येशूविषयीच्या शंका समर्थित आहेत का?
नासरेथच्या येशूने खरोखरच चमत्कार केले का? त्याच्या शिष्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे खरोखरच मृतातून पुनरुत्थान झाले होते का? तो अस्तित्वात तरी होता का? आपल्या आधुनिक युगात, अनेक जण अशा प्रश्नांची उत्तरे खात्रीपूर्वकपणे देऊ शकत नाहीत असे दिसते. का बरे? कारण ते येशूविषयी शंका बाळगतात आणि शंका म्हणजे अनिश्चिततेच्या भावना किंवा एखादी गोष्ट खरी किंवा शक्य आहे ते माहीत नसणे. परंतु, येशूविषयी अनिश्चिततेच्या भावना समर्थित आहेत का? आपण पाहू या.
येशूविषयी शंका कशा रुजविल्या गेल्या
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील काही विशिष्ट जर्मन ईश्वरशास्त्रवेत्तांनी “प्राचीन चर्चचा कल्पित व्यक्ती” असे येशूचे चित्र रेखाटले. येशूच्या ऐतिहासिकतेच्या शंकेने, या शतकाच्या सुरवातीच्या विद्वानांमधील वादविवादाकडे नेले व तो त्या काळच्या लोकांपर्यंत पोहंचला आणि त्याचा प्रभाव आजही आहे. उदाहरणार्थ, जर्मनीतील अलीकडच्या एका अभ्यासाने प्रकट केले, की मुलाखत घेतलेल्यांपैकी ३ टक्के लोकांचा येशू “जिवंत नव्हता” तर “प्रेषितांनी त्याचा शोध लावला होता” असा विश्वास आहे. होय, या शतकाच्या सुरवातीलाच रुजविलेल्या येशूबद्दलच्या शंकेला आजही लोकांच्या अंतःकरणात सुपीक माती मिळते.
येशूचा “शोध” लावला होता हा निष्कर्ष समर्थित का नाही? बायबल विद्वान वुल्फगँग ट्रिलींग विवेचन मांडतात: “येशू हयात होता का म्हणजेच तो एक ऐतिहासिक मनुष्य होता की केवळ एक काल्पनिक मनुष्य होता हा वादविषय मिटवण्यात आला. तो प्रश्न एका विद्वत्तापूर्ण पद्धतीने सोडवण्यात आला, निदान अशा रीतीने की विचारशील लोक त्या समस्येकडे सैद्धांतिक बाब म्हणून तर पाहत नाहीत.” तरी देखील, काही लोक अजूनही येशूच्या अस्तित्वाबद्दल शंका बाळगतात. त्यामुळे, एखादा येशूचे इतिहासत्व कसे प्रस्थापित करू शकतो तसेच त्याच्याबद्दलच्या इतर शंकेचे निरसन कसे करू शकतो त्याचे आपण परीक्षण करू या.
शंकेचे निरसन करणाऱ्या साक्षी
तिरस्करणीय गुन्हेगार म्हणून झालेला येशूचा अपमानास्पद वध, “येशूच्या ऐतिहासिकतेच्या विरोधकांविरुद्ध सर्वात खात्रीलायक वाद” पुरवतो असे ट्रिलींग म्हणतात. का बरे? कारण त्या वधाने “यहुदी आणि गैर-यहुद्यांच्या नव्या विश्वासाला भारग्रस्त केले, इतकेच नव्हे तर अडखळण बनले आणि त्यांची पांगापांगही झाली.” (पडताळा १ करिंथकर १:२३, NW) मशीहा येशूचा वध यहुदी आणि विदेशी लोकांसाठी इतका घोर अपमान होता म्हणजेच प्रेषितांनी नक्कीच त्याचा शोध लावला नव्हता! शिवाय, येशूचा मृत्यू एक ऐतिहासिक घटना असल्याचे केवळ चार शुभवर्तमानच नाही तर रोमी लेखक टॅसिटस आणि यहुदी तालमूद देखील शाबीत करतात.a
येशूच्या जीवनाच्या दरम्यान इतर घटनांकडे देखील शुभवर्तमानांच्या विश्वसनीयतेचा आंतरिक पुरावा म्हणून पाहिले जाते व अशाप्रकारे हा आंतरिक पुरावा आम्हाला येशूबद्दल सांगतो. उदाहरणार्थ, येशूच्या अनुयायांनी नासरेथ या विशेष महत्त्व नसलेल्या ठिकाणातून त्याचे येणे खोटेपणाने रचले होते का? किंवा त्यांनी यहुदा, भरवसा करण्यालायक सोबत्याकरवी त्याचा विश्वासघात काल्पनिक रीत्या रचण्याची शक्यता आहे का? अशा भ्याड मार्गाने येशूच्या बाकीच्या सर्व शिष्यांनी त्याचा त्याग केल्याबद्दलच्या कल्पित कथा ते तयार करतील असा विचार करणे वास्तविकपणाचे वाटते का? शिष्यांनी पहिल्यांदा हानीकारक स्वरुपाचे तपशील तयार केले आणि मग त्यांचा बोभाटा केला हे खरोखरच तर्काच्या विरुद्ध आहे. या सोबतच, येशूने जी शिकवण्याची कला वापरली ती एका अद्भुत शैलीचे गुणवर्णन करते. पहिल्या शतकातील यहुदी साहित्यामध्ये त्याने दिलेल्या दाखल्यांच्या तुल्य काहीच नाही. कोणत्या निनावी व्यक्तीने, डोंगरावरील प्रवचन यासारख्या सर्वोत्कृष्ट कृतीचा “शोध” लावला असेल? हे सर्व वाद, येशूच्या जीवनाचा अहवाल असलेल्या शुभवर्तमानांच्या विश्वासूपणाची पुष्टी देतात.
येशूच्या इतिहासत्वासाठी बाह्यस्वरुपी पुरावे देखील आहेत. चारही शुभवर्तमान, तो एका विशिष्ट, अचूकपणे तपशीलवार ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या काळात राहत असल्याचे चित्र रेखाटतात. बेथलेहेम व गालील यासारखी ठिकाणे; पंतय पिलात यासारखे प्रमुख लोक आणि परुशी लोकांसारखे गट; तसेच यहुदी रीतिरीवाज आणि इतर वैशिष्ट्ये उगाचच रचले नव्हते. ते, पहिल्या शतकातील जीवनशैलीच्या संरचनेचे भाग होते आणि त्यांना गैर-बायबल उगम तसेच पुरातत्त्वशास्त्र पुराव्याच्या आधारावर पुष्टी देण्यात आली आहे.
अशा प्रकारे, येशू हा ऐतिहासिक व्यक्ती होता याबद्दलचे आंतरिक आणि बाह्यस्वरुपी दोन्ही पुरावे उपलब्ध आहेत.
परंतु, येशू हयात होता का याबद्दलची शंका न घेता पुष्कळ लोक त्याने केलेल्या चमत्कारांबद्दल शंका बाळगतात. होय, वर उल्लेखलेल्या सर्वेक्षणानुसार, चर्चला जाणारे केवळ थोडकेच जर्मन, येशूचे चमत्कार आणि त्याचे पुनरुत्थान “खरोखर झाल्याचा” ठामपणे विश्वास बाळगतात. येशूच्या चमत्कारांबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल शंका समर्थित आहेत का?
काही जण येशूच्या चमत्कारांबद्दल शंका का बाळगतात
येशूने चमत्काराने रोग्यांना बरे केले, मेलेल्यांचे पुनरुत्थान केले व भुतांना काढल्याचा अहवाल मत्तय ९:१८-३६ देते. प्राध्यापक ह्युगो स्टॉडिंगर हे इतिहासकार अशा प्रकारे विवेचन मांडतात: “हे असाधारण अहवाल उठावदार कल्पनेने निर्माण केले आहेत असा यावर विश्वासच बसत नाही व इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अशक्यच वाटते.” का बरे? कारण असे दिसते की बहुतेक चमत्कार प्रत्यक्षात पाहणारे लोक जिवंत होते त्या कालावधीत सुरवातीचे शुभवर्तमान लिहिण्यात आले होते! स्टॉडिंगर पुढे म्हणाले की यहुदी विरोधकांनी “येशूने केलेल्या अद्भुत कृत्यांना कधीच नाकारले नाही” यावरून या गोष्टीला आणखी पुष्टी मिळते. इतर सर्व पुराव्यांकडे दुर्लक्ष करून आपला निर्णय या बाह्यस्वरुपी पुराव्यावर आधारित ठेवला तर येशूचे चमत्कार नक्कीच विश्वासयोग्य आहेत हे आपल्याला आढळते.—२ तीमथ्य ३:१६.
“येशूने रोग्यांना बरे केले अशी बहुतेक जर्मन लोकांना खात्री पटली” असली तरी, बरे करण्यामागील शक्तीबद्दल अनेकांना शंका वाटते. उदाहरणार्थ, एका प्रख्यात जर्मन ईश्वरशास्त्रवेत्त्याने उघडपणे जाहीर केले की, येशूने मानसिक दुःख असलेल्या रोग्यांवर प्रभाव टाकून वशीकरणाच्या शक्तीने रोग बरे केले. हे विश्वसनीय स्पष्टीकरण आहे का?
जरा विचार करा. मार्क ३:३-५, येशूने एका माणसाचा वाळलेला हात बरा केला. पण मानसिक दुःखामुळे कधी हात वाळतो का? मुळीच नाही. तेव्हा, हा रोग बरा होण्याचे श्रेय वशीकरणाच्या शक्तीला दिले जाऊ शकत नाही. मग येशू कोणाच्या साहाय्याने चमत्कार करत होता? प्राध्यापक स्टॉडिंगर कबूल करतात: “पूर्णपणे सबळ असे नियम नसले व एखादा पूर्णपणे देवाला नाकारत नसला तर मग, ज्याचे सामर्थ्य मनुष्यापेक्षा अधिक आहे तो देव असाधारण गोष्टी करू शकतो या शक्यतेला कोणीही मूलभूतपणे काढून टाकू शकत नाही.” होय, ‘देवाच्या महान सामर्थ्याच्या’ साहाय्याने येशूने खरोखर रोग्यांना बरे केले. तेव्हा त्याच्या चमत्काराच्या अस्सलतेची शंका घेण्याचे काही कारण नाही.—लूक ९:४३; मत्तय १२:२८.
द अमेरिकन पीपल्स एन्सायक्लोपिडिआ म्हणतो त्याप्रमाणे, जर सर्व चमत्कारांमधील सर्वात महान चमत्कार—येशूचे पुनरुत्थान—घडले तर शुभवर्तमानात लिहून ठेवलेले इतर सर्व चमत्कार “शक्य आहेत.” येशूला मृतांमधून खरोखरच उठवण्यात आले होते का?
येशूच्या पुनरुत्थानाबद्दलच्या शंका समर्थित आहेत का?
येशूच्या पुनरुत्थानाच्या वास्तविकतेला आधार देणाऱ्या ठोस परिस्थितीजन्य पुराव्याच्या उदाहरणाचा विचार करा—त्याचे रिकामे थडगे. येशूचे थडगे रिकामे आढळल्याची वास्तविकता त्याच्या समकालीन लोकांमध्ये, त्याच्या विरोधकांमध्ये देखील निर्विवाद होती. (मत्तय २८:११-१५) फसवणूक सहजरीत्या उघडकीस आली असती! वर उल्लेखलेला संदर्भ ग्रंथ योग्यपणे निष्कर्ष काढतो: “रिकाम्या थडग्याबद्दल ‘तो येथे नाही; कारण तो उठला आहे’ (मत्त. २८:६) या बायबलच्या विधानाशिवाय इतर कोणतेही सबळ स्पष्टीकरण आजपर्यंत सूचित करण्यात आले नाही.”
येशूच्या स्वतःच्या शिष्यांनीच तो पुनरुत्थित मशीहा असल्याची सर्वत्र घोषणा केली असा आक्षेप काही जण घेतात. ते अगदी बरोबर आहे. परंतु, त्यांच्या संदेशाची व विशेषकरून येशूचा मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान याची विश्वसनीयता ऐतिहासिक वास्तविकतेवर दृढपणे मुळावलेली नव्हती का? होय नक्कीच. “ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासहि व्यर्थ; आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो; कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठविले” असे प्रेषित पौलाने लिहिले तेव्हा त्याला या गोष्टीची जाणीव होती. —१ करिंथकर १५:१४, १५; पडताळा योहान १९:३५; २१:२४; इब्रीयांस २:३.
पहिल्या शतकामध्ये, येशूच्या मृत्यूनंतर त्याला पाहिल्याची साक्ष देणारे अनेक प्रसिद्ध लोक होते. त्यांच्यापैकी १२ प्रेषित आणि पौल तसेच ५०० पेक्षा अधिक इतर साक्षीदार होते.b (१ करिंथकर १५:६) अविश्वासू प्रेषित यहुदाचा उत्तराधिकारी होण्यासाठी लागणाऱ्या योग्यता मत्थियाने का पूर्ण केल्या त्याचे कारण देखील लक्षात ठेवा. प्रेषितांची कृत्ये १:२१-२३ अहवाल देते की मत्थिया येशूच्या पुनरुत्थानाची तसेच येशूसंबंधी पूर्वीच्या इतर घटनांची साक्ष देऊ शकत होता. येशूचे जीवन आणि पुनरुत्थान वास्तविकतेऐवजी कल्पित असते तर नियुक्तीसाठी अशा प्रकारची गरज नक्कीच पूर्णपणे निरर्थक ठरली असती.
पहिल्या शतकामध्ये येशूचे जीवन, चमत्कार, मृत्यू आणि पुनरुत्थानाची साक्ष देणाऱ्या अनेक साक्षीदारांमुळे, वर उल्लेखलेले अडथळे असतानाही ख्रिस्ती विश्वास सापेक्षरितीने संपूर्ण रोमी साम्राज्यात लगेचच पसरला. पुनरुत्थान आणि त्याच्यातील मूलभूत सत्याची घोषणा सर्वत्र करण्यासाठी त्याचे अनुयायी हालअपेष्टा, छळ आणि मृत्यूला देखील सामोरे जाण्यासाठी तयार होते. ते कोणते सत्य होते? हेच की त्याचे पुनरुत्थान केवळ देवाच्या सामर्थ्यामुळेच शक्य झाले. यहोवा देवाने येशूला मृतातून का उठवले होते बरे? या प्रश्नाचे उत्तर ऐतिहासिक येशू कोण असल्याचे दाखवते.
पेन्टेकॉस्टच्या दिवशी प्रेषित पेत्राने जेरुसलेममधील आश्चर्यचकित झालेल्या यहुद्यांना सांगितले: “त्या येशूला देवाने उठविले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. कारण दावीद स्वर्गास चढून गेला नाही; पण तो स्वतः म्हणतो: ‘परमेश्वराने [यहोवा, NW] माझ्या प्रभूला सांगितले की, मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायांसाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” (प्रेषितांची कृत्ये २:३२-३६) होय, यहोवा देवाने नासरेथच्या येशूला “प्रभू व ख्रिस्त” बनवले. तर मग, देवाच्या उद्देशातील त्याच्या भूमिकेविषयी असलेल्या शंका समर्थित आहेत का?
येशूच्या सद्य भूमिकेविषयी शंका का घ्यावी?
येशूची ओळख आणि त्याच्या भूमिकेविषयी सर्व शंका कशाप्रकारे दूर केल्या जाऊ शकतात? तो खरोखरच एक संदेष्टा होता या वस्तुस्थितीद्वारे. त्याने आज आपण पाहत असलेली युद्धे, दुष्काळ, भूकंप, गुन्हे आणि प्रीतीची उणीव याबद्दल भाकीत केले होते. त्यासोबतच त्याने: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल” हेही भाकीत केले होते. (मत्तय २४:३-१४) या भविष्यवाण्यांची पूर्णता, येशू हा पुनरुत्थित ख्रिस्त आहे, तो ‘त्याच्या शत्रूंमध्ये’ अदृश्यपणे राज्य करीत आहे आणि लवकरच तो देवाचे राज्य आणील हे शाबीत करतात.—स्तोत्र ११०:१, २; दानीएल २:४४; प्रकटीकरण २१:१-५.
पूर्वी कधीही नव्हती इतकी आज मानवजातीला ईश्वरी बुद्धी असलेल्या एका तारणकर्त्याची गरज आहे. मानवजातीचा बचाव करण्यासाठी येशू हा योग्यपणे निवडलेला आहे याबद्दल आपण शंका का बाळगावी बरे? प्रभावकारी चमत्कार आणि येशूच्या पुनरुत्थानाला प्रत्यक्षात पाहिलेल्या योहानाने घोषित केले: “आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे.” (१ योहान ४:१४; पडताळा योहान ४:४२.) ज्याप्रकारे आपल्याजवळ येशूचे अस्तित्व, चमत्कार, मृत्यू आणि पुनरुत्थानाची शंका घेण्यासाठी काही आधार नाही त्याचप्रमाणे तो यहोवा देवाने अधिष्ठित केलेला व त्याच्या उजव्या हाताशी असलेला त्याचा कायदेशीर राजा आहे याविषयी शंका बाळगण्याचे काहीच कारण नाही. निःसंशये, नासरेथचा येशू, देवाच्या राज्याचा राजा आणि “जगाचा तारणारा” आहे.—मत्तय ६:१०.
[तळटीपा]
a तालमूदमधील येशूविषयी विवादात्मक संदर्भ विशिष्ट प्रामाणिक विद्वानच केवळ स्वीकारतात. दुसऱ्या बाजूला पाहता, टॅसिटस, स्युटोनियस, प्लिनी द यंगर यांनी येशूविषयी केलेले संदर्भ आणि फ्लेवियस जोसेफसचा निदान एक संदर्भ यांना येशूच्या अस्तित्वाचा ऐतिहासिक पुरावा म्हणून सर्वसामान्यपणे स्वीकारले जाते.
b एके प्रसंगी पुनरुत्थित येशूने त्याच्या शिष्यांसोबत मासा खाल्ला. आज काही जण दावा करतात त्याप्रमाणे त्याचे प्रकट होणे केवळ एक दृष्टांत नव्हता हे यावरून सिद्ध होते.—लूक २४:३६-४३.