वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ३/१५ पृ. २१-२४
  • निवृत्ती आमच्यासाठी नाही!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • निवृत्ती आमच्यासाठी नाही!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • त्यांना काय आनंदित करते
  • जुळवून घेण्याची स्वेच्छा
  • शारीरिक समस्या असतानाही सहन करणे
  • क्रियाशील संस्था
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ३/१५ पृ. २१-२४

निवृत्ती आमच्यासाठी नाही!

जपानमधील टोकियो येथील एका असामान्य गृहाला भेट दिल्यानंतर “निवृत्ती आमच्यासाठी नाही,” हा संदेश तुम्हाला तेथे मिळेल. या कुटुंबामध्ये २२ स्त्री-पुरुष राहतात आणि त्यांचे सरासरी वय ७० वर्षे आहे. ते सर्व रक्‍ताच्या नात्यामुळे नव्हे तर सामाईक आस्था—मिशनरी सेवेमुळे संघटित आहेत. ते पूर्ण-वेळेच्या प्रचार कार्यामध्ये एकूण १,०२६ वर्षांपासून कार्यरत आहेत! सर्वात वृद्ध असणाऱ्‍या तीन सदस्यांचा जन्म १९१० मध्ये झाला. त्यापैकी सातजणांनी त्यांच्या पूर्ण-वेळेच्या सेवेची सुरवात किशोरावस्थेमध्ये केली. त्यातील नऊ जणांनी दुसऱ्‍या जागतिक महायुद्धानंतर जपानमध्ये देवाच्या राज्य–प्रचार कार्याची प्राथमिक अवस्थेपासून आत्तापर्यंत झालेली वाढ पाहिली आहे.—यशया ६०:२२.

तथापि, आधीच्या वॉचटावर शाखा दप्तराची सहा मजल्यांची इमारत ही एक प्रोत्साहनाची जागा आहे; तेथे राहणाऱ्‍या मिशनऱ्‍यांचा उत्साह आणि त्यांची प्रभावशाली मनोवृत्ती हे त्याचे मुख्य कारण आहे. त्यापैकी पुष्कळांवर वयोमान आणि अशक्‍त प्रकृतीमुळे शारीरिक मर्यादा आहेत; तरीदेखील या आध्यात्मिक योद्धयांमधील एकहीजण स्वस्थ बसण्यासाठी तयार नाही. जपानी साक्षीदारांनी त्यांच्यासाठी तळमजल्यावर राज्य सभागृह त्याचप्रमाणे लिफ्टची व्यवस्था करण्याद्वारे या इमारतीची संपूर्ण दुरुस्ती केली आहे.

त्यांना काय आनंदित करते

मिशनरी अनेक वर्षांपासून त्यांच्या नियुक्‍तीमध्ये कायम आहेत आणि हे त्यांचे घरच आहे असे त्यांना वाटते. या कुटुंबातील एक वृद्ध सदस्या म्हणते, “मी गेल्या उन्हाळ्यामध्ये प्रांतीय अधिवेशनासाठी ऑस्ट्रेलिया येथे गेले आणि केवळ दोन आठवड्यानंतर मी मिशनरी गृहात येण्यासाठी देखील तयार होते!” मिशनरी ज्या लोकांची सेवा करतात त्यांच्यावर ते प्रेम करतात आणि त्यांच्याप्रीत्यर्थ त्यांनी सखोल स्नेहभाव विकसित केला आहे. सर्व मिशनरी गतकाळातील कार्यांच्या आठवणी जाग्या करणाऱ्‍या पत्रांद्वारे तसेच फोन कॉल्समुळे आनंदित होतात.

परिश्रमपूर्वक सेवेचा हा परिणाम आहे. यहोवावरील प्रेमामुळे उद्युक्‍त होऊन या मिशनऱ्‍यांनी विविध परिस्थितींमध्ये देवाच्या वचनाचा प्रचार तत्परतेने केला आहे. (पडताळा २ तीमथ्य ४:२.) जपानमध्ये ३७ वर्षे सेवा केलेल्या व्हायरा मॅके म्हणतात, “यहोवाची सेवा करत असल्यामुळे आनंदित असण्यास आम्ही स्वतःला प्रशिक्षित केले आहे. दरवाज्यामध्ये कोणीही आले नाही, तरी देखील यहोवाची साक्ष देण्यासाठी आम्ही तेथे हजर असतो.”

या मिशनऱ्‍यांपैकी बारा जणांनी कधीच विवाह केला नाही; तरी सुद्धा प्रभूची सेवा अविचलितपणे करण्यात ते आनंदी आहेत. (१ करिंथकर ७:३५) मिशनरी या नात्याने ४३ वर्षे सेवा केलेल्या ग्लॅडीस ग्रेगरी त्यापैकी एक आहेत. त्या म्हणतात, “यहोवाची सेवा मोठ्या प्रमाणात करता यावी म्हणून मी पायनियर कार्य, नंतर गिलियड [वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला] आणि पुढे मिशनरी कार्यामध्ये सामील झाले. अविवाहित राहण्याचा कोणताही निर्धार केलेला नसतानाही मी अविवाहित राहिले आणि अनेक मित्रांप्रमाणे याचा मला एकदा सुद्धा खेद वाटला नाही.”

जुळवून घेण्याची स्वेच्छा

काही लोक वृद्ध होतात तसे हट्टी बनतात; परंतु या मिशनऱ्‍यांची जुळवून घेण्याची इच्छा आहे. लॉईस डायर, मॉली हेरॉन, लीना आणि मार्गीर्ट व्हिंटलर हे सर्व टोकियो येथे वसाहत भूखंडातील अगदी लहान मिशनरी गृहामध्ये राहत होते. ते त्या ठिकाणी २० पेक्षा अधिक वर्षांपर्यंत राहिले आणि स्थानिक लोकांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या क्षेत्रांमध्ये व्हिंटलर बहिणींकडून ४० लोकांनी आणि मॉली आणि लॉईस यांच्याकडून ७४ लोकांनी नियतकालिक मार्गाचा स्वीकार केला होता. त्यानंतर, संस्थेने त्यांना टोकियोच्या मध्यभागी असणाऱ्‍या सहा मजल्यांच्या या मिशनरी गृहामध्ये स्थानांतर करण्यासाठी सांगितले. लीना कबूल करतात की, “सुरवातीला मी निराश आणि दुःखी झाले होते.” तथापि, त्यांनी नेहमीच त्यांच्या नवीन नियुक्‍तींशी जुळवून घेतले आहे. त्यांना आता कसे वाटते? लीना उत्तर देतात, “अगदी आनंदी, आमचा स्वयंपाक बनविण्यासाठी आणि या गृहाची स्वच्छता राखण्यासाठी बेथेलचे दोन बंधू येथे आहेत. आमची उत्तमप्रकारे काळजी घेण्यात येते.” “यहोवाची संघटना आमची प्रेमळपणे काळजी घेते आणि त्यामुळे आम्हाला टिकून राहण्यास मदत मिळते,” लॉईस यांच्या या वक्‍तव्याशी ते सर्वजण सहमत आहेत.

नॉरेन थॉम्पसन यांनी देखील नवीन परिस्थितींशी जुळवून घेतले. त्या म्हणतात, “माझ्या पतीबरोबर [मूळचे न्यूझीलंडचे रहिवासी] जिल्हा कार्यामध्ये १५ वर्षांपर्यंत सहभागिता करण्याचा सुहक्क मला प्राप्त झाला आणि त्यावेळी संपूर्ण जपान हा केवळ एकच जिल्हा होता.” तथापि, त्यांच्या पतीची प्रकृती बिघडली आणि १८ वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला—जीवनातील या सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. त्या म्हणतात, “त्यावेळी, संपूर्ण जपानमधील बांधवांनी दाखवलेले प्रेम त्याचप्रमाणे प्रार्थना आणि सेवेमध्ये स्वतःला व्यग्र ठेवणे या गोष्टींमुळे मला मिशनरी कार्य कायम ठेवणे शक्य झाले.”

शारीरिक समस्या असतानाही सहन करणे

आल्बर्ट पास्टर हे मिशनरी गृहाचे पर्यवेक्षक म्हणतात, “अनेकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची शारीरिक समस्या आहे तरी देखील ते आनंदी आहेत आणि सेवा करण्याची त्यांची इच्छा हा एक उल्लेखनीय गुण आहे.” मिशनऱ्‍यांची काळजी घेण्यासाठी एका डॉक्टरांची तसेच त्यांच्या पत्नीची नियुक्‍ती करण्यात आली आहे आणि ती स्वतः एक नर्स देखील आहे.

सुमारे तीन वर्षांआधी, गिलियड प्रशालेच्या अकराव्या वर्गातील पदवीधर एल्सा टँग्वा यांच्या डाव्या डोळ्याची दृष्टी एके दिवशी अचानकपणे नाहीशी झाली. चार महिन्यानंतर त्यांनी उजव्या डोळ्याची देखील दृष्टी गमावली. एल्सा म्हणतात, “मला पूर्वीप्रमाणे सेवा करता येत नाही म्हणून त्यावेळी मी थोडी निराशच झाले होते. परंतु संस्थेच्या प्रेमळ तरतूदींमुळे आणि माझ्या सोबत्याच्या आणि इतरांच्या प्रेमळ सहकार्यामुळे यहोवाच्या सेवेमध्ये मला अजूनही आनंद मिळत आहे.”

शिनीची टॉरमा आणि त्यांची पत्नी मॉस्को हे एल्साचे गिलियड प्रशालेतील वर्गमित्र होते आणि त्यांनी मागील काही वर्षांपासून त्यांच्या शारीरिक प्रकृती संबंधाने अनेक परीक्षांना तोंड दिले आहे. शिनीची योग्य वक्‍ता आहेत आणि दृष्टी क्षीणतेमुळे टिपण पाहणे हे त्यांच्यासाठी एक आव्हानच आहे. अलीकडच्या वर्षांमध्ये त्यांच्या डोळ्यांवर अनेक लहान-मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या, परंतु ९० वर्षांचा त्यांचा बायबल विद्यार्थी ज्यास ते मदत करत आहेत त्याच्याविषयी बोलताना मात्र त्यांचे डोळे लकाकतात.

“शरीरात एक काटा” असताना देखील या मिशनऱ्‍यांनी त्यांच्या कमतरतेकडे पौलाने म्हटल्याप्रमाणे, “कारण जेव्हा मी अशक्‍त तेव्हाच मी सशक्‍त आहे,” या दृष्टिकोनातून पाहिले. (२ करिंथकर १२:७-१०) आणि ते खरोखरच सशक्‍त आहेत! दररोज सकाळी सात वाजता होणाऱ्‍या प्रातः उपासनेसाठी ते उठतात. नाश्‍ता केल्यानंतर ज्यांना शक्य आहे ते सकाळी लवकरच क्षेत्र सेवेसाठी जातात.

रिचर्ड आणि मार्टल शिरोमा सेवेसाठी नियमितपणे बाहेर जाणाऱ्‍यांपैकी आहेत. मार्टल यांना १९७८ मध्ये मस्तिष्काच्या धमणी विकारामुळे धक्के बसले, तरी देखील त्यांच्या पतीला प्रवासी कार्यामध्ये त्यांनी नोव्हेंबर १९८७ पर्यंत साथ दिली. आता रिचर्ड ७० वर्षांचे आहेत आणि मार्टल यांना प्रत्येक कामामध्ये मदत करतात. रिचर्ड सकाळी पाच वाजता उठतात, त्यांच्या पत्नीला पलंगावरुन उठवण्यास मदत करतात, आंघोळ घालतात, कपडे बदलतात, तिला तयार करतात आणि तिला चमच्याने भरवतात. त्यानंतर प्रत्येक सकाळी व्हील चेअर वरुन तिला क्षेत्र कार्यासाठी घेऊन जातात, घरोघरचे कार्य साधारण एक तास करतात आणि नंतर बस स्टॉपवर लोकांना साक्ष देतात. मार्टल यांना आता बोलता येत नाही; परंतु त्यांनी उच्चारलेले शेवटचे शब्द जपानी भाषेमध्ये डेनडो, डेनडो म्हणजे “प्रचार, प्रचार” यासाठी होते.

सँड्रा स्युमायडा ही त्यांची मुलगी मिशनरी गृहामध्ये त्यांची काळजी घेण्यासाठी गेली. अलीकडेच सँड्राचा पती हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. तेव्हा ती गुआम येथे तिच्या पतीबरोबर मिशनरी या नात्याने सेवा करत होती; परंतु संस्थेने तिची नियुक्‍ती पुन्हा जपानमध्ये केली, वॉचटावर संस्थेच्या या प्रेमळ व्यवस्थेबद्दल ती गुणग्राहकता बाळगते. ती म्हणते, “मी गुआम येथे असल्यामुळे माझ्या पालकांना मदत करण्याचा विशेष हिस्सा मला नाही असे मला नेहमी वाटत होते. जॉने या माझ्या बहिणीने या गृहामध्ये त्यांची काळजी घेतली आहे. त्यामुळे मला ही संधी उपलब्ध झाली तेव्हा मला हायसे वाटले. माझा पतीच्या अचानक निधनामुळे माझी कोणालातरी गरज आहे ही भावनाच माझ्यासाठी एक उपचार होती.”

क्रियाशील संस्था

मिशनऱ्‍यांना वार्धक्याचा परिणाम जाणवत असला तरीसुद्धा मिशनरी आत्म्याचा त्याग करण्यासाठी ते तयार नाहीत. (स्तोत्र ९०:१०; रोमकर ५:१२) जेरी आणि योशी टॉमा हे जपानमध्ये आलेल्या पहिल्या गिलियड पदवीधरांपैकी आहेत आणि अजूनही शिब्युया येथील प्रमुख व्यापारी क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. योशी म्हणतात, “आम्ही १९४९ मध्ये बांधण्यात आलेल्या दोन मजल्यांच्या इमारतीमध्ये आल्यानंतर प्रत्येक आश्रय स्थानाला भेटी दिल्या. टोकियो आता देशातील प्रमुख शहर झाले आहे. आम्ही वृद्ध झालो आहोत आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणे कार्य करु शकत नाही. परंतु प्रचार कार्य करुन परतल्यानंतर आम्हाला बरेच ताजेतवाने वाटते.”

लिलयान सॅमसन या ४० वर्षांपासून जपानमध्ये मिशनरी आहेत आणि त्यांच्या सेवेचा त्या पूर्ण आनंद घेत आहेत. “मी आता एका ८० वर्षांच्या स्त्रीचा अभ्यास घेत आहे व पूर्वी तिचा अभ्यास माझी मिशनरी सोबतीन ॲडिलिन नॅके घेत होती आणि सध्या ती तिच्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी हवाई येथे गेली आहे. पूर्वजांच्या उपासनेच्या समस्येवर मात केल्यावर अलीकडेच ही स्त्री राज्य प्रचारक झाली. ती मंदिरामध्ये गेली आणि तेथील पुजाऱ्‍याच्या पत्नीला तिने म्हटले, ‘मी ख्रिस्ती विश्‍वासामध्ये माझे मतांतर केले आहे!’” लियान यांचे जीवन अशाप्रकारे आनंदी असल्यामुळे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऐहिक नोकरी सोडून पायनियरींग करण्यास सुरवात केल्याचा त्यांना एकदाही खेद वाटला नाही.

रुथ अलरिक आणि मार्था हेस या ४५ पेक्षा अधिक वर्षांपासून मिशनरी सोबती आहेत आणि या मिशनरी गृहामध्ये त्यांनी ३५ वर्षे काम केले आहे. त्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःची उत्तमपणे छाप पाडली आहे. एकदा एका विभागीय पर्यवेक्षकांनी मार्थाला विचारले, “दारोदारी जाण्यासाठी मला तुमचा चेहरा उधार मिळेल का?” लोकांना मार्थाचा चेहरा चांगला परिचित होता आणि नियतकालिके घेण्यासाठी लोक तिच्याकडे येत होते, परंतु त्याच वेळेस विभागीय पर्यवेक्षकांना संभाषण सुरु करण्यासाठी फार अवघड जात होते.

रुथ यांच्याकडून एका स्त्रीने नियतकालिक मार्गाचा स्वीकार केला; या स्त्रीला शारीरिक समस्यांमुळे वाचण्यास अशक्य होते. तरी देखील या स्त्रीने नियतकालिके प्राप्त करणे कायम ठेवले आणि देवाकरता मानवजातीचा शोध हे पुठ्ठाबांधणीचे पुस्तक सुद्धा स्वीकारले. कोणीही साहित्याचे वाचन करत नाही असे वाटल्याने नियतकालिकांना सादर करणे कायम ठेवावे की ठेवू नये असा विचार रुथच्या मनामध्ये आला. नंतर एके दिवशी त्या स्त्रीच्या पतीने शोध हे पुस्तक घेऊन रुथची भेट घेतली आणि म्हटले, “हे फारच उत्तम पुस्तक आहे! मी ते दोनदा वाचले.” रूथने त्याच्याबरोबर आणि त्याच्या पत्नीबरोबर बायबल अभ्यास सुरु केला.

हे मिशनरी गृह देखील आस्थेवाईक लोकांना आकर्षित करते. एके संध्याकाळी एक युवक या गृहामध्ये आला आणि म्हणाला, “मला असे कळाले आहे की, मी येथे आलो तर मला बायबल शिकण्यास मदत मिळू शकेल.” त्याच्या बरोबर बायबल अभ्यास सुरु करण्यात आला. तो एका चीनी रेस्टॉरंटमध्ये आचारी होता आणि तेथे त्याने अनेक वर्षांपासून बहिष्कृत असलेल्या एका स्त्रीबरोबर काम केले होते. एका प्रचारकाने त्या रेस्टॉरंटला भेट दिल्यानंतर तेथे नियतकालिकांचे वाटप केले आणि त्यामुळे ही नियतकालिके रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरामध्ये देखील उपलब्ध झाली. या तरुण आचाऱ्‍याला ती नियतकालिके आवडली आणि पूर्वी साक्षीदार असलेल्या स्त्रीला प्रश्‍न विचारण्यास त्याने सुरवात केली. या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास असमर्थ असलेल्या या स्त्रीने त्याला मिशनरी गृहाला भेट देण्यासाठी सांगितले. आता तो सेवा-सेवक आणि पायनियर या नात्याने सेवा करत आहे. कालांतराने, या बहिष्कृत स्त्रीला मंडळीमध्ये पुन्हा घेण्यात आले आणि ती देखील पुढे नियमित पायनियर बनली.

या गृहातील सर्व मिशनरी यहोवाने त्यांच्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल गुणग्राहकता बाळगतात. ते ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हवाई, स्वित्झर्लंड आणि अमेरिका येथून आले होते तसेच, त्यापैकी अकरा जण गिलियड प्रशालेच्या अकराव्या वर्गातील किंवा त्याच्या आधीच्या वर्गातील होते. राज्य कार्याची जपानमधील प्रगती त्यांनी पाहिली आहे आणि राजा दाविदाच्या विचाराशी ते सहमत आहेत ज्याने म्हटले, “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान्‌ निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तोत्र ३७:२५) देवाच्या प्रेमळ काळजीची गुणग्राहकता म्हणून या मिशनऱ्‍यांनी निवृत्त न होण्याचा, परंतु यहोवाची सेवा करत राहण्याचा दृढनिश्‍चय केला आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा