खऱ्या देवाचे भय बाळगण्याचे फायदे
“तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.
१. ईश्वरी भयामुळे कोणत्या विपत्तींना टाळता आले असते?
आदामाने ईश्वरी भय विकसित केले असते, तर त्याच्या स्वतःच्या चिरकालिक मृत्यूप्रत आणि त्याच्या संततीकरता हजारो वर्षांच्या दुःखाप्रत निरवलेले पाप करण्यापासून ईश्वरी भयाने त्याला रोखले असते. इस्राएलाच्या प्राचीन राष्ट्राने यहोवाचे भय बाळगण्याबद्दल आणि त्याच्यावर प्रेम करण्याबद्दल त्याचा सल्ला ऐकला असता, तर त्या राष्ट्राला बॅबिलोनमध्ये बंदिवान करून नेण्यात आले नसते, तसेच देवाच्या पुत्राला नाकारून त्याचे रक्त सांडण्याबद्दल ते दोषी ठरले नसते. आज जगाने देवाचे भय बाळगले असते, तर सरकार किंवा व्यापार यात भ्रष्टता झाली नसती, गुन्हेगारी, युद्धे राहिली नसती.—नीतीसूत्रे ३:७.
२. आपल्या भोवतालच्या जगाची परिस्थिती अशी असतानाही आपण यहोवाचे भय का विकसित केले पाहिजे?
२ आपल्या भोवतालचे जग काहीही करत असले तरीसुद्धा, आपण वैयक्तिक, कुटुंबे आणि यहोवाच्या सेवकांच्या मंडळ्या या नात्याने खऱ्या देवाबद्दल भय विकसित करण्यापासून लाभ मिळवू शकतो. ही गोष्ट, मोशेने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या स्मरणिकेच्या सुसंगतीत आहे: ‘तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय धरावे, त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याच्यावर प्रीति करावी, पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने तुझा देव परमेश्वर ह्याची सेवा करावी आणि परमेश्वराच्या ज्या आज्ञा तुझ्या बऱ्यासाठी आहेत त्या तू पाळाव्या; तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून ह्यापेक्षा जास्त काय मागतो?’ (अनुवाद १०:१२, १३) आपण, यहोवा या खऱ्या देवाचे भय बाळगतो तेव्हा आपल्याला प्राप्त होणारे काही लाभ कोणते आहेत?
बुद्धी—सोन्यापेक्षा मोलवान
३. (अ) आपण मिळवू शकतो तो प्रमुख लाभ कोणता आहे? (ब) स्तोत्र १११:१० चा काय अर्थ आहे?
३ सर्वात प्रथम लाभ म्हणजे, खरी बुद्धी होय. स्तोत्र १११:१० म्हणते: “परमेश्वराचे भय ज्ञानाचा [बुद्धी] आरंभ होय.” याचा काय अर्थ होतो? समस्या सोडवण्यासाठी, धोका टाळण्यासाठी आणि काही विशिष्ट ध्येये प्राप्त करण्यासाठी यशस्वीपणे ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी होय. त्यामध्ये योग्य निर्णय घेणे समाविष्ट आहे. अशा बुद्धीची सुरवात, पहिला भाग आणि पाया म्हणजे यहोवाचे भय आहे. का बरे? कारण सर्व निर्मिती त्याच्या हातांची कृती आहे. ती त्याच्यावर विसंबून आहे. त्याने मानवजातीला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली, परंतु त्याच्या मार्गदर्शनाविना यशस्वीपणे आपल्या पावलांचे निदर्शन करण्याची क्षमता त्याने त्यांना दिली नाही. (यहोशवा २४:१५; यिर्मया १०:२३) आपण केवळ जीवनाच्या त्या मूलभूत वास्तविकतांचे गुणग्रहण केले आणि त्यांच्या एकवाक्यतेत जगलो तर आपल्याला कायमचे यश मिळू शकते. यहोवाबद्दलचे आपले ज्ञान, देवाच्या इच्छेला निश्चित यश मिळेल आणि विश्वासूपणाचा मोबदला देण्याचे त्याचे अभिवचन व क्षमता ठाम असेल अशी भक्कम खात्री पटवत असल्यास, ईश्वरी भय आपल्याला बुद्धिमत्तेने कृती करण्यास प्रवृत्त करील.—नीतीसूत्रे ३:२१-२६; इब्रीयांस ११:६.
४, ५. (अ) एका तरुण पुरुषाच्या विद्यालयीन शिक्षणाने त्याला खरी बुद्धी का दिली नाही? (ब) या पुरुषाने व त्याच्या बायकोने नंतर खरी बुद्धी कशी प्राप्त केली आणि यामुळे त्यांचे जीवन कसे बदलले?
४ एका उदाहरणाचा विचार करा. काही दशकांआधी, एक तरुण पुरुष कॅनडातील सस्केचवन विद्यापीठात शिकत होता. अभ्यासक्रमात जीवशास्त्र हा विषय होता आणि त्याला उत्क्रांतीचे शिक्षण दिले जात असे. पदवीधर झाल्यावर अणुभौतिकशास्त्रात तो तज्ज्ञ बनला आणि टोरोंटोच्या विद्यापीठात त्याचा अभ्यास पुढे चालू ठेवण्याकरता त्याला शिष्यवृत्ती मिळाली. तो अभ्यास करीत गेला तसे, अणुच्या रचनेतील व्यवस्था आणि मांडणीचा अद्भुत पुरावा त्याला दिसला. परंतु, या सर्वांची रचना कोणी केली? केव्हा? आणि कशाला? या प्रश्नांना कोणतीही उत्तरे देण्यात आली नाहीत. त्या उत्तरांविना त्यावेळी युद्ध करीत असलेल्या जगात तो संभवतः आपले ज्ञान बुद्धिमत्तेने वापरू शकत होता का? त्याला कोणती गोष्ट मार्गदर्शित करू शकत होती? राष्ट्रीयवाद? भौतिक बक्षीसांची इच्छा? खरोखरच, त्याने खरी बुद्धी संपादली होती का?
५ पदवीधर झाल्यावर लगेचच, तो तरुण पुरुष आणि त्याची बायको यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागले. देवाच्या स्वतःच्या वचनातून, त्यांना पूर्वी मिळाली नव्हती अशी उत्तरे मिळू लागली. त्यांना निर्माणकर्ता, यहोवा देव याची ओळख पटली. लाल समुद्रापाशी मोशेविषयी आणि बॅबिलोनमध्ये दानीएल आणि त्याच्या साथीदारांविषयी ते शिकले तसे, त्यांनी मनुष्याचे नव्हे तर देवाचे भय बाळगण्याचे महत्त्व शिकून घेतले. (निर्गम १४:१०-३१; दानीएल ३:८-३०) असे ईश्वरी भय व त्यासोबत यहोवाबद्दल खरे प्रेम त्यांना प्रवृत्त करू लागले. लवकरच त्यांचे सबंध जीवनक्रम बदलले. शेवटी, त्या तरुण पुरुषाला जीवशास्त्रामध्ये ज्याच्या हाताच्या कृतीबद्दल त्याने शिकले होते त्या व्यक्तीची ओळख पटली. भौतिकशास्त्राच्या अभ्यासात ज्याची बुद्धी प्रतिबिंबित झालेली त्याला दिसली त्या व्यक्तीचा उद्देश त्याला समजू लागला. आपल्या सहमानवाचा नाश करील अशी उपकरणे उत्पन्न करण्यात आपले ज्ञान वापरण्याऐवजी, त्याला व त्याच्या पत्नीला इतरांना देवावर आणि त्यांच्या शेजाऱ्यावर प्रीती करण्यास मदत करावयाचे होते. त्यांनी देवाच्या राज्याचे उद्घोषक म्हणून पूर्ण वेळेच्या सेवेत आपले नाव नोंदवले. नंतर, ते वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेला उपस्थित राहिले आणि त्यांना मिशनरी म्हणून पाठवण्यात आले.
६. यहोवाचे भय बाळगणे यामध्ये आपली बुद्धी मुळावलेली असल्यास, आपण कोणत्या अदूरदर्शी ध्येयांना टाळू आणि त्याऐवजी आपण काय करू?
६ अर्थात, सर्वचजण मिशनरी बनू शकत नाहीत. परंतु, यहोवाचे भय यामध्ये मुळावलेल्या बुद्धीचा आनंद आपण सर्वजण घेऊ शकतो. ती बुद्धी विकसित केल्यास, आपण उत्सुकतेने मनुष्यांचे तत्त्वज्ञान घेत राहणार नाही. खरे म्हणजे, जीवन काय आहे याचा ते केवळ अंदाज लावत आहेत. आपण स्वतः, जीवनाचा स्रोत यहोवा देव, जो आपल्याला चिरकालिक जीवन देऊ शकतो त्याच्याद्वारे प्रेरित असलेल्या बायबलचा अभ्यास करू लागू. (स्तोत्र ३६:९; कलस्सैकर २:८) नाशाच्या कडेवरून जणू कोसळून पडण्याच्या बेतात असणाऱ्या व्यापारी व्यवस्थेचे दास होण्याऐवजी, अन्न आणि निवारा याने तृप्त असण्याच्या यहोवाच्या सल्ल्याकडे आपण लक्ष देऊ आणि त्यादरम्यान देवाबरोबरील आपला नातेसंबंध जीवनातील सर्वात प्रमुख गोष्ट बनवू. (१ तीमथ्य ६:८-१२) या जगात आपले भविष्य आपल्या श्रीमंत होण्यावर अवलंबून आहे असे समजून कार्य करण्याऐवजी, यहोवाचे वचन आपल्याला, जग व त्याची वासना नाहीशी होत आहे पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो असे सांगते तेव्हा आपण त्यावर विश्वास ठेवू या.—१ योहान २:१७.
७. (अ) मूल्यांचा संतुलित दृष्टिकोन राखण्याबद्दल नीतीसूत्रे १६:१६ आपल्याला कशी मदत देते? (ब) देवाची इच्छा आपल्या जीवनातील केंद्रबिंदू बनवल्यावर कोणते प्रतिफळ प्राप्त होतील?
७ नीतीसूत्रे १६:१६ खरेपणाने असे म्हणून उत्तेजन देते: “ज्ञानप्राप्ती [परमेश्वराच्या भयामुळे प्राप्त होणारी बुद्धी] उत्कृष्ट सोन्यापेक्षा किती उत्तम आहे! बुद्धी संपादन करणे रुप्यापेक्षा इष्ट आहे.” देवाची इच्छा करणे ही गोष्ट आपल्या जीवनात केंद्रस्थानी ठेवण्यासाठी अशी बुद्धी व समज आपल्याला प्रवृत्त करणार आहे. मानवी इतिहासातील या काळासाठी देवाने त्याच्या साक्षीदारांना कोणते काम सोपविले आहे? त्याच्या राज्याविषयी प्रचार करणे आणि प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य होण्यास मदत करणे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) हे कार्य खरे समाधान आणि पुष्कळ आनंद यांचा मोबदला देते. मग, बायबल उचितपणे असे म्हणते: “ज्याला ज्ञान [बुद्धी] प्राप्त होते . . . तो मनुष्य धन्य होय.”—नीतीसूत्रे ३:१३.
पातक करण्यापासून सुरक्षित राहा
८. (अ) देवाचे भय बाळगल्याने मिळणारा दुसरा लाभ सांगा. (ब) आपल्याला ज्यापासून सुरक्षित ठेवले आहे ती वाईट गोष्ट कोणती आहे? (क) ईश्वरी भय प्रवृत्त करणारी प्रभावी शक्ती कशी बनते?
८ देवाचे भय धरण्यापासून होणारा दुसरा लाभ म्हणजे, आपल्याला वाईट करण्यापासून सुरक्षित ठेवले जाते. देवाचा खोल आदर बाळगणाऱ्या व्यक्ती, चांगले काय आणि वाईट काय याचा निर्णय स्वतः घेत नाहीत. देव ज्या गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतो त्यांना ते वाईट लेखत नाहीत, त्याचप्रमाणे देव ज्या गोष्टी वाईट आहेत असे सांगतो त्या चांगल्या आहेत असा विचार ते करत नाहीत. (स्तोत्र ३७:१, २७; यशया ५:२०, २१) त्याशिवाय, ईश्वरी भयाने प्रवृत्त झालेली व्यक्ती, यहोवा ज्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट असल्याचे सांगतो त्या केवळ जाणल्यावर थांबत नाही. अशी व्यक्ती यहोवा ज्या गोष्टींना पसंत करतो त्यांना पसंत करते आणि यहोवा ज्यांचा वीट करतो त्यांचा ती वीट करते. परिणामस्वरूप, ती देवाच्या दर्जाच्या एकवाक्यतेत जीवन व्यतीत करते. अशाप्रकारे, नीतीसूत्रे १६:६ मध्ये सांगितल्याप्रमाणे, “परमेश्वराचे भय बाळगिल्याने मनुष्ये दुष्कर्मांपासून दूर राहतात.” असे ईश्वरी भय, एखादी व्यक्ती जे स्वतःहून प्राप्त करू शकत नाही ते साध्य करण्यासाठी प्रवृत्त करणारी सामर्थ्यशाली शक्ती ठरते.
९. देवाला नाखूष न करण्याच्या तीव्र इच्छेने मेक्सिकोमधील एका स्त्रीच्या निर्णयाला कसे प्रभावीत केले आणि त्याचा काय परिणाम झाला?
९ ईश्वरी भय एखाद्या व्यक्तीमध्ये विकसित होण्यास सुरु झाले असले, तरी आपल्या उर्वरित जीवनात त्या व्यक्तीला पस्तावा होईल अशी कोणतीही गोष्ट करण्याचे टाळण्यास ते तिला बळकट करील. उदाहरणार्थ, मेक्सिकोमधील एका गर्भवती स्त्रीने यहोवाच्या एका साक्षीदाराला गर्भपाताविषयी विचारले. साक्षीदाराने त्या स्त्रीला पुष्कळ शास्त्रवचने वाचून दाखवल्यावर अशी कारणमीमांसा केली: “निर्माणकर्त्याच्या दृष्टित जीवन, अद्याप न जन्मलेल्यांचेही जीवन फार महत्त्वपूर्ण आहे.” (निर्गम २१:२२, २३; स्तोत्र १३९:१३-१६) वैद्यकीय परीक्षणाने, तिचे बाळ विकृत असेल असे सांगितले होते. परंतु, आता देवाच्या वचनातून तिने जे पाहिले त्याने प्रवृत्त झाल्यामुळे तिने बाळास जन्म देण्याचे ठरवले. तिच्या डॉक्टरांनी तिला पुन्हा पाहण्यास नकार दिला, तिच्या पतीने तिला सोडून देण्याची धमकी दिली, परंतु ती खंबीर राहिली. कालांतराने, तिने सर्वसाधारण, स्वास्थपूर्ण आणि सुंदर अशा मुलीला जन्म दिला. कृतज्ञतेमुळे तिने साक्षीदारांना शोधून काढले आणि ते तिच्यासोबत देवाच्या वचनाचा अभ्यास करू लागले. एका वर्षाच्या आतच तिचा व तिच्या पतीचा बाप्तिस्मा झाला. काही वर्षांनी एका प्रांतीय अधिवेशनात, त्यांना पहिल्या साक्षीदारांना भेटण्यास व त्यांची चार वर्षांची सुंदर मुलगी हिच्याशी त्यांचा परिचय करून देण्यास फारच आनंद वाटला. देवाबद्दल योग्य आदर आणि त्याला नाखूष न करण्याची तीव्र इच्छा या गोष्टी एखाद्याच्या जीवनात नक्कीच शक्तीशाली प्रभाव पाडतात.
१०. ईश्वरी भय लोकांना कोणत्या प्रकारच्या पातकांपासून मुक्त होण्यास बळकट करू शकते?
१० ईश्वरी भय आपल्याला विविध अपराधांपासून सरंक्षण देते. (२ करिंथकर ७:१) योग्यरीतीने विकसित केल्यास, ते एखाद्या व्यक्तीच्या गुप्त पापांना, जी केवळ तिला आणि यहोवाला ठाऊक असतात, थांबवण्यास तिची मदत करते. ते त्याला मद्याचा किंवा मादक औषधांचा दुरुपयोग याच्या दास्यातून मुक्त करण्यास मदत करू शकते. दक्षिण आफ्रिकेत पूर्वी मादक औषधांचे व्यसन असणाऱ्या एका व्यक्तीने असे स्पष्ट केले: “मी देवाचे ज्ञान घेऊ लागलो तसे, देवाला दुःखित करण्याचे किंवा त्याला नाखूष करण्याचे भय माझ्यामध्ये विकसित होऊ लागले. तो पाहत असल्याचे मला ठाऊक होते आणि त्याच्या नजरेत स्वीकृती मिळवण्याची माझी खूप इच्छा होती. त्या गोष्टीने माझ्याजवळ असणारी मादक औषधे शौचालयात टाकून त्यांना नष्ट करण्यास मला प्रवृत्त केले.” ईश्वरी भयाने अशा पद्धतींनी आणखी हजारोंची मदत केली आहे.—नीतीसूत्रे ५:२१; १५:३.
मनुष्यांची भीती बाळगण्यापासून संरक्षण
११. यहोवाचे हितकारक भय आपल्याला कोणत्या सर्वसामान्य पाशापासून सुरक्षित ठेवू शकते?
११ देवाचे हितकारक भय आपल्याला मनुष्यांचे भय बाळगण्यापासूनही सुरक्षित ठेवते. पुष्कळ लोक कमीअधिक प्रमाणात मनुष्याच्या भयाने पीडित आहेत. येशू ख्रिस्ताला गेथशेमानेच्या बागेत सैनिकांनी पकडले त्यावेळी त्याचे प्रेषितही त्यास सोडून पळून गेले. त्यानंतर, मुख्य याजकाच्या अंगणात असताना, असंयमी होऊन तसेच भीतीच्या पकडीत असताना पेत्राने तो येशूच्या शिष्यांपैकी एक असल्याचे व तो त्यास कधी ओळखत असल्याचेही नाकारले. (मार्क १४:४८-५०, ६६-७२; योहान १८:१५-२७) परंतु, प्रेषितांना त्यांचे आध्यात्मिक संतुलन पुन्हा प्राप्त करण्यासाठी मदत देण्यात आली. दुसऱ्या बाजूला पाहता, यहोयाकीम राजाच्या दिवसात शमायाचा पुत्र उरीया इतका भयग्रस्त झाला की, त्याने यहोवाचा संदेष्टा या नात्याने असलेली आपली सेवा त्यागली आणि देशातून पळून गेला, परंतु त्याला पकडण्यात आले आणि ठार मारण्यात आले.—यिर्मया २६:२०-२३.
१२. (अ) नीतीसूत्रे २९:२५ मनुष्याच्या भयापासून कोणत्या संरक्षणाकडे निर्देश करते? (ब) देवावरील भरवसा कसा वाढवला जातो?
१२ मनुष्याच्या भयावर विजय मिळविण्यास कोणती गोष्ट एखाद्या व्यक्तीला मदत करू शकते? “मनुष्याची भीती पाशरूप होते” असा ईशारा दिल्यावर, नीतीसूत्रे २९:२५ पुढे म्हणते: “जो परमेश्वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” यहोवावर भरवसा ठेवणे ही गुरुकिल्ली आहे. असा भरवसा ज्ञान आणि अनुभव यावर आधारलेला असतो. यहोवाच्या वचनाचा अभ्यास केल्याने, आपण त्याच्या मार्गांच्या योग्यतेचे प्रमाण पाहतो. त्याची खात्रीलायकता, त्याच्या अभिवचनांची निश्चितता (पुनरुत्थानाच्या अभिवचनासहित), त्याचे प्रेम आणि सर्वशक्तीमान सामर्थ्य यांना प्रदर्शित करणाऱ्या घटनांशी आपण परिचित होतो. त्यानंतर आपण त्या ज्ञानानुरुप कार्य करतो, म्हणजेच यहोवा निर्देशित करतो त्या गोष्टी करतो आणि तो ज्या गोष्टींविरुद्ध इशारा देतो त्या गोष्टी खंबीरतेने नाकारतो त्यावेळी, आपण त्याची प्रेमळ काळजी आणि त्याची खात्रीलायकता यांचा प्रथम अनुभव घेऊ लागतो. त्याची इच्छा पूर्ण करण्यास त्याची शक्ती कार्य करू लागते याचा पुरावा आपण व्यक्तिशः पाहतो. त्याच्यावरील आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्यासोबतच त्याच्याबद्दल आपले प्रेम आणि त्याला नाखूष न करण्याची मनःपूर्वक इच्छा देखील वाढते. असा भरवसा एका मजबूत पायावर उभारला जातो. तो मनुष्याच्या भयाविरुद्ध तटाप्रमाणे कार्य करतो.
१३. ईश्वरी भय आपल्याला आपल्या ऐहिक कामाच्या ठिकाणी, घरी आणि शाळेत कसे मदत करू शकते?
१३ आपण अप्रामाणिकपणाच्या व्यापारात भाग घेण्यास नाकारल्यामुळे आपल्या मालकाने नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली असल्यास, यहोवावर भरवसा ठेवणे तसेच ईश्वरी भय बाळगणे आपल्याला उचित ते करण्यास बळकट करील. (पडताळा मीखा ६:११, १२.) असे ईश्वरी भय पुष्कळ हजारो ख्रिश्चनांना, विश्वासात नसणाऱ्या कौटुंबिक सदस्यांकडील विरोधाचा सामना करत असताना, खऱ्या उपासनेत टिकून राहण्यास दृढ करते. तसेच ते शाळेत जाणाऱ्या युवकांना त्यांची ओळख यहोवाचे साक्षीदार म्हणून करून देण्यास धैर्य देते आणि बायबलच्या दर्जांची थट्टा करणाऱ्या वर्गसोबत्यांकडील उपहासाला तोंड देण्यास दृढ करते. यास्तव, एका किशोरवयीन साक्षीदाराने म्हटले: “ते जो विचार करतात तो इतका महत्त्वाचा नाही. यहोवा जो विचार करतो तो महत्त्वाचा आहे.”
१४. यहोवाच्या सेवकांचे जीवन धोक्यात येते तेव्हा देखील ते विजयी कसे होतात?
१४ तीच खात्री खऱ्या ख्रिश्चनांना, त्यांचे जीवन धोक्यात असते, तेव्हा देखील त्यांना खंबीरपणे यहोवाच्या मार्गांना धरून राहण्यास दृढ करते. त्यांनी जगाकडून छळाची अपेक्षा करावी हे त्यांना माहीत आहे. प्रेषितांना फटके मारण्यात आले होते आणि दुष्ट मनुष्यांनी स्वतः येशू ख्रिस्ताला मारले व ठार केले याची जाणीव त्यांना आहे. (मार्क १४:६५; १५:१५-३९; प्रेषितांची कृत्ये ५:४०; पडताळा दानीएल ३:१६-१८.) परंतु, यहोवाच्या सेवकांना पूर्ण आत्मविश्वास आहे की, तो त्यांना टिकून राहण्यास बळकट करील; देवाच्या मदतीने ते विजयी होऊ शकतात; विश्वासू असणाऱ्यांना देव निश्चितच प्रतिफळ देईल—आवश्यकता पडल्यास त्याच्या नवीन जगात तो त्यांना पुनरुत्थितही करील. देवाबद्दल त्यांचे प्रेम व ईश्वरी भय, त्याला नाखूष करील अशी कोणतीही गोष्ट करण्याचे टाळण्यास त्यांना प्रभावीपणे प्रवृत्त करते.
१५. नात्सी छळ छावण्यांमध्ये यहोवाच्या साक्षीदारांना त्यांची सत्वनिष्ठा टिकवून ठेवण्यास कोणत्या गोष्टीने मदत दिली?
१५ या प्रेरणेने यहोवाच्या साक्षीदारांना १९३० आणि १९४० च्या दशकांमधील नात्सी छळ छावण्यांच्या दहशतीला तोंड देण्यास बळकट केले. त्यांनी लूक १२:४, ५ मध्ये आढळणारा येशूचा सल्ला अंतःकरणाप्रत घेतला: “माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराचा वध करितात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करिता येत नाही त्यांची भीति बाळगू नका. तुम्ही कोणाची भीति बाळगावी हे मी तुम्हास सुचवून ठेवितो वध केल्यावर नरकात टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीति बाळगा; हो, मी तुम्हास सांगतो त्याचीच भीति बाळगा.” अशाप्रकारे, गुस्तव ऑश्नर हा साक्षीदार जो झॉक्सनहॉझन छळ छावणीत होता, त्याने नंतर लिहिले: ‘एसएसनी ऑगस्ट डिकमॉन याला गोळी झाडून ठार मारले आणि आम्ही आमचा विश्वास नाकारण्यासाठी एका कागदावर स्वाक्षरी दिली नाही तर आम्हालाही गोळी झाडून ठार मारण्यात येईल असे धमकावण्यात आले. आम्हापैकी एकानेही सही केली नाही. त्यांच्या गोळ्यांच्या भीतीपेक्षा आम्हाला यहोवाला नाखूष करण्याचे अधिक भय वाटत होते.’ मनुष्याचे भय हातमिळवणी करण्याकडे निरवते परंतु देवाचे भय एखाद्याला योग्य ते करण्यास खंबीर बनवते.
जीवनाचा बचाव
१६. जलप्रलय येईपर्यंत, दशकानुदशके नोहाला योग्य मार्गात टिकून राहण्यात कोणत्या गोष्टीने मदत पुरवली आणि त्याच्यासाठी व त्याच्या घराण्यासाठी त्याचा काय परिणाम झाला?
१६ नोहा, जलप्रलयापूर्वीच्या जगातील शेवटल्या दिवसातून पार पडला. मनुष्याच्या दुष्टतेमुळे यहोवाने त्या काळच्या दुष्ट जगाला नष्ट करण्याचे ठरवले होते. तथापि, त्यादरम्यान हिंसा, अतिनिंद्य अनैतिकता आणि ईश्वरी इच्छेबद्दल औदासिन्य या गोष्टींनी भरलेल्या जगात नोहा जगत होता. नीतिमत्वतेबद्दल नोहा प्रचार करीत होता, तरीही “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही.” (मत्तय २४:३९) तरीही, देवाने नोहाला नेमून दिलेल्या कामापासून तो मागे हटला नाही. “देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्पत्ती ६:२२) जलप्रलय येईपर्यंत, नोहाला वर्षानुवर्षे योग्य कृती करण्यास कोणत्या गोष्टीने मदत दिली? इब्रीयांस ११:७ (प. र. भाषांतर) उत्तरते: ‘विश्वासाने नोहाने, ज्या गोष्टी अजूनपर्यंत कोणी पाहिल्या नव्हत्या त्याविषयी देवाकडून सूचना मिळाल्यावर, ईश्वरी भय धरले.’ परिणामस्वरूप, तो व त्याची पत्नी आणि त्याचे पुत्र व त्यांच्या बायका यांना जलप्रलयातून वाचवण्यात आले.
१७. (अ) इतर लोक जे करतात त्याकडे लक्ष न देता आपण काय केले पाहिजे? (ब) यहोवाचे भय बाळगणारेच खरोखर आनंदी लोक का आहेत?
१७ नोहाच्या दिवसाशी पुष्कळ बाबतीत साम्य असलेल्या काळात आपण जगत आहोत. (लूक १७:२६, २७) पुन्हा एकदा इशारा दिला जात आहे. प्रकटीकरण १४:६, ७ प्रत्येक राष्ट्राच्या आणि जातीच्या आणि भाषेच्या लोकांना, “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा,” असे आर्जवणारा देवदूत जो आकाशात उडत आहे त्याच्याबद्दल सांगते. तुमच्या भोवतालचे जग काहीही करत असले, तरी त्या शब्दांकडे लक्ष द्या आणि मग इतरांना ते आमंत्रण द्या. नोहाप्रमाणे, विश्वासाने कार्य करा आणि ईश्वरी भय दाखवा. तुम्ही तसे केल्यास, तुमचे तसेच इतर अनेकांचेही जीवन वाचवले जाईल. खऱ्या देवाची भीती बाळगणारे ज्या लाभांचा आनंद लुटतात त्याचा विचार आपण करतो तसे, आपण केवळ प्रेरित स्तोत्रकर्त्याशी सहमत होऊ शकतो, त्याने गायिले: “जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य.”—स्तोत्र ११२:१.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ खऱ्या देवाचे भय बाळगल्याने मिळणारे काही उल्लेखनीय लाभ कोणते आहेत?
◻ ईश्वरी भय यामध्ये मुळावलेली बुद्धी आपले संरक्षण कशी करू शकते?
◻ ईश्वरी भय आपल्याला वाईटापासून कसे वळवते?
◻ ईश्वरी भय आपल्याला मनुष्याच्या भयापासून संरक्षण कसे देते?
◻ ईश्वरी भयाचा आपल्या भवितव्यातील जीवनाच्या आशेसोबत काय संबंध आहे?
[१६, १७ पानांवरील चित्रं]
“जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य.”—स्तोत्र ११२:१