“सत्य काय आहे?”
समोरासमोर उभे राहिलेले दोन पुरुष एकमेकांपासून फारच विभिन्न होते. एक राजकारणी होता जो उपहास करणारा, महत्त्वकांक्षी, श्रीमंत आणि स्वतःचे भवितव्य चांगले करण्यासाठी काहीही करण्यास तयार होता. दुसरा एक शिक्षक होता जो संपत्ती आणि प्रतिष्ठा झिडकारण्यास आणि इतरांचे जीव वाचवण्याकरता स्वतःचे बलिदान देण्यास तयार होता. या दोन्ही पुरुषांमध्ये एकमत नव्हते हे सांगण्याची गरज नाही! विशेषकरून एका बाबतीत त्या दोघांचा पूर्णपणे मतभेद होता—ती म्हणजे सत्याची बाब.
हे दोघे पंतय पिलात आणि येशू ख्रिस्त होते. येशू एका दंडित गुन्हेगाराप्रमाणे पिलातासमोर उभा होता. का बरे? येशूने याचे कारण स्पष्ट केले—होय, पृथ्वीवर येऊन त्याची सेवा हाती घेण्याचे एकच कारण होते—ते म्हणजे: सत्य. तो म्हणाला: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.”—योहान १८:३७.
पिलाताचे उत्तर “सत्य काय आहे?” हा स्मरणीय प्रश्न होता. (योहान १८:३८) त्याला खरोखरच उत्तर हवे होते का? बहुतेक नाही. येशूला प्रामाणिक हेतूने विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकत होता, परंतु पिलाताला त्याने उत्तर दिले नाही. आणि बायबल म्हणते, की हा प्रश्न विचारल्यानंतर पिलात सरळ श्रोतृकक्षेच्या बाहेर गेला. या रोमी शासकाने कदाचित हा प्रश्न अविश्वासी उपहासाने विचारला असावा, जणू असे म्हणण्यासाठी की, “सत्य? ते काय आहे? नाही तसे काहीच नाही!”a
सत्याकडे पाहण्याचा पिलाताचा संशयखोर दृष्टिकोन आज असामान्य नाही. सत्य सापेक्ष आहे असा अनेक लोक विश्वास करतात—दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, एक व्यक्ती ज्याला सत्य मानते त्याला दुसरी व्यक्ती असत्य मानते, म्हणून दोन्हीही “बरोबर” असू शकतात. हा विश्वास सार्वत्रिक असल्यामुळे त्याच्यासाठी एक शब्द देखील ठरविण्यात आला आहे—“सापेक्षतावाद.” तुम्ही देखील सत्याकडे याच दृष्टिकोनातून पाहता का? असे आहे तर मग, तुम्ही या दृष्टिकोनाची कसून तपासणी न करताच त्याचा स्वीकार केला आहे का? तुमचा हा दृष्टिकोन नसला तरी, या तत्त्वज्ञानाचा तुमच्या जीवनावर किती परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का?
सत्यावर हल्ला
पूर्ण सत्याच्या कल्पनेची शंका बाळगणारा पंतय पिलात हा पहिलाच मनुष्य नव्हता. काही प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानी लोकांनी वस्तुतः, अशा शंकेच्या शिकवणींना आपला जीवन मार्ग बनवला होता! पिलाताच्या पाच शतकांआधी, खरे ज्ञान साध्य करण्याजोगे नाही असे परमेनिडसने (युरोपियन मेटाफिजिक्सचा जनक म्हणून ज्याला समजले जात होते) विश्वास केला. “सर्व प्राचीन तत्त्वज्ञानी लोकांपैकी महान” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेमोक्रिटसने प्रतिपादले: “सत्य खोलवर गाढलेले आहे. . . . आपल्याला निश्चित काहीच माहीत नाही.” कदाचित सर्वांपेक्षा अधिक पूज्य असलेल्या सॉक्रेटिसने, त्याला वास्तविकतेत जे माहीत आहे ते म्हणजे त्याला काहीच माहीत नाही असे म्हटले.
सत्य समजले जाऊ शकते या कल्पनेवरील हा हल्ला आमच्या दिवसांपर्यंत चालूच आहे. उदाहरणार्थ, ज्ञानेंद्रियांद्वारे ज्ञान मिळत असल्यामुळे ती ज्ञानेंद्रिये फसवली जाऊ शकतात म्हणूनच कोणतेही ज्ञान यथार्थपणे खरे नाही असे काही तत्त्वज्ञानी म्हणतात. फ्रेंच तत्त्वज्ञानी आणि गणितशास्त्रज्ञ रने डेसकार्टिस यांनी, त्यांना ज्या गोष्टींची खात्री होती असे वाटत होते त्या सर्वांचे परीक्षण करण्याचे ठरवले. त्यांनी बाकीचे सर्व काही नाकारले परंतु त्यांना निर्विवाद वाटणारे एकच सत्य स्वीकारले ते म्हणजे: “कोगिटो एरगो सम,” किंवा “मी विचार करतो म्हणजे मी आहे.”
सापेक्षतावादाची संस्कृती
सापेक्षतावाद केवळ तत्त्वज्ञानी लोकांपुरताच मर्यादित नाही. तो धार्मिक नेत्यांद्वारे शिकवला जातो, शाळांमध्ये बिंबवला जातो व प्रसार माध्यमाद्वारे प्रसार केला जातो. बिशपवर्गातील जॉन एस. स्पाँग काही वर्षांआधी म्हणाले होते: “आपल्या जवळ सत्य आहे असा आपला विचार . . . आपण बदलला पाहिजे आणि परमसत्य सर्वांच्या आकलनाच्या पलीकडे आहे हे जाणून इतरांनी आपल्या दृष्टिकोनाप्रत यावे.” आजच्या अनेक पाळकांप्रमाणेच स्पाँग यांचा सापेक्षतावाद, “प्रत्येकाला त्याचा निर्णय घेऊ द्या” या तत्त्वज्ञानासाठी बायबलच्या नैतिक शिकवणींचा त्याग करण्यासही तयार आहे. उदाहरणार्थ, बिशपांनी चालवलेल्या चर्चमधील समलिंगी लोकांना “निश्चिंत वाटण्यासाठी,” स्पाँग यांनी एका पुस्तकात लिहिले ज्यामध्ये, स्वतः प्रेषित पौल एक समलिंगी होता असा दावा केला होता!
अनेक राष्ट्रांतील शालेय व्यवस्था अशाच प्रकारची विचारसरणी उत्पन्न करत असल्याचे दिसते. ॲलन ब्लूम यांनी अमेरिकी मन बंद होणे (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकात असे लिहिले: “एका गोष्टीची प्राध्यापकाला खात्री असू शकते ती म्हणजे: विद्यापीठात प्रवेश करणारा बहुतेक प्रत्येक विद्यार्थी, सत्य सापेक्ष आहे असा विश्वास करतो किंवा तो विश्वास करतो असे म्हणतो.” जर त्याने या बाबतीत त्याच्या विद्यार्थ्यांच्या मताला आवाहन केले तर, “तो २+२=४ या गणिताच्या समीकरणावर संशय घेत आहे” अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया ते दाखवतील असे ब्लूम यांना दिसून आले.
ह्याच विचारसरणीला इतर अगणित मार्गांद्वारे उत्तेजित केले जाते. उदाहरणार्थ, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांचे वार्ताहार बहुधा त्यांच्या दर्शकांसमोर एखाद्या गोष्टीचे सत्य सादर करण्यापेक्षा त्यांचे मनोरंजन करण्यात अधिक रस घेतात असे दिसते. काही वृत्त कार्यक्रमांनी तर, कार्यक्रम अधिक नाट्यमय भासवण्यासाठी खोट्या फिल्म सादर केल्या. आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये सत्यावर अधिक जोरदार हल्ला केला जात आहे. आपले पालक आणि आजीआजोबा ज्या मूल्यांप्रमाणे आणि नैतिक सत्यांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करत आले त्याला सर्वत्र जुन्या पद्धतीचे समजले जाते आणि बहुधा थट्टेसाठी चवाठ्यावर आणले जाते.
अशाप्रकारचा सापेक्षतावाद खुल्या मनाचे प्रतिनिधित्व करतो आणि म्हणूनच त्याचा मानवी समाजावर सकारात्मक प्रभाव पडतो असा काही जण वादविवाद करतील हे निश्चित. परंतु तसे खरेच आहे का? आणि तुमच्यावर त्याचा प्रभाव पडतो त्याविषयी काय? सत्य सापेक्ष आहे किंवा ते अस्तित्वात नाही असा तुम्ही विश्वास करता का? असे आहे तर त्याचा शोध घेणे तुम्हाला आपला वेळ वाया घालवण्यासारखे वाटेल. अशा प्रकारच्या दृष्टिकोनाचा तुमच्या भवितव्यावर परिणाम होईल.
[तळटीपा]
a बायबल विद्वान आर. सी. एच. लेन्स्की यांच्या मते, पिलाताची “बोलण्याची पद्धत बेपर्वा प्रपंचासक्त व्यक्तीप्रमाणे आहे कारण त्याचा प्रश्न विचारण्यामागील हेतू म्हणजे तो, धार्मिक सत्याच्या स्वरूपातील कोणतीही गोष्ट निरर्थक कल्पना आहे असे म्हणू इच्छित होता.”