राज्य घोषकांचा वृत्तान्त
‘कुचराई न करता नियमितपणे गाजवित राहिले’
येशू ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांच्या दिवसांपासून, धार्मिक नेत्यांनी शक्य त्या अनेक मार्गांनी देवराज्याच्या सुवार्तेच्या प्रचारात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. जेरूसलेमधील स्थानिक अधिकाऱ्यांनी “येशूच्या नावाने बोलू नका” असे प्रेषितांना वारंवार व “निक्षून” सांगितले. (प्रेषितांची कृत्ये ५:२७, २८, ४०) तरीदेखील, “देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली” असा अहवाल बायबल देते.—प्रेषितांची कृत्ये ६:७.
दोन हजार वर्षांनंतरही, इस्राएलमधील धार्मिक नेते त्या देशातील खऱ्या ख्रिश्चनांच्या कार्यावर बंदी आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे आपण पाहतो.
नोव्हेंबर १९८७ मध्ये जहाल धार्मिक मतवाद्यांच्या दबावामुळे, इस्राएलच्या तेल अवीव येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरातील राज्य सभागृहात होणाऱ्या ख्रिस्ती सभा थांबवाव्यात असा साक्षीदारांना आदेश दिला. हा आदेश ऑक्टोबर १९८९ पासून लागू झाला. त्याचे अनुपालन करून तीन वर्षांपर्यंत साक्षीदार भाड्याच्या जागेत एकत्र येऊ लागले. त्यांचे राज्य सभागृह कोणीच वापरत नसून त्याला कुलूप लावण्यात आले होते.
या दरम्यान, ही बाब इस्राएली सर्वोच्च न्यायालयाच्या ध्यानात आणून देण्यात आली. राज्य मुखत्यार कार्यालयाने साक्षीदारांनी सादर केलेल्या युक्तीवादाची पुनःतपासणी केली व तो आदेश निर्विवादपणे धार्मिक कलुषितपणावर आधारित असल्यामुळे त्यांचे अपील यशस्वी होईल असे त्यांना सांगण्यात आले. अशा प्रकारे स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि यहोवाचे साक्षीदार पुन्हा एकदा आनंदाने त्यांच्या राज्य सभागृहात एकत्र येऊ लागले.
त्या वर्षांदरम्यान, बायबल सत्याच्या प्रचाराचे कार्य मागे पडले का? मुळीच नाही! राज्य सभागृह बंद ठेवण्याबद्दलच्या आदेशाच्या वेळी, तेल अवीवमध्ये दोन मंडळ्या आणि जवळपासच्या लॉड शहरामध्ये एक वेगळा बायबल अभ्यास गट होता. तीन वर्षांनंतर, जेव्हा राज्य सभागृह पुन्हा उघडण्यात आले तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांची संख्या चार मंडळ्यांमध्ये बहुगुणित झाली होती तसेच, बेरशिबा येथे एक नवा बायबल अभ्यास गट एकत्रित होत होता.
अरेबिक आणि हिब्रू या मुख्य भाषांच्या लोकसमूहांपर्यंतच इस्राएलमधील वाढ मर्यादित नाही. तेथे भूतपूर्व सोवियत युनियन मधील उत्प्रवाशांचा प्रचंड लोंढा असल्यामुळे, रशियन भाषा बोलणारे यहोवाचे साक्षीदार आता त्यांना सुवार्ता सांगण्यात व्यग्र आहेत. काही रशियन भाषेतील सभा तीन मंडळ्यांमध्ये भरवल्या जातात; अलीकडील एका रशियन संमेलनासाठी शेकडो पेक्षा अधिक लोक जमले होते.
निःसंशये, कलुषित धार्मिक मतवादी खऱ्या उपासनेविरुद्ध त्यांची चळवळ चालूच ठेवतील. परंतु राज्य उद्घोषक पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचे अनुकरण करतात की जे विरोध असतानाही “शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता कुचराई न करता नियमितपणे गाजवित राहिले.”—प्रेषितांची कृत्ये ५:४२, NW.