देण्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे का?
लोकांना देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या एकापेक्षा अधिक प्रेरणा आहेत हे तुम्ही पाहिले आहे का? एखादे बक्षीस, प्रीती, उदारता, गुणग्राहकतेची अभिव्यक्ती असेल. परंतु, कृपापसंतीच्या दृष्टीने पाहण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून एखादे बक्षीस येऊ शकते हे तुम्ही पाहिले नाही का? किंवा, केवळ कर्तव्याच्या भावनेमुळे वा देणाऱ्याला परत काहीतरी हवे असल्यामुळे ते दिले जाते.
बक्षीस, एखाद्या कागदात गुंडाळून त्यावर सुंदरशी रिबिन बांधलेली असेल. पण फुलांचा एखादा गुच्छ, अन्नाचा एखादा प्रकार किंवा एखादे दयाळू कृत्य देखील उत्तम बक्षीस होऊ शकते ही गोष्ट खरी नाही का? वास्तविक पाहता, ज्या बक्षिसाची खोलवर गुणग्राहकता बाळगली जाते त्यामध्ये स्वतःला देणे समाविष्ट आहे.
तुम्ही ज्याची कृपापसंती प्राप्त करू इच्छिता असा कोणी आहे का?
ज्याची कृपापसंती प्राप्त करण्यात येते त्याला बक्षीस देणे असामान्य नाही. काही देशांमध्ये एखादा तरुण पुरुष, त्याच्या भावी वधूचे मन जिंकण्यासाठी तिला फुले देईल. पण सुज्ञ स्त्री त्या बक्षिसामागचा हेतू पाहते. ती पाहते, की त्या तरुण पुरुषाने दिलेल्या बक्षिसामागचा हेतू प्रेम आहे, जे लग्नानंतरही त्याला तिचा प्रेमळ पती बनवू शकते. अशा प्रकारचे बक्षीस जर ईश्वरी आत्म्याला प्रतिबिंबित करत असेल तर देणारा आणि घेणारा या दोघांनाही आनंद मिळू शकतो.
बायबल एका प्रसंगाबद्दल सांगते जेव्हा नाबालाची पत्नी अबीगईलने दावीद हा देवाने निवडलेला इस्राएलचा भावी राजा असल्याचे ओळखून त्याच्यासाठी लागलीच उदार बक्षिसाची तयारी केली. तिने सुद्धा कृपापसंती मिळवण्याचा प्रयत्न केला. तिच्या पतीने दावीदाला झिडकारले व दावीदाच्या लोकांना फटकारले होते. सुमारे ४०० शस्त्रधारी लोकांच्या एका समूहाचा नेता होऊन दावीद नाबाल आणि त्याच्या घराण्याचा नाश करण्यास निघाला होता. अबीगईल मध्ये पडली व तिने लागलीच दाविद आणि त्याच्या लोकांसाठी उदारमनाने खाण्यासाठी अन्नाचे बक्षीस पाठवून दिले. बक्षीस पाठवल्यानंतर ती स्वतः दावीदाला भेटण्यास गेली व तिच्या पतीने जो व्यवहार केला होता त्याबद्दल नम्रपणे क्षमा मागून दावीदासोबत तिने जो तर्कवितर्क केला त्यावरून तिच्या सुज्ञतेचा पुरावा सादर केला.
तिचा हेतू उदात्त होता व त्याचा परिणामही चांगला निघाला. दावीदाने तिचे बक्षीस स्वीकारले व तिला म्हणाला: “आपल्या घरी सुखाने जा. पाहा मी तुझा शब्द ऐकला आहे व तुझी विनंती मान्य केली आहे.” नंतर नाबालाचा मृत्यू घडल्यावर, दावीदाने तिच्याशी लग्न करण्याची देखील इच्छा दर्शवली आणि तिने आनंदाने होकार दिला.—१ शमुवेल २५:१३-४२.
परंतु, काही बाबतीत एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या कृपापसंतीत कदाचित पक्षपातीपणा, न्यायाचा विपर्यास याचा देखील समावेश होऊ शकतो. अशा बाबतीत, बक्षीस म्हणजे लाच देणे होय. देणाऱ्याला वाटते, की त्याचा त्याला फायदा होईल पण तो स्वतःच्या मनाची शांती हिरावून घेतो. तेव्हा त्याने केलेले कृत्य इतरांना एक ना एक दिवस दिसून येईल ज्याच्याबद्दल त्याला जाब द्यावा लागेल हा एक धोका नेहमीच असतो. कृपापसंती मिळाली तरी, ज्याला ती मिळाली त्याला असे दिसून येईल की आता त्याची गणना अशा लोकांमध्ये होते की ज्यांचे हेतू संशयास्पद आहेत. ईश्वरी बुद्धी प्रतिबिंबित करत, बायबल आपल्याला अशा प्रकारच्या बक्षिसांविरुद्ध ताकीद देते.—अनुवाद १६:१९; उपदेशक ७:७.
बक्षीस स्वेच्छापूर्ण अंतःकरणातून येते का?
तुम्ही काही द्यावे असे इतरांनी तुम्हाला वाटू देण्यापेक्षा तुम्हाला वाटते म्हणून तुमच्या प्रिय व्यक्तीला काही देण्यामुळे अधिक आनंद प्राप्त होतो—यात काही शंका नाही.
भौतिकरीत्या गरजवंत सह ख्रिश्चनांसाठी मदत सामग्री गोळा करण्याविषयी प्रेषित पौलाने ईश्वरी देण्यातील काही सर्वोत्तम तत्त्वे मांडली. त्याने लिहिले: “उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसते तसे नाही.” तो पुढे म्हणाला: “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” (२ करिंथकर ८:१२; ९:७) अशा प्रकारे पुष्कळसे तुमच्यावर अवलंबून आहे. बक्षीस देण्याची मौज पुरी करण्यासाठी कर्जबाजारी होण्यापेक्षा, तुम्ही अंथरुण पाहून तुमचे पाय पसरता का? सामाजिक किंवा व्यापारी दबावामुळे प्रामुख्याने देण्यास भाग पडण्यापेक्षा तुम्ही मनापासून जे ठरवले आहे ते करता का? अशा ईश्वरी तत्त्वांना लागू करणाऱ्या प्रारंभीच्या ख्रिश्चनांबद्दल पौलाने लिहिले: “त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी.”—२ करिंथकर ८:४.
याच्या विरुद्धतेत, नाताळापूर्वीच्या आठवड्यांबद्दल नोव्हेंबर/डिसेंबर १९९४ च्या रॉयल बँक लेटरने म्हटले: “सुटीचा हंगाम, व्यापारी फायद्यांनी चेतवलेल्या वरकरणी अत्यानंदाची स्थिती असल्याचे समजला जातो जो गिऱ्हाईकांना इतरवेळी खरेदी करता येऊ शकणार नाही अशा वस्तू खरेदी करण्यास त्यांना प्रवृत्त करतो.” उधारीवर खरेदी केल्यानंतर, बक्षीस देत असताना जे समाधान मिळत असते ते, उधारी फेडताना झाकाळले जाते.
तुमची मुख्य चिंता—तो प्रसंग? की प्रेमाची एक अभिव्यक्ती?
तुम्हाला प्रसंगामुळे बहुतेककरून बक्षिसे द्यावी लागतात असे आढळून आले आहे का? असे आहे तर उत्स्फूर्तीने देण्यामध्ये जो आनंद आहे तो कदाचित तुम्ही गमावत आहात.
असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना काही विशिष्ट दिवशी बक्षीस देण्याचे परिणाम आवडत नाहीत. लेखिका असलेल्या एका मातेने कबूल केले, की मुलांना बक्षीस देण्याचा दिवस जसजसा जवळ येई तसे तिच्या मुलांमध्ये स्वार्थी भावना दिसून येत. तिने मान्य केले की सुंदरसे बक्षीस देण्याचा तिचा आनंद तिने काही वेगळेच अपेक्षिले होते त्यामुळे लोप पावला. मेजवान्या आणि बक्षिसांची देवाणघेवाण करण्याच्या सोहळ्यांमध्ये पुष्कळ भावनिक तणाव निर्माण होतो व मद्याचा दुरुपयोग केला जातो.
सुटीच्या काळात बक्षीस देण्यावर अधिक जोर दिल्याने काहीवेळा मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो याचे निरीक्षण करणाऱ्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी दिलेल्या शिफारशीचा द न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने संदर्भ घेतला की, “तणाव कमी करण्याचा मार्ग इतर दिवशी बक्षिसे देण्याचा विचार राखा.” असे केल्याने चांगले परिणाम होतील असे तुम्हाला वाटते का?
नाताळ आणि वाढदिवस साजरा न करणाऱ्या घरातील १२ वर्षीय टॅमीने लिहिले: “तुम्ही अपेक्षा करत नसताना एखादे बक्षीस मिळणे जास्त मजेशीर असते.” वर्षातून एकदा किंवा दोनदाच बक्षीस देण्याऐवजी तिचे पालक तिला आणि तिच्या भावाला वर्षातून अनेकदा बक्षीस देतात असे ती म्हणते. पण त्या बक्षिसांपेक्षा काही तरी महत्त्वपूर्ण आहे असे तिला वाटते. ती म्हणते, “माझे कुटुंब सुखी आहे.”
दृढ कुटुंबांचे मर्म (इंग्रजी) हे पुस्तक स्पष्टपणे सांगते: “आपल्यातील बहुतेक जण वर्षातून अनेकदा आपल्या प्रियजणांचा वाढदिवस, लग्नाचे वर्षदिन किंवा सुट्यांच्या निमित्ताने सर्वोत्तम बक्षीस निवडण्यात पैसा आणि वेळ खर्च करतात. सर्वांपेक्षा उत्तम बक्षिसाकरता पैशाची गरज नाही. आणि तुम्हाला ते बक्षीस गुंडाळावे सुद्धा लागणार नाही. बहुतेक लोक विश्वास करतात त्याप्रमाणे तुम्ही देखील, तुमचे जीवनच तुमच्याजवळचा सर्वात मौल्यवान ठेवा आहे असा विश्वास करत असाल तर तुम्ही देऊ शकाल असे सर्वात बहुमोल बक्षीस म्हणजे तुमच्या जीवनातील थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागेल. आपण आपल्या प्रियजणांसाठी जो वेळ खर्च करतो तेच बहुमूल्य बक्षीस आपण त्यांना देतो.”
तुमच्या स्वतःच्या कुटुंबाव्यतिरिक्त सुद्धा तुम्ही हे देणे देऊ शकता. इतरांची उघड गरज पूर्ण करण्यासाठी उत्स्फूर्त देणे विशेष तुष्टी प्रदान करील. गरीब, लंगडे आणि अंधळ्यांसाठी अशा प्रकारची प्रेमळ काळजी दाखवण्यास येशू ख्रिस्ताने आपल्याला आर्जवले, तसेच तो पुढे म्हणाला: “तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करावयास त्यांच्याजवळ काही नाही.”—लूक १४:१२-१४.
अलीकडेच, द रॉकलँड जर्नल-न्यूज (यु.एस.ए.) या वृत्तपत्राने अशा प्रकारच्या देण्याविषयीचे एक उदाहरण दिले. एका वृद्ध अंध स्त्रीचे घर कोसळले तेव्हा, तिच्या स्नेह्यांनी तिच्यासाठी नवीन घर बांधून दिले. पुष्कळ स्थानिक व्यापाऱ्यांनी वर्गण्या दिल्या व स्थानिक सरकार एजन्सीने द्रव्य अनुदान केले. “पण त्याहूनही सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे, हॅवरस्ट्रो येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत उपस्थित असलेल्या सुमारे १५० लोकांनी ते घर बांधून देण्यासाठी त्यांचा वेळ खर्च केला,” असे ते वृत्तपत्र म्हणते.
त्या लेखाने पुढे म्हटले: “बांधकाम चाललेल्या ठिकाणी बांधकाम सामग्रीचा ढीग होता आणि त्याच्याच शेजारी टेबलांवर अन्न होते. दोन दिवसांत कामकऱ्यांनी, तीन मजली इमारत, दोन फॅमिली अपार्टमेंट बांधले. . . . अल्पावधीत बांधकाम करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी यहोवाचे साक्षीदार प्रसिद्ध आहेत. . . . पण अशा प्रकारची जलदगती, त्यांच्या कार्याच्या स्थायित्वाच्या विरुद्धतेत आहे: प्रीतीच्या कार्यात टिकाऊपणा प्रदान करणे. मिस ब्लॅक्लेंना त्यांचे नवे घर पाहता येणार नाही पण त्या त्यांच्या हातांनी स्पर्श करू शकतात व या निःस्वार्थ कृत्यामुळे त्यांचे अंतःकरण किती भरून आले.”
संपूर्ण वर्षभर उदारतेचा आत्मा
जे खरोखरच उदार आहेत ते खास दिवसांची वाट पाहत थांबून राहत नाहीत. त्यांचे जीवन आत्मकेंद्रित नसते. त्यांना चांगले काही मिळाल्यास ते लगेचच इतरांबरोबर वाटून घेतात. याचा अर्थ ते सक्तीने बक्षीस देणारे आहेत असा होत नाही. त्यांच्या कुटुंबाला वंचित करण्याइतपत ते देतात असा त्याचा अर्थ होत नाही. बक्षीस मिळणाऱ्या व्यक्तीवर कोणता परिणाम होईल याचा जरा देखील विचार न करता बक्षीस देणे असा याचा अर्थ होत नाही. पण येशूने त्याच्या शिष्यांना ‘देण्याची सवय करा’ असे जे सांगितले त्याप्रमाणे वागणारे हे लोक आहेत.—लूक ६:३८.
ते वृद्ध, आजारी किंवा उत्तेजनाची आवश्यकता असलेल्या स्नेही आणि शेजाऱ्यांची परिस्थिती लक्षात घेतात. बाजारात जाणे किंवा घरकामात मदत करणे हेच त्यांचे “बक्षीस” असू शकते. ते बक्षीस, कदाचित लाकडे तोडणे किंवा साठलेल्या बर्फाचा ढीग फावड्याने काढणे हे असू शकते. ते, बनवलेले अन्न किंवा त्यांना भेटण्यासाठी व त्यांच्यासोबत वाचन करण्यास घालवलेला एखादा तास असू शकते. त्यांचे स्वतःचे जीवन अतिशय व्यग्र असेल पण इतरांना मदत करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही इतके ते व्यग्र नाहीत. “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” हे खरोखरच सत्य आहे ते त्यांनी अनुभवानिशी शिकले आहे.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.
आपला निर्माणकर्ता यहोवा देव, देणाऱ्यांमध्ये सर्वात महान आहे यात काही शंका नाही. “जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो.” (प्रेषितांची कृत्ये १७:२५) बायबलमध्ये, दुष्टाई, आजारपण आणि मृत्यूला काढून या पृथ्वीला एक परादीस बनवण्याचा त्याचा उद्देश आहे याबद्दलची सूक्ष्मदृष्टी देखील तो देतो. (स्तोत्र ३७:१०, ११; प्रकटीकरण २१:४, ५) हे सर्व काही शिकल्यावर उदार मनाचे लोक ही सुवार्ता स्वतःजवळच ठेवत नाहीत. इतरांना सांगण्यात मिळणारा आनंद सर्व आनंदात मोठा आहे. त्यांच्यात खरा ईश्वरी दातृत्वाचा आत्मा आहे. तुम्ही हाच आत्मा विकसित करत आहात का?
[७ पानांवरील चित्रं]
काही सर्वात बहुमूल्य बक्षिसांना पैसा लागत नाही