एकटीच परंतु कधीही न त्यागलेली
ॲडा लुईसद्वारे निवेदित
माझा नेहमीच एकलकोंडी स्वभावाकडे कल असतो. मी जे काही करते त्याबद्दल देखील ठामनिश्चयी असते. इतर जण काहीवेळा त्याला हट्ट म्हणतात. स्पष्टवक्ता असणे किती सोपे आहे हेही मला माहीत आहे परंतु या सर्व वर्षांमध्ये या सवयीने माझ्यासमोर पुष्कळ समस्या उभ्या ठाकल्या.
तरीही, यहोवा देवाने माझ्या या व्यक्तिमत्त्वाच्या उणीवेमुळे मला त्यागले नाही यासाठी मी त्याचे आभार मानते. त्याच्या वचनाच्या अभ्यासाद्वारे मी माझ्या व्यक्तिमत्त्वात सुधार करू शकले आणि अशा प्रकारे सुमारे ६० वर्षे त्याच्या राज्य हितांसाठी कार्य केले. बालपणापासूनच मला घोडे आवडतात आणि देवाच्या मदतीने माझ्या काहीशा हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी घोड्याला काबूत ठेवण्यासाठी लगामाचा कसा उपयोग केला जाऊ शकतो त्याची बहुतेकवेळा आठवण करून दिली.
माझा जन्म १९०८ मध्ये, दक्षिण ऑस्ट्रेलियातील माऊंट गॅम्बिअर येथील एका सुंदर निळसर तळ्याजवळ झाला. माझ्या आईवडिलांचा डेअरी फार्म होता आणि मी आठ मुलांपैकी ज्येष्ठ कन्या होते. आम्ही सर्व लहान असतानाच आमचे बाबा मरण पावले. माझ्या दोन मोठ्या भावांना कुटुंबासाठी कमवून आणण्यासाठी दुसरीकडे कामाला जावे लागत असल्यामुळे तो फार्म सांभाळायची अधिक जबाबदारी माझ्यावरच आली. फार्मचे काम तोंडचे नव्हते, अतिशय कष्टाचे काम होते.
बायबल सत्याशी पहिला संपर्क
आमचे कुटुंब प्रेसबिटेरियन चर्चला जात असे व आम्ही तेथे नियमितपणे उपस्थित राहत होतो. मी संडे-स्कूलची शिक्षिका झाले व ज्या गोष्टी आध्यात्मिक व नैतिकरीत्या बरोबर आहेत असे मला वाटत होत्या त्या सर्व मुलांना शिकवण्याची जबाबदारी मी गंभीरपणे स्वीकारली.
माझे आजोबा १९३१ मध्ये मरण पावले. त्यांच्या वस्तूंमध्ये, वॉचटावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष जे. एफ. रदरफोर्ड यांनी लिहिलेली पुष्कळ पुस्तके होती. मी, देवाची वीणा (इंग्रजी) आणि सृष्टी (इंग्रजी) ही पुस्तके वाचण्यास प्रारंभ केला. मी जसजसे वाचत गेले तसे मला अधिकच आश्चर्य वाटू लागले की मी आजपर्यंत ज्या गोष्टींवर विश्वास ठेवत होते व मुलांना शिकवत होते त्यांना बायबलचा काहीच आधार नव्हता.
मानवी जीव अमर नाही, बहुतेक लोक मरण पावल्यानंतर स्वर्गात जाणार नाहीत आणि दुष्टांसाठी नरकामध्ये चिरकाल यातना नाहीत या सर्व गोष्टी शिकून मला धक्काच बसला. शिवाय, साप्ताहिक रविवारचा शब्बाथ पाळणे ही एक ख्रिस्ती आवश्यकता नाही हे समजल्यावर देखील मी गोंधळून गेले. आता मला एक गंभीर निर्णय घ्यावयाचा होता: ख्रिस्ती धर्मजगताच्या पारंपारिक शिकवणींनुसार चालायचे की बायबल सत्य शिकवायचे. प्रेसबिटेरियन चर्चसोबतचे माझे सर्व संबंध तोडून टाकण्यास मी उशीर लावला नाही.
आता खरोखरच एकटी
मी चर्च व संडे-स्कूलमध्ये शिकवणे सोडून देण्याचा विचार करत आहे हे मी माझ्या कुटुंबाला, मित्र-मैत्रिणींना आणि चर्चमधील पूर्वीच्या ओळखीच्या लोकांना सांगितल्यावर त्यांना ते मुळीच आवडले नाही. मी, तेव्हा जज रदरफोर्डचे लोक असे संबोधले जाणाऱ्या लोकांना जाऊन सामील झाल्याचे त्यांना समजल्यावर माझ्याबद्दलच्या वायफळ गप्पा चालू झाल्या. मला प्रत्यक्षात वाळीत टाकले नव्हते; परंतु त्याविषयी अगदी सौम्यपणे सांगायचे तर, माझ्या कुटुंबातील बहुतेक जण आणि माझे पूर्वीचे पुष्कळ मित्र माझ्याबद्दल उदास झाले.
मी जितकी पुस्तके वाचून त्यातील शास्त्रवचनांचा अभ्यास करीत गेले व पडताळून पाहू लागले तितकेच मला जाहीरपणे प्रचार करण्याची गरज असल्याचे दिसून आले. यहोवाचे साक्षीदार त्यांच्या जाहीर सेवेचा भाग म्हणून घरोघरी जातात हे मला कळाले. परंतु त्या वेळी आमच्या प्रान्तामध्ये कोणीही साक्षीदार नव्हते. यास्तव, देवाच्या राज्याचा प्रचार कसा करावा त्याबद्दल मला कोणी उत्तेजन दिले नाही किंवा कसे करावे तेही दाखवले नाही. (मत्तय २४:१४) मला खूपच एकटे वाटत होते.
तरीसुद्धा, इतरांना प्रचार करण्याबद्दलच्या बायबलमधील आज्ञेचा माझ्यावर कायमचा प्रभाव पडला म्हणून, मी काहीही करून प्रचार केलाच पाहिजे असे ठरवले. बऱ्याच वेळा प्रार्थना केल्यानंतर, मी आमच्या शेजाऱ्यांकडे जाऊन माझ्या अभ्यासाद्वारे जे काही शिकले होते ते त्यांना सांगण्यासाठी भेट द्यायची आणि त्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिगत बायबलमधूनच दाखवायचे असे मी ठरवले. मी सर्वात पहिल्यांदा माझ्या पूर्वीच्या संडे-स्कूल अधीक्षकांच्या घरी गेले. त्यांचा थंड प्रतिसाद आणि मी चर्चला सोडून देण्याबद्दलच्या त्यांच्या नकारात्मक विवेचनांमुळे मला नक्कीच उत्तेजनात्मक सुरवात मिळाली नाही. परंतु तेथून निघाल्यावर मला प्रफुल्लित आणि एक विलक्षण आंतरिक शक्ती मिळाल्यासारखे वाटले व मी दुसऱ्या घरांमध्ये जात राहिले.
तसा मला पूर्णपणे विरोध होत नव्हता पण मी जेव्हा पूर्वीच्या चर्च सोबत्यांकडे जाई तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवरील सर्वसामान्य उदासीनता पाहून मला आश्चर्य वाटत होते. माझ्या थोरल्या भावाने माझा सर्वात कडक विरोध केला तेव्हा मला आश्चर्यही वाटले आणि मी निरुत्साहीतही झाले. तेव्हा मला येशूच्या शब्दांची आठवण झाली: “आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील . . . आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करितील.”—लूक २१:१६, १७.
मी लहानवयातच अनुभवी घोडेस्वार झाल्यामुळे लोकांच्या घरी होताहोईल तितक्या लवकर पोहंचण्याचा एकच मार्ग म्हणजे घोड्यावर जाण्याचे मी ठरवले. त्यामुळे मी ग्रामीण क्षेत्रामधील दूर ठिकाणी जाऊ शकले. परंतु एके दुपारी माझा घोडा एका घसरड्या रस्त्यावर ठेचकळून पडल्यामुळे माझ्या डोक्याला फार वाईटरीतीने मार लागला. मी जगणार नाही अशी काही दिवसांपर्यंत भीती होती. त्याच्यानंतर, रस्ते जर ओले किंवा घसरडे असले तर मी घोड्यावर जाण्याऐवजी एक्क्याने [सलकीने] जाऊ लागले.a
संघटनेसोबत संपर्क
माझ्या या अपघाताच्या काही काळानंतर, ज्यांना आता पायनियर म्हटले जाते त्या पूर्ण वेळेच्या प्रचारकांच्या गटाने माऊंट गॅम्बिअर प्रान्ताला भेट दिली. अशा प्रकारे, मी समविश्वासूंबरोबर पहिल्यांदाच समोरासमोर बोलू शकले. निघण्याआधी त्यांनी मला वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तराला लिहिण्यास व मी अधिक संघटित पद्धतीने जाहीर प्रचार कार्यात भाग कसा घेऊ शकते त्याची विचारपूस करण्याचे उत्तेजन दिले.
संस्थेला लिहिल्यानंतर, मला पुस्तके, पुस्तिका आणि दारावर माझी ओळख देण्यासाठी एक साक्षपत्रही मिळाले. शाखा दप्तराशी पोस्टाद्वारे संपर्क साधल्यानंतर मला माझ्या आध्यात्मिक बंधू आणि बहिणींच्या जरा निकट असल्यासारखे वाटले. परंतु जेव्हा तो पायनियर गट तेथून निघून दुसऱ्या शहरी गेला तेव्हा मला पुन्हा एकदा पूर्वीपेक्षा अधिक एकटे वाटू लागले.
प्रत्येक दिवसाच्या नियमित साक्षकार्याला—जास्त करून एक्क्याने—जात असल्यामुळे मी सर्व जिल्ह्यात प्रसिद्ध झाले. साक्षकार्यासोबतच मी डेअरी फार्मची कामे सांभाळू शकत होते. आतापर्यंत, माझ्या कुटुंबाने मला विरोध करण्याचे थांबवले होते व ते माझ्यामध्ये दखल देण्याचा मुळीच प्रयत्न करीत नव्हते. अशा प्रकारे, चार वर्षांपर्यंत मी सुवार्तेची एकाकी, बाप्तिस्मा न घेतलेली उद्घोषक म्हणून कार्य केले.
अधिवेशन आणि सरतेशेवटी बाप्तिस्मा
सन १९३८ च्या एप्रिलमध्ये बंधू रदरफोर्ड यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली. पाळकांच्या कडक विरोधामुळे भाड्याने घेतलेले सिडनी टाऊन सभागृह रद्द करावे लागले. परंतु, शेवटच्या मिनिटाला क्रीडांगण वापरण्याची परवानगी मिळाली. बळजबरीने झालेला योजनांमधील बदल फायदेकारक ठरला, कारण या मोठ्या क्रीडांगणावर आणखी हजारोंची बसण्याची व्यवस्था करता आली. सुमारे १२,००० लोक आले. पाळकांनी आमच्या सभेला विरोध चेतवल्यामुळे स्पष्टपणे अनेकांमध्ये आस्था जागृत झाली होती.
बंधू रदरफोर्डच्या भेटीच्या संबंधाने जवळपासच्या सिडनी उपनगरात अनेक दिवसांचे एक अधिवेशन देखील भरवण्यात आले. सरतेशेवटी मी त्याच अधिवेशनात यहोवा देवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला. सर्व ऑस्ट्रेलियाच्या विस्तृत खंडातून आलेल्या शेकडो बंधू आणि बहिणींसोबत एकत्र येण्याचा अनुभव मिळाल्यामुळे मला झालेल्या आनंदाचा तुम्ही विचार करू शकाल का?
माऊंट गॅम्बिअरला परतणे
घरी आल्यावर मला खूपच एकटे वाटू लागले, तरीसुद्धा राज्य कार्यात पूर्वीपेक्षा अधिक करण्याचा मी ठामनिश्चय केला होता. लवकरच माझी ॲग्नू कुटुंबासोबत—ह्यू, त्याची पत्नी आणि त्यांची चार मुले यांच्याबरोबर ओळख झाली. ते माऊंट गॅम्बिअरपासून जवळजवळ ५० किलोमीटर दूर असलेल्या मिलीसेंट शहरामध्ये राहत होते. आणि मी त्यांच्याबरोबर नियमित बायबलचा अभ्यास घेण्यासाठी एक्क्याने ५० किलोमीटरचा एक मार्गी प्रवास करत होते. त्यांनी सत्याचा स्वीकार केल्यानंतर, माझा एकटेपणा सुसह्य झाला.
थोड्याच कालावधीत, संघटित साक्षकार्यासाठी आमचा एक गट तयार झाला. आनंदाची गोष्ट म्हणजे, त्यानंतर माझी आई आस्था घेऊ लागली आणि मग नव्याने तयार झालेल्या या गटासोबत अभ्यास करण्यासाठी माझ्याबरोबर १०० किलोमीटरचा येऊन-जाऊन प्रवास करू लागली. तिचा बाप्तिस्मा होण्याच्या काही वर्षांआधीची ही गोष्ट असली तरी तेव्हापासून आई नेहमी मला उत्तेजनकारक आणि मदतदायक ठरली. आता मला मुळीच एकटे वाटत नव्हते!
आमच्या लहान गटात चार पायनियर झाले—क्रिस्टील, एस्टेल आणि बेटी या तीन ॲग्नू मुली—आणि मी. नंतर, १९५० च्या दशकाच्या सुरवातीला सर्व तीन मुली वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेला उपस्थित राहिल्या. त्यांना मिशनरी म्हणून, भारत आणि श्रीलंका येथे नेमणूक मिळाली. तेथे त्या अजूनही विश्वासूपणे सेवा करीत आहेत.
जानेवारी १९४१ मध्ये ऑस्ट्रेलियात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आली, म्हणून आम्ही तत्काळ त्याप्रमाणे कार्य केले. आम्ही सेवेमध्ये जे काही वापरत होतो—साहित्य, पोर्टेबल फोनोग्राफ, ध्वनिमुद्रण केलेली बायबल व्याख्याने, वगैरे—सर्व एका मोठ्या पत्र्याच्या पेटीत घातले. मग ती पेटी एका छपरीत ठेवून तिला झाकून टाकण्यासाठी गाड्यांभरून वाळलेले गवत आणले.
बंदी असतानाही आम्ही आमचे घरोघरचे प्रचारकार्य चालू ठेवले. घरमालकासोबत बोलताना सावधगिरीने केवळ बायबलचा उपयोग करीत होतो. मी माझ्या घोड्याच्या खोगीराखाली नियतकालिके आणि पुस्तिका लपवून ठेवत असे आणि जर कोणी राज्य संदेशामध्ये खरोखर आस्था दाखवली तरच मी ती बाहेर काढत होते. शेवटी, जून १९४३ मध्ये बंदी उठवण्यात आली आणि आम्ही पुन्हा एकदा उघडपणे साहित्य सादर करू शकलो.
नव्या नेमणुका
सन १९४३ मध्ये मी एक पायनियर झाले व पुढील वर्षी दुसऱ्या एका नेमणूकीसाठी माऊंट गॅम्बिअर सोडले. पहिल्यांदा मला अल्पावधीसाठी स्ट्रॅथफिल्ड येथील संस्थेच्या शाखा दप्तरात काम करण्यासाठी बोलवण्यात आले. त्यानंतर, मला दक्षिणेकडील न्यू साउथ वेल्स व पश्चिम व्हिक्टोरिया या लहान शहरांमध्ये लागोपाठ नेमणुका मिळाल्या. परंतु माझ्या नेमणुकांमधील सर्वात अधिक आध्यात्मिक प्रतिफलदायी नेमणूक, मेलबर्न शहरातील मोठ्या मंडळीसोबतची होती. एका लहानशा खेडेगावातून आल्यामुळे येथे सेवा केल्याने मी पुष्कळ काही शिकू शकले.
व्हिक्टोरियाच्या गिप्पसलँड जिल्ह्याच्या खालच्या प्रदेशातील माझ्या नेमणुकीतील माझी पायनियर सोबतीण, हेलन क्रोफर्ड आणि मी अनेक बायबल अभ्यास चालवले व काही काळातच एका मंडळीची स्थापना होत असताना पाहिले. त्या जिल्ह्यात एक विस्तीर्ण ग्रामीण क्षेत्र होते व आमच्याकडे वाहतुकीसाठी एक जुनी, खटारा मोटार गाडी होती. काहीवेळा आम्ही मोटार गाडी चालवली परंतु बहुतेक वेळा आम्ही तिला ढकलतच नेली. तेव्हा मला घोड्याची किती आठवण येई! काहीवेळा तर मी खरोखरच म्हणू शकत होते: “मी घोड्यासाठी (राज्या व्यतिरिक्त) कशाचीही अदलाबदल करण्यास तयार आहे!” त्या जिल्ह्यातील बहुतेक शहरांमध्ये आज, दृढ मंडळ्या आणि उत्तम राज्य सभागृहे आहेत.
सन १९६९ मध्ये मला ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे नेमणूक मिळाली. हे ठिकाण आव्हानात्मक आणि साक्ष देण्यासाठी विविध परिस्थिती सादर करणारे होते, कारण आम्ही पुष्कळ वेळा अनेक विदेशी राजदूतावास येथील कर्मचारीवर्गाशी संपर्क साधत होतो. मी अजूनही येथेच कार्य करीत आहे, परंतु अलीकडील वर्षांमध्ये मी शहराच्या औद्योगिक क्षेत्रात माझे साक्षकार्य केंद्रित केले आहे.
सन १९७३ मध्ये मला अमेरिकेतील मोठ्या अधिवेशनांना उपस्थित राहण्याचा सुहक्क प्राप्त झाला. सन १९७९ मध्ये अधिवेशन प्रतिनिधी होण्याची व इस्राएल आणि जॉर्डनचा प्रवास करण्याची संधी माझ्या जीवनातील दुसरी एक ठळक गोष्ट होती. बायबलमध्ये उल्लेखित केलेल्या वास्तविक स्थळांना भेट देऊन तेथे घडलेल्या घटनांवर मनन करणे हा खरोखरच भावना उद्दीपित करणारा अनुभव होता. मी मृत समुद्रावरील दाट क्षारयुक्त पाण्यावर तरंगण्याचा अनुभव घेऊ शकले तसेच जॉर्डन येथील पेट्रा येथे मला पुन्हा एकदा घोडदौड करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला माझे ते पूर्वीचे दिवस आठवले जेव्हा राज्याचा संदेश विखुरलेल्या आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये पोहंचवण्यासाठी मला घोड्यांनी मदत केली.
पूर्ण वेळेची निरंतर सेवा
इतके वय झालेले असतानाही पायनियर सेवा प्रशाला, विभागीय संमेलनांच्या दरम्यान होणाऱ्या पायनियर सभा तसेच प्रवासी पर्यवेक्षकांकडून मला मिळत असलेले निरंतर प्रोत्साहन या सारख्या खास तरतुदींनी पूर्ण वेळेची सेवा निरंतर करीत राहण्याच्या माझ्या इच्छेला जिवंत ठेवले आहे. माझ्या एकाकीपणाचे दिवस इतिहासात जमा झाल्याचे यहोवाने दयाळुपणे पाहिले आहे हे मी खरेपणाने म्हणू शकते.
मी आता ८७ वर्षांची आहे व गेल्या ६० वर्षांपासून यहोवाची सेवा केल्यानंतर सडेतोड आणि ठामपणे स्वावलंबी वृत्तीच्या लोकांसाठी माझ्याकडे उत्तेजनाचे काही बोल आहेत: नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनाच्या अधीन राहा.
यहोवा आपल्याला सडेतोडपणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करो आणि आपल्याला कितीही एकटे वाटत असले तरी तो आपला त्याग करणार नाही याची नेहमी आठवण करून देवो.
[तळटीपा]
a सलकी नावाची गाडी हलकी आणि दुचाकी असते.