वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ७/१ पृ. १४-१९
  • ‘देवाचे इस्राएल’ आणि “मोठा लोकसमुदाय”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘देवाचे इस्राएल’ आणि “मोठा लोकसमुदाय”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “मोठा लोकसमुदाय”
  • विशिष्ट “याजकराज्य”
  • इस्राएलमध्ये विदेशी
  • आध्यात्मिक राष्ट्र
  • स्वर्गीय पूर्णता
  • एका पुनर्स्थापित ‘देशात’ एकत्र वास्तव्य करणारे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • स्वर्गीय नागरिकत्व असलेले ख्रिस्ती साक्षीदार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • सर्व मानवांच्या फायद्यासाठी एक राजकीय याजकगण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • तुम्ही रहिवाशी किंवा परदेशी असा, देव तुमचे स्वागत करतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ७/१ पृ. १४-१९

‘देवाचे इस्राएल’ आणि “मोठा लोकसमुदाय”

“मी पाहिले . . . कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय . . . माझ्या दृष्टीस पडला.”—प्रकटीकरण ७:९.

१-३. (अ) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना कोणते वैभवी स्वर्गीय भवितव्य आहे? (ब) पहिल्या शतकातील मंडळीचा नाश करण्याचा सैतानाने कसा प्रयत्न केला? (क) सन १९१९ मध्ये काय घडले ज्यावरून अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीला भ्रष्ट करण्याचे सैतानाचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून आले?

सा.यु. ३३ मधील ‘देवाच्या इस्राएलची’ स्थापना, यहोवाच्या उद्देशांच्या पूर्णतेतील मोठे पाऊल होते. (गलतीकर ६:१६) त्याच्या अभिषिक्‍त सदस्यांना, अमर आत्मिक प्राणी होण्याची व देवाच्या स्वर्गीय राज्यात ख्रिस्तासोबत राज्य करण्याची आशा आहे. (१ करिंथकर १५:५०, ५३, ५४) अशा पदावर असताना, यहोवाच्या नावाला पवित्र करण्यात आणि मोठा शत्रू दियाबल सैतानाचे डोके ठेचून टाकण्यात त्यांची प्रमुख भूमिका आहे. (उत्पत्ती ३:१५; रोमकर १६:२०) म्हणूनच तर सैतानाने या नव्या मंडळीचा छळ करून व तिला भ्रष्ट करून तिचा नाश करण्यास त्याची शक्‍ती सर्वस्वी पणास लावली आहे!—२ तीमथ्य २:१८; यहुदा ४; प्रकटीकरण २:१०.

२ प्रेषित जिवंत होते तोपर्यंत सैतानाला यश मिळाले नाही. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर, धर्मत्याग अनिर्बंधपणे पसरला. सरतेशेवटी, मानवी दृष्टिकोनातून पाहता, आज ख्रिस्ती धर्मजगत म्हणून ओळखली जाणारी धर्मत्यागी धार्मिक नक्कल सैतानाने ख्रिस्ती मंडळीत आणली तेव्हा ही मंडळी भ्रष्ट झाल्याचे दिसून आले. (२ थेस्सलनीकाकर २:३-८) तरीसुद्धा, खऱ्‍या ख्रिस्ती धर्माने टिकाव धरुन ठेवला.—मत्तय २८:२०.

३ काही काळापर्यंत खरे ख्रिस्ती, “निदण” किंवा खोट्या ख्रिश्‍चनांसोबतच वाढतील असे येशूने गहू आणि निदणाच्या त्याच्या दाखल्यात भाकीत केले होते; आणि तसेच झाले. परंतु शेवटल्या दिवसांदरम्यान, “राज्याचे पुत्र” पुन्हा एकदा ‘निदणापासून’ दृश्‍यपणे वेगळे होतील असेही तो म्हणाला होता. (मत्तय १३:३६-४३) हेही खरे ठरले. सन १९१९ मध्ये खरे अभिषिक्‍त ख्रिस्ती, बॅबिलॉनच्या दास्यत्वातून मुक्‍त झाले. त्यांना ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास’ अशी ईश्‍वरी ओळख मिळाली आणि ते राज्याच्या सुवार्तेची घोषणा धैर्याने करू लागले. (मत्तय २४:१४, ४५-४७; प्रकटीकरण १८:४) बहुतांशी लोक विदेशी होते; परंतु अब्राहामासारखाच त्यांचाही विश्‍वास असल्यामुळे ते खरोखर “अब्राहामाचे पुत्र” होते. ते ‘देवाच्या इस्राएलचे’ सदस्य होते.—गलतीकर ३:७, २६-२९.

“मोठा लोकसमुदाय”

४. ख्रिश्‍चनांचा कोणता गट खासकरून १९३० च्या दशकामध्ये चटकन नजरेत भरणारा झाला?

४ सुरवातीला, या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या प्रचाराला प्रतिसाद देणारे सुद्धा, आध्यात्मिक इस्राएली, म्हणजेच स्वर्गीय आशा असलेल्या १,४४,००० च्या शेष जणांपैकी झाले. (प्रकटीकरण १२:१७) परंतु, १९३० च्या दशकात दुसरा एक गट खासकरून चटकन नजरेत भरणारा झाला. त्यांना मेंढवाड्यांच्या दाखल्यातील “दुसरी मेंढरे” म्हणून ओळखण्यात आले. (योहान १०:१६) परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाची आशा असलेले ते ख्रिस्ताचे शिष्य होते. ते जणू काय अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे आध्यात्मिक संतान होते. (यशया ५९:२१; ६६:२२; पडताळा १ करिंथकर ४:१५, १६.) त्यांनी अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना विश्‍वासू आणि बुद्धिमान दास म्हणून ओळखले आणि त्यांच्या अभिषिक्‍त बांधवांप्रमाणे त्यांना यहोवासाठी गाढ प्रीती, येशूच्या बलिदानावर विश्‍वास, देवाची स्तुती करण्याचा आवेश व धार्मिकतेसाठी दुःख सहन करण्याची स्वेच्छा होती.

५. दुसऱ्‍या मेंढरांच्या पदाविषयी प्रगतिशीलपणे समज कशी प्राप्त झाली आहे?

५ सुरवातीला, दुसऱ्‍या मेंढरांचे पद पूर्णपणे समजले नव्हते, परंतु काळाच्या ओघात सर्वकाही स्पष्ट होऊ लागले. सन १९३२ मध्ये अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना, दुसऱ्‍या मेंढरांना प्रचार कार्यात—पुष्कळ दुसरी मेंढरे आधीच करत असलेल्या कार्यात भाग घेण्यास आर्जवण्याचे उत्तेजन देण्यात आले. सन १९३४ मध्ये, दुसऱ्‍या मेंढरांना पाण्याने बाप्तिस्मा घेण्याचे उत्तेजन देण्यात आले. सन १९३५ मध्ये, त्यांना प्रकटीकरणाच्या ७ व्या अध्यायातील “मोठा लोकसमुदाय” यांच्यासोबत ओळखण्यात आले. सन १९३८ मध्ये त्यांना निरीक्षक या नात्याने येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले. सन १९५० मध्ये त्यांच्यापैकीच्या प्रौढ पुरुषांना, “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा” म्हणून कार्य करणारे “अधिपति” असे समजण्यात आले. (स्तोत्र ४५:१६; यशया ३२:१, २) सन १९५३ मध्ये, देवाच्या पार्थिव संघटनेकडे—जी त्यावेळी दुसऱ्‍या मेंढरांच्या बहुसंख्यांकानी अधिककरून मिळून बनली होती—नव्या जगात अस्तित्वात असलेल्या पार्थिव संस्थेचे केंद्रस्थान या दृष्टिकोनातून पाहण्यात येऊ लागले. सन १९८५ मध्ये, येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर इतर मेंढरांना देवाचे मित्र या नात्याने धार्मिक ठरवण्यात येते व हर्मगिदोनातून बचावण्याची आशा मिळते हे समजून आले.

६. आज, अभिषिक्‍त आणि दुसरी मेंढरे यांचे सापेक्ष पद कोणते आहे व त्यामुळे कोणते प्रश्‍न उद्‌भवतात?

६ आतापर्यंत, ‘शेवटल्या काळाच्या’ अलीकडच्या भागात, १,४४,००० मधील बहुसंख्य लोक मरण पावले आहेत व त्यांना त्यांचे स्वर्गीय बक्षीस मिळाले आहे. (२ तीमथ्य ३:१; प्रकटीकरण ६:९-११; १४:१३) पार्थिव आशा असलेले ख्रिस्तीजन आता सुवार्तेचा बहुतेक प्रचार करीत आहेत आणि असे करणे येशूच्या अभिषिक्‍त बांधवांना सहकार्य देण्याचा विशेषाधिकार आहे असे ते समजतात. (मत्तय २५:४०) तथापि, हे अभिषिक्‍त लोक विश्‍वासू आणि बुद्धिमान दास आहेत ज्यांच्याद्वारे या सर्व शेवटल्या दिवसांदरम्यान आध्यात्मिक अन्‍न पुरवले जात आहे. सर्व अभिषिक्‍त जनांना त्यांचे स्वर्गीय बक्षीस प्राप्त झाल्यावर दुसऱ्‍या मेंढरांची काय स्थिती होईल? तेव्हा दुसऱ्‍या मेंढरांसाठी कोणत्या तरतूदी करण्यात येतील? प्राचीन इस्राएलची एक झलक आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी मदत देईल.

विशिष्ट “याजकराज्य”

७, ८. नियमशास्त्र कराराखाली प्राचीन इस्राएल कितपत एक याजकराज्य व पवित्र राष्ट्र होते?

७ यहोवाने इस्राएलला त्याचे खास राष्ट्र म्हणून निवडले तेव्हा, त्याने त्यांच्यासोबत एक करार केला. तो म्हणाला: “म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे; पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” (निर्गम १९:५, ६) इस्राएल लोक नियमशास्त्र कराराच्या आधारावर यहोवाचे खास लोक होते. तर मग, याजकांचे राज्य आणि पवित्र राष्ट्राबद्दलची भविष्यवाणी कशी पूर्ण होणार होती?

८ इस्राएल राष्ट्र विश्‍वासू होते तेव्हा त्याने यहोवाचे सार्वभौमत्व कबूल केले आणि त्याला आपला राजा म्हणून स्वीकारले. (यशया ३३:२२) अशा प्रकारे ते एक राज्य होते. परंतु नंतर प्रकट केल्याप्रमाणे ‘राज्याविषयीच्या’ भविष्यवाणीचा अर्थ ह्‍याहूनही अधिक होता. शिवाय, त्यांनी यहोवाचे नियम पाळले तेव्हा ते शुद्ध आणि त्यांच्या आसपासच्या राष्ट्रांपासून वेगळे होते. ते खरोखरच एक पवित्र राष्ट्र होते. (अनुवाद ७:५, ६) ते याजकांचे राज्य होते का? इस्राएलमध्ये लेवी वंशाला मंदिराच्या सेवेसाठी राखून ठेवण्यात आले होते व त्या वंशामध्ये लेवीय याजकपण होते. मोशेच्या नियमशास्त्राची सुरवात झाली तेव्हा, प्रत्येक गैर-लेवीय कुटुंबातील ज्येष्ठ पुत्राऐवजी लेवीय पुरुषांना घेण्यात आले.a (निर्गम २२:२९; गणना ३:११-१६, ४०-५१) अशा प्रकारे इस्राएलमधील प्रत्येक कुटुंब जणू काय मंदिराच्या सेवेसाठी प्रतिनिधीत्व करत होते. अशा प्रातिनिधिक मार्गाने या राष्ट्राला याजकगण बनण्याचा हा सर्वात सोपा मार्ग होता. तरीदेखील, त्यांनी राष्ट्रांसमोर यहोवाचे प्रतिनिधीत्व केले. खऱ्‍या देवाची उपासना करू इच्छिणाऱ्‍या कोणत्याही विदेश्‍याला इस्राएलसोबत सहवास राखताना असे करावे लागत असे.—२ इतिहास ६:३२, ३३; यशया ६०:१०.

९. यहोवाने उत्तरेकडील इस्राएल राष्ट्राला ‘याजकाचे काम करू न देण्याचे’ काय कारण होते?

९ शलमोनाच्या मृत्यूनंतर, राजा यराबामच्या सत्तेखालील इस्राएलचे उत्तरेकडील राष्ट्र आणि राजा रहबामच्या सत्तेखालील यहुदाचे दक्षिणेकडील राष्ट्र अशी देवाच्या लोकांमध्ये विभागणी झाली. शुद्ध भक्‍तीचे केंद्र, म्हणजेच मंदिर यहुदाच्या क्षेत्रात असल्यामुळे यराबामने त्याच्या स्वतःच्या राष्ट्रीय क्षेत्रात वासरांच्या प्रतिमा करून बेकायदेशीर उपासनेचे प्रकार चालू केले. पुढे “त्याने उच्च स्थानी मंदिरे बांधिली, आणि सर्व लोकांतून याजक नेमिले; ते लेवीचे वंशज नव्हते.” (१ राजे १२:३१) अहाब राजाने त्याच्या विदेशी बायकोला, ईजबेल हिला त्या राष्ट्रामध्ये बआल उपासनेची स्थापना करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर उत्तरेकडील हे राष्ट्र खोट्या उपासनेत गढून गेले. शेवटी, यहोवाने त्या बंडखोर राष्ट्रावर न्यायदंड पुकारला. होशेयद्वारे तो म्हणाला: “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीहि तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही.” (होशेय ४:६) त्यानंतर लगेचच, अश्‍शुरी लोकांनी इस्राएलच्या उत्तरेकडील राष्ट्राचा पूर्णपणे विध्वंस केला.

१०. दक्षिणेकडील यहुदाच्या राष्ट्राने विश्‍वासू असताना राष्ट्रांसमोर यहोवाचे प्रतिनिधीत्व कशा प्रकारे केले?

१० दक्षिणेकडील यहुदा राष्ट्राबद्दल काय? हिज्कीयाच्या दिवसांमध्ये, यहोवा यशयाद्वारे त्यांना म्हणाला: “तुम्ही माझे साक्षी आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस . . . मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करितील.” (यशया ४३:१०, २१; ४४:२१) दक्षिणेकडील राष्ट्र विश्‍वासू होते तेव्हा त्यांनी, इतरांना यहोवाचा महिमा विदित केला आणि खऱ्‍या अंतःकरणाच्या लोकांना त्याच्या मंदिराकडे आकर्षित केले तसेच कायदेशीर लेवीय याजकगणाला सेवा करू दिली.

इस्राएलमध्ये विदेशी

११, १२. इस्राएलसोबत यहोवाचे उपासक झालेल्या काही विदेश्‍यांची नावे सांगा.

११ मोशेद्वारे ज्याची पत्नी सिप्पोरा, एक मिद्यानी होती त्याला दिलेल्या नियमशास्त्रात ज्या विदेश्‍यांनी या राष्ट्रीय साक्षीला प्रतिसाद दिला त्यांच्यासाठी काही तरतूद करण्यात आली होती. इस्राएलने इजिप्त सोडले तेव्हा गैर-यहुद्यांचा “एक मोठा मिश्र समुदाय” देखील त्यांच्याबरोबर निघाला व नियमशास्त्र देते वेळी ते देखील उपस्थित होते. (निर्गम २:१६-२२; १२:३८; गणना ११:४) राहाब आणि तिचे कुटुंब यरीहोतून वाचले व नंतर त्यांना यहुदी मंडळीमध्ये स्वीकारण्यात आले. (यहोशवा ६:२३-२५) त्यानंतर लगेचच, गिबोनी लोकांनी इस्राएलबरोबर शांतीचे करार केले आणि त्यांना निवासमंडपाच्या संबंधाने काही कार्ये नेमून देण्यात आली.—यहोशवा ९:३-२७; तसेच १ राजे ८:४१-४३ हेही पहा; एस्तेर ८:१७.

१२ परिणामी, विदेशी लोकांनी उच्च पदी कामगिरी बजावली. बथशिबाचा पती उरीया जो हित्ती होता त्याला, सेलक अम्मोन्याप्रमाणेच दावीदाच्या “सैन्यातील वीर” म्हणून गणले होते. (१ इतिहास ११:२६, ३९, ४१; २ शमुवेल ११:३, ४) एबद-मलेख हा इथियोपियन मनुष्य राजगृहात काम करत होता व तो राजाला जाऊन भेटू शकत होता. (यिर्मया ३८:७-९) इस्राएल राष्ट्र बॅबिलॉनच्या दास्यत्वातून परतल्यावर, गैर-इस्राएली नथीनीमला याजकांना मदत करण्याच्या अधिक जबाबदाऱ्‍या देण्यात आल्या. (एज्रा ७:२४) हे अनेक विश्‍वासू विदेशी किंवा अन्यदेशीय रहिवाशी आजच्या मोठ्या लोकसमुदायाला पूर्वचिन्हीत करतात असा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन असल्यामुळे, त्यांच्या स्थितीविषयी आपल्याला आज आस्था वाटली पाहिजे.

१३, १४. (अ) इस्राएलमध्ये यहुदीयमतानुसारी लोकांचे विशेषाधिकार व जबाबदाऱ्‍या कोणत्या होत्या? (ब) इस्राएली लोकांना विश्‍वासू यहुदीयमतानुसारी लोकांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावयाचे होते?

१३ हे सर्व यहुदीयमतानुसारी मोशेच्या नियमशास्त्रानुसार यहोवाचे समर्पित उपासक होते आणि इस्राएल लोकांबरोबर तेही राष्ट्रांपासून वेगळे झालेले होते. (लेवीय २४:२२) त्यांनी इस्राएल लोकांप्रमाणेच बलिदाने अर्पिली, खोट्या उपासनेपासून दूर राहिले व रक्‍त वर्ज्य केले. (लेवीय १७:१०-१४; २०:२) त्यांनी शलमोनाला मंदिराच्या बांधकामात हातभार लावला व राजा आसा व राजा हिज्कीया यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्‍या उपासनेच्या पुनर्स्थापनेत सामील झाले. (१ इतिहास २२:२; २ इतिहास १५:८-१४; ३०:२५) सा.  यु.  ३३ च्या पेन्टेकॉस्टला पेत्राने राज्याच्या पहिल्या चावीचा उपयोग केला तेव्हा, “यहुदी व [गैर-यहुदी] यहुदीयमतानुसारी” या दोघांनी त्याचे शब्द ऐकले. बहुधा, त्या दिवशी बाप्तिस्मा घेतलेल्या तीन हजार लोकांपैकी काही जण यहुदीयमतानुसारी होते. (प्रेषितांची कृत्ये २:१०, ४१) त्यानंतर लगेचच, पेत्राने राज्याच्या शेवटल्या चावीचा उपयोग कर्नेल्य आणि त्याच्या कुटुंबासोबत करण्याआधी एका इथियोपियन यहुदीयमतानुसारीला फिलिप्पने बाप्तिस्मा दिला. (मत्तय १६:१९; प्रेषितांची कृत्ये ८:२६-४०; १०:३०-४८) स्पष्टतः, यहुदीयमतानुसारी यांना विदेशी समजले जात नव्हते.

१४ तरीसुद्धा, इस्राएलमधील यहुदीयमतानुसारी लोकांचे पद मूळ गावी जन्मलेल्या इस्राएली लोकांसारखे नव्हते. यहुदीयमतानुसारी यांनी याजक या नात्याने कार्य केले नाही व लेवीय याजकगणात त्यांच्या ज्येष्ठ पुत्रांचे प्रतिनिधीत्व होत नव्हते.b शिवाय यहुदीयमतानुसारी लोकांना इस्राएलमध्ये वारसाने मिळणारी जमीन देखील नव्हती. तरीही, इस्राएली लोकांना विश्‍वासू यहुदीयमतानुसारी लोकांबद्दल विचारीपणा दाखवावा व त्यांना बांधव समजावे अशी आज्ञा देण्यात आली होती.—लेवीय १९:३३, ३४.

आध्यात्मिक राष्ट्र

१५. दैहिक इस्राएलने मशीहाला स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे काय झाले?

१५ इस्राएलला शुद्ध आणि आजूबाजूच्या इतर राष्ट्रांपासून वेगळे ठेवण्याकरता नियमशास्त्राची रचना केली होती. परंतु ते दुसऱ्‍या उद्देशाकरता देखील उपयोगी पडले. प्रेषित पौलाने लिहिले: “आपण विश्‍वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.” (गलतीकर ३:२४) दुःखाची गोष्ट अशी, की बहुतेक इस्राएली लोक नियमशास्त्राद्वारे ख्रिस्ताकडे जाण्यात अपयशी ठरले. (मत्तय २३:१५; योहान १:११) यास्तव, यहोवा देवाने त्या राष्ट्राचा त्याग केला व ‘देवाच्या इस्राएलचा’ जन्म होऊ दिला. शिवाय, त्याने गैर-यहुदी लोकांना या नव्या इस्राएलचे नागरिक होण्याचे निमंत्रण दिले. (गलतीकर ३:२८; ६:१६) निर्गम १९:५, ६ मध्ये यहोवाने ज्या राजकीय याजकगणाचे अभिवचन दिले होते त्या अभिवचनाची आश्‍चर्यकारक आणि शेवटची पूर्णता या नव्या राष्ट्राच्या बाबतीत पूर्ण झाली. ती कशी?

१६, १७. पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिस्ती कोणत्या अर्थाने “राजकीय”? व ‘याजकगण’ आहेत?

१६ पेत्राने निर्गम १९:६ चा संदर्भ घेऊन, त्याच्या दिवसातील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लिहिले: “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे स्वतःचे लोक असे आहा.” (१ पेत्र २:९) त्याचा काय अर्थ होतो? पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिस्ती राजे आहेत का? नाही, त्यांचे राज्यत्व अद्याप भवितव्यामध्ये आहे. (१ करिंथकर ४:८) तरीसुद्धा, त्यांना “राजकीय” असे संबोधणे म्हणजेच, भवितव्यातील राज्याच्या विशेषाधिकारांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. आताही ते थोर सार्वभौम यहोवा देवाने नियुक्‍त केलेल्या एका राजाच्या, येशूच्या सत्तेखाली एक राष्ट्र या नात्याने आहेत. पौलाने लिहिले: “[यहोवाने] आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.”—कलस्सैकर १:१३.

१७ पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिस्ती, याजकगण आहेत का? काही बाबतीत होय. मंडळी या नात्याने ते निर्विवाद याजकीय कर्तव्य पार पाडतात. पेत्राने असे म्हणून त्याचे विवरण दिले: “तुम्हीहि स्वतः . . . आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहा; ह्‍यासाठी की, . . . तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.” (१ पेत्र २:५; १ करिंथकर ३:१६) आज अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे शेष, सामुदायिक रीतीने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आहेत. यांच्याद्वारे आध्यात्मिक अन्‍न पुरवले जाते. (मत्तय २४:४५-४७) प्राचीन इस्राएलमध्ये होते त्याप्रमाणे, यहोवाची उपासना करू इच्छिणाऱ्‍या कोणालाही या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबत ती उपासना केली पाहिजे.

१८. याजकगण या नात्याने, पृथ्वीवरील अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीची कोणती प्रमुख जबाबदारी आहे?

१८ शिवाय, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी, राष्ट्रांमध्ये यहोवाच्या महानतेची साक्ष देण्याचा विशेषाधिकार स्वतःकडे घेतला. पेत्राने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना राजकीय याजकगण असे संबोधले तेव्हा, त्याच्या मनात प्रचार कार्य होते असा तो संदर्भ दाखवून देतो. निश्‍चितच, त्याने एका अवतरणामध्ये निर्गम १९:६ मधील यहोवाचे अभिवचन व यशया ४३:२१ मधील इस्राएलला उद्देशिलेले त्याचे शब्द यांना एकत्र करून म्हटले: “तुम्ही तर . . . राजकीय याजकगण . . . असे आहा; [ह्‍यासाठी] की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९) याच्या सुसंगतेत, यहोवाचे गुण प्रसिद्ध करणे मंदिरामध्ये बलिदान देण्यासारखे आहे असे पौलाने म्हटले. त्याने लिहिले: “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण [येशूच्याद्वारे] देवाला नित्य अर्पण करावा.”—इब्रीयांस १३:१५.

स्वर्गीय पूर्णता

१९. इस्राएल याजकांचे राज्य होईल या अभिवचनाची शेवटची, भव्य पूर्णता काय आहे?

१९ परंतु, शेवटी निर्गम १९:५, ६ ची एक महान वैभवी पूर्णता आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रेषित योहान, स्वर्गीय प्राणी पुनरुत्थित येशूची स्तुती करताना हे वचन लागू करत असल्याचे ऐकतो: “तू आपल्या रक्‍ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्‍यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:९, १०) त्याच्या शेवटल्या मथितार्थात, राजकीय याजकगण देवाचे स्वर्गीय राज्य, येशूने आपल्याला ज्याच्याबद्दल प्रार्थना करावयास शिकवले ते शासन करणारे राज्य आहे. (लूक ११:२) मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहिलेल्या सर्व १,४४,००० अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचा त्या राज्य व्यवस्थेमध्ये भाग असेल. (प्रकटीकरण २०:४, ६) मोशेद्वारे इतक्या काळाआधी केलेल्या अभिवचनाची किती आश्‍चर्यकारक पूर्णता होईल!

२०. कोणत्या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही मिळावयाचे बाकी आहे?

२० सर्व अभिषिक्‍तांना त्यांचा आश्‍चर्यकारक वारसा प्राप्त झाल्यावर, या सर्व गोष्टींचा मोठ्या लोकसमुदायाच्या स्थितीशी आणि त्यांच्या भवितव्याशी काय संबंध आहे? या श्रृंखलेच्या शेवटल्या लेखात ते स्पष्ट होईल.

[तळटीपा]

a इस्राएलच्या याजकगणाची सुरवात झाली तेव्हा इस्राएलमधील गैर-इस्राएली वंशातील ज्येष्ठ पुत्रांची आणि लेवी वंशातील पुरुषांची मोजणी करण्यात आली. लेवी पुरुषांपेक्षा २७३ जास्त ज्येष्ठ पुत्र होते. यास्तव, २७३ इतके लोक अधिक असल्यामुळे खंडणी म्हणून प्रत्येकासाठी पाच शेकेल द्यावेत अशी यहोवाने आज्ञा दिली.

b सा. यु. पू. १५१३ मध्ये नियमशास्त्राची सुरवात करण्यात आली तेव्हा तेथे गैर-इस्राएल लोकांचा मोठा मिश्र समुदाय उपस्थित होता; परंतु इस्राएलच्या ज्येष्ठ पुत्रांऐवजी लेवीयांना घेण्यात आले तेव्हा त्यांच्या ज्येष्ठ पुत्रांना त्यात सामील करण्यात आले नाही. (परिच्छेद ८ पहा.) याच कारणास्तव, या गैर-इस्राएल लोकांच्या ज्येष्ठ पुत्रांऐवजी लेवीयांना घेण्यात आले नाही.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

◻ दुसऱ्‍या मेंढरांच्या पदाविषयी प्रगतिशीलपणे समज कशी प्राप्त होत गेली?

◻ यहोवाने उत्तरेकडील इस्राएल राष्ट्राला याजकाचे काम का करू दिले नाही?

◻ विश्‍वासू असताना, राष्ट्रांसमोर यहुदाचे कोणते पद होते?

◻ इस्राएलमध्ये विश्‍वासू यहुदीयमतानुसारी लोकांचे कोणते पद होते?

◻ अभिषिक्‍तांची मंडळी याजक राज्य या नात्याने कसे कार्य करते?

[१६ पानांवरील चित्रं]

राजकीय याजकगण या नात्याने, अभिषिक्‍त ख्रिस्ती पृथ्वीवर यहोवाची महिमा प्रसिद्ध करतात

[१८ पानांवरील चित्रं]

निर्गम १९:६ ची शेवटची पूर्णता म्हणजे राज्य होय

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा