वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १०/१ पृ. १९-२४
  • माझ्या पालकांचे अनुकरण करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माझ्या पालकांचे अनुकरण करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • राज्यासाठी बाबांचा आवेश
  • आईची विश्‍वासू सेवा
  • तारुण्यातील सेवा
  • दुसरे महायुद्ध भडकते
  • आल्हाददायक पूर्ण वेळेची सेवा
  • आमचा समृद्ध आध्यात्मिक वारसा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • आमच्या आईवडिलांनी आम्हाला देवावर प्रेम करायला शिकवलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • “मी तीळमात्रही बदल कशात करणार नाही!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • यहोवानं मला त्याच्या सेवेत यश दिलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १०/१ पृ. १९-२४

माझ्या पालकांचे अनुकरण करणे

हिल्डा पॅडगेट द्वारा निवेदित

“परात्पर देवाच्या सेवेसाठी माझे जीवन समर्पित आहे व मी दोन धन्यांची सेवा करू शकत नाही,” असे वार्तापत्रकात लिहिले होते. सन १९४१ मध्ये ब्रिटिश मिनिस्ट्री ऑफ लेबर ॲण्ड नॅशनल सर्विस मंडळाला दिलेल्या माझ्या विवरणपत्रातील ह्‍या शब्दांनी, दुसऱ्‍या महायुद्धाच्या दरम्यान इस्पितळात काम करण्याला नकार देण्याचे माझे कारण सादर केले. त्यानंतर, काही काळातच मला सिद्धापराधी ठरवण्यात आले आणि नकार दिल्यामुळे तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

कोणत्या कारणास्तव मी अशा बिकट परिस्थितीत आले होते बरे? तारुण्याच्या लहरीमुळे किंवा बंडखोर वागणुकीमुळे नव्हे; तर याची कारणे मी लहान होते त्या वेळेची आहेत.

राज्यासाठी बाबांचा आवेश

माझा जन्म जून ५, १९१४ रोजी इंग्लंडच्या पूर्वेस असलेल्या लीड्‌स जवळील हॉर्सफर्थ येथे झाला. माझे आईवडील, पॅटी आणि ॲटकिन्सन पॅडगेट दोघेही प्रिमिटीव मेथडिस्ट चॅपल येथे संडेस्कूल शिक्षक आणि गायक समूहाचे सदस्य होते, तेथे बाबा ऑर्गन वाजवायचे. मी बाळ असताना एका गोष्टी व्यतिरिक्‍त आमचे घर आनंदी घरकुल होते. बाबांना जगाची परिस्थिती पाहून चिंता वाटत होती. त्यांना युद्ध आणि हिंसेचा वीट होता आणि “खून करू नको” या बायबलच्या आज्ञेवर त्यांचा विश्‍वास होता.—निर्गम २०:१३.

सन १९१५ मध्ये सरकारने, सक्‍तीने सेनाभरती टाळण्यासाठी सर्व तरुण पुरुषांना स्वेच्छेने सेनेत भरती होण्यास आर्जवले. काही शंकेमुळे बाबा दिवसभर सैनिक म्हणून स्वतःचे नाव नोंदवहीत लिहून देण्यासाठी पावसात उभे होते. दुसऱ्‍या दिवशी त्यांचे संपूर्ण जीवनच बदलले!

एका मोठ्या घरात नळकारागीर म्हणून काम करत असताना, ते जगाच्या घटनांबद्दल इतर कामगारांसोबत बोलले. तेव्हा तेथील माळ्याने त्यांना प्रभूची रत्ने गोळा करणे (इंग्रजी) ही लहानशी पत्रिका दिली. बाबांनी ती घरी आणली, वाचली आणि पुन्हापुन्हा वाचली. ते म्हणाले, “हे जर सत्य आहे तर मग इतर सर्व काही असत्य आहे.” दुसऱ्‍या दिवशी त्यांनी अधिक माहितीसाठी विनंती केली आणि तीन आठवड्यांपर्यंत त्यांनी पहाटेपर्यंत बायबलचा अभ्यास केला. त्यांना सत्य सापडले आहे हे त्यांना माहीत होते! त्यांच्या डायरीत लिहिले होते, रविवार जानेवारी २, १९१६ “सकाळी चॅपलला गेलो, रात्री आय.बी.एस.ए. [तेव्हा इंग्लडमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना, इंटरनॅशनल बायबल स्टूडन्ट्‌स असोसिएशन म्हणून ओळखले जात होते] येथे गेलो—इब्रीयांस ६:९-२० चा अभ्यास करतोय—बांधवांची प्रथमच भेट.”

लगेचच विरोध येऊ लागला. आमच्या नातेवाईकांना आणि चॅपलमधील मित्रांना वाटले, की बाबांना वेड लागले आहे. पण त्यांनी त्यांचा निर्णय घेतला होता. सभा आणि अभ्यास त्यांच्या जीवनातील मुख्य गोष्टी होत्या व मार्चपर्यंत त्यांनी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला त्यांचे समर्पण केले होते. काही आठवड्यांसाठी बाबा एकटेच सभांना जात असत, पण मग आईने देखील सभांना जाण्याचा निश्‍चय केला. तिने मला बाबा गाडीत घातले आणि लीड्‌सला आठ किलोमीटर्स चालत गेली, सभा नुकतीच संपायच्या बेतात असताना ती तेथे पोहंचली. बाबांनी तिला पाहिल्यावर त्यांना किती आनंद झाला याची जरा कल्पना करा. तेव्हापासून आमचे कुटुंब यहोवाच्या सेवेत एक झाले.

सैन्यातील एक स्वयंसेवक आणि मग काही आठवड्यांनंतर बुद्धीपुरस्सर आक्षेप घेणारा—अशी ही बाबांची स्थिती अतिशय बिकट होती. त्यांना जेव्हा बोलावण्यात आले तेव्हा बंदुक हातात घेण्यास त्यांनी नकार दिला व जुलै १९१६ पर्यंत त्यांना पाच सैनिकी न्यायांपैकी एक न्याय देण्यात आला, त्यांना ९० दिवसांचा तुरुंगास झाला. पहिली शिक्षा भोगल्यानंतर दोन आठवड्यांची रजा देण्यात आली व त्यानंतर आणखी ९० दिवसांसाठी दुसरा सैनिकी न्याय देण्यात आला. दुसऱ्‍या कारावासाच्या मुदतीनंतर, त्यांची रॉयल आर्मी मेडिकल कॉर्पस येथे बदली झाली व फेब्रुवारी १२, १९१७ रोजी ते सेना नौकेने रेन, फ्रान्स येथे गेले. तेथे, त्यांना त्यांच्या परिस्थितीचा आणखीनच तिटकारा आल्याचे त्यांच्या डायरीत लिहिले होते. सैनिकांना पुन्हा युद्धात पाठवण्यासाठी त्यांना मलमपट्टी करण्याचे काम मिळाल्याचे त्यांना कळून आले.

पुन्हा एकदा त्यांनी सहकार्य देण्यास नकार दिला. या वेळी सेना न्यायालयाने त्यांना पाच वर्षांसाठी रेन येथील ब्रिटिश सैनिकी तुरुंगात टाकले. बुद्धीपुरस्सर आक्षेप घेणारा म्हणून दिवाणी बंदिवासात बदली करावी अशी बाबा वारंवार त्यांना विचारणा करत असल्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून तीन महिन्यांसाठी केवळ भाकरी आणि पाणी इतकेच जेवण मिळत होते. त्यानंतर, त्यांचे वजन वाढू पर्यंत त्यांना नियमितरीत्या कारागृहातील अन्‍न देण्यात आले; मग पुन्हा एकदा अशाच प्रकारची ही क्रिया चालू होती. दिवसा त्यांचे हात मागे घेऊन हातबेड्या घातल्या जात तर रात्री आणि जेवणाच्या वेळी पुढे हातबेड्या घातल्या जात. संपूर्ण जीवनभरात, त्यांच्या मनगटावर व्रण उठले होते कारण त्यांना ज्या बेड्या घातल्या जात होत्या त्या इतक्या लहान होत्या, की त्या घातल्यावर त्यांच्या हाताचे मांस त्यात अडकायचे आणि त्यामुळे त्यांच्या व्रणांमध्ये पू साठायचा. त्यांच्या पायातही कमरेला जोडलेल्या बेड्या होत्या.

सैन्यातील अधिकाऱ्‍यांनी त्यांचा दृढतेचा आत्मा तोडण्यासाठी त्यांची सर्व शक्‍ती पणास लावली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांचे बायबल आणि पुस्तके त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्यांना घरून आलेली पत्रे दिली जात नव्हती किंवा ते स्वतः घरी पत्र लिहू शकत नव्हते. दोन वर्षांनी त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सिद्ध करून दाखवण्यासाठी उपोषण करण्याचा निश्‍चय केला. त्यांनी अन्‍न किंवा पाण्याला न शिवता सात दिवसांसाठी उपोषण केले व गंभीरपणे आजारी पडल्यामुळे कारागृहातील इस्पितळात त्यांची बदली झाली. ते प्रामाणिक होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले खरे, पण त्यामुळे त्यांनी जवळजवळ त्यांचे जीवन गमावले. अशा प्रकारे त्यांचे जीवन धोक्यात घालणे चुकीचे होते व ते पुन्हा कधीच असे कृत्य करणार नाहीत हे त्यांनी काही वर्षांनंतर कबूल केले.

नोव्हेंबर १९१८ मध्ये युद्ध समाप्त झाले पण बाबा अद्यापही रेन तुरुंगातच होते, पुढील वर्षाच्या सुरवातीलाच त्यांना इंग्लंड येथील दिवाणी कारागृहात हलवण्यात आले. त्यांचे बायबल, पुस्तके आणि जमा झालेली आईची सर्व पत्रे आणि पार्सल मिळाल्यावर त्यांना झालेल्या आनंदाची कल्पना करा! त्यांना विनचेस्टर कारागृहात नेण्यात आले व तेथे ते एका तरुण बांधवाला भेटले ज्याचे युद्धाच्या वेळेचे अनुभव बाबांसारखेच होते. त्याचे नाव फ्रँक प्लॅट होते. त्यांनी अनेक वर्षांसाठी लंडन बेथेल येथे सेवा केली होती. त्या दोघांनी दुसऱ्‍या दिवशी भेटण्याच्या व्यवस्था केल्या पण फ्रँकची दुसऱ्‍या ठिकाणी बदली करण्यात आली.

एप्रिल १२, १९१९ रोजी आईला एक तार मिळाली, “हालेलूया! घरी येत आहे—लंडनहून तार केली.” परीक्षा, चौकशी आणि विभक्‍तीच्या तीन वर्षांनी पुन्हा एकदा आनंदाचा क्षण आला! सर्वात पहिल्यांदा लंडन बेथेल मधील बांधवांना फोन करून भेटण्याची बाबांची इच्छा होती. ३४ क्रेवन टेरेस येथे त्यांचे प्रेमळपणे स्वागत करण्यात आले. स्नान व दाढी केल्यावर दुसऱ्‍या एका बांधवाचा सूट आणि हॅट घालून बाबा घरी परतले. आम्हा सर्वांच्या पुर्नमिलनाची तुम्ही कल्पना करू शकाल का? मी तेव्हा सुमारे पाच वर्षांची होते आणि मला बाबा आठवत नव्हते.

बाबांची सुटका झाल्यावर ते सर्वात पहिल्यांदा स्मारक विधीच्या सभेला उपस्थित राहिले. सभागृहाच्या पायऱ्‍या चढल्यावर ते पहिल्यांदा कोणाला भेटले असावेत असे तुम्हाला वाटते? फ्रँक प्लॅट, ज्याला लीड्‌स येथील एका सैन्याच्या इस्पितळात हलवण्यात आले होते. एकमेकांचे अनुभव सांगण्यासाठी त्यांना किती आनंद झाला होता! त्यानंतर इस्पितळातून त्यांची सुटका होईपर्यंत फ्रँक नेहमी आम्हाला भेटावयास येत असे कारण त्याला आमच्या घरी त्याच्या घरच्या वातावरणासारखे वाटत असे.

आईची विश्‍वासू सेवा

बाबा जोपर्यंत घरी नव्हते तोपर्यंत सरकारकडून मिळणाऱ्‍या अल्प मिळकतीला हातभार लावण्यासाठी आईने लोकांचे कपडे धुण्याचे काम घेतले. बंधुजन खरोखरीच दयाळू होते. दर काही आठवड्यांनंतर मंडळीतील एखादे वडील तिच्या हातात निनावी बक्षिसाचे एक लहानसे पाकीट देत. बांधवांच्या प्रीतीमुळे ती यहोवाच्या जवळ आली होती व त्या परीक्षामय काळात टिकून राहण्यासाठी मदत केली होती असे आई नेहमी म्हणत असे. बाबांच्या अनुपस्थितही ती विश्‍वासूपणे मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहत असे. बाबा जिवंत आहेत की नाहीत, हे तिला एक वर्षापर्यंत माहीत नव्हते आणि ते एक वर्ष तिच्यासमोर परीक्षेसारखे उभे होते. त्यात आणखी एक भर म्हणजे, १९१८ मध्ये आई आणि मला आम्हा दोघींना स्पॅनिश फ्लू झाला. आमच्या सभोवती लोक मरत होते. जे शेजारी दुसऱ्‍या शेजाऱ्‍यांना मदत करण्यासाठी जात त्यांना तो आजार जडून ते मृत्यूमुखी पडत होते. अन्‍नटंचाईमुळे आजाराला प्रतिकार करण्याची लोकांचा शक्‍ती कमी होत होती यात काही शंकाच नाही.

“देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांस पूर्ण, दृढ व सबळ करील” हे प्रेरित पेत्राचे शब्द आमच्या कुटुंबासाठी किती खरे ठरले! (१ पेत्र ५:१०) माझ्या पालकांनी जे काही सहन केले त्यामुळे, त्यांच्यामध्ये यहोवावर दृढ विश्‍वास व तो आपली काळजी घेतो आणि कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या प्रीतीपासून विभक्‍त करू शकत नाही ही पूर्ण खात्री विकसित करण्यास त्यांना मदत मिळाली. अशा प्रकारे विश्‍वासामध्ये माझे संगोपन झाल्यामुळे मी खास आशीर्वादित आहे.—रोमकर ८:३८, ३९; १ पेत्र ५:७.

तारुण्यातील सेवा

बाबांच्या सुटकेनंतर राज्य सेवा आमच्या जीवनातील केंद्रस्थान बनले. आजाराव्यतिरिक्‍त मी कधीही सभा चुकवल्याचे मला आठवत नाही. घरी परतल्यावर अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी पैसे हवे असल्यामुळे बाबांनी त्यांचा प्लेट कॅमेरा आणि आईची सोन्याची बांगडी विकली. आम्हाला सुट्टी परवडणारी नव्हती तरी, आम्ही कधीही अशा प्रकारची अधिवेशने चुकवली नाहीत, मग ती लंडनमध्ये असली तरीही.

युद्धानंतरची पहिली दोन की तीन वर्षे तजेला देणारी होती. बाबा आणि आईने संगती आणि सहवासाच्या संधींचा पूर्ण फायदा घेतला. इतर बंधू आणि बहिणींना आम्ही भेट देण्यासाठी जात असू व मी लहान असल्यामुळे चित्र काढून ते रंगवत बसायची आणि वडीलधारी मंडळी तासन्‌तास सत्याची नवीन समज याबद्दल बोलत बसायची हे मला अजूनही आठवते. सर्वांसोबत बोलल्याने, वाद्यसंगीतासोबत गाणी गायिल्याने, सुखदायक सहवास उपभोगल्याने त्यांना आनंदी आणि ताजेतवाने बनवले.

माझे पालक माझ्या प्रशिक्षणाच्या बाबतीत खूप कडक होते. शाळेमध्ये मी सर्वांमध्ये उठून दिसायची. पाच वर्षांची होते तेव्हाही मी वाचण्यासाठी माझे “नवा करार” घेऊन जात असे व कॅटकिसमचा वर्ग चालत असताना ते वाचत असे. काही दिवसांनंतर, साजरा केला जाणाऱ्‍या रिमेंब्रन्स डे मध्ये मी भाग न घेतल्यामुळे “बुद्धीपुरस्सर आक्षेप घेणारी” म्हणून संपूर्ण शाळेसमोर माझी धिंड काढण्यात आली.a माझ्या संगोपनाबद्दल मला मुळीच वाईट वाटत नाही. वास्तविक पाहता त्यामुळे माझे संरक्षण झाले आणि ‘अरुंद मार्गावर’ राहण्यास मला सोपे बनवले. माझे पालक जेथे कोठे गेले, सभांना किंवा सेवेला मी त्यांच्यासोबतच होते.—मत्तय ७:१३, १४.

मी स्वतःहून प्रचारास सुरवात केलेली ती रविवारची सकाळ मला खासपणे आठवते. तेव्हा मी फक्‍त १२ वर्षांची होते. मी किशोरावस्थेत होते तेव्हा, मला आठवते की एका रविवारी सकाळी मी माझ्या पालकांना सांगितले, मी आज घरात राहणार आहे. कोणीही माझी टीका केली नाही किंवा मला जबरदस्ती केली नाही, मी माझे बायबल घेऊन बागेत वाचत बसले, पण मग मला खूप अस्वस्थ वाटू लागले. ही गोष्ट घडल्याच्या एक की दोन आठवड्यानंतर मी बाबांना म्हणाले: “मला वाटतं मी या रविवारी तुमच्यासोबत येईन!” त्यानंतर मी कधीही मागे वळून पाहिले नाही.

सन १९३१ हे वर्ष किती विलक्षण होते! आम्हाला यहोवाचे साक्षीदार हे नवे नाव मिळाले होते म्हणूनच नव्हे तर अलेक्झॅन्ड्रा पॅलेस, लंडन येथे झालेल्या एका राष्ट्रीय अधिवेशनात माझा बाप्तिस्मा झाला होता. मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. आम्ही लांब, काळे झगे घातले होते आणि माझा झगा ओला होता कारण आधीच एका उमेदवाराने बाप्तिस्म्याच्या वेळी तो वापरला होता!

तेव्हा पूर्ण वेळेच्या सेवकांना कॉल्पचर असे म्हटले जात होते आणि लहानपणापासूनच ती माझी महत्त्वाकांक्षा होती. मी जसजशी मोठी होत गेले तसे मला यहोवाच्या सेवेमध्ये अधिक करावे असे वाटू लागले. या कारणास्तव, मार्च १९३३ मध्ये १८ व्या वर्षी मी पूर्ण वेळेच्या सेवकांच्या श्रेणीत सामील झाले.

विशिष्ट मोठ्या शहरांमधील “पायनियर सप्ताह” आमच्यासाठी खास आनंदाचे होते, तेव्हा आम्ही जवळजवळ डझनभर पूर्ण वेळेचे सेवक एकत्र येत, स्थानिक बांधवांसोबत राहत आणि संघ या नात्याने कार्य करीत होतो. आम्ही धार्मिक नेत्यांना आणि इतर प्रमुख लोकांना पुस्तिका वाटत असू. त्यांच्यासोबत बोलण्यासाठी धैर्याची गरज होती. बहुतेक वेळा आमची थट्टा केली जात असे आणि पुष्कळ वेळा घरमालक त्यांच्या घराचे दार धाडकन लावून घेत. यामुळे आम्ही चिंतित झालो नाही, कारण आमचा आवेश इतका मोठा होता, की ख्रिस्ताच्या नावासाठी आमची निंदा होत असल्यामुळे आम्हाला आनंद झाला.—मत्तय ५:११, १२.

लीड्‌समध्ये असताना आम्ही नक्कल करणारे यंत्र नेण्याकरता बाबा गाडी, तीनचाकी सायकल, बाबांची मोटारसायकल आणि साईडकारचे रूपांतर केले. दोन बांधव यंत्र घेऊन रस्त्यावर जात, लोकांना जागृत करून त्यांनी त्यांच्या घराबाहेर यावे म्हणून संगीत रेकॉर्ड लावत आणि मग बंधू रदरफोर्ड यांनी ध्वनिमुद्रित केलेले पाच मिनिटांचे भाषण लावत असत. मग ते बांधव दुसऱ्‍या रस्त्यावर जात आणि त्यानंतर आम्ही प्रचारक, लोकांना बायबल साहित्य देत असू.

अनेक वर्षांसाठी आम्ही प्रत्येक रविवारी संध्याकाळी सभेनंतर, सार्वजनिक वक्‍त्‌यासाठी असलेला चौक म्हणजे सार्वजनिक सभागृहाच्या चौकात जाऊन बंधू रदरफोर्डचे ध्वनिमुद्रित केलेले एक तासाचे एखादे भाषण ऐकत बसत होतो आणि मग हस्तपत्रिका देऊन ज्यांनी आस्था दाखवली त्यांच्याशी संपर्क साधत होतो. त्या भागामध्ये आम्ही सुपरिचित झालो. पोलिस देखील आमचा आदर करत होते. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे आम्ही एकत्र जमलो असता, आम्हाला दुरून ढोल आणि बँडचा आवाज ऐकू आला. काही वेळातच सुमारे शंभर फॅसिस्ट लोकांचा मोर्चा रस्त्यावरून कूच करत आला. ते आमच्या मागून मोर्चा करत गेले आणि त्यांचे झेंडे उंचावत थांबले. बँड थांबला व बंधू रदरफोर्डचा आवाज गरजला तशी सगळीकडे शांतता पसरली. ते म्हणाले: “त्यांना हवे तर त्यांनी त्यांच्या झेंड्यांना वंदन करावे आणि मनुष्यांचा जयजयकार करावा. आम्ही तर केवळ आमच्या यहोवा देवाची उपासना करू आणि जयजयकार करू!” आता पुढे काय होईल याचा विचार करत आम्ही बुचकळ्यात पडलो! काहीच झाले नाही, फक्‍त त्यांना एक चांगली साक्ष मिळाली आणि आम्हाला उर्वरित भाषण ऐकू यावे म्हणून पोलिसांनी त्यांनाच शांत बसवले.

लोकांना भव्य साक्ष देण्यास मदत करण्यासाठी आतापर्यंत तर फोनोग्राफचा चांगलाच उपयोग होत होता. आम्ही दारावर रेकॉर्डर ठेवून लोकांनी त्या पूर्ण पाच मिनिटांच्या बायबल उपदेशाकडे लक्ष द्यावे म्हणून आम्ही काळजीपूर्वकतेने आमचे लक्ष त्या रेकॉर्डरवर ठेवत असू. बहुतेकवेळा घरमालक आम्हाला घरात बोलावत आणि आणखी रेकॉर्ड्‌स ऐकण्याची इच्छा असल्यामुळे आम्ही पुन्हा त्यांच्याकडे यावे असे ते आम्हाला सांगत असत.

१९३९ चे वर्ष अतिशय व्यग्र आणि कठीण होते कारण त्यावर्षी विरोध आणि हिंसेचा उद्रेक होत होता. आमच्या एका अधिवेशनाआधी, बांधवांना रस्त्यावरील संतप्त जमावाचा अनुभव आला. म्हणून, संमेलनाच्या दरम्यान मोटारकारने त्रस्त क्षेत्रांमध्ये जाऊन प्रचार करण्यासाठी त्यांनी बांधवांच्या एका तुकडीची योजना केली आणि बहिणी आणि इतर बांधव सुरक्षित ठिकाणी गेले. एका गटासोबत रस्त्यावर कार्य करत असताना मी एका बोळीतून रस्त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या घरी प्रचार करण्यासाठी गेले. एका घरी बोलत असताना, मला काहीतरी गडबड होत असल्याचा आवाज ऐकू आला—रस्त्यावरून ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकू येत होता. तरी देखील सर्व काही शांत होईपर्यंत मी घरमालकाशी तशीच बोलत राहिले. मग मी बोळीतून पुन्हा रस्त्यावर आले तेव्हा, मला कळाले, की इतर बंधू आणि भगिणींना मी कोठे होते हे न समजल्यामुळे ते घाबरून गेले होते! त्या दिवशी नंतर, उपद्रवी लोकांनी आमच्या सभांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा बांधवांनी त्यांना अडवले.

दुसरे महायुद्ध भडकते

अजूनही सक्‍तीच्या सेनाभरतीला जोर होता आणि पुष्कळ तरुण बांधवांना ३ ते १२ महिन्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. तेव्हा, तुरुंगातील बांधवांना जाऊन भेटण्याचा आणखी एक सुहक्क बाबांना प्राप्त झाला. प्रत्येक रविवारी त्यांनी स्थानिक तुरुंगात टेहळणी बुरूज अभ्यास चालवला. बुधवारी संध्याकाळी त्यांनी बांधवांना त्यांच्या कोठडीत जाऊन भेट दिली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी स्वतः दीर्घ आणि खडतर तुरुंगवासाचा अनुभव घेतल्यामुळे अशाच परिस्थितीतून गुजरणाऱ्‍यांची सेवा करण्यास त्यांना खास आनंद वाटत होता. असे त्यांनी १९५९ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे २० वर्षांपर्यंत केले.

१९४१ पर्यंत, आम्ही घेतलेल्या तटस्थतेच्या पवित्र्यामुळे लोकांच्या कटुत्वाची आणि वैरभावाची आम्हाला सवय होत होती. रस्त्यावर नियतकालिके घेऊन उभे राहून या सर्व गोष्टींना तोंड देणे इतके सोपे नव्हते. त्याचवेळी आमच्या क्षेत्रातील निर्वासितांना मदत करण्यास आम्हाला आनंद वाटला. लॅटवीयन, पोल, एस्टोनियन, जर्मन लोकांनी—टेहळणी बुरूज किंवा कन्सोलेशन (आता सावध राहा!) त्यांच्या भाषांमध्ये पाहिल्यावर त्यांचे चेहरे प्रसन्‍न झालेले पाहणे किती आनंददायक होते!

मग, दुसऱ्‍या महायुद्धाच्या दरम्यान मी तटस्थेतेची भूमिका घेतल्यामुळे माझी परीक्षा चालू झाली. दर २४ तासांपैकी १९ तासांसाठी तुरुंगातील कोठडीत डांबून राहणे मला अतिशय कठीण वाटले. सुरवातीचे तीन दिवस सर्वात कठीण होते कारण मी एकटीच होते. चौथ्या दिवशी मला गव्हर्नरच्या कार्यालयात बोलावण्यात आले तेव्हा मी आणखी दोन मुली उभ्या असलेल्या पाहिल्या. एका मुलीने मला, “तू येथे कशामुळे आलीस?” असे हलक्या आवाजात विचारले. मी म्हणाले: “तुला समजल्यावर खूप आश्‍चर्य वाटेल.” तिने मला पुन्हा हलक्या आवाजात विचारले: “तू यहोवाची एक साक्षीदार आहेस का?” दुसऱ्‍या मुलीने ते ऐकले आणि आम्हा दोघींना विचारले: “तुम्ही यहोवाच्या साक्षीदार आहात का?” आणि आम्ही तिघींनी एकमेकांना मिठी मारली. आता आम्ही एकट्या नव्हतो!

आल्हाददायक पूर्ण वेळेची सेवा

तुरुंगातून सुटल्यावर मी माझी पूर्ण वेळेची सेवा चालू ठेवली व जिची शाळा नुकतीच संपली होती ती १६ वर्षांची एक मुलगी मला येऊन सामील झाली. आम्ही योकशायर डेल्सच्या किनाऱ्‍यावर वसलेल्या सुंदर इकली शहरात स्थलांतर केले. पूर्ण सहा महिने आम्ही आमच्या सभांसाठी एक उत्तम सुविधाजनक जागा शोधण्यास झटत होतो. शेवटी, आम्ही एक गॅरेज भाड्याने घेतले ज्याचे आम्ही राज्य सभागृहात रूपांतर केले. लायटींग आणि हिटींगची व्यवस्था करण्यास मदत करण्यासाठी बाबा आमच्या मदतीला धावून आले. त्यांनी त्या इमारतीला देखील सजवले. अनेक वर्षांपर्यंत शेजारच्या मंडळ्यांमधील बांधवांनी आम्हाला पुष्कळ आधार दिला, प्रत्येक आठवडी जाहीर भाषण देण्यासाठी त्यांनी बांधवांची नेमणूक केली. यहोवाच्या आशीर्वादाने आमची भरभराट झाली आणि आमची संख्या वाढली आणि कालांतराने तेथे एका मंडळीची स्थापना देखील झाली.

जानेवारी १९५९ मध्ये बाबा अचानक आजारी पडले. मला घरी बोलावण्यात आले आणि एप्रिल महिन्यात त्यांचा देहान्त झाला. त्यानंतरची वर्षे अतिशय कठीण होती. आईची तब्येत बिघडली तसेच तिची स्मरणशक्‍ती देखील निकामी झाली ज्यामुळे मला अतिशय झटावे लागले. परंतु, यहोवाच्या आत्म्याने मला पुढे चालत राहण्यास साहाय्य केले व त्यामुळे मला १९६३ मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत तिची काळजी घेण्यास शक्य झाले.

या सर्व वर्षांमध्ये मला यहोवाकडून कितीतरी आशीर्वाद मिळाले आहेत. त्या सर्वांची मला आठवण करता येणार नाही. मी माझ्या मंडळीची प्रगती पाहिली, ती दिवसानुदिवस वाढत चालल्यामुळे चार वेळेला तिचे विभाग झालेले मी पाहिले तसेच काही प्रचारकांना व पायनियरांना बोलिव्हिया, लाओस आणि युगांडासारख्या दूरच्या राष्ट्रांमध्ये मिशनरी म्हणून पाठवताना देखील मी पाहिले आहे. काही प्रसंग असे आले, की ज्यामुळे मला विवाह करून संसार थाटता आलाच नाही. पण त्यामुळे मी नाराज झालेली नाही; मी नेहमीच व्यग्र राहिले आहे. माझे सख्खे नातेवाईक नसले तरी प्रभूमध्ये मला पुष्कळ, होय शेकडो मुले आणि नातवंडे आहेत.—मार्क १०:२९, ३०.

ख्रिस्ती सहवासाचा आनंद लुटण्यासाठी मी बहुतेकवेळा तरुण पायनियरांना आणि इतर युवकांना घरी बोलावते. आम्ही सर्व एकत्र मिळून टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करतो. माझ्या पालकांप्रमाणेच आम्ही देखील अनुभव सांगतो आणि राज्य गीते गातो. माझ्या आजूबाजूला आनंदी तरुण लोक असल्यामुळे मी देखील तारुण्यभरीत आणि आनंदी दृष्टिकोन ठेवते. पायनियर सेवेशिवाय माझ्याकडे कोणतेही दुसरे उत्तम जीवन नाही. माझ्या पालकांचे अनुकरण करण्याचा सुहक्क मला मिळाला त्याबद्दल मी यहोवाची अतिशय आभारी आहे. चिरकालासाठी मी यहोवाची सेवा करत राहावी हीच माझी त्याच्या चरणी प्रार्थना आहे.

[तळटीपा]

a १९१८ मधील आणि १९४५ मधील युद्धाचा अंत झाल्याबद्दलचा स्मरणोत्सव.

[२३ पानांवरील चित्रं]

हिल्डा पॅडगेट तिचे आईवडील, पॅटी आणि ॲटकिन्सन यांच्यासमवेत

सत्यामध्ये बाबांची आस्था जागृत करणारी पत्रिका

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा