आम्हाला अति मोलवान मोती देण्यात आला होता
रिचर्ड गंथर यांच्याद्वारा निवेदित
तो सप्टेंबर १९५९ चा समय होता. आम्ही ज्युलिओ सीजर या इटालियन प्रवासी जहाजात असून न्यूयॉर्क ते कॅडिज, स्पेनचा अटलांटिक महासागर पार करत होतो. वॉचटावर संस्थेने माझी पत्नी रिटा आणि दुसरे मिशनरी दांपत्य पॉल व इवलन हंडर्टमॉर्क यांच्यासह माझी नियुक्ती आयबेरियन देशात केली. आम्ही अनेक आव्हानांना तोंड देणार होतो. परंतु आम्ही या मिशनरी कार्याला कशी सुरूवात केली बरे?
रिटाने आणि मी यहोवाचे साक्षीदार या नात्याने न्यूजर्सी, अमेरिका येथे १९५० मध्ये बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर लगेचच, आम्ही एक निर्णय घेतला ज्यामुळे आमच्या हातावर एक अति मोलवान मोती ठेवण्यात येणार होता. क्षेत्रात सेवा करण्यास पुरेसे बंधू आणि भगिणी असणाऱ्या मंडळीत आम्ही होतो. त्यामुळे प्रचारकांची नितांत गरज असणाऱ्या ठिकाणी सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे आम्हाला वाटले. आम्ही १९५८ च्या उन्हाळ्यात न्यूयॉर्क शहरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये मिशनरी सेवेसाठी अर्ज केला.
त्यानंतर थोडक्याच अवधीत, आम्हाला वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेचे आमंत्रण देण्यात आले आणि एका वर्षातच आम्ही स्पेनमध्ये मिशनरी म्हणून जाण्याच्या मार्गावर होतो. अनेक व्यवस्थांमध्ये पूर्णपणे उद्दीपित होऊन गुंग असल्यामुळे आम्हाला काय देण्यात आले, हे त्यावेळी आम्हाला उमगले नाही. येशू अति मोलवान मोत्याविषयी बोलला होता. (मत्तय १३:४५, ४६) मिशनरी विशेषाधिकार हा त्याच्या दृष्टांताचा मुद्दा नव्हता तरी सुद्धा मिशनरी या नात्याने सेवा करण्याचा आमचा विशेषाधिकार आमच्यासाठी अशाप्रकारच्या अति मोलवान मोत्याच्या तुलनेचा होता. सिंहावलोकन केल्यानंतर, आम्ही यहोवाच्या संघटनेमध्ये सेवा करण्याच्या या बहुमोल बक्षिसाची आता मनःपूर्वक कदर करतो.
एक स्मरणीय अनुभव
त्याकाळी गिलियड मिशनरी अभ्यासक्रम न्यूयॉर्क स्टेटच्या फिंगर लेक्स क्षेत्राच्या सुंदर ग्रामीण परिसरामध्ये घेण्यात येत असे. तेथे आम्ही सहा महिने बायबल अभ्यासात तसेच खऱ्या ख्रिस्ती सहवासात पूर्णपणे गढून गेलो होतो. आम्ही जगीक काम आणि त्रासापासून पूर्णपणे दूर होतो. आमचे सह-विद्यार्थी ऑस्ट्रेलिया, बोलिव्हिया, ब्रिटन, ग्रीस, न्यूझीलंड वगैरे देशांचा समावेश असणाऱ्या जगाच्या अनेक भागातून आले होते. लवकरच पदविदानाचा दिवस आला. ऑगस्ट १९५९ मध्ये आम्ही निरोप देऊन आमच्या मिशनरी नेमणूकांसाठी प्रवास करण्यास जहाजावर चढलो तेव्हा आमच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. आम्ही एक महिन्यानंतर स्पेनच्या भूमीवर पाऊल ठेवले.
नवीन संस्कृती
प्रचंड रॉक ऑफ जिब्राल्टर जवळील दक्षिणी ॲल्जिसायरस बंदरावर आम्ही उतरलो. त्या रात्री रिटा आणि मी तसेच हंडर्टमॉर्कस दांपत्य अशा आम्ही चौघांनी माद्रिदला जाण्यासाठी रेल्वे पकडली. आम्ही मरकॅदोर या हॉटेलात गेलो आणि संस्थेच्या गुप्त शाखा दप्तराच्या सदस्यांशी संपर्क साधेपर्यंत तेथेच थांबलो. त्यावेळी स्पेनवर सर सेनापती फ्रॅन्सिस्को फ्रॅन्को याचे हुकुमशाही राज्य होते. याचा अर्थ, देशातील अधिकृत मान्यता असलेला एकमेव धर्म म्हणजे रोमन कॅथलिक चर्च, असा होता. जाहीरपणे दुसऱ्या एखाद्या धर्माला आचरणे बेकायदेशीर होते आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या घरोघरच्या प्रचार कार्यावर बंदी घालण्यात आली होती. धार्मिक सभा देखील निषिद्ध होत्या यामुळे त्या काळातील स्पेनमधील ३० मंडळ्यातील सुमारे १,२०० यहोवाच्या साक्षीदारांना इतर देशांतील साक्षीदारांप्रमाणे राज्य सभागृहांमध्ये एकत्रित होता येत नव्हते. आम्हाला गुप्तपणे खाजगी घरांमध्ये जमावे लागत असे.
स्पॅनिश शिकणे आणि सुरवात करणे
भाषा शिकणे हे आमचे पहिले आव्हान होते. पहिल्या महिन्यात आम्ही दिवसाचे ११ तास—रोज सकाळी ४ तासांचा वर्ग आणि त्यानंतर ७ तास व्यक्तीशः स्पॅनिश शिकण्यात घालवत होतो. दुसऱ्या महिन्यात सकाळी हाच कार्यक्रम होता; परंतु दुपारची वेळ आम्ही घरोघरचा प्रचार करण्यासाठी राखून ठेवली होती. याची तुम्ही कल्पना तरी करू शकता का? आम्हाला अजूनही भाषा येत नव्हती तरीदेखील रिटा आणि मी कार्डावर लिहिलेल्या एका तोंडपाठ केलेल्या प्रस्तावनेच्या साहाय्याने आमच्या स्वतःवर विसंबून राहून घरोघरचे कार्य करण्यासाठी बाहेर पडलो!
व्हॅलिकस, माद्रिदच्या कामगार-वर्ग विभागात दरवाजा ठोठावलेला मला आठवते. गरज पडेल म्हणून कार्ड हातात ठेवून मी स्पॅनिश भाषेत असे म्हणालो: “नमस्ते. आम्ही ख्रिस्ती कार्य करत आहोत. बायबल म्हणते (आम्ही वचन वाचत असू). आपण ही पुस्तिका घ्यावी अशी आमची इच्छा आहे.” खरे पाहता, त्या युवतीने केवळ पाहिले आणि नंतर ती पुस्तिका घेतली. तिची पुनर्भेट घेतली तेव्हा तिने आम्हाला आत बोलावले आणि आम्ही बोलत असताना ती केवळ आमच्याकडे पाहत होती. आमच्या मर्यादित भाषेत आम्ही तिच्यासह बायबल अभ्यास सुरू केला व अभ्यासाच्या दरम्यान ती केवळ आमचे ऐकत होती आणि पाहत होती. अखेरीस काही काळानंतर तिने आम्हाला सांगितले की, तिला दिलेल्या आमच्या पहिल्या भेटीत आम्ही तिच्याबरोबर जे बोललो ते तिला कळाले नव्हते; परंतु तिने डियॉस (देव) हा शब्द ऐकला होता आणि हे काहीतरी चांगले आहे हे समजण्यास तो शब्द पुरेसा होता. कालांतराने, तिने बायबलचे पुष्कळ ज्ञान संपादन करून बाप्तिस्मा घेतला आणि यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक झाली.
माझ्यासाठी स्पॅनिश शिकणे फारच कठीण होते. शहरात प्रवास करताना क्रियापदाला धातूची रूपे देण्याचे पाठांतर मी करत असे. जे पहिल्या आठवड्यात पाठ केले आहे ते मी दुसऱ्याच आठवड्यात विसरत असे. हे फारच निराशाजनक होते. कित्येकवेळा तर हा प्रयत्न करण्याचे मी सोडून दिले होते. मी अशाप्रकारचे भयंकर स्पॅनिश बोलत असल्यामुळे स्पॅनिश बांधवांमध्ये नेतृत्व करताना त्यांना फारच सहनशील व्हावे लागले. एका प्रांतीय अधिवेशनामध्ये बांधवाने मला व्यासपीठावरून वाचण्याकरता एक हस्तलिखीत घोषणा दिली. त्याचे हस्ताक्षर वाचण्यास अवघड गेल्याने मी अशी घोषणा केली: “उद्या स्टेडियममध्ये तुमच्या म्युलेटास (कुबड्या) घेऊन या.” ही घोषणा, “उद्या स्टेडियममध्ये तुमचे म्यॉलेटॉस (सामान) घेऊन या.” अशी करण्यास हवी होती. अर्थातच जमावामध्ये हशा पिकला आणि स्वाभाविकपणे माझी तारांबळ उडाली.
माद्रिदमधील आरंभीच्या परीक्षा
माद्रिदमधील पहिली काही वर्षे रिटा आणि माझ्यासाठी भावनात्मकरित्या फारच कठीण होती. आम्हाला आमच्या घरची आणि मित्रांची फार आठवण येत होती. प्रत्येक वेळी आम्हाला अमेरिकेतून पत्र येत तेव्हा आम्ही घरची ओढ असणाऱ्या भावनेच्या प्रवाहात पूर्णपणे वाहून जात होतो. घरची ओढ लागण्याचा काळ पूर्णपणे भारावून टाकणारा असे; परंतु तो निघून गेला. खरे पाहता, अति मोलवान मोती प्राप्त करण्यासाठी आम्ही घर, कुटुंब आणि मित्रांचा त्याग केला होता. आम्हाला जुळवून घेण्याची गरज होती.
माद्रिदमध्ये सुरवातीला आम्ही एका अतिशय जुनाट वसतिगृहात राहात होतो. या ठिकाणी आमच्यासाठी एक खोली होती आणि येथे आम्हाला दिवसातून तीन वेळा जेवण मिळत असे. या छोट्या आंधारलेल्या खोलीत पेंढ्यापासून बनविलेल्या गाद्या होत्या. आमचा मर्यादित मासिक भत्ता काही प्रमाणात वसतिगृहाच्या महिन्याच्या भाड्यामध्ये खर्च होत असे. सामान्यतः, आम्ही दुपारचे जेवण वसतिगृहात करत असू आणि त्याची मालकीण रात्रीचे जेवण गरम राहावे म्हणून ओवनमध्ये ठेवत असे त्यामुळे रात्री उशिरा आम्हाला खाण्यास काहीतरी मिळत असे. तथापि, सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावरून प्रचार कार्य करत चालल्यामुळे आम्हाला फार भूक लागत असे. आमच्याकडे भत्ता शिल्लक नसल्यास सर्वात स्वस्त चॉकलेट बार विकत घेण्यासाठी आमचे व्यक्तिगत पैसे आम्ही खर्च करत होतो. तथापि, संस्थेच्या परिमंडल पर्यवेक्षकांनी भेट दिल्यानंतर या परिस्थितीमध्ये लवकरच बदल घडून आला. त्यांनी आमची दैन्यावस्था पाहिल्यानंतर मिशनरी गृहासाठी आम्ही एका लहान अपार्टमेंटचा शोध घेऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. स्वतःचे अपार्टमेंट असणे हे वसतिगृहाच्या स्वयंपाक खोलीतील आंघोळीच्या टबमध्ये आंघोळ करण्यापेक्षा फारच उत्तम होते. आता आम्हाला शॉवर, अन्न ठेवण्यासाठी रिफ्रिजरेटर आणि आमचे जेवण तयार करण्यासाठी इलेक्ट्रीक बर्नर मिळणार होता. या काळजीबद्दल आम्ही फारच कृतज्ञ होतो.
माद्रिद येथील विलक्षण अनुभव
घरोघरचा प्रचार मोठ्या सावधगिरीने केला जात होता. माद्रिदमधील दररोजच्या वर्दळीमुळे स्वतःला लपविण्यास आम्हाला मदत झाली यामुळे आमच्याकडे चटकन लक्ष वेधले जात नव्हते. परदेशी असल्याचे लोकांना चटकन कळू नये म्हणून इतरांप्रमाणे वेशभूषा आणि हालचाली करण्याचा आम्ही प्रयत्न केला. अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणे, दरवाजा ठोठावणे, त्या व्यक्तीशी बोलणे आणि नंतर ती इमारत, तो मार्ग व ते क्षेत्र सोडून निघून जाणे ही आमच्या दारोदारी प्रचार करण्याची पद्धत होती. घरमालकाने पोलिसाला बोलावण्याची नेहमीच शक्यता होती आणि त्यामुळे आसपास राहणे बुद्धिमत्तेचे नव्हते. पॉल आणि इवलन हंडर्टमॉर्क ही सावधगिरीची पद्धत वापरत असतानाही त्यांना पकडण्यात आले आणि १९६० मध्ये देशातून हाकलून देण्यात आले. त्यांनी शेजारील पोर्तुगाल देशात जाऊन तेथे कित्येक वर्ष सेवा केली आणि या ठिकाणी पॉल भूमिगत शाखा दप्तराचा कारभार पाहत होते. आज ते सॅन डायेगो, कॅलिफोर्निया येथे शहर पर्यवेक्षक आहेत.
तथापि, आमच्या बाबतीतही तेच घडले. केवळ सहा महिन्यानंतर, पोर्तुगालमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सहा मिशनऱ्यांना देश सोडून देण्याची आज्ञा देण्यात आली! यामुळे आनंदी विकास घडून आला कारण आमच्यासह गिलियड वर्गात असणाऱ्या एरिक आणि हेजल बेव्हीरेज यांना देखील आता पोर्तुगाल सोडून स्पेनला येण्यासाठी सांगण्यात आले होते. म्हणून फेब्रुवारी १९६२ मध्ये मरकॅदोर हॉटेलमध्ये आम्ही पुन्हा एकदा—यावेळी एरिक आणि हेजल यांच्या आगमनाच्या स्वागतार्थ उपस्थित होतो.
माद्रिदमधील आरंभीच्या दिवसामध्ये रिटाला आणि मला धार्मिक दांभिकपणाचा व्यक्तिशः अनुभव आला. बरनार्डो आणि मारिया या दांपत्याचा आम्ही बायबल अभ्यास घेत होतो. बरनार्डो याने इमारतीची निरुपयोगी सामग्री गोळा करून लाकडांच्या फळ्यांपासून त्याचे घर तयार केले होते. आम्ही त्यांच्याबरोबर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होतो आणि अभ्यास झाल्यानंतर ते आम्हाला ब्रेड, द्राक्षारस आणि चीज किंवा त्यांच्याकडे असेल ते देत असत. हे चीज अगदी अमेरिकन चीजप्रमाणे असल्याचे माझ्या लक्षात आले. एके रात्री अभ्यास झाल्यानंतर त्यांनी चीज असलेला डबा बाहेर काढला. त्यावर इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात असे लिहिण्यात आले होते, “अमेरिकी लोकांकडून स्पेनच्या लोकांना—विक्रीसाठी नाही.” या गरीब कुटुंबाला हे चीज कसे मिळाले होते? गरिबांकरता या चीजचे वितरण करण्यासाठी शासनाद्वारे कॅथलिक चर्चचा वापर करण्यात येत होता. परंतु पाळक त्याची चक्क विक्री करत होता!
सैनिकांसोबत फलदायक सेवा
लवकरच असे काही घडले ज्यामुळे आम्हाला आणि इतरांना मोठा आशीर्वाद मिळणार होता. वॉल्टर केडॅश नामक युवकाला आम्ही भेट द्यावी, अशी सूचना शाखा दप्तराकडून आम्हाला मिळाली. हा युवक माद्रिदपासून काही मैल दूर असणाऱ्या टॉरेकॉन येथील अमेरिकी वायुसेनेत तैनात होता. आम्ही त्याला आणि त्याच्या पत्नीला भेट दिली आणि त्यांच्याबरोबर तसेच वायुसेनेतील आणखी एका दांपत्याबरोबर बायबल अभ्यासाला सुरवात केली.
त्यावेळी अमेरिकेच्या वायुसेनेत सुमारे पाच लोकांचा मी बायबल अभ्यास संचालित करत होतो, अर्थातच सर्व इंग्रजीमध्ये. त्यापैकी सात जण बाप्तिस्मा घेऊन नंतर अमेरिकेला परतले आणि त्यापैकी चार जण मंडळीचे वडील बनले.
आमच्या कार्यावर बंदी असल्याने देशात पुस्तके, नियतकालिके आणि बायबल आणण्यासाठी फारच कमी संधी उपलब्ध असण्याचा तो काळ होता. तथापि, पर्यटक आणि आमचे अमेरिकी संपर्क याकडून काही साहित्य देशात आणले जात होते. गुप्त साहित्याच्या भांडाराचा कार्यभाग सांभाळण्यासाठी शाखेद्वारा माझी नेमणूक करण्यात आली. व्हॅलिकस येथे स्टेशनरी दुकानाच्या मागील बाजूस सामान ठेवण्याची ती एक खोली होती. मालकाची पत्नी यहोवाची एक साक्षीदार होती. मालक साक्षीदार नव्हता तरी देखील त्याने आमच्या कामाचा आदर केला. स्वतःला आणि त्याच्या धंद्याला मोठी जोखीम असतानाही संपूर्ण देशातील शहरांमध्ये पाठविण्यास साहित्याचे पार्सल बनविण्यासाठी दुकानाची मागील जागा वापरण्याची त्याने मला परवानगी दिली. ही खोली अपेक्षा केल्याप्रमाणे—नेहमीच धुळीने माखलेली आणि पुठ्ठ्यांच्या खोक्यांनी अव्यवस्थित होती—त्यामुळे लवकरात लवकर लावता येईल आणि काही सेकंदात पटकन लपविता येईल असा एक बाक आणि कपाट मला बनवावे लागले. संध्याकाळी दुकानात कोणी नाही तोपर्यंत मी दुकानात थांबत असे आणि त्यानंतर माझ्या पार्सलसह चटकन दुकानाच्या बाहेर पडत असे.
संपूर्ण देशातील मंडळ्यांमध्ये टेहळणी बुरूज आणि सावध राहा! आणि इतर साहित्यासारख्या आध्यात्मिक सामग्रीचे वितरण करण्यात भाग घेणे हा खरोखरच एक विशेषाधिकार होता. तो उद्दीपित करणारा काळ होता.
रिटाने १६ बायबल अभ्यास चालविण्यात आनंद मिळवला आणि त्यापैकी निम्मेजण बाप्तिस्मा घेतलेले बनले. डोलोरेज ही एक विवाहित युवती होती आणि तिला हृदय विकारामुळे हिवाळ्यात बिछान्यावरच राहावे लागत असे. वसंत ऋतुमध्ये ती उठून काहीतरी हालचाल करू शकत होती. डोलोरेजचा विश्वास दृढ होता. टूलूझ फ्रान्स, येथे होणाऱ्या आपल्या प्रांतीय अधिवेशनाची वेळ आली तेव्हा तेथे जाण्याची तिची फार इच्छा होती. तिच्या हृदयाच्या स्थितीला पाहता असे करणे मुर्खतेचे होईल, असा डॉक्टरांनी तिला सावधगिरीचा इशारा दिला. घरातील पोशाख आणि चप्पल घालून त्याचप्रमाणे कोणतेही सामान बरोबर न घेता तिच्या पतीला, तिच्या आईला तसेच इतरांना निरोप देण्यासाठी ती रेल्वे स्टेशनला गेली. स्वतःला सोडून जाताना पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू आले आणि म्हणून ती रेल्वेमध्ये चढली आणि फ्रान्सला गेली! हे सर्व घडल्याची रिटाला कल्पना नव्हती. परंतु अधिवेशनामध्ये डोलोरेजला मनसोक्त हसताना पाहून रिटाला आश्चर्यच वाटले!
असामान्य बायबल अभ्यास
डॉन बेनिग्नो फ्रॅन्को, “एल प्रोफेसर” यांचा उल्लेख केल्याशिवाय माद्रिदमधील आमच्या नेमणूकांच्या अहवालाची सांगता आम्ही करू शकत नाही. एका स्थानिक साक्षीदाराने या वयस्कर सद्गृहस्थाकडे मला नेले जो आपल्या पत्नीसोबत मोडकळीस आलेल्या एका वसाहतीत राहत होता. मी त्याच्याबरोबर बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली. सुमारे दीड वर्षापर्यंत अभ्यास केल्यानंतर बाप्तिस्मा घेण्याची त्याने माझ्याकडे पृच्छा केली आणि तो एक यहोवाचा साक्षीदार झाला.
तो वयस्कर सद्गृहस्थ, डॉन बेनिग्नो फ्रॅन्को त्या काळचा स्पेनचा संचालक फ्रॅन्सिस्को फ्रॅन्को याचा चुलत भाऊ होता. डॉन बेनिग्नो नेहमीच स्वातंत्र्य-प्रेमी असल्याचे दिसत होते. स्पेनच्या यादवी युद्धामध्ये त्याने प्रजासत्ताक राज्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि त्याच्या चुलत भावाचा विरोध केला—त्या सेनापतीने युद्ध जिंकले आणि कॅथलिक हुकुमशाहीची प्रस्थापना केली. डॉन बेनिग्नो यांच्याकडून १९३९ मध्ये काम करण्याचा हक्क काढून घेण्यात आला आणि त्याचा चरितार्थ मर्यादित करण्यात आला. अशाप्रकारे सर सेनापती फ्रॅन्सिस्को फ्रॅन्कोचा म्हणजे स्पेनच्या सैनिकी संचालकाचा चुलत भाऊ यहोवाचा एक साक्षीदार झाला
आश्चर्यकारक निमंत्रण
सन १९६५ मध्ये स्पेन शाखा दप्तराने बार्सेलोनाच्या विभागीय कार्यात प्रवास करण्याचे आम्हाला आमंत्रण दिले. माद्रिद येथील सलोख्याचे नातेसंबध प्रस्थापित असणाऱ्या आमच्या प्रेमळ बांधवांना सोडून जाणे, हा याचा अर्थ होता. आता माझ्यासाठी ही केवळ एका नवीन अनुभवाचीच नव्हे तर एका परीक्षेची देखील सुरवात होणार होती. माझ्या योग्यतेवर मी नेहमीच शंका घेत असल्याने हा भीतीदायक अनुभव होता. सेवेच्या क्षेत्रात प्रभावी होण्यास यहोवाने मला समर्थ केल्याचे मला पूर्णपणे ठाऊक होते.
प्रत्येक सप्ताहामध्ये मंडळीमध्ये भेटी देण्याचा अर्थ बांधवांच्या घरांमध्ये राहणे होता. आमच्याकडे कायमचे घर नव्हते आणि सामान्यपणे दर दोन सप्ताहास आम्ही दुसऱ्या घरात राहत होतो. विशेषतः एखाद्या स्त्रीसाठी हे कठीण आहे. परंतु लवकरच बार्सेलोनामध्ये राहणाऱ्या जोस आणि रोजर एस्कुदा यांनी आम्हाला त्यांच्यासह पुष्कळ दिवस राहण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी आमची प्रेमळ काळजी घेतली, म्हणजे आमचे सामान ठेवण्यासाठी आम्हाला एक निश्चित जागा होती आणि रविवारी संध्याकाळी घरी येण्यासाठी एक नियमित स्थान होते.
रिटाने आणि मी विभागीय कार्याची पुढील चार वर्षे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या कॅटेलोनियाच्या प्रांतात घालवली. आमच्या सर्व बायबल सभा खाजगी घरांमध्ये गुप्तपणे घेतल्या जात होत्या आणि आमच्याकडे लक्ष आकर्षिले जाऊ नये म्हणून आमचा घरोघरचा प्रचार देखील सावधगिरीने केला जात होता. काहीवेळा रविवारी संपूर्ण मंडळी अरण्यात “पिकनिक” करण्यासाठी एकत्र जमत असे. खासकरून, विभागीय संमेलनासाठी आम्ही याप्रकारे एकत्र येत होतो.
नोकरी आणि स्वातंत्र्य धोक्यात घालून मंडळीला एकत्रित आणि कार्यरत ठेवण्यासाठी परिश्रम करणाऱ्या अनेक समर्पित आध्यात्मिक बांधवांची आम्ही नेहमी प्रशंसा करतो. शहराच्या उप-नगरांमध्ये कार्याची वाढ होण्यासाठी त्यापैकी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच १९७० मध्ये बंदी उठविल्यानंतर आणि धार्मिक स्वातंत्र्यास मान्यता मिळाल्यानंतर स्पेनमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ घडून येण्यास ही गोष्ट मूलभूत ठरली.
आमची परदेशातील नियुक्ती सोडावी लागली
स्पेनमध्ये आमच्या दहा वर्षांच्या काळात यहोवाची सेवा करण्याच्या खास आशीर्वादामुळे मिळणारा आनंद आमच्या पालकांच्या अवस्थेमुळे कमी झाला. माझ्या आईवडिलांची काळजी घेण्याकरता घरी जाण्यासाठी आम्ही अनेकदा आमच्या नियुक्तीचा त्याग करण्याच्या बेतातच होतो. तथापि, माझ्या पालकांच्या जवळच्या मंडळ्यांतील प्रेमळ बंधू आणि भगिणींमुळे स्पेनमधील आमचे कार्य पुढे चालू ठेवण्यास शक्य झाले. होय, मिशनरी कार्यात सेवा करण्याच्या विशेषाधिकाराला काही प्रमाणात इतरांनी समर्थ केले होते आणि त्यांनी देव राज्याला प्रथमस्थानी ठेवण्यात आमच्यासह सहभाग घेतला होता.
अखेरीस, डिसेंबर १९६८ मध्ये माझ्या आईची काळजी घेण्यासाठी आम्ही घरी गेलो. त्याच महिन्यात वडील मरण पावले आणि आता आई एकटी झाली होती. अजूनही तुलनात्मक दृष्ट्या पूर्ण-वेळेच्या सेवेसाठी आम्ही रिकामे असल्यामुळे विभागीय कार्यात सेवा करण्याची नियुक्ती आम्हाला मिळाली; परंतु यावेळी ही नियुक्ती अमेरिकेत होती. पुढील २० वर्षे आम्ही स्पेनच्या विभागात सेवा केली. आम्ही अति मोलवान मिशनरी मोती गमावला असला तरी आमच्या हातात दुसरा ठेवण्यात आला होता.
मादक पदार्थ आणि हिंसाचार यामध्ये प्रचार करणे
आता आम्ही हिंसाचाराचा विशेष प्रभाव असलेल्या शहरातील क्षेत्रात राहणाऱ्या अनेक बंधू आणि भगिणींच्या आसपास सेवा करत होतो. न्यूयॉर्क, ब्रूकलिन येथील विभागीय कार्यातील पहिल्याच आठवड्यात रिटाची पर्स हिसकावून घेण्यात आली होती.
एकदा रिटा आणि मी न्यूयॉर्क शहराच्या दुसऱ्या भागात एका गटाबरोबर घरोघरचे प्रचार कार्य करत होतो. रस्यावरून वळताना एका त्यागलेल्या इमारतीच्या भिंतीच्या भगदाडासमोर काही लोकांना रांगेत उभे असल्याचे आम्ही पाहिले. आम्ही काही पावले पुढे गेलो तेव्हा एक तरुण व्यक्ती फूटपाथवर उभी राहून आमच्याकडे पाहत असल्याची आम्हाला दिसली. दूरवरच्या वळणावर आणखी एक मनुष्य होता आणि तो पोलिसांच्या गाड्यांकडे बघत होता. आम्ही मादक पदार्थांच्या व्यापाराच्या अगदी मध्यभागी पोहंचलो होतो! आम्हाला तेथे पाहून त्याला धक्काच बसला; परंतु आमच्याकडील टेहळणी बुरूज नियतकालिक पाहिल्यानंतर त्याने सुटकेचा निःश्वास सोडला. खरे पाहता, मी पोलीस अधिकारी होण्यास हवे होते! नंतर त्याने स्पॅनिश भाषेत म्हटले, “¡लॉस ऑटॉलॉइऑस! ¡लॉस ऑटॉलॉइऑस!” (टेहळणी बुरूज! टेहळणी बुरूज!). आम्ही कोण आहोत हे त्यांनी नियतकालिकांवरून ओळखले आणि त्यामुळे सर्वकाही ठीक झाले होते. त्याच्या जवळून जाताना मी त्याला म्हटले, “¿बॉयेनॉस डायॉस, कोमा एस्तॉ?” (नमस्ते, तुम्ही कसे आहात?) माझ्यासाठी प्रार्थना करा, असे म्हणून त्याने उत्तर दिले!
कठीण निर्णय
सन १९९० मध्ये माझ्या आईबरोबर प्रत्येक दिवशी मला राहावे लागणार हे उघड झाले. प्रवासी कार्यात राहण्यासाठी आम्ही मोठा प्रयत्न केला; परंतु दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणे अशक्य असल्याचे आमच्या विवेकाने आम्हाला सांगितले. आईची प्रेमळपणे काळजी घेण्यात यावी अशी आमची निश्चितच इच्छा होती. परंतु पुन्हा एकदा आम्हाला अति मोलवान मोत्याचा त्याग करावा लागणार होता आणि हा मोती आमच्यासाठी फारच बहुमोल होता. मिशनरी किंवा यहोवाच्या संघटनेमध्ये प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने सेवा करण्याच्या मोत्यांची तुलना जगातील भौतिक मोत्यांबरोबर किंवा ते एखाद्यासाठी जे काही करू शकतात याबरोबर केल्यास जगीक मोती फारच क्षुद्र आहेत.
रिटा आणि मी वयाच्या साठीमध्ये आहोत. आम्ही स्थानिक स्पॅनिश-बोलणाऱ्या मंडळीत सेवा करण्यात समाधानी आणि आनंदी आहोत. यहोवाच्या सेवेतील आमच्या गत वर्षांकडे सिंहावलोकन केल्यानंतर आम्हाला काही अति मोलवान मोती दिल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो.
[२३ पानांवरील चित्रं]
रिटा आणि पॉल व इवलन हंडर्टमॉर्क (उजवीकडे) यांच्यासोबत माद्रिदमधील बैलांच्या झुंजीच्या रिंगणाच्या बाहेर
[२४ पानांवरील चित्रं]
अरण्यातील “पिकनिक” करणाऱ्या मंडळीची सेवा करताना