मोझांबिकमध्ये “मीठ विकणे”
फ्रॅन्सिस्को ऑनॉ हे मोझांबिक प्रादेशिक समितीचे सदस्य असून ते “आश्रितांसाठी असलेल्या छावणीमध्ये” दहा वर्षे होते. त्यांचा अनुभव ते सांगतात: “आम्हाला येथे काही काळ राहावे लागणार हे मला माहीत होते त्यामुळे नियमित पायनियरींग पुढे चालू ठेवण्यासाठी विभागीय पर्यवेक्षकांना मी विचारले. परंतु, छावणीमध्ये बहुतेक सर्वचजन यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे मला जाहीर सेवेमध्ये पर्याप्त वेळ घालवण्यास कसे शक्य होईल? मी येथून ४७ किलोमीटर दूर असणाऱ्या मिलँज नगरामध्ये जाऊन प्रचार करण्यासाठी लोकांचा शोध घेईन, असे मी त्यांना सांगितले.
“आम्हाला छावणीच्या बाहेर जाण्याची कायदेशीररीत्या परवानगी नव्हती; परंतु या नियमाला इतक्या काटेकोरपणे लागू केले जात नसे. मला आठवते की, मी झुडपामध्ये गुडघे टेकून स्थानिक लोकांना प्रचार करण्यासाठी मला संधी मिळावी यासाठी प्रार्थना करत असे. यहोवाने लवकरच माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले.
“मी एका मनुष्याला भेटलो ज्याच्याकडे एक सायकल होती. म्हणून मी त्याच्याबरोबर एक करार केला. पावसाळा सुरु होण्याआधी मी त्याच्या दोन एकर जमिनीची मशागत केल्यास मला मोबदला म्हणून त्याची सायकल देण्याचे त्याने कबूल केले. त्यामुळे प्रत्येक सकाळी त्याच्या जमिनीची मशागत करण्यास मी सुरुवात केली. यहोवाने माझ्या प्रयत्नांना आशीर्वादित केले आणि अखेरीस मला ती सायकल मिळाली.
“या सायकलमुळे मला मिलँज या मोठ्या शहरात जाणे सुलभ झाले आणि या फलदायक क्षेत्रामध्ये परिणामकारकपणे पायनियरींग करण्यास देखील मला मदत मिळाली. आमच्या कार्यावर बंदी असल्यामुळे लोकांपर्यंत सत्य पोहंचविण्यासाठी मला युक्ती लढवावी लागली. शर्टच्या आतील बाजूला पुस्तके व नियतकालिके लपविली आणि एका थैलीमध्ये मीठ घेऊन मीठ विकण्याच्या धंद्याची मी सुरुवात केला. मीठ ५ मेटीकायस किंमतीला विकण्याऐवजी ते मी १५ मेटीकायस किंमतीला विकत असे. (मीठ फारच स्वस्त असते तर लोकांनी सर्व मीठ विकत घेतले असते आणि त्यामुळे प्रचार करण्यासाठी माझ्याकडे थोडेसुद्धा मीठ शिल्लक राहिले नसते!) मी पुढीलप्रमाणे संभाषण करत असे:
“‘नमस्ते! मी आज मीठ विकत आहे.’
“‘काय भाव आहे?’
“‘पंधरा मेटीकायस.’
“‘नको, नको. ते फारच महाग आहे!’
“‘होय, मीठ महाग असल्याचे मला कबूल आहे. तुम्हाला हे आता महाग वाटते; परंतु काही काळानंतर ते यापेक्षाही महाग होईल, याचा जरा विचार करा. बायबलमध्ये हे भाकीत केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का?’
“‘माझ्या बायबलमध्ये असे मी कधीही वाचले नाही.’
“‘होय, बायबलमध्ये असे लिहिले आहे. तुमचे बायबल आणा मी तुम्हाला त्यातूनच दाखवतो.’
“अशाप्रकारे त्याच्याच बायबलच्या साहाय्याने संभाषण सुरू होत असे आणि त्यावेळी माझे बायबल शर्टच्या आत लपलेल्या स्थितीत राहत असे. मी प्रकटीकरणातील सहाव्या अध्यायाचा उल्लेख कठीण परिस्थिती आणि अन्नटंचाईसाठी करत असे. अनुकूल प्रतिक्रिया मिळाल्यास मी सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते किंवा तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता ही पुस्तके काढून त्यांच्या साहाय्याने बायबल अभ्यासास आरंभ करत असे.
“याचा परिणाम म्हणजे, मिलँज येथील १५ आस्थेवाईकांसोबत बायबल अभ्यास सुरु करणे मला शक्य झाले. परंतु काही काळातच अधिकाऱ्यांना आमच्या कार्यहालचालींची जाणीव झाली. एके दिवशी बायबल अभ्यास संचालित करत असताना पोलिस अनपेक्षितपणे घरात शिरले आणि त्यांनी आम्हाला अटक केली. कुटुंबातील लहान मुलांसहित आम्हा सर्वांना स्थानिक तुरुंगात नेण्यात आले. एका महिन्याचा तुरुंगवास भोगल्यानंतर सर्वांना पुन्हा एकदा छावणीमध्ये परत पाठवण्यात आले.”
अशाप्रकारच्या अनुभवांमुळे आपल्या बांधवांचा आवेश कमी झालेला नाही. तर त्याउलट, फ्रॅन्सिस्को आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या हजारो बांधवांबरोबर जे पूर्वी छावण्यांमध्ये होते, आता मोझांबिकमधील स्वतंत्र परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात उपासना आणि प्रचार करत आहेत.