राज्य घोषकांचा वृत्तान्त
साक्षकार्य घरात व शाळेत फलप्राप्ती आणते
ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात दुसऱ्यांचे चांगले करणे विशेषतः त्यांच्या सोबत सुवार्तेची सहभागिता करणे याचा समावेश होतो. नीतिसूत्रे ३:२७ म्हणते: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.” अर्जेंटिनात, माध्यमिक शाळेच्या तिसऱ्या वर्षात असलेल्या एका तरुण साक्षीदारास त्याच्या शाळकरी मित्राला राज्याची सुवार्ता सांगण्याची इच्छा होती. त्याने असे केल्यामुळे दीर्घकालीन फायदे घडून आले.
एके दिवशी त्या तरुण साक्षीदाराने त्याच्या मित्राला सहज म्हटले, की सर्वच धर्म चांगले नसतात. त्या तरुणाने तो काहीच वाईट करत नाही असे उत्तर दिले तेव्हा साक्षीदार म्हणाला: “तू चांगले तरी कोठे करतोस.” यामुळे तो तरुण विचारात पडला. नंतर साक्षीदाराने, हे शेवटले दिवस असल्याचे व देवाची संमती मिळविण्यासाठी बायबलचे अचूक ज्ञान मिळवून त्यास लागू करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्याच्या शाळकरी मित्राला ते पटले. परंतु, त्याच्या कुटुंबातील लोक त्याला बायबलचा अभ्यास करण्याची परवानगी देतील का? त्याच्या मित्राच्या विचारांना चालना देण्यासाठी, साक्षीदाराने त्याला तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक वाचण्यास सांगितले.
कालांतराने, त्या मित्राने शाळा सोडली. एका वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत त्याच्याबद्दल काहीच समजू शकले नाही. मग अचानक एका दिवशी त्याचा फोन आला तेव्हा त्या तरुण साक्षीदारास आश्चर्यच वाटले. या मित्राला बायबलची भाकिते पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहेत, असे त्याने सांगितले. साक्षीदाराने लगेच त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्याची व्यवस्था केली.
तो त्याच्या पूर्वीच्या शाळकरी मित्राच्या घरी गेला तेव्हा आपला मुलगा कशात पडतोय याबाबत त्याच्या मित्राचे पालक चांगलेच चिंतित होते हे त्याच्या लक्षात आले. मित्राच्या धाकट्या भावालाही वाटले, की त्याला वेड लागले होते. यामुळे आई-वडिलांनी पुढील अभ्यासाच्या वेळेस धाकट्या भावालासुद्धा बसायला लावले. नंतर, या तरुण मुलाने भावनाविवश होऊन आपल्या पालकांना त्याचा थोरला भाऊ वेडा नसल्याचे सांगितले तेव्हा त्यांची आई उद्गारली, “आता एका समस्येऐवजी माझ्यापुढे दोन समस्या आहेत!”
यामुळे, पुढील अभ्यासाच्या वेळेस ती स्वतः उपस्थित होती व तिच्या मुलांना वेड लागलेले नाही हे तिला कबूल करावे लागले. काही काळाने तिच्यासोबत व तिच्या पतीसोबत अभ्यास सुरू करण्यात आला. लवकरच सबंध कुटुंब राज्य सभागृहात मंडळीच्या सभांना उपस्थित राहू लागले. कालांतराने, आजीआजोबांनीसुद्धा बायबलचा अभ्यास करण्यास व सभांना जाण्यास सुरवात केली. आज त्या पहिल्या तरुण मुलाचा बाप्तिस्मा झाला आहे. त्याने लग्न केले व तो आणि त्याची बायको आवेशी प्रचारक आहेत.
एवढेच नव्हे तर, शाळेत केलेल्या अनौपचारिक साक्षकार्याद्वारे, या तरुण साक्षीदाराने दुसऱ्या दोन मित्रांना तसेच त्यांच्यापैकी एकाच्या आईला व बहिणीलासुद्धा बायबलचा अभ्यास सुरू करण्यास मदत केली आहे. त्या तरुणाने त्याच्या शाळेतील मित्रांचे बरे करण्यात माघार न घेतल्यामुळे एकूण ११ जणांनी बायबलचे सत्य शिकले. केवढा हा आनंदी परिणाम! खरोखर, “ज्या लोकांचा देव परमेश्वर [यहोवा, NW] आहे ते धन्य!”—स्तोत्र १४४:१५.