमधील राज्य सभागृह पाहा!
निऊ, हे दक्षिण पॅसिफिकवरील एक लहानसे प्रवाळद्वीप आहे जे न्यूझीलंडच्या ईशान्येपासून २,१६० किलोमीटरच्या अंतरावर आहे. एका पर्यटन माहितीपत्रकानुसार, निऊ हे नाव दोन शब्दांतून येते, नऊ, ज्याचा अर्थ “नारळाचे झाड,” आणि ई, ज्याचा अर्थ “पाहा” किंवा “बघा.” ते माहितीपत्रक म्हणते: “दंतकथेनुसार, पहिल्या पॉलीनेशियन स्थायिकांनी या प्रदेशावर वाढणारी नारळाची झाडे पाहून पहिल्यांदा उद्गारलेले हे शब्द आहेत.”
“ई! फाले ही काऊटू हा माऊटोलू!” म्हणजे, “आमचे राज्य सभागृह पाहा!” असे आज अभ्यागतांना सांगण्यास यहोवाच्या साक्षीदारांना अभिमान वाटतो. या सभागृहासाठी त्यांच्या इतक्या गाढ भावना का आहेत बरे? सर्व ठिकाणच्या यहोवाच्या साक्षीदारांना, विशेषकरून त्यांनी स्वतःहून राज्य सभागृह बांधलेला असेल तर त्याच्याबद्दल त्यांना अभिमान वाटतो. पण, विस्तारीत दक्षिण पॅसिफिकच्या मध्यावर आणि एका दूरच्या द्वीपावर राज्य सभागृह बांधणे एक दुसरी बाब आहे. कारण, निऊ केवळ २६० किलोमीटरपर्यंत विस्तारीत आहे आणि संपूर्ण द्वीपावर केवळ २,३०० लोक आहेत.
राज्य सभागृह कोण बांधेल हा प्रश्न सर्वांसमोर होता. निऊमधील एका मंडळीत केवळ ३२ साक्षीदार आहेत. आवश्यक असलेली सर्व सामग्री, जसे की ट्रक, बुलडोझर आणि क्रेन या गोष्टी सरकारच्या मालकीच्या आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे, बांधकामास लागणारी सर्व सामग्री—जसे की पोलाद, काँक्रीट ठोकळे, छप्परासाठी लागणारे साहित्य, विद्युत आणि नळकामाचे साहित्य, ध्वनिसामग्री आणि खुर्च्या—नाहीतरी न्यूझीलंडपासून जहाजानेच आणावे लागणार होते. आणि जहाज वाहतूक तर प्रत्येक पाच आठवड्यांमधून एकदाच होत असते. शिवाय, द्वीपावरील खडकाळ पृष्ठभूमीवर बांधकाम करणे कठीणच होते आणि सभागृह असे बांधायचे होते की ते उष्णकटिबंधीय वादळांत टिकाव धरू शकेल. खरोखरच, ते कोणासाठीही जबरदस्त कार्य होते!
पण, येथे एक मोठा फरक होता. यहोवाच्या साक्षीदारांसाठी, राज्य सभागृह स्थानिकरीत्या खऱ्या उपासनेचे एक केंद्र आहे व ते मार्गदर्शनासाठी आणि मदतीसाठी यहोवाकडे पाहतात. (स्तोत्र ५६:११; १२७:१) ऑकलंडमधील निऊन मंडळीच्या सदस्यांसोबत न्यूझीलंडच्या ख्रिस्ती बांधवांनी निऊमधील साक्षीदारांच्या लहानशा गटाच्या मदतीला येऊन बांधकाम प्रकल्पाला पूर्ण अंतःकरणाने पाठिंबा दिला.
कार्यवाही करण्याचा निर्णय
जून १९९४ मध्ये, रोटोरूआ, न्यूझीलंड येथे राज्य सभागृहाचे बांधकाम चाललेल्या ठिकाणी, निऊ प्रकल्पात भाग घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी हाक देण्यात आली. आश्चर्याची गोष्ट अशी, की २०० ख्रिस्ती बंधू आणि भगिनी या स्वयंसेवेसाठी पुढे आल्या. यातून, ८० लोकांना निवडण्यात आले ज्यामध्ये सुतार, पोलाद कामगार, नळकाम करणारे, छप्पर बसवणारे, प्लास्टर करणारे, रंगारी, विद्युत कामे करणारे, ध्वनी तंत्रज्ञ, काँक्रीट कामगार, विटा रचणारे आणि कामगार या सर्वांचा समावेश होता.
बांधवांनी यहोवावर भरवसा ठेवून आखणी केली व कार्याला आरंभ केला. मंडळीतील दोन वडिलांपैकी एक स्थानिक व्यापारी आहेत, त्यांनी लागणाऱ्या सर्व साहित्यांच्या जहाज वाहतुकीची योजना करण्यास सुरवात केली. स्वेच्छेने आपला खर्च करू पाहणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांसाठी विमानाच्या तिकिटाचा तसेच त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेच्या खर्चाबद्दल संबंधित अशा वाटाघाटी करण्यात आल्या आणि बांधकाम करण्याच्या तारखा ठरवण्यात आल्या. हा प्रकल्प अवघ्या २० दिवसांमध्ये, मार्च ४ ते मार्च २३, १९९५ पर्यंत पूर्ण व्हावयाचा होता आणि पूर्ण झाल्यावर राज्य सभागृहाचे समर्पण होणार होते.
सर्व काही ठीकठाक करण्यासाठी न्यूझीलंडवरून एक आठवडा आधीच आलेले प्रकल्प नियोजक म्हणाले: “ज्या ठिकाणी सभागृह बांधायचे होते ती जागा पाहून मी सर्दच झालो. खालची सर्व खडकाळ जमीन आहे. पाया घालण्यासाठी ती खडकाळ जमीन खोदायलाच दोन आठवडे लागतील.” पण त्यांनी नंतर हे कबूल केले की, स्थानिक साक्षीदारांना त्यांनी चांगल्याप्रकारे ओळखले नव्हते. ते म्हणाले, “निऊन बांधवांना त्या खडकाची चांगलीच माहिती होती. कोणत्या जागी खडकावर मारल्यावर मोठमोठे तुकडे पडतील हे त्यांना चांगलेच माहीत आहे.” अवघ्या दोन दिवसांमध्ये पाया खणून झाला!
मार्च ४ रोजी, न्यूझीलंड साक्षीदारांनी भरलेले पहिले विमान आले आणि काँक्रीटचे काम पूर्ण करण्यात आले. जसजसा कामकऱ्यांचा गट येऊ लागला तसतशी प्रकल्पाची विविध कामे पूर्ण होत गेली. दिवसाच्या कामाची सुरवात सकाळी ७ वाजता दैनंदिन वचनावर संक्षिप्त चर्चा केल्यानंतर होत असे. काही बांधवांनी तर, ९७ डिग्री फॅरनहाईट इतकी उष्णता असूनसुद्धा दिवसाला १२ तास काम केले. सरतेशेवटी मार्च २३ रोजी, जमिनीवर भूदृश्याचे काम करण्यात आले. आंब्याच्या लाकडाचा एक आकर्षक फलक लावण्यात आला ज्याच्यावर “यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह” असे लिहिण्यात आले.
सहकार्य आणि आदरातिथ्याचा आत्मा
या प्रकल्पाच्या यशाला हातभार लावणारे महत्त्वपूर्ण कारण, निऊ येथील लोकांनी दिलेले सहकार्य हे होय. स्थानिक गावकऱ्यांनी हे दृश्य पाहून प्रोत्साहित होऊन अन्न व पैसे दान केले. पुष्कळांनी सभागृहाचे बांधकाम त्यांचा प्रकल्प आहे असे समजले. सरकारी अधिकाऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी अपेक्षेच्या पलीकडे मदत केली. आवश्यक असणारी सामग्री तसेच लाकूडकामाचा कारखाना देखील उपलब्ध करून देण्यात आला. एवढेच काय, आवश्यक असलेले सामानसुमान वेळेवर यावे याची खात्री करण्यासाठी जहाज वाहतुकीच्या कंपनीने त्यांचे जहाज पुन्हा पाठवले.
निऊन साक्षीदारांचे कठीण परिश्रम व आदरातिथ्य पाहून अभ्यागतांनी त्यांची प्रशंसा केली. या साक्षीदारांनी त्यांची घरे व त्यांच्या वस्तू त्यांना वापरावयास दिल्या. बांधकामासाठी आलेल्या एका कामकऱ्याने म्हटले, “स्थानिक बहिणी खूप चांगल्या होत्या.” दररोजच्या दुपारच्या गरमागरम जेवणाव्यतिरिक्त बहिणींनी दररोज सकाळी ६.३० वाजता न्याहरी दिली. काही बहिणी जेवण बनवण्यासाठी पहाटे ४.३० वाजता उठत होत्या. आणखी एका कामकऱ्याने म्हटले: “मला वाटते आमच्या घरापेक्षा आम्हाला येथे निऊनमध्येच चांगले वाटले.”
मार्च १० च्या निऊ स्टारने या घटनेचा अहवाल पहिल्याच पानावर मोठ्या ठळक अक्षरांमध्ये छापला, “निऊमधील पहिले राज्य सभागृह,” आणि सोबतच न्यूझीलंड आणि निऊचे रहिवाशी एकत्र मिळून कार्य करत असलेले चित्र देखील छापले. त्या बातमीत म्हटले होते, की ते सभागृह २८० चौरस मीटरचे असून त्यामध्ये ७० ते १०० लोकांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते. त्या लेखाने पुढे म्हटले: “हे बांधकाम खरे पाहता दोन [आठवड्यांमध्ये] पूर्ण करता येऊ शकते, पण याबाबतीत ते पुढे ढकलले जाईल. काम चालू करून केवळ दोन दिवसात पाया, चौकट, वासे आणि छप्पर लावण्याचे काम वेळेआधीच उरकण्यात आले.”
एका स्थानिक व्यापाऱ्याने, निऊ द्वीपावरील सर्वांनी तो प्रकल्प पाहून त्यातून धडा शिकून घ्यावा अशी त्याची इच्छा प्रकट केली. तो म्हणाला, की प्रेम आणि सहकार्यामुळे काय करता येऊ शकते ते यावरून दिसून येईल अशी मी आशा करतो.
समर्पणाला २०४ लोक उपस्थित होते. निऊन बांधव, भगिनी आणि मुलांनी सादर केलेली खास सादरता, उपस्थित असलेल्या सर्वांना प्रभावित करणारा अनुभव होता. या कार्यक्रमात नृत्य आणि संगिताद्वारे राज्य सभागृहाचे बांधकाम दाखवण्यात आले. बांधकाम केलेल्या गटाचे आणि यहोवाचे आभार प्रदर्शन करण्यात आले. कारण यहोवाच्या आत्म्यानेच, हा प्रकल्प साध्य करण्यासाठी मनांना, अंतःकरणांना आणि हातांना प्रवृत्त केले होते.—यशया ४०:२८-३१.